आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:सत्यपाल मलिक... एक जळता निखारा!

प्रमोद चुंचूवारएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सध्याचे मेघालयाचे सत्यपाल मलिक हे आता भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी तळहातावरचा जळता निखारा ठरले आहेत. चौधरी चरण सिंग यांचे शिष्यत्व पत्करून राजकीय वाटचाल सुरू केलेल्या मलिक यांनी आजवर भारतीय क्रांती दल, काँग्रेस, जनता दल,समाजवादी पक्ष आणि भाजप अशी विविध पक्षात मुशाफिरी केली आहे. आमदार, राज्यसभा व लोकसभा सदस्य, केंद्रीय राज्यमंत्री, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असा प्रदीर्घ वैविध्यपूर्ण राजकीय अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे. उच्चशिक्षित मलिक सध्या त्यांच्या स्पष्ट व सडेतोड वक्तव्यांमुळे चर्चेत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्याचे धाडस न मोदीत आहे, ना भाजपात. कोण आहेत हे सत्यपाल मलिक?

सोशल मिडीयावर एक विनोद खूप लोकप्रिय झाला होता. एक व्यक्ती दिल्लीत इंडिया गेटजवळ कुणा एका व्यक्तीचे आडनाव घेऊन ‘अमूक पागल आहे’ असे ओरडत असतो. त्याच्या दुर्देवाने तेच आडनाव तत्कालिन पंतप्रधानांचेही असते. पोलिस त्याला पकडतात आणि म्हणतात, तू देशाच्या पंतप्रधानांना पागल म्हणतोय. तो म्हणतो, साहेब मी तर पंतप्रधान असे म्हणालो नाही. त्यावर पोलिस म्हणतात की, आम्हाला माहिती आहे की आपल्या देशाचा पंतप्रधान पागल आहे आणि देशाचे गुपित तू जाहीरपणे लोकांना सांगितले हा तुझा गुन्हा आहे, चल तुरूंगात.

हा विनोद ऐकून अनेकांचे तेव्हा मनोरंजन झाले. रशियातील एका खऱ्याखुऱ्या घटनेवर हा विनोद आधारित असल्याचे मानले जाते. हे सारे आठवण्याचे कारण म्हणजे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक... गेल्या सात वर्षात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची कार्यशैली पाहून त्यांच्या ‘अहंकारी’ स्वभावाची जी कल्पना देशवासियांना आली होती त्यावर शिक्कामोर्तब करण्याचे काम सत्यपाल मलिक यांनी केले. यापूर्वीही मलिक यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली.

जम्मू-काश्मीरमध्ये अंबानी व संघ परिवाराशी संबंधित एका जवळच्या व्यक्तीकडून दोन फायलींवर स्वाक्षरी करण्यासाठी ३०० कोटी लाचेची ऑफर देण्यात आली होती, हा मलिक यांचा गौप्यस्फोट आिण नंतर या आरोपापासून केलेले घुमजाव ही मलिक यांची भबूमिका कायम वादग्रस्त राहिली आहे. गोव्यातील भाजप सरकारने कोरोनाच्या काळात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला, हा गोव्याचे माजी राज्यपाल म्हणून त्यांनी केलेले वक्तव्यही असेच भाजपच्या सुशासनाचे वस्त्रहरण करणारे आहे.

भाजपमध्ये १३ वर्षे राहूनही भाजप, संघ परिवार आणि नरेंद्र मोदी यांचे खरे स्वरूप जगजाहीर करणारे सत्यपाल मलिक आहेत तरी कोण? याबद्दल देशात सर्वांच्या मनात उत्सूकता निर्माण झाली आहे.

सत्यपाल मलिक हे सध्या ७५ वर्षांचे असून त्यांचा जन्म २४ जुलै १९४६ साली उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील हिसावदा या गावात झाला. राममनोहर लोहियांच्या विचारांनी ते प्रेरित झाले. समाजवादी विचारसरणी अंगिकारून त्यांनी राजकारणाची कास पकडली आणि विद्यार्थी राजकारणात सक्रिय झाले. त्यांनी बीएससी व नंतर एलएलबी हे शिक्षण घेतले. महाविद्यालयीन जीवनात १९६८ साली ते विद्यार्थी संघाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. हा काळ हरित क्रांतीचा होता. ७० च्या दशकात उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना विशेषतः पश्चिमेकडील शेतकऱ्यांना प्रगतीपथावर नेण्याचे काम चौधरी चरण सिंग यांनी केले. त्यामुळे चरण सिंग हे तेव्हा लोकप्रिय नेतृत्व म्हणून पुढे आले होते. काँग्रेसला पर्यायी राजकारण करण्याचा प्रयत्न तेव्हा त्यांनी चालवला होता. चरण सिंग हे नवे नेतृत्व पारखणारे व्यक्ती होते. त्यांनी मलिक यांच्यातील नेतृत्व गुण हेरले आणि त्यांना आपल्या भारतीय क्रांती दल या पक्षात स्थान दिले. मलिक यांना १९७४ साली बागपत विधानसभेची उमेदवारी देण्यात आली. ही निवडणूक ते जिंकले आणि त्यांच्या संसदीय राजकारणाची सुरूवात झाली. विधानसभेत त्यांनी समाजवादी नेता म्हणून शेतकऱ्यांचे प्रश्न अतिशय प्रभावीपणे मांडले.

चौधरी चरण सिंग यांचे शिष्यत्व पत्करून राजकीय वाटचाल सुरू केलेल्या मलिक यांनी आजवर भारतीय क्रांती दल, काँग्रेस, जनता दल,समाजवादी पक्ष आणि भाजप अशी विविध पक्षात मुशाफिरी केली आहे. आमदार, राज्यसभा व लोकसभा सदस्य, केंद्रीय राज्यमंत्री, भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष असा प्रदीर्घ वैविध्यपूर्ण राजकीय अनुभवही त्यांच्या गाठीशी आहे. अटलबिहारी वाजपेयी यांच्या व्यक्तीमत्वाने प्रेरित होऊन त्यांनी २००४ मध्ये भाजपात प्रवेश केला आणि पुढे १३ वर्षे त्यांनी भाजपात काम केले. त्यांना उत्तर प्रदेश भाजपात उपाध्यक्ष करण्यात आले. त्यानंतर ते भाजपचे २०१२ आणि २०१४ असे दोनदा राष्ट्रीय उपाध्यक्ष झाले आणि भाजपच्या शेतकरी आघाडीचे ते प्रभारी असतानाच त्यांना सप्टेंबर २०१७ मध्ये बिहार राज्याचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली.

सतत बदली होणारे राज्यपाल

सत्ताधाऱ्यांना अडचणीचे ठरणाऱ्या प्रामाणिक अधिकाऱ्यांची सत्ताधारी सतत बदली करीत असतात, हे आपण पाहिले आहे. सत्यपाल मलिक यांची अवस्था अशा अधिकाऱ्यांसारखी झाली आहे. राज्यपाल पदी नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या चार वर्षात त्यांची चार राज्यांमध्ये बदली करण्यात आली आहे. ओडिशाचा काही महिने असलेला अतिरिक्त कार्यभार लक्षात घेतल्यास चार वर्षात पाच राज्यांचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. सप्टेंबर २०१७ ते ऑगस्ट २०१८ या काळात ते बिहारचे राज्यपाल होते. त्यानंतर ऑगस्ट २०१८ मध्ये त्यांची नियुक्ती जम्मू काश्मीरचे राज्यपाल म्हणून झाली. जम्मू काश्मीर राज्याच्या इतिहासात जवळपास ५० वर्षानंतर कुण्या राजकीय नेत्याला राज्यपाल पदी नियुक्ती देण्यात आली. तोवर सतत निवृत्त नोकरशहाच वा निवृत्त लष्करी अधिकारीच या राज्याचे राज्यपाल राहिले आहेत. १० वर्षे राज्यपाल राहिलेल्या माजी केंद्रीय गृह सचिव एन.एन. वोहरा यांच्यानंतर त्यांनी राज्यपाल म्हणून पदभार स्वीकारला. त्यांच्याच कार्यकाळात ऑगस्ट २०१९मध्ये जम्मू काश्मीरमधील ३७० कलम रद्द करण्यात आले आणि जम्मू काश्मीर राज्याचे विभाजन करून राज्याचा दर्जा काढून घेण्यात आला. त्यानंतर त्यांना गोवा राज्याचे राज्यपाल म्हणून नोव्हेंबर २०१९ मध्ये पाठविण्यात आले. येथे ऑगस्ट २०२० पर्यंत त्यांनी काम केल्यावर त्यांची पुन्हा बदली करण्यात आली आणि त्यांची रवानगी राजकीयदृष्ट्या फार महत्व नसलेल्या मेघालयात करण्यात आली. सध्या ते मेघालयचे राज्यपाल आहेत.

सत्यपाल असे का वागतात?

“मी जेव्हा माझ्या घरी परतेल तेव्हा मला कुणी हे म्हणू नये की त्यांच्या पाठिशी उभा राहिलो नाही आणि भाजपच्या नेत्याला साजेसे वागलो नाही’’, अशा शब्दात स्वतः मलिक यांनी आपल्या स्पष्टवक्तेपणाचे रहस्य सांगितले आहे. त्यांना जवळून ओळखणाऱ्यांना त्यांचा मूळ पिंड हा लोहियांचा समाजवाद आणि चौधरी चरण सिंग यांच्या शेतकरी कल्याणाचा विचार आहे, असे वाटते.

विद्यार्थी दशेपासूनच ते सडेतोड, स्पष्टवक्ते नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. आजही त्यांच्या स्पष्टवक्तेपणात आणि भीड मूर्वत न बाळगता सत्य सांगणाऱ्या स्वभावात काहीही बदल झालेला नाही. या स्पष्टवक्तेपणाची किंमत त्यांना राज्यपाल झाल्यापासून चुकवावी लागत आहे. म्हणूनच चार वर्षांपूर्वी बिहारसारख्या महत्वपूर्ण राज्याचे राज्यपाल असलेल्या मलिकांना आता दूर मेघालयात पाठवून त्यांना विजनवासात पाठविण्याचा आणि खरे बोलल्याबद्दल धडा शिकविण्याचा खटाटोप केंद्र सरकारतर्फे केला जात आहे.

मलिक यांची हकालपट्टी का होत नाही?

सत्यपाल मलिक यांची तोफ सातत्याने भाजप नेतृत्वावर धडाडत असतानाही त्यांची राज्यपाल पदावरून हकालपट्टी का केली जात नाही, हा प्रश्न देशात चर्चेचा विषय आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अहंकारी असल्याचे विशेषण बहाल करून आणि ५०० शेतकऱ्यांच्या हौतात्म्याबद्दलचे त्यांचे मग्रुरीपूर्ण विधान जगजाहीर केल्यानंतर तरी त्यांच्यावर कारवाई होईल, असे बोलले जात होते. कारवाई तर दूर त्यांच्या विधानांवर प्रतिक्रिया व्यक्त करण्याची हिंमतही भाजपमध्ये कुणीही दाखवू शकलेले नाही. मलिक तर गेल्या १७ वर्षांपासून भाजपच्या आतल्या गोटातील नेते आणि उत्तर प्रदेशसारख्या राज्यात तयार झालेले मुत्सद्दी राजकारणी आहेत. त्यामुळे त्यांनी मोदींची कमकुवत बाजू ओळखली आहे. उत्तर प्रदेशात येत्या काही महिन्यातच विधानसभेची निवडणूक आहे. केंद्रातील आपले सरकार उत्तर प्रदेशात मिळालेल्या घवघवीत यशामुळे आले आहे, याची जाण मोदींना आहे. त्यामुळे आता मलिकांना राज्यपाल पदावरून हटविल्यास त्याची जबर राजकीय किंमत आपल्याला चुकवावी लागेल, याची त्यांना कल्पना आहे. मोदींना परत २०२४ मध्ये देशाचे पंतप्रधान व्हायचे असेल तर त्यांना उत्तर प्रदेशची साथ हवी आहे. मलिक हे जाट या जातीचे आहेत. उत्तर प्रदेशातील २२ जिल्ह्यात या जातीची लोकसंख्या १४ टक्के आहे. सेंटर फॉर दि स्टडी ऑफ डेव्हलपिंग सोसायटीज (सीएसडीएस)ने केलेल्या एका अभ्यासानुसार २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला जाट समाजाच्या एकूण मतदारांपैकी ७७ टक्के तर २०१९ च्या निवडणुकीत ९१ टक्के मते मिळाली. २०१७ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत आरक्षणासाठी आक्रमक झालेल्या जाट समाजाला शांत करून त्यांना भाजपकडे वळविण्यात मलिक यांची मोठी भूमिका होती. मोदी सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरूद्ध शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनात जाट समाजाचा मोठा सहभाग होता. हा समाज मोदी सरकारच्या या कायद्यांमुळे आणि ज्या पद्धतीने आंदोलकांना वागवण्यात आले त्यामुळे चिंतित आहे. अशात मलिक यांच्यावर कारवाई केल्यास त्याचा फटका केवळ उत्तर प्रदेशातच नव्हे तर जाटबहुल असलेल्या हरियाणात आणि पंजाबमध्येही बसू शकतो. राज्यपाल पदावरून दूर केले गेल्यास सत्य बोलल्याबद्दल त्यांची हकालपट्टी झाली असा निष्कर्ष काढला जाऊन मलिक हे राजकीय हुतात्मा ठरू शकतात. त्यामुळे सप्टेंबर २०२२ ला त्यांच्या राज्यपालपदाची मुदत संपेपर्यंत हात चोळत वाट पाहणे, याशिवाय तरी दुसरा पर्याय मोदींसमोर नाही. मलिक यांच्या विधानांचे थेट खंडन करण्याचे धाडसही मोदी दाखवू शकलेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मृत्यूबद्दल मोदींना सहानुभूती नव्हती आणि “ते माझ्यासाठी मेले का?” असा उर्मट प्रश्न त्यांनी विचारला यावर एकप्रकारे शिक्कामोर्तब झालेले आहे.

‘हमारा नेता अंगार है, बाकी सब भंगार है’ अशा संवग घोषणा राजकारणात दिल्या जातात. मोदींकडून आणि केंद्र सरकारकडून असंख्य चुका होत असूनही देश, सर्वसामान्य माणूस, शेतकरी, देशाची अर्थव्यवस्था देशोधडीला लागत असूनही याविरूद्ध खासगीत बोलणाऱ्या मात्र पक्ष नेत्याला वा मोदींना सत्यस्थिती सांगण्याचे धाडस दाखवू न शकणाऱ्या सध्याच्या देशातील भाजप नेत्यांच्या तुलनेत सत्यपाल हेच ‘एकमेव अंगार’ आहेत हे आता स्पष्ट झाले आहे. हा जळता निखारा तळहातावर घेऊन मोदी व भाजप किती काळ व कशी चालेल, हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

pchunchuwar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...