आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी शॉर्टफिल्म:शोध पाण्याच्या तळाचा...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

‘डे झीरो’च्या कथेनुसार मला शॉर्टफिल्ममध्ये कुठेच हिरवळ किंवा पाणी नको होते. पण, त्याच काळात पुण्यात पाऊस सुरू झाला. लोकेशनवर हिरवळ उगवेल, याची सगळ्यांना भीती होती. मात्र, तसे झाले नाही. पाऊस थांबला, शूटिंग सुरू झाले. खरे तर, माझी फिल्म पाण्याच्या तळाचा शोध घेणारी. पण, ती बनवताना हाच पाऊस मला नकोसा झाला होता…

पाण्याच्या टंचाईवर एखादी शॉर्टफिल्म करावी किंवा काहीतरी कलाकृती साकारावी, हे २०१९ च्या उन्हाळ्यात माझ्या मनात आले. मी सुटीसाठी घरी गेलो होतो. त्यावेळी आमच्याकडे दीड महिन्यातून एकदा नळाला पाणी यायचे. पाण्यासाठीच सारी कसरत करावी लागे. जिल्ह्याच्या ठिकाणी ही परिस्थिती असेल, तर ग्रामीण भागात काय अवस्था असेल, याचा मी विचार करू लागलो. सुटी संपवून पुण्याला परतलो, त्यावेळी माझ्या डोक्यात ‘डे झीरो’ची कथा आकार घेत होती.

खेड्यातच काय; अगदी अनेक तालुक्यांच्या, जिल्ह्यांच्या ठिकाणी सुद्धा आजही मोठ्या प्रमाणात पिण्याच्या पाण्याची समस्या उभी राहते. पाण्याचा साठा संपतो, तेव्हा प्रत्येक माणूस स्वबळावर ते शोधण्याची मोहीम सुरू करतो. हे सूत्र समोर ठेऊन कथेचा विस्तार केला. एक वयस्कर माणूस नकाशाच्या मदतीने शहरापासून खूप दूर असलेल्या पठारावर पाणी शोधण्यासाठी येऊन पोहोचतो.. प्रचंड तळपत्या उन्हात, बर्याच प्रवासानंतर मुक्कामाजवळ पोहोचल्याने तो आनंदात असतो.. पुढे प्रवास सुरू करणार तेवढ्यात अचानक एक जण हल्ला करून त्याला ठार करतो.. आणि इथूनच ही शॉर्टफिल्म पुढे सरकते…

आता ही कथा तर तयार होती, पण ती पडद्यावर कशी मांडायची, याविषयी मी बराच काळ विचार करत होतो. अनेक मित्रांना कथा ऐकवली. प्रत्येक जण सल्ले, सूचना देत होता. शेवटी दृश्य माध्यमात मांडता येईल, अशी एक पटकथा तयार झाली. ती मित्रांना ऐकवली. सगळे जण विना मोबदला काम करायला तयार झाले. कमीत-कमी पैसे खर्च करून आपण ही फिल्म कशी बनवू शकतो, यावर भरपूर चर्चा झाली. पण, हे माध्यमच खर्चिक असल्याने चित्रीकरणाएवढ्या पैशांची मी आई-वडिलांकडून जुळणी करुन ठेवली.

सगळी टीम शॉर्टफिल्मच्या कामात गुंतली. ही फिल्म कोण चित्रीत करेल, याचा शोध घेऊ लागलो. एका मित्राच्या सल्ल्याने मी चिन्मय बाविस्करला भेटलो. त्याला कथा आवडली. तो फिल्मच्या छायाचित्रणास तयार झाला. तो सोबत नसता, तर आज फिल्म जशी दिसतेय, तशी बनली नसती. फिल्ममध्ये मुख्य भूमिका कोण करणार, हे माझ्या नजरेसमोर आधीपासूनच होते. ऋषभ राठोड हा माझा खूप जवळचा मित्र आणि चांगला अभिनेता. त्याला मुख्य भूमिकेत घ्यायचे निश्चित केले. पुण्यातलेच लोकेशन ठरवले. शूटिंगच्या तारखा ठरल्या. सगळी तयारी झाली. कथेनुसार मला फिल्ममध्ये कुठेच हिरवळ किंवा पाणी नको होते. पण, त्याच काळात पुण्यात पाऊस सुरू झाला. लोकेशनवर हिरवळ उगवेल, याची सगळ्यांना भीती होती. मात्र, तसे झाले नाही. पाऊस थांबला, शूटिंग सुरू झाले. खरे तर, माझी फिल्म पाण्याच्या तळाचा शोध घेणारी. पण, ती बनवताना हाच पाऊस मला नकोसा झाला होता. हे ढगात भरणारे पाणी, कसे असते नाही?

‘वनराई’ने दिला हात...
चित्रीकरणानंतर पैसे नसल्याने पुढचे काम खूप हळू सुरू होते. अशातच पोस्ट प्रॉडक्शनची आर्थिक जबाबदारी सुधीर पवार आणि ‘वनराई’ या पर्यावरणासाठी काम करणाऱ्या संस्थेचे सचिव अमित वाडेकर यांनी घेतली. त्यामुळे कामाला गती आली. अजिंक्य कुलकर्णीचे संकलन आणि रोहित मुलमुलेचे ध्वनिमुद्रण व संगीत यांमुळे शॉर्टफिल्मचे एकूणच सादरीकरण लक्षवेधी झाले. पण, कोरोना भारतात आला आणि पुन्हा काम ठप्प झाले. आता ‘डे झीरो’ वेगवेगळ्या फिल्म फेस्टिवलमध्ये पाण्याची कहाणी सांगत फिरतेय.

शुभम पांडव (लेखक, दिग्दर्शक)

बातम्या आणखी आहेत...