आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा'स्क्विड गेम' ही नेटफ्लिक्सवर असणारी नऊ एपिसोड्सची सिरीज त्यातल्या वेगळ्या आशयामुळे खूप गाजत आहे. दिग्दर्शक हाँग डॉक ह्युकची ही सिरीज मनोरंजक तर आहेच पण पोस्ट कोविड जगावर अप्रत्यक्ष भाष्य करणारी आहे. गेल्या काही वर्षात कोरियन सिनेमाने जगभरातल्या प्रेक्षकांना गारुड घातलं आहे. कोरियन कलाकृतींमध्ये स्थानिक सांस्कृतिक संदर्भ ठासून भरलेले असतात.'स्क्विड गेम' पण भांडवलशाहीमधल्या आर्थिक विषमतेवर आणि समानतेच्या संधी वर बोलतो.
मानवाने खेळाचा शोध हा वेळ घालवण्याच्या गरजेतून लावला असावा. पण मनुष्य जमात उत्क्रांतीच्या पायऱ्या झपाट्याने चढू लागली, तसं तसं मनोरंजनाचा आणि वेळ घालवण्याचा एक प्रकार इतकंच खेळाचं महत्व राहिलं नाही. खेळ देश,धर्म,आणि इतर समूहांच्या अस्मितेचं प्रतीक बनू लागला आणि खेळाच्या 'खेळाचे' नियमच बदलून गेले. खेळ हे देशाच्या किंवा समूहाच्या मनस्थितीचं एकक बनले. खेळामधली हार -जीत जीवनमरणापेक्षा आणि देशासमोरच्या ज्वलंत आणि धगधगत्या प्रश्नांपेक्षा मोठी बनू लागली आणि त्यातून वेगळेच प्रश्न उभे राहू लागले. एका फुटबॉल सामन्यातल्या पराभवामुळे होंडुरास आणि अल साल्वाडोर या दोन देशांमध्ये युद्ध पेटलं होत. बोरीस स्पास्की आणि बॉबी फिशर यांच्यातला अजरामर बुद्धिबळाचा सामना विसरलात का? हा फक्त दोन महान बुद्धिबळपटूमधला सामना नव्हता. त्याला दोन महासत्तांमधल्या शीतयुद्धाची पार्श्वभूमी होती. स्पास्की आणि फिशर मधला सामना हा एकप्रकारे तात्कलिन सोवियेत युनियन आणि अमेरिका यांच्यातल्या शीतयुद्धाचा एक महत्वाचा भाग होता. फारस लांब कशाला जायचं? भारत आणि पाकिस्तान जेंव्हा जेंव्हा क्रिकेट सामन्यात एकमेकांना भिडतात तेंव्हा दोन्ही देशातले कोट्यवधी लोक सगळ्या समस्या, काम तात्पुरतं बाजूला ठेवून टीव्हीसमोर ठिय्या मांडून बसतातच की. त्या अर्थाने तुमचा देश कुठला खेळ, किती वेळ आणि कुठल्या प्राथमिकतेने बघतो यावरून देशाच्या मनस्थितीबद्दल, परिस्थितीबद्दल अनेक विधान करता येतात. एखादा खेळ हा अनेकदा माणसातलं छुपं हिंसाचारी जनावर पण जाग करत असतो. माणसांमधला मूळ शिकारी आदिमानवाचा अंश जागृत झाल्यावर काय होतं याचा अदमास घेणारी 'स्क्विड गेम ' ही सिरीज माणसातलं लपलेलं जनावर जागं झाल्यावर तो काय करू शकतो याचं अस्वस्थ करणार चित्र दाखवते.
'स्क्विड गेम' वर बोलण्यापूर्वी दक्षिण कोरिया या देशावर आणि तिथल्या कलाकृतींवर थोडं बोलायला पाहिजे. दक्षिण कोरिया आणि भारतामध्ये अनेक बाबतीत साम्य आहेत. दुसऱ्या महायुद्धानंतर पूर्णपणे बदलत चाललेल्या जागतिक संरचनेची ही दोन्ही राष्ट्र अपत्य आहेत. कोरियन राष्ट्राची पण भारतासारखीच फाळणी झाली. भारत पाकिस्तानसारखंच कोरियन राष्ट्राच्या फाळणीतून निर्माण झालेले उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरिया हे दोन्ही देश एकमेकांवर बंदुकांच्या संगिनी रोखून उभे आहेत. फाळणीनंतर भारत हा सेक्युलर,सुधारक, देशातल्या सर्व समूहांना सोबत घेऊन जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या मार्गावर गेला. याउलट धर्माधिष्ठित पाकिस्तानची वाटचाल धार्मिक कट्टरवादाकडे सुरु झाली. उत्तर कोरियाची वाटचाल पण अनिर्बंध हुकूमशाहीकडे आणि युद्धखोरीकडे चालू झाली. पाकिस्तानच्या आण्विक कार्यक्रमाला आणि क्षेपणास्त्र कार्यक्रमाला उत्तर कोरियाने बरीच मदत केली हा योगायोग नसावा.
गेल्या काही वर्षात कोरियन सिनेमाने जगभरातल्या प्रेक्षकांना गारुड घातलं आहे. 'ट्रेन टू बुसान ', 'आय सॉ द डेव्हील' , मेमरीज ऑफ मर्डर' हे सिनेमे बघितले नाहीत असा चित्रपटप्रेमी सापडणार नाही. साय या गायकाच्या 'ओपा गंगम स्टाईल' गाण्याने जगभरात धुमाकूळ घालून लोकप्रियतेचे उच्चांक गाठले होते. दक्षिण कोरियाच्याच बीटीएस या बॉय बँडला कोरियाच्या बाहेर पण अभूतपूर्व प्रसिद्धी मिळत आहे. त्यातच बोन्ग जु हो या दिग्दर्शकाच्या 'पॅरासाईट' सिनेमाला सर्वोत्कृष्ट सिनेमाचं ऑस्कर मिळालं आणि कोरियन सिनेमाच्या दुदुंभी सर्वत्र वाजल्या. पॉप कल्चरमध्ये हा दक्षिण कोरियाई दिग्विजय सुरु झाला असतानाच नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या 'स्क्विड गेम्स' या शो ला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळायला लागला. क्वचितचं प्रेक्षकांचे आकडे जाहीर करणाऱ्या नेटफ्लिक्सने घोषणा केली की 'स्क्विड गेम्स' हा त्यांचा सगळ्यात जास्त बघितलेला गेलेला शो बनण्याच्या मार्गावर आहे. कोरियन कलाकृतींमध्ये स्थानिक सांस्कृतिक संदर्भ ठासून भरलेले असतात. विदेशी प्रेक्षकांनी आपला शो बघावा यासाठी ते याबाबतीत तडजोडी करत नाहीत. पण संदर्भ जरी स्थानिक असले तरी कोरियन कलाकृतींमध्ये एक 'जागतिक अपील' असतं जे जगातल्या कुठल्याही कोपऱ्यातल्या माणसाला भावतं. 'पॅरासाईट'चं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य म्हणजे सिनेमाच्या कथानकात असणारी वैश्विकता. सिनेमाची कथा जरी कोरियात घडत असली तरी ती भारतातल्या कुठल्याही श्रमिक पुरवठा केंद्र असणाऱ्या झोपडपट्टीत घडू शकते, इतकी सर्वव्यापी आहे. 'स्क्विड गेम' पण भांडवलशाहीमधल्या आर्थिक विषमतेवर आणि समानतेच्या संधी वर बोलतो.
'स्क्विड गेम ' ही नेटफ्लिक्सवर असणारी नऊ एपिसोड्सची सिरीज त्यातल्या वेगळ्या आशयामुळे खूप गाजत आहे. दिग्दर्शक हाँग डॉक ह्युकची ही सिरीज मनोरंजक तर आहेच पण पोस्ट कोविड जगावर अप्रत्यक्ष भाष्य करणारी आहे. सेओंग (ली जुंग जे ) हा पन्नाशीच्या जवळ आलेला आर्थिक दिवाळखोरीत निघालेला बेजबाबदार माणूस. आर्थिकदृष्ट्या तो अजूनही भाजी विकणाऱ्या वृद्ध आईवर अवलंबून आहे. घटस्फोटित सेओंगचा जीव त्याच्या मुलीत अडकून पडलाय. पण त्याची माजी बायको त्यांच्या मुलीला घेऊन अमेरिकेला जाण्याची तयारी करते आहे. सेओंगला जुगार खेळण्याची पण सवय आहेच. पैसे कमवण्यासाठी मेहनत न करता तो सतत शॉर्टकट शोधत असतो. एके दिवशी या सेओंगला अनपेक्षित ठिकाणाहून एक ऑफर येते. एक कंपनी सेओंगला ऑफर देते की एका घरात सात दिवस राहायचं आणि वेगवेगळे खेळ खेळायचे. खेळातल्या विजेत्याला खूप मोठी रक्कम बक्षीस म्हणून मिळणार असते. सुरवातीला साशंक असणारा सेओंग पैसे मिळण्याचे सगळे मार्ग खुंटल्यावर काहीशा नाईलाजाने त्या घरात जायला तयार होतो. त्या घरात त्याच्यासारखेच ४५५ लोक असतात. या खेळाडूंमध्ये वेगवेगळ्या वयोगटातले, सामाजिक परिस्थितीमधले, व्यवसायातले स्त्री पुरुष सहभागी असतात. पण आपण लहानपणी जे खेळ खेळायचो, ते आता खेळायचे इतकं सहज निरुपद्रवी प्रकरण ते नसतं. खेळाच्या पहिल्या दिवशीचं कळतं की इथं तुम्ही हरण्याची शिक्षा मृत्यूचं आहे. पहिल्याच दिवशी दोनशेहून अधिक स्पर्धक 'एलिमिनेट' होतात. मग सात दिवस सात वेगवेगळे खेळ खेळताना हळूहळू स्पर्धक कमी व्हायला लागतात आणि शेवटी सेओंग मिळून तीन स्पर्धक उरतात. पण ह्या खेळाने तिघांमधलं बरंच काही शोषून घेतलं आहे. हा खेळ कोण जिंकत? पैशाने तुमच्यासमोरचे सगळेच प्रश्न सुटतात का? का त्यामुळे जगण्यातली क्लिष्टता अजूनच वाढते? जिंकण्यासाठी माणसं कुठल्या पातळीला जाऊ शकतात? खेळांमुळे तुमच्यातलं लपलेलं जनावर कसं बाहेर येतं? या प्रश्नांची उत्तर 'स्क्विड गेम' बघताना उलगडत जातात. 'स्क्विड गेम' मध्ये स्पर्धकांना सतत सांगण्यात येतं असतं की या घरात सर्वजण समान आहेत आणि सगळ्यांना या घरात समान संधी आहे. पण ते खरं असतं का? कारण अनेक खेळ असे असतात की ज्यात शारीरिक सामर्थ्य फार महत्वाचं असतं. त्यामुळे महिला आणि वृद्ध लोक तो खेळ जिंकण्याची शक्यता शून्य असते. त्याचप्रमाणे काही स्पर्धकांना कंपनी जरा जास्त पाठिंबा देत असते. याचं लोकशाही भांडवलशाही राष्ट्रांशी एक रोचक साम्य आहे. आपल्याला वारंवार सांगितलं जातं की देशातले सगळे नागरीक समान आहेत. पण दलित,अल्पसंख्य, आदिवासी, दिव्यांग,स्त्रिया ही लोक खरीच समान मानली जातात? त्यांना समान संधी आहेत? प्रश्नाचं खरं खरं पण डाचणार उत्तर मिळवायचं असेल तर या वर्गातल्या कुणाशीही संवाद साधा. मिळणारी उत्तर फारशी उत्साहवर्धक नसतील आणि आपल्या तथाकथित 'समानतेची' वाभाडे काढणारी असतील.
'स्क्विड गेम' मध्ये असं काय आहे की ज्यामुळे दक्षिण कोरियाच्या बाहेर राहणाऱ्या लोकांना पण या शो ची भुरळ पडली? या शोचं वैश्विक अपील नेमकं कशात असावं? 'स्क्विड गेम्स' मधले खेळाडू स्पर्धक त्या मोठ्या घरात अडकून पडले आहेत. त्यांना तिथून बाहेर जाण्याचं स्वातंत्र्य नाही. त्या घरात प्रचंड अनिश्चितता आहे आणि उद्याचा दिवस आपल्याला दिसेल याची खात्री नाही. गेली दोन वर्ष जगातली बहुसंख्य जनता लॉकडाऊनमुळे अशीच घरात अडकून पडली आहे. असंख्य लोकांनी आपले जवळचे लोक, मित्र,नातेवाईक कोरोनाच्या साथीने गमावले. या काळात कुणालाही आपल्या जीवाची शाश्वती नव्हती.'स्क्विड गेम' मधल्या त्या जेलरूपी घराशी आणि अनिश्चततेशी बहुसंख्य प्रेक्षक स्वतःला कनेक्ट करू शकत असावेत. लॉकडाउनच्या काळात जगभरात कौटुंबीक हिंसाचारात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे रिपोर्ट्स वर्तमानपत्रात आले होते. चोवीस तास माणसं डोक्याला डोकं लावून घरात राहू लागल्यावर असं नेमकं काय घडलं की माणसांना आपल्याच घरातल्या माणसांचा वीट आला? इतका की अनेकांनी आपल्या साथीदारापासून घटस्फोट घ्यायचं ठरवलं. इतके वर्ष सुरळीत चाललेले नातेसंबंध किती कचकड्याचे आहेत हे लॉकडाऊनमुळे आलेल्या सक्तीच्या सहवासामुळे अनेकांना लक्षात आलं असेल का? 'स्क्विड गेम्स' मधले ते बालपणीचे मित्र जसा जसा खेळ पुढं सरकत जातो तसं तसं एकमेकांपासून दूर जायला लागतात. एका खेळामध्ये तर आपला जीव वाचवण्यासाठी नवरा पत्नीचा बळी देतो. 'स्क्विड गेम्स' मधलं धुरकट काळोखी जग पोस्ट कोविड जगासारखंच आहे. बहुसंख्य लोक 'स्क्विड गेम्स' मधल्या जगाशी त्यामुळे स्वतःला रिलेट करू शकतात. सध्याचं आपल्या आजूबाजूचं जग पण 'रिऍलिटी शो' च्या जवळ जाणारं आहे. आपण सगळे या खेळातले पात्र आहोत आणि शेकडो कॅमेऱ्यांमधून तुमच्यावर नजर ठेवली जात आहे. तुम्ही कुठं जाताय, काय खाताय, काय पिताय, काय घालताय, कुणाशी आणि काय बोलताय याची बारीक नोंद सर्च इंजिन्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ठेवली जात आहे. 'स्क्विड गेम्स' मधल्या खेळाडूंनी जसं संमतीपत्र खेळाच्या आयोजकांना स्वखुशीने सही करून दिलं आहे,तसं आपणही आपलं स्वातंत्र्य आणि खाजगीपण या आय टी कंपन्यांकडे स्वखुशीने गहाण टाकलं आहे. आपण कुठेही असलो तरी सीसीटीव्ही कॅमेरे आपला पाठलाग करत असतातच. आजूबाजूची माध्यम तारस्वरात आपल्याला सांगत आहेत की वेगाने आपण महासत्ता बनण्याकडे वाटचाल करत आहोत. आजूबाजूला दिसणार भीषण दारिद्र्य दिसत असून, पण आपला मेंदू या महासत्ता प्रपोगंडासमोर शरणागती पत्कारत चाललाय. सोशल मीडियावर लोक आपण रोज किती सुंदर आहोत,आपण किती वेगवेगळ्या डिशेस खातो, आपण किती आनंदी आहोत,आपण आपल्या जवळच्या लोकांवर किती प्रेम करतो याचे थकवून टाकणारे अपडेट्स देत असताना, आपणच या जगातले सगळ्यात दुःखी माणूस असू असं पण हल्ली वाटतंय. कदाचित आपल्यालाच एक समूह म्हणून 'scripted reality' मध्ये राहण्याची सवय लागली असावी. मग नेमाडे 'कोसला' मध्ये लिहितात तसं -उदाहरणार्थ काही तरी झालं तरी हे आपल्याला खुंट्यावर आणून वैगेरे बांधतीलच. मग नेमकं अगोदरच खुंट्यावर येऊन उभं राहिलेलं बर.'द ट्रुमन शो ' मधला ट्रुमन असो, 'स्क्विड गेम' मधला सेओंग असेल आणि या खऱ्या रिऍलिटी शॉ मध्ये जगणारे आपण यांना जोडणारा हा वैश्विक धागा.
amoludgirkar@gmail.com
(लेखक सिने पटकथाकार आणि ब्लॉगर आहेत.)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.