आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी शॉर्टफिल्म:हिरव्या बोलीचा दुखरा शब्द !

9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

विकास हा तसा खूप गोड शब्द. मात्र, विकास होताना निसर्गाला अक्षरश: ओरबाडले जाते. रस्त्यांसाठी डोंगर कापले जातात. धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गासाठी तर हजारो झाडांची कत्तल झाली. ते पाहून मी अस्वस्थ झालो. ते भयंकर दृश्य आतमध्ये कुठंतरी टोचत राहिले अन् पुढे त्यातूनच ‘सलाईन’ची कथा आकाराला आली…

‘सलाईन’ शॉर्टफिल्मचा प्रवास दोन वर्षांपूर्वी सुरू झाला. धुळे-सोलापूर या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू झाल्यानंतर रोडच्या बाजूला असलेली हजारो वडांची झाडे तोडली गेली. यातल्या अनेक झाडांनी वयाची शंभरी नक्कीच पार केली असेल. हे पाहिल्यापासून मी खूप अस्वस्थ झालो. संकल्पना मिळाली. एक पिढी झाडे तोडून जगतेय, तर दुसरी पिढी जगवण्यासाठी झाडे लावतेय. आपण आजारी पडलो की, अनेकदा दवाखान्यात जाऊन सलाईन घेतो, पण एखादे झाड जर आजारी असेल, तर त्याला सलाईन कोण देते? या सर्व गोष्टींचा, बहीण-भावाच्या संगतीचा हा प्रवास. त्यांनी चोरून आणलेले झाड जगवण्याचा केलेला आटोकाट निरागस प्रयत्न म्हणजे ‘सलाईन’.

लघुपटाची कथा लिहून पूर्ण झाली. त्यानंतर निर्मात्याच्या शोधात होतो. त्याच दरम्यान कैलास उढाण यांची भेट झाली. त्यांना कथा सांगितली. त्यांना ती खूप आवडली. ते स्वत: निसर्गप्रेमी आणि सामाजिक कार्यकर्ते. त्यामुळे त्यांनी या शॉर्टफिल्मसाठी पैसे लावायला होकार दिला. मग पात्रांची शोधाशोध सुरू केली. लोकेशनची तयारी सुरू झाली. दहा ते बारा गावांची पाहणी केली. त्यानंतर खंडाळा (विहामांडवा) हे पैठण तालुक्यातील हे गाव निवडले. ही कथा पूर्णत: ग्रामीण भागात घडते. ही लक्षात घेऊन आम्ही पात्रांची निवड केली. शॉर्टफिल्म बनवताना अनेक आव्हाने समोर होती. खरे तर, या विषयावर अगोदर बरेच काही आलेले आहे. पण, मी आपले बालपण यामध्ये शोधत, दिग्दर्शक या नात्याने त्यावर फोकस करत न्याय देण्याचा प्रयत्न केला. लहानपणी खेळता खेळता आपण झाडे लावतो आणि मोठेपणी तोडतो. हा विरोधाभास दाखवला. आम्ही छायाचित्रण, ध्वनीमुद्रणासाठी मुंबईत वापरले जाणारे तंत्रज्ञान वापरले. ध्वनीचे वैशिष्ट्य म्हणजे आम्ही ओरिजनल सिंक साऊंड वापरला. एकही शब्द डब केला नाही.

प्रकल्पात प्रामुख्याने कैलास उढाण, अश्विनी उढाण, राजकुमार तांगडे, प्रा रामदास ठोके, तुषार बोडखे आणि खडांळा येथील समस्त गावकऱ्यांनी मदत केली. शॉर्टफिल्ममध्ये साक्षी व्यवहारे, अशोक देवकर, प्रणव ढवळे, तेजश्री कानडे, विवेक खराटे, सतीश काटकर यांनी भूमिका केल्या. सहाय्यक म्हणून मुकेश ढवळे यांनी, तर सुजित देठेंनी संकलन, निरंजन भालेकरांनी संगीत आणि चाणक्य नेहुल यांनी ध्वनी संयोजनाची जबाबदारी सांभाळली. निर्माता ‌विभागात आकाश अरगडे, प्रकाश बांगर, नारायण तिहारे यांनी काम पाहिले.

शॉर्टफिल्ममधला एक प्रसंग आजही आठवतो. आम्ही पात्र निवड केली. चित्रीकरणाच्या पहिल्याच दिवशी दोन भूमिका साकारणारे कलाकार आलेच नाहीत. ऐनवेळी गावातील दोघांची त्या भूमिकेसाठी आम्हाला निवड करावी लागली. फिल्ममध्ये दोन बालकलाकार आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी या पूर्वी कुठल्याही स्टेजवर कसलेही काम केलेले नाही. मे महिन्यातल्या कडक उन्हात सलग चार दिवस त्यांच्याकडून काम करून घेणे, हे खूप आव्हानात्मक होते. या दोन्ही कलाकारांनी अनवाणी पायांनी आपापली भूमिका उत्तम वठवली. पण, त्यावेळी त्यांच्या पायाला बसलेले चटके आजही अस्वस्थ करतात.

वृक्षवल्ली म्हणजे माणसाच्या सुख-दुःखाची भाषा जाणणारी निसर्गाची हिरवी बोली. पण, आपल्या अवतीभोवतीची झाडे ओरबाडली, तोडली जातात तेव्हा या बोलीचे दुखरे शब्द आपल्याला ऐकू येत नाहीत. हा अस्फुट हुंकार चित्रबद्ध करण्याचा प्रयत्न आम्ही ‘सलाईन’मधून केला आणि तो बऱ्याच अंशी यशस्वीही झाला.

पुरस्कारांनी कौतुकाची थाप
प्रत्येक लेखक, दिग्दर्शक नेहमीच काहीतरी नवीन करण्याच्या प्रयत्नात असतो. आतापर्यंत निसर्ग, जंगल या विषयावर अनेक लघुपट आले. पण, मी ‘सलाईन’ हा विषय थोडा वेगळ्या पद्धतीने हाताळला आणि त्याला अनेक पुरस्कार मिळाले. दैनिक दिव्य मराठीने उत्कृष्ट शॉर्टफिल्म म्हणून निवड केली. औरंगाबाद इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्येही सर्वोत्कष्ट फिल्म म्हणून ‘सलाईन’चा गौरव झाला. इंदापूर आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये सर्वोत्कृष्ट कथेचा पुरस्कार मिळाला. कलामहर्षी भालजी पेंढारकर फिल्म फेस्टिवलमध्येही या शॉर्टफिल्मची निवड झाली.

रामेश्वर झिंजुर्डे (लेखक / दिग्दर्शक)

बातम्या आणखी आहेत...