आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

माझी शॉर्टफिल्म:हा अतोनात कोलाहल मनातला...

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वकिली करताना पारधी समाजातील गुन्हे दाखल झालेल्या तरुणांचा जामीन करण्याचे अनेक प्रसंग आले. बहुतांश तरुणांवरील गुन्हे खोटे असत. पण, ही पुरुष मंडळी तुरुंगात जायची, तेव्हा त्यांच्या स्त्रिया जीवाचे रान करून त्यांच्या सुटकेसाठी झुंजतात, हे मी पाहिले. या बायकांची जिद्द, त्यांचा अथक संघर्ष मला लिहिण्यासाठी प्रेरक ठरला आणि तिथेच ‘दरमजल’ची कथा आकाराला आली.

पारधी कुटुंबाच्या वाट्याला येणाऱ्या संघर्षाचा विषय मनात कितीतरी दिवस घोळत होता. दोन वर्षे कथा- पटकथेवर काम केल्यानंतर शॉर्टफिल्म करायचे ठरवले, तेव्हा आमच्यापुढे सर्वांत मोठे आव्हान होते, ते पारधी भाषेचे. तशी भाषा कलाकारांना बोलता यावी, यासाठी त्यांच्या मुलाखती घेतल्या. पारधी भाषेच्या उच्चाराचा दोन महिने सराव करून घेतला. एकु या स्त्री व्यक्तिरेखेसाठी दोन वेळा ऑडिशन घ्यावी लागली. त्यावेळी औरंगाबाद, सातारा, अकोला, परभणी, सोलापूर, पुणे येथून कलाकार आलेले. तरीही एकुशी साधर्म्य असणारी कलाकार मिळत नव्हती. नंतर बीडमधीलच कलाकारांचे ऑडिशन घेतले. नववीत शिकत असलेल्या क्षितिजा शिंदे हिने दोन-तीन संवाद हुबेहुब म्हणून दाखवले अन् एकुचा शोध संपला.

सर्व व्यक्तिरेखांच्या निवडीनंतर लोकेशनसाठी बीडपासून श्रीगोंद्यापर्यंत फिरलो. शेवटी आष्टी तालुक्यातील सराटे वडगांव, आनंदवाडी परिसरातील माळरानाचा परिसर आम्ही निवडला. चित्रीकरणावेळी अनंत अडचणींना तोंड द्यावे लागले. २०१९ च्या मे महिन्यात शूटिंग सुरू होते. आष्टी तालुक्यातील पाणीटंचाई सर्वश्रुत आहे. १० ते १५ कलाकार, तंत्रज्ञ यांच्यासाठी पिण्याचे पाणी १५ किलोमीटरवरून आणावे लागायचे. तेही वेळेवर मिळत नव्हते. पण, टीमचे सदस्य सुरेश सुंबरे यांनी स्वतःची जबाबदारी समजून तब्बल पाच-सहा दिवस सर्वांची जेवणाची, राहण्याची सोय केली.

शूटिंग ऐन भरात आले असताना कॅमेर्यातील एसडी कार्डची क्षमता संपली. आणखी दहा सीन शूट करणे बाकी होते. आष्टी, जामखेड येथे जावून कार्डचा शोध घेतला, पण मिळाले नाही. दोन दिवस सर्व कलाकार, तंत्रज्ञ, बसून राहिले. माझी अस्वस्थता वाढली. जितेंद्र सिरसाट यांना फोन करून अडचण सांगितली. त्यांनी तत्काळ बीडवरून कार्ड उपलब्ध करून दिले आणि मी सुटकेचा निश्वास टाकला. शूटिंग पुन्हा सुरू झाले.

शॉर्टफिल्मचा क्लायमॅक्स सुरू होता. द्वारका ही मुख्य व्यक्तिरेखा साकारणाऱ्या कलाकार सुरेखाताई यांचे पती रागातच आले. शूटिंग सहा दिवस कसे लांबले? मी पत्नीला आत्ताच्या आत्ता घेवून जाणार, मुलाबाळांची हेळसांड होतेय, म्हणून इरेला पेटले. शूटिंग थांबवावे लागले. सगळे युनिट त्यांना समजावून सांगत होते, पण ते निर्णयावर ठाम होते. दोन वर्षांपासून सुरू असलेल्या मेहनतीवर पाणी फेरणार असे वाटू लागले. मेकअपमॅन नीलेश गव्हाळे व इतरांनी समजूत काढल्यावर ते शांत झाले. पण, तोपर्यंत सूर्यास्ताची वेळ झाली. संधिप्रकाश पसरू लागल्याने तो सीन पुन्हा दुसऱ्या दिवशी चित्रीत करावा लागला.

एका पारधी कुटुंबावर समाजातील विषमतेमुळे कसे अमानवी प्रसंग ओढावतात याची कहाणी म्हणजे ‘दरमजल’. या कुटुंबातील सुभाना या कर्त्या पुरुषाचा मृत्यू होतो. द्वारका ही त्याची पत्नी. ती आणि साऱ्या कुटुंबाचा सुभान्याच्या अंत्यविधीसाठी समाजाशी संघर्ष सुरू असतो. पोलिसांशी हे कुटुंब झुंजत आहे. का, तर गावठाणात अंत्यविधीसाठी जागा मिळावी. शासनाने त्यांना आधारकार्ड दिले. पण, खालच्या जातीचे असल्याने प्रस्थापित समाज त्यांना अंत्यविधीसाठी जागा देत नाही. पोलिसांचा ससेमिरा चुकवत न्याय मिळण्यासाठी गौतम हा कार्यकर्ता मदतीसाठी धडपडतो. सुभाना ज्या लाकडी गाड्यावर हसत-खेळत आपला मुलगा सुबराला पहिल्यांदा शाळेत नेवून घालतो, त्याच गाड्यावर त्याचे प्रेत ठेवले जाते. वडिलांचे प्रेत ओढता ओढता सुबरा गतप्राण होतो. शेवटी द्वारका मजल- दरमजल भटकत पती सुभाना आणि लहान मुलगा सुबराचा अंत्यविधी करते. सामाजिक विषमतेविरुद्ध तिची झुंज एकाकी ठरते. मी अनुभवलेला, मनातला दाटलेला हा अतोनात कोलाहल ‘दरमजल’मधून मला मांडता आला.

इंटरनॅशनल फेस्टिवलपर्यंत ‘दरमजल’
दरमजल शॉर्टफिल्मचे सगळीकडे खूप कौतुक झाले. ‘दिव्य मराठी’च्या ‘रसिक शॉर्टफिल्म फेस्टिवल’च्या पहिल्या पन्नासमध्ये निवड झाली. कोचीन इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिवलमध्ये स्पेशल ज्युरी मेन्शन अवॉर्ड मिळाले. बेस्ट शॉर्टस् इंडिया २०२० हे ऑनरेबल ज्युरी अवॉर्डही मिळाले. मुंबईचा थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल पुरस्कार मिळाला. माय ठाणे शॉर्टफिल्म फेस्टिवलमध्ये अभिनय, उत्कृष्ट दिग्दर्शक, उत्कृष्ट लेखन असे तीन अवॉर्ड पटकावले. पुणे, नगर येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिवलमध्ये पुरस्कार मिळाले. मुंबईतील रंगकर्मी इंटरनॅशनल शॉर्टफिल्म फेस्टिवलमध्ये अभिनयाचे कौतुक झाले. नाशिक इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये बेस्ट फिल्मचे अवॉर्ड मिळाले.

विजय जावळे
(संपर्कः ९८९०५६१५९४)

बातम्या आणखी आहेत...