आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"रसिक'ची दशकपूर्ती:"रसिक' अधिक बुलंद होवो...! - अभिषेक भोसले

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आज दिव्य मराठीची "रसिक' पुरवणी ११ व्या वर्षात पदार्पण करत आहे. मागच्या दहा वर्षात रसिकने मराठी पुरवणी जगताला काय दिले? याचा विचार केला तर स्पष्ट दिसेल की, रसिकमुळे मराठी दैनिकांच्या पुरवणीचे बहुजनीकरण आणि लोकशाहीकरण झाले. रसिकमधील आशयामुळे वाचकाला महाराष्ट्राच्या जगण्याच्या बुडाशी असणाऱ्या धारणाचा शोध घेता येतो. बहुजनांच्या सांस्कृतिक जगण्याची नाडी वाचकांना पकडता येते. रविवारी वाचक रसिकच्या घोड्यावर स्वार होवून महाराष्ट्राची सैर करून येऊ शकतो. एवढी विविधता आणि मुलभूत विषय रसिकने सतत हाताळले आहेत.

सांस्कृतिक वर्चस्वाच्या लढाईमध्ये मराठी दैनिकांच्या पुरवण्यांची भूमिका ही महत्त्वाची राहिली आहे. मराठी दैनिकांच्या पुरवणीची चर्चा सुरू झाली की, लेखक-वाचक यांची एक मोठी परंपरा उभी केली जाते. त्या परंपरेचे गौरवीकरण केले जाते. पण हे गौरवीकरण नक्की कोणाचे असते? महाराष्ट्रातील प्रमुख दैनिकांच्या पुरवण्या, त्यात लिहिणाऱ्या लेखक आणि विषयांनी ग्रामीण वास्तव, जगण्या मरण्याचे प्रश्न, अल्पसंख्यांक सांस्कृतिक घटकांना किती प्रमाणात सामावून घेतले? एकंदरीत मराठी पुरवण्यांचा विचार केला तर त्यांचा चेहरा मोहरा हा अभिजन, शहरी आहे हे नाकारता येणे शक्यच नाही. तो अभिजन शहरी चेहरा इथल्या सांस्कृतिक वर्चस्वाचा चेहरा आहे. तो सतत सहित्याची परिभाषा प्रस्थापित करत असतो. त्या साहित्याच्या आणि पुरवणीच्या परिभाषेत इथला शेतकरी, आदिवासी, कामगार, मुस्लिम, दलित -शोषित, देहविक्री करणाऱ्या महिला, एलजीबीटी समूह कधीच दिसत नाही. या सगळ्यांची पुसटशी सावलीही मराठी पुरवण्यांच्या पानांवर पडलेली दिसत नाही. स्वत:चे अभिजन असणं मिरविण्यातच या पुरवण्यांनी समाधान मानलं.

या सगळ्यामध्ये दिव्य मराठीची रविवारची रसिक पुरवणी गेल्या दहा वर्षापासून पुरवण्यांच्या जगामध्ये स्वत:चा नवा पायंडा पाडायचा प्रयत्न करत आहे. बहुजनांचं जगणं मांडायचा प्रयत्न करत आहे. बहुजनांच्या सांस्कृतिक वर्चस्वाची परिभाषा निर्माण करण्याचा प्रयत्न रसिक करत आहे. पुरवण्यांच्या जगात आणि वातावरणात रसिकने स्वत:ची स्पेस निर्माण केली. आज रसिक ११ व्या वर्षात पदार्पण करत आहे. मागच्या दहा वर्षात रसिकने मराठी पुरवणी जगताला काय दिले? याचा विचार केला तर स्पष्ट दिसेल की, रसिकमुळे मराठी दैनिकांच्या पुरवणीचे बहुजनीकरण आणि लोकशाहीकरण झाले. एकंदरीत मराठी पुरवण्यांची परंपरा पाहता मराठी पुरवणीचे बहुजनीकरण झाले हे म्हणणे धाडसाचे ठरू शकते. पण रसिकचा मागील दहा वर्षांचा प्रवास पाहिला तर हे लक्षात येऊ शकेल. रसिकचा वाचक, लेखक आणि माध्यमांचा अभ्यास करणारा म्हणून या पुरवणीचे वेगळेपण महाराष्ट्रातील वाचकांशी संवाद साधताना सतत लक्षात येते.

लेखकांची विविधता हे तर रसिकचे सर्वात मोठे बलस्थान. रसिक टीमने जाणिवपूर्वक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून नवे लेखक जोडले. महाराष्ट्राचा कोणताच जिल्हा नसेल की जिथल्या लेखकाने रसिकमध्ये लिखाण केले नाही. लेखकांच्या या विविधतेने रसिकमध्ये विषयांची विविधता सतत वाचायला मिळते. रसिकने पुरवण्यांच्या जगात नवा साहित्यव्यवहार पेरला. ज्यातली माणसं ही मातीतली होती. ती झुंजणारी होती. झुंजणाऱ्या, मातीत राबणाऱ्या हातांना रसिकने लिहायला लावले. त्यांना व्यक्त व्हायची जागा उपलब्ध करून दिली. अस्सल मातीतले लेखक रसिकने शोधून काढले. कवयित्री दिशा शेख यांचा रसिकमध्ये चालवलेला स्तंभ हे याचेच उदाहरण. कोणच्या ध्यानी मनी येणार नाही असं हे पाऊल होतं.

वीरा राठोड सारखे लेखक रसिकने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात नेले. गडचिरोलीच्या दुर्गम भागातून लालसू नागोटी यांचा स्तंभ रसिकने चालविला. नारायण भोसले यांच्या स्तंभातून भटक्यांचे पालावरचे जगणं समोर आणलं. ज्यांना राजकीय प्रतिनिधित्वच नाही अशा एकाही भटक्या समुदायचे प्रतिबिंब मराठीतील अभिजन पुरवण्यामध्ये पडलं नाही. त्यांचं अस्तित्वच कधी अभिजन पुरवण्यांनी मान्य केलं नाही. ज्यांनी अस्तित्व मान्य केलं त्यांनी भटक्यांसोबतच शेतकरी आदिवासी मुस्लिम दलित यांच्याकडं फक्त डेटा म्हणून पाहिलं. त्यातून त्याच अभिजनांनीच या सगळ्यांचं जगणं मांडलं. पण दोरीवरच्या कसरती करणाऱ्या भटक्या हातांना, तेंदू पत्ता वेचणाऱ्या आदिवासी माणसांना व्यक्त व्हायची जागा पुरवण्यांमध्ये मिळाली नव्हती. ग्रामीण माणसाला, आदिवासींना आणि नाकारलेल्या समाजघटकांचे प्रतिनिधत्व करणाऱ्या त्याच समाजातील लोकांना त्यांचं जगणं लिहायला रसिकने जागा दिली.

हॉटेलमध्ये वेटर म्हणून काम केलेल्या व्यक्तीचा त्याच्या जगण्याबद्दलचा स्तंभ चालविला जाऊ शकतो हा विचारही तुम्ही कधी करणार नाहीत. पण रसिकने रमेश रावळकर यांचा टिश्यू पेपर हा स्तंभ चालविला. हा स्तंभ प्रचंड लोकप्रिय ठरला. त्यामुळं खऱ्या अर्थाने रसिकने पुरवणीतून येणाऱ्या आशयाचे लोकशाहीकरण आणि आशयाचे बहुजनीकरण केले. रसिकमध्ये सापडणारे अनेक नवीन हात हे पहिल्यांदाच स्तंभ लिहिणारे असतात.

हे सगळं करत असताना पुरवण्यांमध्ये काम करणाऱ्यांवर सतत टांगती तलवार असते. असे विषय हाताळताना सतत रिस्क असतेच. पण प्रयोगशील असणाऱ्या रसिकच्या टीमने सतत ही रिस्क पत्कारत नवीन लेखक आणि विषयांना हात घातला. इतर पुरवण्या जेव्हा इव्हेंट आणि "अमुक डे तमुक डे' साजरे करण्यांमध्ये व्यस्त असतात तेव्हा रसिक पुरवण्यांसाठीचे पठडीबाहेरचे विषय लोकांसमोर आणत असते. अनेक वेळा रसिकमधील दर्जेदार विषय हे इंडियन एक्सप्रेस, द हिंदू वर्तमानपत्रांच्या रविवार पुरवण्यांच्या जवळ जाणारे असतात. यातून रसिक टीमच्या विषयांच्या आकलनाची जाणीव वाचकांना होवू शकते. इव्हेंटच्या पॅनडेमिकमध्ये रसिक अजून टिकून आहे. वाढत आहे. रसिक शहरांमध्ये कधी रमलीच नाही. अभिजनांच्या पुरवणी व्यवहारमध्ये शहरांत न रमणे हा मोठा गुन्हाच. हा गुन्हा किती मोठा ठरू शकतो याचा अंदाज येण्यासाठी एक घटना सांगतो. आमची पत्रकारितेतील एक सहकारी मराठीतील नामांकित दैनिकाच्या मुंबई मुख्य कार्यालयात काम करत होती. त्या दैनिकाच्या शनिवार-रविवार पुरवणीचे नियोजन करण्याची जबाबदारी तिच्यावर होती. पत्रकार म्हणून महाराष्ट्राची सामाजिक, सांस्कृतिक समज तिच्या जवळ होतीच. ती मुळातच प्रयोगशील असल्याने तिने पुरवणीच्या जगात सर्वसाधारणपणे चर्चिले न जाणारे विषय, माणसं समोर आणण्याचा प्रयत्न सुरू केला. जेणेकरून नवे विषय, नवी माणसं आणि त्यांचं जगणं वाचकांसमोर मांडता येईल ही त्यामागची भूमिका.

चर्चिले न जाणारे विषय हे जेव्हा मी म्हणतोय त्याचा अर्थ ग्रामीण भागातले, राजकीय-सांस्कृतिक प्रतिनिधित्व नसलेले सामाजिक समूह असा त्याचा अर्थ. पण तिचा हा प्रयत्न तिच्या मुंबईस्थित वरिष्ठांना काही रूचला नाही. त्यांच्यासाठी ती जे करू पाहत होती ते काही पुरवणीचे विषयच नव्हते. पत्रकारितेच्या विश्वात त्याला फिचर किंवा न्यूज व्हॅल्यू असं म्हणतात. तशी व्हॅल्यू त्या विषयांना नव्हती असं सेंट्रल आणि वेस्टर्नच्या चर्चेत रमणाऱ्या त्या पुरवणीच्या संपादिकेला वाटत राहायचं. कालांतराने महाराष्ट्राची माती कपाळावर लावून, पायाला भिंगरी लावून महाराष्ट्राचा कानाकोपरा फिरणाऱ्या तिला प्रचंड मनस्तापाला सामोरे जावं लागलं. कालांतराने तिने ती नोकरी सोडली. त्यामुळे आपल्याकडच्या अनेक मराठी पुरवण्यांची समज ही शहरी आणि अभिजन आहे. रसिक जे विषय मांडत आहे त्याची गरज आणि त्यातली रिस्क किती मोठी असते हे समजण्यासाठी वर सांगितलेली न्यूजरूममधील घटना पुरेशी आहे.

अशात रसिकने पुरवणी म्हणून शहरातला वाचक हा कधीच टार्गेट केला नाही असं सतत जाणवतं. पण शहरांची घुसमटही मांडायला विसरली नाही. मुंबई – पुणेत्तर महाराष्ट्र केंद्रस्थानी ठेवून रसिक दैनिकांच्या पुरवण्या निघू शकतात आणि त्यातला साहित्यव्यवहार केला जाऊ शकतो हे रसिकने दाखवून दिले. दैनिकाची पुरवणी म्हणून इतर वर्तमानपत्र धजावणार नाहीत असे विषय रसिकने वाचकांसमोर आणले. नुकताच "पिंजरा' सिनेमाबद्दलचा लेख असो वा नाशिकमध्ये तमाशा कलावंतावर झालेल्या हल्ल्यानंतर रसिकने घेतलेली भूमिका असो हे सगळं महाराष्ट्राच्या सांस्कृतिक पटलावर केंद्रस्थांनी आणण्याचे धाडस रसिकने केले. काही विषय तर असे होते की जे पत्रकारांना प्रचंड ताकदीने हाताळता यायला पाहिजे होतो. पण दुर्देवाने ते चर्चिलेही जात नाही असा विषयांवर रसिकने लेखांची मालिका चालविली.

तासिका तत्वांवर कार्यरत असणारे प्राध्यापक आणि त्यांचं जगणं, संघर्ष, स्वप्न यावर रसिकने सलग काही आठवडे लेखांची मालिका प्रकाशित केली. तासिका तत्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना त्यांची घुसमट मांडायला स्पेस निर्माण करून दिली. रसिकमधील आशयामुळे वाचकाला महाराष्ट्राच्या जगण्याच्या बुडाशी असणाऱ्या धारणाचा शोध घेता येतो. बहुजनांच्या सांस्कृतिक जगण्याची नाडी वाचकांना पकडता येते. रविवारी वाचक रसिकच्या घोड्यावर स्वार होवून महाराष्ट्राची सैर करून येऊ शकतो. एवढी विविधता आणि मुलभूत विषय रसिकने सतत हाताळले आहेत.

रसिकमध्ये लेख लिहिणाऱ्या लेखकांचे भ्रमणध्वनी लेखासोबत प्रकाशित केले जातात. वाचक लेखकांना आवर्जून फोन करतात. मी स्वत: रसिकमध्ये स्तंभ लिहित असताना दुर्गम भागातील वाचकांचे फोन यायचे यातून रसिक महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंच पोहचली आहे हे लक्षात यायचं. ह्या सगळ्यातून वाचक लेखकांशी थेट जोडला जातो. तो लेखक वाचकांसाठी उपलब्ध असतो. लेखक -वाचकांमधील हा संवाद त्या विषयांना अधिक व्यापक करत जातो हे ही आवर्जून नमूद केले पाहिजे. रसिकचा स्वत: हक्काचा वाचकवर्ग आहे. मागच्या वर्षी लॉकडाऊनच्या काळात वर्तमानपत्र घरोघरी पोहचत नसताना अनेक जण रसिक हातात घेऊन वाचता येत नाही याची खंत व्यक्त करायचे.

फक्त मुद्रीत पेपर नाही तर सोशल मिडियावरही रसिकच्या लेखांची चर्चा सातत्याने होत असते. पुणे-मुंबईमध्ये ही पुरवणी पोहचत नसतानाही सोशल मिडिया आणि डिजिटल पेपर रसिकचा स्वतचा हक्काचा शहरी वाचकवर्ग तयार झाला आहे. रसिकने लेखकांची विविधता जपायला सुरू केली. त्यातून भाषेची विविधताही आली. बहुजनांच्या भाषेचे प्रतिनिधत्व रसिकमध्ये उमटताना दिसते. लोकांची पुरवणी किंवा लोकांचे माध्यम म्हणजे काय असं जर कोणी विचारलं तर पुरवणीच्या विश्वात तरी रसिक त्याचं उदाहरण आहे. रसिकमधील अनेक स्तंभांची पुढं पुस्तकं आली. मातीतल्या लेखकांना रसिकने सेलिब्रेटी लेखक बनविले.

मागच्या वर्षीपासून चार पानांची रसिक पुरवणी दोन पानांवर आली आहे. मागच्या वर्षीचा लॉकडाऊन संपल्यानंतर वाचकांना अपेक्षा होती की परत चार पानांची रसिक त्यांना वाचायला मिळेल. पण अजून दोन पानांची रसिक चार पानांची झालीच नाही. लवकरच ही अपेक्षा पूर्ण होईल अशी आशा वाचकांना आहे. महाराष्ट्राच्या पुरवणी व्यवहारातील रसिकचं असणं आश्वासक आहे. रसिक महाराष्ट्राची सांस्कृतिक समज वाढवित आहे. रसिकच्या दहाव्या वर्धापनदिनानिमित्त टीम रसिकला महाराष्ट्रातील तमाम वाचकांकडून शुभेच्छा. बहुजन रसिक बुलंद होवो...!

अभिषेक भोसले
(लेखक माध्यम अभ्यासक आहेत.)
bhosaleabhi90@gmail.com

बातम्या आणखी आहेत...