आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:राजकारणाचे दाऊदीकरण!

हेमंत देसाई6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दाऊद सध्या कुठे आहे? तो पाकिस्तानात राहतो का? यावर गेली तीन दशके पानेच्या पाने प्रसिद्ध झाली आहेत. दाऊदचा करोनाने मृत्यू झाल्याचीही बातमी मध्यंतरी आली होती. अर्थात त्याला कोणी अधिकृत दुजोरा दिला नाही. तरीदेखील भारताच्या राजकीय व गुन्हेगारी विश्वाच्या चराचरात दाऊद व्यापून राहिला आहे. दाऊदची टोळी नष्ट झाली नसली, तरी ती पूर्वीइतकी सक्रिय नाही. तरीही दाऊद या नावाचे वलय आणि भय इथले संपत नाही, अशी स्थिती आहे. तस्करी करून आणलेल्या सोन्याला जसा भाव येतो, तसा आजही दाऊदच्या नावाला राजकारणात व मीडियात सोनमोलाचा भाव आहे!

‘ट्रिगर खींच, मामला मत खींच. खींच गया ना तो बहुत तकलीफ दूँगा’. ‘डी-डे’ या सिनेमातला हा डायलॉग सॉलिड गाजला होता. दिग्दर्शक निखिल अडवाणीच्या या सिनेमात इकबाल सेठ ऊर्फ गोल्डमनला (दाऊदला) जिवंत पकडून आणण्याच्या मिशनची कथा आहे. यात ऋषी कपूरने डॉनची ही भूमिका केली असून, तसाच गॉगल, केस आणि मिश्या राखल्या होत्या. दाऊदवरून प्रेरणा घेऊन, ब्लॅक फ्रायडे, कंपनी, शूटआउट ॲट वडाला, वन्स अपऑन अ टाइम इन मुंबई (दोन भाग) आणि हसीना पारकर असे अनेक चित्रपट आले. एक थी बेगम या वेब सीरीजमध्ये एक महिला दाऊदसारख्याच एका गँगस्टरला मारण्याचा कट रचते. असे दाखवण्यात आले आहे. प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक व पटकथालेखक एस. हुसैन झैदीने ‘डोंगरी ते मुंबई’ हे चित्तथरारक पुस्तक लिहिले असून, त्यातही दाऊदसह मुंबईच्या अंडरवर्ल्ड जगताचा मागोवा घेण्यात आला आहे. तोदेखील वेब सीरीजचा विषय झाला आहे. ‘तवायफ’ या चित्रपटात नायक ऋषी कपूरच्या व्यक्तिरेखेचे नाव ‘दाऊद’ असल्यामुळे खुद्द डॉन दाऊद हा खूश झाला होता आणि ऋषी दुबईला गेला असताना त्याने ऋषीला भेटायलाही बोलावले होते. आपली दाऊदशी कशी भेट झाली, याचा किस्साही ऋषीने आपल्या आत्मचरित्रात वर्णन केला आहे. अवव्ल लेखक आबिद सुरती यांनी ‘सूफी’ ही अंडरवर्ल्डच्या उदयाचे चित्रण करणारी कादंबरी लिहिली आहे. सुरती हे लहानपणी डोंगरी, नागपाडा वगैरे भागात राहिले होते आणि पुढे डॉन म्हणून कुप्रसिद्ध झालेल्या व्यक्तींना त्यांनी जवळून पाहिले आहे. काही मराठी नाटकांतूनही डॉनचे उल्लेख आलेले आहेत. थोडक्यात ‘मैं हूँ डॉन’ हा अत्र तत्र सर्वत्र भरून राहिला आहे.

अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिकांनी मुंबई बाँबस्फोट प्रकरणातील गुन्हेगार सरदार शहा वलीखान आणि कुख्यात दाऊद इब्राहीमची बहीण हसीना पारकरचा हस्तक मोहम्मद सलीम इसहाक पटेल ऊर्फ सलीम पटेलकडून करोडो रुपयांच्या मोक्याच्या जागेची कवडीमोल दराने खरेदी केली, असा घणाघाती आरोप नुकताच माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. या प्रकरणातील सर्व कागदपत्रे केंद्रीय किंवा राज्य सरकारच्या तपासयंत्रणांना त्यांच्या कार्यकक्षेनुसार दिली जातील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनाही, त्यांनी मलिकांवर करवाई करावी यासाठी पाठवली जातील, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. याला उत्तर म्हणून मलिक यांनी, ड्रग्ज वाहतूक प्रकरणात ज्याला अटक झाली आहे, अशा जयदीप राणाशी तसेच काशिफ खान, ऋषभ सचदेव, प्रतीक गाबा या ड्रग्ज पेडलर्सशी फडणवीस यांचा संबंध असल्याचा आरोप केला. ड्रग्जच्या संपूर्ण खेळाचे मास्टरमाइंड हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आहेत का, असा सवालही त्यांनी केला. मलिक यांनी उल्लेख केला नसला, तरी आंतरराष्ट्रीय ड्रग्जचा व्यापार म्हटले, की त्याचा किंगपिन हा दाऊद आहे, हे सर्वश्रुत आहे. थोडक्यात, महाराष्ट्राच्या राजकारणात दाऊद हादेखील परवलीचा शब्द बनला आहे...

शरद पवार यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कालखंडात मुंबईच्या विकास आराखड्यातील २८५ भूखंडांचे प्रकरण गाजले. ‘भूखंडाचे श्रीखंड’ खाल्ले, असे आरोप करणारे छगन भुजबळ तेव्हा विरोधी पक्षात होते. असेच आरोप वसई-विरार येथील भूखंडांवरूनही पवारांवर झाले. परंतु ते कधीही सिद्ध झाले नाहीत. याच वसई-विरार पट्ट्यातील स्थानिक जनतेची आर्थिक लूट करणाऱ्या उत्तर भारतीयांना आव्हान देत, त्यांची दहशत संपवणाऱ्या भाई ठाकूरने, नंतर तिथे आपले प्रभुत्व प्रस्थापित केले. त्याचवेळी मुंबईत दाऊद इब्राहीमचा उदय झाला होता. परदेशांतून विविध वस्तूंची तस्करी करून भारतात आणण्यास त्याने सुरुवात केली होती. विरारजवळच्या अर्नाळा बंदरात पोहोचले की कुणीही तेथील जहाजातून आपला माल जगात कुठेही नेऊ शकतो. शिवाय वसई-विरारजवळ पूर्वेकडून जाणारा राष्ट्रीय महामार्ग आहे. या महामार्गाद्वारे काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत वाहतूक करणे शक्य होते. अर्नाळा बंदरात तस्करीचा माल आला, की तो देशात सर्वत्र पोहोचवण्यासाठी दाऊद भाई ठाकूरचा वापर करून घेई. त्यासाठी पोलीस यंत्रणेची मदतही घेई. विरारमधील चौरसिया आणि नालासोपारा रेल्वे स्टेशनमध्ये भर सकाळी सुरेश दुबे या तरुणाच्या झालेल्या खुनात भाई ठाकूर हा आरोपी होता. या काळात तेथील प्रतिष्ठित लोक आणि अगदी साहित्यिकदेखील भाई ठाकूरची आरती ओवाळत होते. वेगवेगळ्या पक्षांना ठाकूर मंडळी निवडणूक निधीही देत होती.

१९८८ मध्ये पवारांनी मुख्यमंत्री असताना, या भागातील ४० हजार एकर जमीन नागरीकरणासाठी खुली केली. त्यावेळी आमदार डॉमनिक गोन्साल्विस, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, जनता दलाचे विलास विचारे, प्रसिद्ध कादंबरीकार ना. सी. फडके यांचे चिरंजीव सुधीर फडके यांनी एक सभा घेऊन, या निर्णयाचा निषेध करत ठाकूर यांच्या दहशतीच्या विरोधात उभे राहण्याचा पवित्रा घेतला. पुढे हितेंद्र ठाकूर युवा काँग्रेसचा कार्यकर्ता बनला. वसईमधील काँग्रेसच्या सभांना हितेंद्र ठाकूरबरोबर शेकडो तरुणांचे जत्थे हजर असत. विधानसभेच्या निवडणुकीत इलेक्टिव्ह मेरिटच्या निकषावर हितेंद्र ठाकूर याच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आणि ठाकूर मंडळींनी जल्लोष साजरा केला. या निवडणुकीत हितेंद्रने जनता दलाचे विधानसभेतील प्रभावी उमेदवार गोन्साल्विस यांचा पराभव केला. दाऊदला मदत करणाऱ्या प्रवृत्तींचा वसई-विरारमध्ये विजय झाल्यामुळे महाराष्ट्रात खळबळ निर्माण झाली होती. पुढे यथावकाश राजकारणाचे गुन्हेगारीकरण हाच मुद्दा महाराष्ट्रात महत्त्वाचा बनला. तोपर्यंत महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी सुधाकर नाईक आले होते. २७ एप्रिल ते १९ जून १९९२ दरम्यान मंत्रालयाच्या कार्यालयातून दुबईतील वेगवेगळ्या फोन नंबरांवर संपर्क साधण्यात आला, अशी चर्चा सुरू झाली आणि गृहखात्याकडून त्याची चौकशीसुद्धा करण्यात आली. याच मुद्द्यावरून विरोधी पक्षनेते गोपीनाथ मुंडे यांनी तेव्हाच्या काँग्रेस सरकारवर तुफानी हल्ला चढवला. संपर्क करणाऱ्या व्यक्ती शरद पवार यांच्या जवळच्या असून, पवारांचा थेट दाऊदशी संबंध असल्याचा गंभीर आरोपही मुंडे यांनी केला. निवडणुकीत जिंकून सरकार स्थापन झाल्यास, आम्ही चौकशी करून हे संबंध उघड करू, असेही मुंडे यांनी म्हटले होते. युतीचे सरकार आल्यानंतर, या प्रकरणी पद्मसिंह पाटील, अरुण मेहता, जावेद खान, मदन बाफना, रमेश दुबे, पुष्पाताई हिरे प्रभृतींची नावे घेण्यात आली. संबंधित टेलिफोन क्रमांक उघड करा, असे आव्हान देण्यात आल्यानंतर, तपास व गुप्ततेचे कारण देत, त्याची माहिती देण्यात आली नाही. ‘मुंडे यांनी आरोप सिद्ध केले, तर मी राजकारण सोडेन आणि सिद्ध न झाल्यास, तर मुंडे यांनी राजकीय संन्यास घ्यावा, असे आव्हान अरुण मेहता यांनी त्यांना दिले. दाऊद हा विषय चर्चेत आल्याचा फायदा युतीला सत्ता मिळवण्यासाठी झाला. ‘तुमचा दाऊद, तर आमचा अरुण गवळी’, अशी गर्जना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती.

बाबरी मशीद पाडल्यानंतर, मुंबईत दंगली सुरू झाल्या आणि या दंगलींत अंडरवर्ल्डचाही हात होता. १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत आरडीएक्सचा वापर करून तेरा स्फोट घडवण्यात आले आणि त्यात २५७ लोकांना जीव गमवावा लागला. दाऊद आणि टायगर मेमनने हे स्फोट घडवले होते. बाबरीनंतर देशात महाराष्ट्रासह सर्वत्र धार्मिक ध्रुवीकरणाचा खेळ सुरू झाला आणि त्यात कुठे ना कुठे दाऊद कनेक्शन येत राहिले. मुस्लिम मतदार काँग्रेसपासून दुरावला. जवळजवळ ४० मतदारसंघांत मुस्लिमांची मते निर्णायक होती. बाबरीचा विध्वंस होतानाची केंद्रातील काँग्रेस सरकारची भूमिका, मुंबईतल्या दंगली, दाऊदने घडवलेले धमाके या सगळ्या घडामोडींचा राग काँग्रेसवर निघाला. १९९३ साली मुंबई महानगरपालिकेचे सहायक आयुक्त गो. रा. खैरनार यांनी पवारांचे अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचा तसेच ते गुन्हेगारांची पाठराखण करत असल्याचा आरोप केला. माझ्याकडे या संदर्भात ट्रकभर पुरावे आहेत, असाही दावा त्यांनी केला होता. पप्पू कलानी, हितेंद्र ठाकूर आणि जयेंद्र ऊर्फ भाई ठाकूर या कथित गुंडांना, आधी संरक्षणमंत्री आणि नंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असलेल्या शरद पवारांचे संरक्षण आहे, असा आरोप ज्येष्ठ पोलीस अधिकारी उल्हास जोशी यांनी केला होता. पोलीस कोठडीत असलेल्या कलानीला नरमाईची वागणूक द्यावी, यासाठी पवारांनी आपल्याला फोन केल्याचा गौप्यस्फोट सुधाकर नाईक यांनी करून, सनसनाटी निर्माण केली होती. अर्थातच कलानीबद्दलच्या सुधाकररावांच्या आरोपाचा पवारांनी स्पष्ट इन्कार केला होता. दाऊदवरून पवारांची बदनामी करण्याचे बरेच उपद्व्याप झाले. त्यापैकी एकही आरोप सिद्ध होऊ शकला नाही. उलट यासंबधी आरोप करणाऱ्या एका नियतकालिकास पवारांनी न्यायालयीन मार्गाने धडा शिकवला. गंमत म्हणजे, ज्या कलानीविरुद्ध भाजपने गंभीर आरोप केले होते, त्याच भाजपात पुढे कलानी गेला. पुढे कलानीने सेनेलाही साथ दिली आणि आता उल्हासनगरमधील राजकारणात दबदबा असलेल्या कलानी कुटुंबीयांना राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या पदरात घेतले आहे...

काँग्रेसने हितेंद्र ठाकूर व कलानीला जेव्हा तिकिटे दिली होती, त्याबद्दल केंद्रीय गृहमंत्री राहिलेल्या शंकरराव चव्हाण यांनीही जाहीर आक्षेप नोंदवला होता. दाऊद प्रकरण आणि एकूणच राजकारणाचे गुन्हेगारीकरण याविरुद्ध शंकररावांनी जोरदार आघाडी कशी उघडली होती, हे मला आजही स्पष्टपणे आठवते. सहा वर्षांपूर्वी ज्येष्ठ वकील राम जेठमलानी म्हणाले होते की, ‘१९९३च्या स्फोटांनंतर देशाबाहेर पळून गेलेल्या दाऊदला पुन्हा भारतात परतायचे होते. त्याने तसा प्रस्तावही दिला होता’. परंतु तत्कालीन मुख्यमंत्री पवार यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही. हा प्रस्ताव आल्याचे पवारांनी मान्य केले होते. ‘परंतु मला घरातच स्थानबद्ध करा, तुरुंगात ठेवू नका, ही अट दाऊदने घातली होती आणि माझ्या सरकारने ती अमान्य केली. तुला कायद्याच्या प्रक्रियेतून जावेच लागेल, अशी भूमिका राज्य सरकारने घेतली’, असे या संदर्भात पवारांनी नंतर स्पष्ट केले होते. इथल्या राजकारणात केवळ दाऊदचाच उल्लेख येत नाही, तर इतर इंदिरा गांधी करीमलालाला भेटत असत आणि मंत्रालयात हाजी मस्तानला सन्मानाची वागणूक मिळत असे, असा गौप्यस्फोट शिवसेना खासदार संजय राऊत यांनी जानेवारी २०२० मध्ये केला, तेव्हा काँग्रेसमधून तिखट प्रतिक्रिया आली. मुंबईचा पोलीस आयुक्त कोण असावा, हे दाऊद, छोटा शकील आणि शरद शेट्टी हे ठरवत असत, असेही जाहीर वक्तव्य राऊत यांनी केले होते. यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता निर्माण झाली. तेव्हा राऊत यांना बचावात्मक पवित्र्यात जावे लागले. या संधीचा फायदा फडणवीस न घेतील, तरच आश्चर्य होते! अंडरवर्ल्डमधून काँग्रेसला आर्थिक मदत मिळत होती का, असा सवाल फडणवीस यांनी लगोलग केलाच. छोटा राजन हासुद्धा चेंबूर भागात प्रभावी होता आणि त्याचाही राजकारण्यांशी संबंध येत होताच. मुंबईतील बाँबस्फोटांनंतर केंद्र सरकारने राजकारणी व गुन्हेगार यांच्यातील संबधांचा अभ्यास करण्यासाठी गृहसचिव एन. एन. व्होरा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली होती. देशातील अनेक गुन्हेगारांच्या व माफिया संघटनांच्या टोळ्यांनी सरकारी अधिकारी व राजकीय नेत्यांशी संगनमत केले असून, त्या बळावर ते निर्धोकपणे आपापली कृत्ये करत आहेत असा निष्कर्ष काढताना, मेमन बंधू व दाऊद इब्राहीम यांचा उल्लेख व्होरा समितीने केला होता. असो.

मुंबईच्या डोंगरीमधला दाऊद हा एका पोलिसाचा मुलगा जगातल्या मोस्ट वाँटेड गँगस्टर्समध्ये कसा गणला गेला? दाऊद सध्या कुठे आहे? तो पाकिस्तानात राहतो का? अभिनेत्री मंदाकिनीशी त्याचा कोणता संबध होता? यावर गेली तीन दशके पानेच्या पाने प्रसिद्ध झाली आहेत. दाऊदचा करोनाने मृत्यू झाल्याचीही बातमी मध्यंतरी आली होती. अर्थात त्याला कोणी अधिकृत दुजोरा दिला नाही. मात्र दाऊद अधूनमधून आजारी पडत असतो. त्याचे वयही झाले आहे. तरीदेखील भारताच्या राजकीय व गुन्हेगारी विश्वाच्या चराचरात दाऊद व्यापून राहिला आहे. दाऊदची टोळी नष्ट झाली नसली, तरी ती पूर्वीइतकी सक्रिय नाही. त्याच्या टोळीतील अनेक गुंडांचा एन्काउंटर झाला आहे. तरीही दाऊद या नावाचे वलय आणि भय इथले संपत नाही, अशी स्थिती आहे. तस्करी करून आणलेल्या सोन्याला जसा भाव येतो, तसा आजही दाऊदच्या नावाला राजकारणात व मीडियात सोनमोलाचा भाव आहे!

------------

hemant.desai001@gmail.com

बातम्या आणखी आहेत...