आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:लेकिन हम भी बहतरीन रफ़ूगर हैं!

राही श्रु. ग.एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सोशल मिडियावर देशातल्या १०० मुस्लिम महिलांचा एका ॲपमार्फतबुल्ली बाईया नावाखाली ऑनलाईन लिलाव मांडण्यात आला. तुमची शारिरीक भूक भागवण्यासाठी बायकांना विकत घ्या असाच संदेश यातून द्यायचा होता. त्यातून मुस्लिम महिलांची नावं आणि फोटो वापरून येणाऱ्या काळात त्यांचं काय स्थान असेल हे पुन्हा उद्धृत झालं. दहशतवादाच्या बहुतांश घटनांमध्ये बंदुक उडवणारे किंवा ऍप चालवणारे हात तरूणांचे आहेत. मात्र या हातांना कठपुतळ्यांप्रमाणे चालवणारे मदारी मात्र प्रत्येक वेळी सुरक्षित सुटतात.

स्त्रीचं शरीर ही दहशतवाद्यांची रणभूमी असते. देशावर, धर्मावर किंवा जातीवर हल्ले होतात तेव्हा त्यात सर्वाधिक धारातीर्थी पडतात त्या बायका. फाळणी असो, दंगली किंवा सनातन सूडबुद्धीतून झालेले हल्ले, विकृत हल्लेखोरांना स्त्रियांची शरीरंच वाटते त्यांची युद्धभूमी. देश, धर्म आणि जातीच्या विकृत भक्तीची जेव्हा नशा चढते तेव्हा पैसा किंवा मालमत्तेपेक्षाही मौल्यवान असहाय्य शत्रूपक्षाची इज्जत, इभ्रत, अब्रू दिसू लागते. दहशतवाद्यांना ही अब्रू, ही इज्जत बाईच्या शरीरातच दिसते… आणि जेव्हा दहशतवादाचं इंधन सर्वत्र पसरलेलं असतं तेव्हा कोणीही पेटून उठतं विखाराच्या नशेत.

हरिद्वारच्या धर्मभूमीला युद्धभूमीत बदलण्याची भीषण आक्रोळी ठोकली गेली त्याला जेमतेम आठवडा झाला आहे. ‘धर्मसंसदे’च्या नावाखाली मुसलमानांची कत्तल करण्याची घोषणा केली. दहशतवाद्यांच्या हाकेला ताबडतोब उत्तर दिलं १८ ते २१ वयोगटातल्या माथेफिरू तरूणांनी! ‘बुल्ली बाई’ नावाच्या ऍपवरून या तरूणांनी थेट मुस्लिम महिलांचा लिलाव सुरू केला! मूलतत्ववाद्यांना तोंड देणाऱ्या किंवा सरकारला प्रश्न विचारणाऱ्या या महिला अगदी किशोरींपासून साठीच्या वरच्या अशा सर्व वयाच्या होत्या. स्वतंत्र विचारांच्या आणि अन्यायाला वाचा फोडणाऱ्या अशा शंभर मुस्लिम महिलांवर या दहशतवाद्यांनी सायबर हल्ला केला.

सहा महिन्यांपूर्वी ‘सुल्ली डील्स’ या नावाखाली अशाच पद्धतीने जवळपास ऐंशी महिलांचे फोटो वापरून "गिटहब' ऍपवरून त्यांचा लिलाव करण्यात आला होता. निर्लज्ज आरोपींनी स्वतःची ओळख लपवायचा कोणताही प्रयत्न केला नसतानाही दिल्ली आणि उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे निर्ढावलेल्या या मूलतत्ववाद्यांनी सैलावून पुन्हा तोच हल्ला करण्याचं धाडस केलं. यावेळी मात्र मुंबई पोलिसांनी साध्या आयपी ट्रेसच्या माध्यमातून गुन्हेगारांचा पत्ता लावून त्यांना ताब्यात घेतलं.

एकवीस वर्षांचे नीरज बिश्नोई आणि विशाल कुमार झा आणि केवळ अठरा वर्षांची श्वेता सिंह हे तिघं या गुन्ह्यातले प्राथमिक आरोपी म्हणून पोलिस कोठडीत आहेत. ३१ डिसेंबरच्या आसपास नीरज बिश्नोई या तरूणाने ‘गिट हब’वरून हे ‘बुल्ली बाई’ ऍप आणि याच नावाची वेबसाईट तयार केली. शिवाय ट्विटरवर या नावाने एक पेजही सुरू केलं.या सर्व ठिकाणी मुद्दाम शीख नावं वापरून नीरज आणि त्याच्या टोळीने हा घाणेरडा उद्योग सुरू केला. एका अल्पसंख्य समुदायावर हल्ले करण्यासाठी या टोळीने दुसऱ्या अल्पसंख्य समुदायाला बदनाम करण्याचा पराक्रम केला. दुसरा आरोपी विशाल कुमार झा हा बंगलोरला राहणारा इंजिनियर.

या प्रकरणातल्या तिसऱ्या आरोपीची गोष्ट मात्र धक्कादायक आहे. श्वेता सिंह ही मूळची उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरमधली. तिला तीन भावंड आहेत. दहा वर्षांपूर्वी या भावंडांनी कॅन्सरमुळे त्यांच्या आईला गमावलं आणि गेल्या वर्षी कोव्हिडच्या वणव्यात त्यांचे वडीलही गेले. वडलांची सोलर कंपनी चालवत उच्च शिक्षणाची तयारी करणाऱ्या या श्वेताला विखाराच्या वणव्याने भडकवून या अमानुष वळणावर कसं आणलं असेल? तिच्या राज्यात कोव्हिडच्या भडक्यात माणसं मरत असताना सत्तारूढ नेत्यांनी चक्क कोव्हिड रुग्णांचे आणि मृतांचे आकडे लपवण्यासाठी प्रशासनावर दबाव आणला. कोव्हिडच्या ऐन भरात कुंभमेळा नेहमीप्रमाणे वाजत गाजत होऊ दिला. स्वतःच्या घरात एक मृत्यू पाहूनही सरकार आणि प्रशासनाऐवजी श्वेताच्या रागाचा सगळा रोख तिने कधी न पाहिलेल्या मुस्लिम महिलांकडे कसा गेला? सोशल मिडीयाच्या विविध चावड्यांवर श्वेता अश्लाघ्य भाषेत हिंसक लिहीत राहते. बुलंदशहरसारख्या जिल्ह्यातल्या श्वेताला मुलगी म्हणून भोगावे लागणारे हिंसेचे संभाव्य धोके डोक्यात घेतल्याशिवाय घराबाहेरही पडता आलं नसणार. आणि तरी श्वेता महिलांचे फोटो बदलून- विस्कटून त्यांच्या त्या नग्न फोटोंच्या जाहिराती देते! त्यांच्यावर बोली लावायचं आवाहन करते! पोलिसांना शंका आहे की नेपाळमध्ये राहणाऱ्या कोणा सोशल मिडियावरच्या मित्राच्या सांगण्यावरून श्वेताने हे ऍप चालवायला घेतलं. पण आज तिने ऍप चालवलं. त्याआधीही ती याच द्वेषभावनेतून सोशल मिडीयावर लिहीत होतीच.

प्रश्न श्वेताचा किंवा नीरज किंवा विशालचा नाहीच. या वयोगटातल्या मुलांना ही घाणेरडी कामं करायला वापरून घेणाऱ्या या मूलतत्ववाद्यांच्या संघटना प्रमुख अशा प्रसंगी पडद्याआडच राहतात. मागे जेएनयू मध्ये हॉस्टेलमध्ये घुसून स्टीलच्या रॉडने विद्यार्थ्यांना मारणारी अभाविपची कोमल शर्मा आजही दिल्ली पोलिसांच्या हाती लागली नाही. जामिया मिलिया इस्लामियाच्या बाहेर विद्यार्थ्यांवर गोळी झाडणारा माथेफिरू केवळ अठरा वर्षांचा होता. राष्ट्रीय स्वाभिमान दल नावाच्या संघटना नेत्याचे, स्वतःसकट इतर अनेक तरूणांचे तलवारी, पिस्तुलं आणि मोठ्या बंदुका घेतलेले फोटो या इसमाच्या फेसबुक पेजवर दिसले. या तरूणाच्या (आणि बंदुका घेऊन दहशत पसरवणाऱ्या त्याच्या साथीदारांच्या) अटकेविषयी पुढे चर्चाही झाली नाही. संसदेपासून जेमतेम अर्धा किलोमीटर अंतरावर असणाऱ्या ‘कॉन्स्टिट्यूशन क्लब’मध्ये ‘खौफ से आजादी’ (भीतीपासून मुक्ती) या कार्यक्रमाला गेलेल्या उमर खालिदवर तिथे गोळी झाडण्याचा प्रयत्न झाला. त्या आरोपीची अटक बाजूला राहिली, इथे उमर खालिदच पुराव्यांविना युएपीए अंतर्गत तुरुंगात आहे! दाभोळकर - पानसरे – कलबुर्गी – गौरी लंकेश या हत्या घडवून आणणारे दहशतवादी आणि त्यांचे कर्ते करविते अजूनही मोकाटच आहेत.

दहशतवादाच्या बहुतांश घटनांमध्ये बंदुक उडवणारे किंवा ऍप चालवणारे हात तरूणांचे आहेत. मात्र या हातांना कठपुतळ्यांप्रमाणे चालवणारे मदारी मात्र प्रत्येक वेळी सुरक्षित सुटतात. खून, दंगली, हल्ले, लिलाव करून लोकांनी सतत दहशतीत राहावं हेच या मूलतत्ववाद्यांचं उद्दिष्ट असतं. मोर्चा, धरणं करायला लोकांनी धजावू नाही, सरकारला प्रश्न विचारायची हिंमत करू नाही, तोंड उघडू नाही, घराबाहेर पडू नाही आणि अखेर डोक्यावर बसलेल्या मूलतत्ववादी सत्तेच्या दहशतीत गपगुमान राहावं, याच उद्देशाने दहशतवादी कारवाया होत असतात. स्त्रियांच्या बाबतीत तर ही दहशत पसरवणं आणाखी सोपं. धोक्याची चाहूल लागताच त्यांच्या आजूबाजूचे त्यांना काळजीने सावध करतात. तिने आवाज चढवणं, एकटं फिरणं, स्वातंत्र्याची स्वप्न पाहणं हे एरवी तिच्या आपल्या माणसांनाही काळजीत पाडत असतं. विद्वेषाचा भडका उडाल्यावर आपल्या बहिणी- लेकीसाठी जीव घाबरा होतो. पोटात गोळा येतो आणि तटबंद्या भक्कम होतात. तिच्यासाठीच्या लक्ष्मणरेषा ठळक होत जातात. एकीकडे ‘मुस्लिम लोक त्यांच्या स्त्रियांना किती बंधनात ठेवतात पाहा’ म्हणणार आणि दुसरीकडे मुस्लिम स्त्री मुक्तीसाठी धडपडू लागल्यावर तिच्यावर हल्ला चढवणार! तिकडे एकापाठोपाठ एक हल्ले पचवणाऱ्यांची असुरक्षितता त्यांच्या नकळत अधिकाधिक कर्मठ होत जाणार! हिंदूराष्ट्राकडे वाटचाल करणाऱ्या माझ्या देशाला या अंतर्विरोधातली खिन्न हतबलता दिसतही नाही.

मोदी सरकार बरोबर हिंदूराष्ट्र हे समीकरण या मूलतत्ववाद्यांच्या डोक्यात इतकं पक्कं आहे की सरकारच्या कुठल्याही धोरण, कृती कार्यक्रमाविषयी साधा प्रश्नही उपस्थित केला तरी त्यांच्या तलवारी उपसल्या जातात. शिवाय ट्विटरसारख्या ठिकाणी खुल्या धमक्या आणि नरसंहाराची भाषा करणाऱ्यांची खाती स्वतः पंतप्रधानच ‘फॉलो’ करत असल्याने यांच्या रक्तपिपासू वृत्तीला थेट अभय मिळतं.

शाळकरी मुलींपासून ते गेली चार वर्ष बेपत्ता असलेल्या नजीबच्या आईपर्यंत तब्बल शंभर महिलांवर व्यवस्थात्मक हल्ला झाला. ‘बुल्ली बाई’ ऍपवर ज्यांचे फोटो टाकण्यात आले होते, त्यामध्ये अनेक पत्रकार, लेखिका, विद्यार्थिनींसह नोबेल पुरस्कारप्राप्त मानवी हक्क कार्यकर्ती मलाला युसुफझई आणि प्रसिद्ध अभिनेत्री शबाना आझमीचीही नावं होती. शबाना आझमींचा नवरा जावेद अख्तर यांची या प्रकरणाला असलेली प्रतिक्रिया पाहून मात्र अनेकांच्या भुवया उंचावल्या. ‘आपले आई आणि वडील गमावलेल्या या अठरा वर्षांच्या मुलीला ‘बुल्ली बाई’च्या पीडितांनी जाऊन भेटावं. तिला समजावून सांगावं की तिच्या हातून हे काय घडलंय. तिला माफ करावं.’ शबानाचा नवरा आणि पुरोगामी मुस्लिम कलाकार म्हणूनही जावेद अख्तरच्या विधानाचं कौतुक वाटणं साहजिक आहे. पुरोगामी विचारधारा मानणाऱ्यांनी मात्र आज या तीनही तरूणांवर कारवाईची मागणी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. कारण प्रश्न श्वेता किंवा विशाल किंवा नीरजचा नाही. त्यांच्यावर होणाऱ्या कारवाईतून या मूलतत्ववाद्यांच्या सूत्रधारांना थेट इशारा मिळाल्याशिवाय या देशातल्या हजारो मुस्लिम मुलींना- महिलांना मोकळा श्वास घेण्यासाठी आपण विश्वास कसा देणार?

रस्त्यांवर कविता सादर करणारी तरूण लखनवी कवियित्री सबिका अब्बास नक़्वी तिच्यासारख्या, सावित्री-फातिमाच्या रस्त्यावर चालणाऱ्या प्रेम आणि क्रांती साडीसह लपेटणाऱ्या या देशाच्या मुली- महिलांचा जाहीरनामाच मांडते-

तुम बडे क्युरियस रहते हो ना कि चोली के पीछे क्या है?

इस साडी के चोली के पीछे मेरे पिस्तानों का उभार है

जो भरे हैं आज़ादी को रगों में पहुंचाने के लिए

मेरी पसलियां है जो अमन के नग़्में गाती हैं!

...

तुमने भी कम कोशिशें नही की है

इस साडी में तुमने बहुत छेद बनाऍं हैं

इसको कईं जगहों से फाडा है

लेकिन हम भी बहतरीन रफ़ूगर हैं!

एकेक छेद में हमने पेवंद लगाया है

और भी रंगीन टुकडों का!

rahee.ananya@gmail.com

बातम्या आणखी आहेत...