आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:एक अनोखी प्रेमकहाणी... विचारांनी जुळलेली, सिद्धांताने साकारलेली

डॉ. भारत पाटणकर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रातील सत्यशोधक आणि डाव्या चळवळीबाबत, समाजव्यवस्था बदलण्याबाबत गेलचा दृष्टिकोन अपारंपरिक होता आणि माझीही या चळवळीकडे पाहण्याची भूमिका तशीच होती. म्हणूनच आमच्यात आगळे बंध तयार झाले, ते दृढ होत गेले. एका अर्थाने आम्ही दोघेही बंडखोर प्रवृत्तीचे असल्यानेच आमचे प्रेमबंध जुळले आणि ते टिकले. हे केवळ वरवरचे प्रेम नव्हते, तर ते विचाराने जुळलेले प्रेम होते, सिद्धांताने साकारलेले प्रेम होते. आमच्यातील हाच प्रेमबंध शेवटपर्यंत कायम राहिला... ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ आणि विचारवंत डॉ. गेल ऑम्वेट यांचे नुकतेच निधन झाले. त्यांचे पती आणि श्रमिक मुक्ती दलाचे सहसंस्थापक -अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी डॉ. गेल आणि त्यांच्यातील नात्याचे उलगडलेले पदर...

गेल भारतात प्रथम १९६३ साली पदवीधर झाल्यानंतर आली. दुसऱ्या देशात शिष्यवृत्ती घेऊन अभ्यासासाठी , संशोधनासाठी जाण्यासाठी तिला परवानगी मिळाली. त्यावेळी तिच्या बॅचचे अनेक अमेरिकन नागरिक भारतात आले होते. ती प्रथम १९६३ ला नागपुरात आली. तेथे ती अॅडव्हान्स इंग्लिश शिकवत होती. देशातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक परिस्थितीची तिने माहिती घेतली. तिला या संदर्भात अहवाल तयार करायचा होता. तो तयार करून युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्निया, बर्कले येथे पाठवला. आणि ती त्यावेळी एमए झाली. त्याचवेळी, साठच्या दशकाच्या उत्तरार्धात अमेरिकेत विद्यार्थी चळवळी सुरू झाल्या. व्हिएतनाम विरोधात युद्ध करण्याच्या भूमिकेविरोधात या चळवळी होत्या. विद्यार्थ्यांना व्हिएतनाम विरुद्धचे युद्ध मान्य नव्हते. या युद्धविरोधी विद्यार्थी चळवळीमध्ये गेलचा पुढाकार होता. सिव्हिल राइट्स मूव्हमेंट सुरू होती. त्यातही तिचा मोठा सहभाग होता. आफ्रिकन लोक गुलाम म्हणून आणले होते. त्या विरोधात चळवळ उभी राहिली. त्यामध्येही गेलने पुढाकार घेतला होता. गुलामांच्या वसाहतीत जाऊन शिक्षणासाठी मदत करणे, काही सेवारुपी मदत करण्यासाठी संघटित प्रयत्न करण्यासह स्त्री मुक्ती चळवळीतही तिचा सहभाग होता. तिसऱ्या जगावर आर्थिक प्रभुत्व गाजवणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही, यासाठी थर्ड वर्ल्ड स्टडीजची मागणी केली गेली, त्यातही गेलचा पुढाकार होता‌.

या कालावधीत ती पुन्हा भारतात आली. त्यावेळी या देशातील, विशेषत: महाराष्ट्रातील सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक बाबींचा तिने प्रत्यक्ष जाऊन अभ्यास केला, संशोधन केले. तिचा पीएच.डी. चा प्रबंध ‘महात्मा फुले यांची सत्यशोधक चळवळ व शाहू महाराजांची ब्राह्मणेतर चळवळ’ या विषयावर होता. या प्रबंधाच्या पूर्ततेसाठी १९७२ ला गेल पुन्हा भारतात आली. महात्मा फुले, ब्राह्मणेतर चळवळ यांचा अभ्यास करण्यासाठी केवळ पुणे-मुंबईवर अवलंबून न राहता तिला ग्रामीण भागात प्रत्यक्ष गावोगावी जाऊन अभ्यास करायचा होता. सत्यशोधक चळवळीचा अभ्यास ग्रंथालयात बसून करण्यापेक्षा प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन करणे तिने पसंत केले. तिचा हा प्रबंध १९७३ मध्ये पूर्ण झाला. साठोत्तरीचा काळ भारतात वादळी कालखंड ठरला होता. अनेक तरुण- तरुणी उसळून चळवळीत सहभागी होत होत्या. दलित पँथर, युवक क्रांती दल, सातारचे समाजवादी युवक दल या संघटनांची त्या काळात निर्मिती झाली आणि त्यांच्यात सहभागी युवकांनी पारंपरिक चळवळीचे स्वरूप अपारंपरिक स्वरूपात बदलले. त्याचवेळी मागोवा ग्रुपही स्थापन झाला. ‘मागोवा’मध्ये मी होतो. नवीन मांडणी करणारा ग्रुप होता. पारंपरिक मांडणी मान्य नसणारा हा एकच ग्रुप होता. गेल भारतात आली, त्यावेळी ज्या चळवळी सुरू होत्या, त्यात प्रामुख्याने या सर्व ग्रुपशी तिचा संबंध होता. त्यातल्या त्यात मागोवा ग्रुपशी ती जास्त निगडीत होती. सत्यशोधक चळवळीच्या अभ्यासामुळे या चळवळीत सहभागी असलेल्या अनेकांशी तिचा संबंध आला. लाल निशाण पक्षाशी संबंध आला. लाल निशाण पक्षाचे पुढारी अॅड. दत्ता देशमुख तसेच सत्यशोधकी परंपरा असलेले भास्करराव जाधव यांचे अहमदनगर येथील केंद्र, त्याचबरोबर मुंबईतील या पक्षाच्या कार्यालयाशी तिचा संपर्क आला. ‘युक्रांद’मुळे डॉ. कुमार सप्तर्षी यांच्याशीही गेलचा संपर्क होता.

‘मागोवा’ या संघटनेचे कार्यालय पुण्यात सुधीर बेडेकरांच्या घराच्या माडीवर होते. तेथे माझ्या आणि गेलच्या अनेक वेळा भेटी व्हायच्या. त्यावेळी आमच्या दोघांमध्ये लग्नाचा विषयही चर्चेला आला नव्हता. गेलने सातारा, सांगली या भागात अनेक दौरे केले. त्यामध्ये सातारा जिल्ह्यातील सत्यशोधक चळवळीचे केंद्र असलेल्या काले, वाठार, पाडळी, सातारा या गावांतून गेल माझ्या आईबरोबर अर्थात इंदुताई पाटणकर यांच्यासोबत जात असे. कासेगावला मारुती आबा मुदगे- यादव यांचा सत्यशोधकी जलसा होता. जमीनदारांनी, भांडवलदारांनी शेतकऱ्यांच्या केलेल्या लुटीबाबत जनजागृती करण्याचे काम या जलशाने केले. माझी ओळख होण्याअगोदर गेल यासंदर्भात कासेगावला आली होती, हे मला नंतर समजले. त्यानंतर ती प्राचार्य मा. पं. मंगुडकर कासेगावला येणार होते, त्यावेळी त्यांच्याशी चर्चा करायला आली होती. माझ्या आईमुळेच या दोघांची भेट झाली. माझी भेट होण्यापूर्वीही गेल माझ्या आईला अनेक वेळा भेटली होती. मुंबईला मी कामगार चळवळीत सहभागी होतो. त्याचवेळी शहादा येथे श्रमिक संघटनेचे काम सुरू होते. त्या ठिकाणीही अभ्यासाचा भाग म्हणून गेल जात होती. स्त्रीमुक्तीचा विचार घेऊन काम सुरू होते, तिथे ती राहत होती. मुंबई , पुणे आणि शहादा येथील कार्यकर्त्यांबरोबर आमचा परिचय वाढत गेला. मग मुंबईला तिच्याच पुढाकाराने स्त्रीमुक्ती आंदोलनातील एक नेत्या छाया दातार यांच्या घरी आमची पहिली भेट झाली आणि तेथूनच आमच्या प्रेम कहाणीला सुररूवात झाली.

छाया दातार यांच्या घराचे कंपाउंड ओलांडले, की मागच्या बाजूला समुद्र. त्या बंगल्याच्या कंपाउंडवर बसून आम्ही भरती आलेला समुद्र पाहात होतो आणि तेथेच आमच्या प्रेमाची पहिली सुरुवात झाली. १९७४ चा तो काळ असेल. त्यानंतर पुण्यातील गोखले इन्स्टिट्यूट ला ती पुन्हा अभ्यासासाठी आली . ती स्त्रीमुक्तीवर लेख लिहायची. डाव्या, परिवर्तनवादी, मार्क्सवादी असलेल्या पारंपरिक चळवळी नाकारून ती मांडणी करत असल्याने तिची आणि आमची अधिक जवळीक होती. मागोवा ग्रुप तिला अधिक जवळचा वाटत होता. त्यात आमची मैत्री वाढत गेली.“मागोवा’चे कार्यकर्ते पोथीनिष्ठ नव्हते. त्यामुळे प्रसंगी कार्ल मार्क्सचे विचार आम्ही बाजूला ठेवू, अशी मांडणी ते करत होते. याला त्यावेळी ‘युगांतर’मधून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्यांनी उत्तर दिले होते. मागोवा मासिकामध्ये त्यावेळी गेल ब्लॅक पँथर चळवळीविषयी लिहायची. मागोवाच्या संबंधाबरोबरच आम्हा दोघांच्या भेटी वाढत गेल्या. आणि त्याचवेळी भारतात आणीबाणीचा कालखंड सुरू झाला. त्यावेळी आम्ही मागोवा ग्रुप विसर्जित केला. गेल संशोधनासाठी आली असल्याने तिचा देशात मुक्काम होताच. ती पुण्यात वास्तव्याला होती. आम्ही १९७८ मध्ये औपचारिकरीत्या लग्न करायचे ठरवले. रजिस्टर मॅरेजसाठी नोटीस देणे आवश्यक होते. आणि नोटीस दिली असती, तर मला वॉरंट असल्याने पकडला गेलो असतो. त्यामुळे आम्ही पारंपरिक पद्धतीने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न होण्याआधी कासेगाव येथे आम्ही गेलो. तेथे आईशी चर्चा केली. सुधीर बेडेकर यांनी आईला मी ठाणे येथे राहत असलेल्या सुहास परांजपे, स्वातीजा कान्हेरे- परांजपे यांच्या घरी बोलावले‌. तेथे आई इंदुताई ,विक्रम कान्हेरे, सुधीर बेडेकर, सुहास परांजपे, स्वातीजा कान्हेरे, गेल आणि मी असे होतो. तेथे आमची चर्चा झाली. आईला सतत असे वाटत होते, किंबहुना तिच्या डोक्यात भरवून देण्यात आले होते की, ही अमेरिकन मुलगी, त्यामुळे लग्न झाल्यावर ते टिकेल का? परंतु, गेलने आईला कन्व्हिन्स केले. आईचा आणि तिचा पूर्वीचा परिचय असल्याने तिने आईला विचारले, की तुम्ही बंड करून कसं केलं लग्न? आमचंही तसंच आहे. मी तुम्हाला सांगते, की आमच्याकडून किंवा माझ्याकडून तुम्हाला वाटतं तसं काही होणार नाही. आम्ही ठरवून नाही, तर बंड करून प्रेमबंधात अडकलो आहोत. अर्थात आईने आमच्या लग्नाला संमतीच दिली.

पुणे येथे लाल निशाण पक्षाचे नेते आप्पासाहेब भोसले यांच्या घरी आमचे लग्न झाले. त्या लग्नाला आम्ही केवळ बारा जण उपस्थित होतो. त्यामध्ये इंदोलीचे मामा-मामी, डॉक्टर बने, सुधीर बेडेकर, चित्रा बेडेकर, माझा मिरजेचा महाविद्यालयीन मित्र डॉ. श्रीकांत खैर, कॉम्रेड यशवंत चव्हाण, कॉम्रेड मधुकर कात्रे, लीलाताई भोसले आणि गेलची सफाई कामगारांची नेता असलेली आणि स्वतः सफाई कामगार असलेली मैत्रीण ताराबाई एवढ्याच लोकांच्या उपस्थितीत आमचे लग्न झाले. गेलच्या आई-वडिलांची भूमिका आप्पासाहेब भोसले व लिलाताई भोसले या दाम्पत्याने बजावली. आम्ही परस्परांमध्ये काय बघितलं असे मला विचारले, तर मी सांगेन की गेलचा सत्यशोधक चळवळीचा अभ्यास करण्याचा दृष्टिकोन अपारंपरिक होता, तसाच अपारंपरिक दृष्टीकोन माझाही होता आणि आहे. त्यामुळेच आमचे प्रेमबंध जुळले आणि टिकले. ग्रामीण भागात जायला कष्ट करावे लागतात या मानसिकतेशी मेळ खाणारे आमचे प्रेमबंध होते.. आमच्या विचारात स्वप्नाळूपणा होता, त्यामुळेच आमचे जुळले. आमचा दोघांचाही विचार स्त्रीमुक्तीचा होता. आईची बंडखोरी मला आईनेच सांगितल्यामुळे माहीत होती. ही बंडखोरी आवश्यक असल्याने आणि ती स्वप्नाळू असणे एकत्रित येण्यासाठी गरजेचे असल्याने हे प्रेमबंध जुळले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावरील संशोधन, त्यांचा इतिहास, सत्यशोधक चळवळीचा इतिहास जाणून घेण्यासंदर्भातील जिव्हाळा , प्रेम निर्माण झाले आणि ते शेवटपर्यंत टिकले. तोच बंध अखेरपर्यंत कायम राहिला. मार्क्सचा सिद्धांत सोप्या भाषेत मांडणे, शोषणमुक्त समाज निर्माण करणे, त्याला हरवू न देणे, हा स्वप्नाळूपणा आम्ही कधीच संपू दिला नाही. आम्ही सदैव एकत्र राहिलो. एकमेकापासून लांब होतो, असे काही झाले नाही. अभ्यासासाठी बाहेरच्या देशात गेल जात होती. शिकवण्यासाठी ती स्वीडन, नॉर्वे, थायलंड, अमेरिकेत जात होती आणि मी येथे चळवळीत गुंतलेलो.. तरीही आमचे बंध कधीच तुटले नाहीत. बंधांची वीण घट्टच होत गेली. आमचे सिद्धांताच्या बारकाव्याच्या अनुषंगाने मतभेद नसायचे. मतभेद असलेच तर ते कार्यक्रम कसा असावा याविषयी. निरोगी मतभेद असणे ही आपत्ती नसून प्रगतीच्या दृष्टीने ते गरजेचे आहे. मतभेदाऐवजी शोध घेण्याचे मार्ग तपासण्याची प्रक्रिया आम्ही सुरू ठेवायचो. आम्ही दोघेही सहचर होतो. त्यात ती चारिका होती. त्यामुळे आम्ही एकत्रित असणारच. या संदर्भातील एकच उदाहरण माझ्या दृष्टीने महत्त्वाचे आहे, ते म्हणजे गेल बाहेर कोठेही असली, तरी आम्ही ठराविक वेळी एकमेकांना फोनवर संपर्क साधत असू. फोन लागला नाही, तर आम्हाला अस्वस्थ व्हायला व्हायचे. पण, फोन लागेपर्यंत आम्ही शांत बसत नसू. पुन्हा फोन लावत असू.. अशी आमची मानसिकता होती. आमचे मुख्य ध्येय ठरलेले होते.

शेतकरी संघटनेला पाठिंबा देण्याच्या मुद्द्यावर माझे आणि गेलचे व्यक्तिगत मतभेद होते असे नाही. शरद जोशी यांच्या चळवळीमध्ये भूमिहीन शेतकरी पाच टक्के सुद्धा नाहीत, असे म्हणून जोशींच्या थेअरीवर मतभेद करणे वेगळे अन् ते श्रीमंत शेतकऱ्यांचे प्रतिनिधित्व करतात, असे म्हणणे वेगळे. तथापि, माझे गेलशी अजिबात मतभेद नव्हते. मुक्त अर्थव्यवस्था ही भांडवली विकासातील अवस्था आहे. भांडवलशाहीचा भांडवली विकास समाजवादाच्या जवळ घेऊन जाणारा आहे, यावर टीका झाली. हा मुद्दा लक्षात घेता अंतर्विरोध ओळखून त्याला तडाखा द्या, असे म्हटले. यावर गेलने जे लिहिले आहे, त्यावर आजपर्यंत कोणीही पुन्हा काही लिहिले नाही. गेलचे समर्थन म्हणून मी स्वतः "मुक्त अर्थव्यवस्था आणि वर्गीय,जातीय, लैंगिक शोषण’ नावाची पुस्तिका लिहिली.

आमच्यात मतभेदांचा व त्यावर मात करण्याचा प्रश्नच आला नाही. वितंडवाद कधीच झाला नाही. वैज्ञानिक आणि सैध्दांतिक पायावर तपासूनच आम्ही भूमिका घेतल्या होत्या. आमच्या भावना समाजबदलाच्या संस्कृतीशी संबंधित आहेत. नवा समाज निर्माण करण्याच्या आहेत. या प्रवासात दोघे मिळून जे स्वप्न पाहिले, त्यासाठीचा भाग म्हणून आमचे प्रेम सुरू झालं. आणि त्या स्वप्नाला मूर्त स्वरूप आलं आणि आम्ही फक्त चळवळ केली नाही, तर शास्त्रीय समाजवाद व समाज विज्ञानाचा पाया शोधला. आम्ही संयुक्तपणे फुले-आंबेडकर, मार्क्स यांच्या विचारांची बेरीज केली नाही, तर त्या विचारांच्या फांद्यावर उभे राहून वंशवादविरोधी चळवळ, स्त्रीमुक्ती चळवळ यांचे स्वप्न पाहात गेलो. या साऱ्यांचा एकत्रित विचार झाला पाहिजे, या दृष्टीने आम्ही नवा सिद्धांत मांडला. आम्ही महात्मा फुले यांच्या विचारातील मार्क्स आणि आंबेडकर घेतले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारातील महात्मा फुले आणि मार्क्स घेतले आणि मार्क्समधील फुले- आंबेडकरांना शोधले. हे फार कमी लोकांनी केले. ते आम्ही दोघांनी केले, म्हणूनच आमचे प्रेमबंध अखेरपर्यंत टिकले. आम्ही यशस्वी झालो.

शब्दांकन- विजय मांडके, सातारा.

बातम्या आणखी आहेत...