आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:गडचिरोलीतील टायगर व्हर्सेस मॅन

हेमंत डोर्लीकर/ गडचिरोली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नक्षल्यांची दहशत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता वाघाची दहशत आहे. नक्षली आणि वाघ दोघेही दबा धरून बसलेले. नक्षली गावात येऊन मारतात. तर वाघ जंगलात मारतो एवढाच काय तो फरक. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मागील दोन वर्षात जेवढे जीव गेले नाहीत त्यापेक्षा अधिक जीव वाघांच्या हल्ल्यात गेले आहे. साधरणत: ऑगस्ट २०२० पर्यंत किरकोळ घटना वगळता गडचिरोली जिल्ह्याला मानव वन्यजीव संघर्षाची किनार नव्हती. मग हा संघर्ष अचानक वाढला काय ? याचे उत्तर नाही असे आहे.

परफ्यूमच्या एका जाहीरातीत सीमेवरील पाकिस्तानी सैनिक भारतीय सैनिकाला विचारतो की, "क्या चल रहा है', त्यावर तो उत्तरतो कि "हिंदुस्तान मे तो फाॅग चल रहा है'. त्याच धरतीवर कुणीजर विचारल की "गडचिरोली मे क्या चल रहा है', तर उत्तर येईल की "गडचिरोली मे तो बाघ चल रहा है'. नक्षल्यांची दहशत असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात आता वाघाची दहशत आहे. नक्षली आणि वाघ दोघेही दबा धरून बसलेले. नक्षली गावात येऊन मारतात. तर वाघ जंगलात मारतो एवढाच काय तो फरक. नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मागील दोन वर्षात जेवढे जीव गेले नाहीत त्यापेक्षा अधिक जीव वाघांच्या हल्ल्यात गेले आहे. वाघाच्या हल्ल्यात वर्षभरातील पंधरावा तर सप्टेंबर महिन्यातील चौथा माणसाचा बळी गेल्यानंतर येथील वातावरण ढवळून निघाले आहे.

१९५५ ला ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची घोषणा झाली. त्या वेळी आताचा गडचिरोली जिल्हा हा चंद्रपूर जिल्ह्याचाच भाग होता. जुनेजाणते लोक सांगतात की त्यावेळी गडचिरोली शहराभोवतालच्या जंगल परिसरात मोठ्या संख्येने वाघांचा वावर होता. परंतु संघर्ष नव्हता. कालांतराने हे वाघ हळूहळू इतरत्र स्थलांतरीत झाले. ताडोबा मध्ये २०११ ते २०१९ पर्यंत केलेल्या गणनेमध्ये वाघांची संख्या निरंतर वाढली. वर्तमान काळात ताडोबा कोअर, बफर घोडाझरी आणि ब्रह्मपूरी वनविभागात मिळून १२५ पेक्षा अधिक आहे. गडचिरोली वनविभागाच्या मते हे वाढलेले वाघ नवीन अधिवासाच्या शोधात बाहेर पडले आणि वैनगंगा नदी ओलांडून गडचिरोली, वडसा वनविभागात स्थलांतरीत झाले. येथील सुरक्षित वातावरणात मागील ७ ते ८ वर्षांपासून त्यांच्या कुटुंबाचा विस्तार होत राहिला. साधरणत: ऑगस्ट २०२० पर्यंत किरकोळ घटना वगळता गडचिरोली जिल्ह्याला मानव वन्यजीव संघर्षाची किनार नव्हती. मग हा संघर्ष अचानक वाढला काय ? याचे उत्तर नाही असे आहे.

वनविभागाकडून वाघांच्या आणि बिबटांच्या वाढत्या संख्येचे सनियंत्रण झाले नाही. वन्यजीव विभागाने सुध्दा गडचिरोलीत अपेक्षित व्याघ्र गणना केली नाही. त्यामुळे वाघांच्या वाढीव अस्तित्वाची जाणीव कुणाला झाली नाही. दुसरीकडे माणसांनी सुध्दा आपले जंगलावरील अतिक्रमण वाढवले, वृक्षतोड केली, आणि सातत्याने वाघांच्या अधिवासाच्या निकट जात राहिला. वाघांनी जंगलात माणसांची आवश्यकतेपेक्षा अधिक उपस्थिती आपल्या तीक्ष्ण संवेदनांनी हेरली आणि संभाव्य धोके लक्षात घेउन हल्ले केले. माणसांचे अनियंत्रितपणे जंगलाकडे जाणे सुरूच राहिले. हल्ल्यात मृत्यूमुखी पडण्याची संख्या वाढली. त्यामुळे असंतोष वाढला. संताप व्यक्त करण्यासाठी आंदोलने झालीत. वाघ मारण्याची मागणी पण झाली. दुसरीकडे मात्र "हम नही सुधरेंगे' म्हणत माणसांचे जंगलात जाणे सुरूच राहिले आहे. परिणामी हल्ल्यांची तीव्रता वाढत आहे.

ताडोबातील वाघांचे भ्रमणमार्ग हे वैनगंगा नदी ओलांडून गडचिरोली आणि वडसा वनविभागातून जात होते. गोसीखुर्द कालव्याच्या बांधकामामुळे हे मार्ग बंद झाल्याने वाघांनी सावली व्याहाड मार्गाने वैनगंगा नदी ओलांडूत गडचिरोली तालुक्यातून आपली भ्रमंती सुरू केली. आणि या जंगलात त्यांना खाद्य आणि पाणी यांसह झुडपी जंगलांचे निवारे सापडल्याने या भागात वाघांनी आपले अधिवास तयार केले. मात्र वाघांच्या या स्थलांतराच्या प्रक्रियेकडे वनविभागानेही फारसे लक्ष दिले नाही. वनविभागाचे लक्ष नसण्याचे कारण असे की गडचिरोलीत केवळ प्रादेशिक आणि एफडीसीएम असे दोनच वनविभागाचे घटक आहेत. प्रादेशिक विभाग वानिकीचे काम बघतो तर वनविकास महामंडळ ही वनविभागाची व्यापारी संस्था असल्याप्रमाणे काम करते. "वन्यजीव' हा वन्यजीवांवरच काम करणारा तिसरा प्रमुख घटक गडचिरोली वनवृत्तात नाही. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात वन्यजीव विषयावर काम करणारे तज्ज्ञ वनविभागात नाहीत आणि स्वयंसेवी संस्थाही नाहीत.

एकाच वाघांचे हल्ले नाहीत!

वडसा आणि गडचिरोली वनविभागात मागील वर्षभरात वाघांचे झालेले हल्ले हे एकाच वाघाचे नसल्याचे निष्कर्ष काढले जात आहे. खास करून सप्टेंबर महिन्यात झालेल्या ४ हल्ल्यांमधील वाघ वेगवेगळे असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. अधिकृत निष्कर्ष पुढे येत नाहीत तोपर्यंत काहीही स्पष्ट होणार नाही, परंतु हे हल्ले करणारे वाघ वेगवेगळे असतील तर ती चिंता वाढवणारी बाब निश्चितच ठरणार आहे. वनविभागाने अधिसूचित केलेला वाघ जेरबंद करण्याच्या कामावरील आरआरटी पथकाचे निष्कर्ष गंभीर चिंतन करायला लावणारे आहेत. या पथकाच्या कॅमेरा ट्रपिंगमध्ये आलेली वाघ आणि त्यांच्या बछड्यांची संख्या आश्चर्य व्यक्त करणारी आहे. सदर पथकाच्या पाहणीनुसार वडसा वनविभागात एकूण २४ वाघांचे आणि बछड्यांचे अस्तित्व आहे. तर गडचिरोली वनविभागाला १२ वाघांचे अस्तित्व दिसून आले. या शिवाय जिल्ह्याच्या इतर भागातही काही वाघांचे अस्तित्व असल्याचे सांगितले जाते. गडचिरोलीतील वाघांची ही संख्या नवेगाव नागझिरा किंवा बोर अभयारण्यातील वाघांच्या संख्येपेक्षा अधिक आहे. त्यामुळे भविष्यात संघर्ष वाढणार हे निश्चित. अशावेळी किती वाघ पकडणार आणि किती मारणार असा प्रश्न उपस्थित झाल्याशिवाय राहणार नाही.

बिबट्याचे वाढते हल्ले चिंताजनक

गडचिरोलीत वाघांच्या हल्ल्यांसोबतच बिबट्याचेही हल्ले वाढत आहेत. सप्टेंबरमध्ये २० तारखपर्यंत बिबट्याचे तीन हल्ले झाले. तर एका ठिकाणी घरात शिरलेल्या बिबट्याला पकडून जंगलात सोडून देण्यात आले. जिल्ह्यात बिबट्यांचीही संख्या ५० पेक्षा कमी नसल्याचे सांगितले जाते. वाघांपेक्षा बिबट हा अधिक धोकादायक असल्याचे वन्यजीव क्षेत्रातील तज्ज्ञ सांगतात. वाघ हा संयमी असून तो शक्यतोवर गावात घूसून हल्ले करीत नाही. परंतु बिबट हा दिसेल त्या प्राण्याचा पाठलाग करीत दूरवर पोहोचतो. तो गावाच्या दिशेने जाउन पाळीव पशू किंवा माणसांवर हल्ले करायला मागेपुढे पहात नाही.

शेवटी तो वाघ आहे

माणसांनी वाघ व अन्य हिंस्त्र प्राण्यांपासून सांभाळून रहावं की वाघासह अन्य हिंस्त्र प्राण्यांनी माणसांपासून सांभाळून रहावं यावर मंथन होणे नितांत गरजेचे आहे. प्रश्नचिन्ह हे नेहमीच प्रशासनावरच निर्माण केलं जातं नागरिक, कायदेमंडळांचे सदस्य असलेले खासदार-आमदार व इतर लोकप्रतिनिधींवर नाही. घटनादत्त कायदे व नियम हे माणसांनी माणसांसाठी निर्माण केलेले आहेत, याचा माणसांना विसर पडला की काय असे दिसून येते. अजूनही वाघाची दहशत असलेल्या जंगलात, गावाजवळील तलावाकडे शौचासाठी जाताना दिसून येत आहेत. लोक इतरत्र खुलेआम फिरत असून वनविभागावर रोष व्यक्त करीत आहेत.

गडचिरोलीचे खासदार अशोक नेते व आमदार डाॅ. देवराव होळी यांनी वाघाला गोळ्या घाला आणि वनअधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा अशी मागणी केली आहे. ही त्यांची मागणी लक्षात घेता त्यांच्याच कायदेमंडळाने वाघाला राष्ट्रीय प्राणी म्हणून घोषित करून संरक्षितही केले आहे. वाघांच्या संदर्भात स्वतंत्र अशी कार्यप्रणाली तयार केली गेली आहे. ही बाब दोघेही विसरलेले दिसतात किंवा माणसं ही त्यांची मतदार आहेत म्हणून लोकप्रिय घोषणा करून सामान्य नागरिकांची दिशाभूल करतात. परंतु माणसांच्या जागी जर वाघ हे त्यांचे मतदार असते तर जंगलांना वीजेचा प्रवाह असलेले कुंपण करा आणि वाघ वाचवा तथा माणसांना गोळ्या घाला असे म्हणायलाही त्यांनी मागेपुढे पाहिले नसते.

सध्या प्राथमिक उपाययोजना सुरू

वाघांच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू ओढवण्याचे प्रमाण वाढल्यानंतर वनविभागाने खबरदारी घेत प्राथमिक उपाययोजना सुरू केल्या आहेत. यामध्ये गावागावात जनजागरण करून नागरिकांनी अत्यावश्यक कामाखेरीज जंगलात जाउ नये असे आवाहन गुराखी आणि शेतकऱ्यांना मोठ्या गटागटाने शेतावर जावे. यासह तो अधिसूचित केलेला वाघ जेरबंद करण्यासाठी विशेष पथक जंगलात वाघाचा मागोवा घेत आहेत.

गडचिरोली वनवृत्तात वन्यजीव विभागाची गरज

विद्यमान परिस्थितीतील वाघांची मोठी संख्या लक्षात घेता आगामी काळात ही संख्या आणखी वाढणार आणि भविष्यात मानव वन्यजीव संघर्ष गडचिरोलीत अधिक तीव्र होणार हे गृहीत धरून दीर्घकालीन उपाययोजनांची गरज व्यक्त केली जात आहे. यावरील सर्वात मोठा आणि महत्वपूर्ण उपाय म्हणून गडचिरोली वनवृत्तात वन्यजीव विभागाचे निर्माण करणे आवश्यक आहे. वडसा आणि गडचिरोली वनविभागात आंशिक स्वरूपात बफर झोनचे निर्माण करणे, व्याघ्रप्रकल्पाकरीता अभ्यासगटाची स्थापना करणे, ताडोबा किंवा नवेगांव नागझिरा व्याघ्र प्रकल्पात आरआरटीच्या एका विस्तारीत टीम नेमून ती गडचिरोलीत ठेवणे, वाघांच्या जून्या अधिवास क्षेत्रांचे व भ्रमणमार्गांचे संशोधन करणे, झुडपी जंगलांचे मोठ्या झाडांच्या जंगलात रूपांतरण करणे, अतिक्रमण काढतानाच नवे अतिक्रमण होणार नाही याची दक्षता घेणे, नागरिक आणि त्यांचे जंगलाशी असलेले नाते अधिक दृढ करण्यासाठी स्थानिक वनसमित्या सक्षम करणे, ग्रामीण अर्थकारण अधिक सक्षम करण्यासाठी वनाधारीत उद्योग स्थानिक स्तरावर उभे करण्याचे नियोजन करणे याची सुरूवात वनविभागाकडून होणे गरजेचे आहे. या प्रकारच्या उपाययोजनांशी वनविभागातील अनेक अधिकारी, कर्मचारी व्यक्तिशः सहमत आहेत.

समन्वयातून काम करण्याची गरज

वाघांचे वाढते हल्ले चिंताजनक आहेत त्यावर दीर्घकालीन उपाययोजना निश्चितच आवश्यक आहेत. त्या संदर्भात वाईल्ड लाईफ इंस्टिट्यूट ऑफ इंडियासोबत संपर्क सुरू केलेला आहे. परंतु सद्यस्थितीत सर्व संबंधितांनी एकत्र येउन काम करण्याची गरज आहे. जिल्हाप्रशासन, वनविभाग, राजकीय, सामाजिक कार्यकर्ते स्थानिक नागरिक, माध्यमकर्मी यांनी समन्वयातून संघर्ष कमी करण्यासाठी सामुहिक काम करावे, असे आवाहन करतो. दीर्घकालीन उपाययोजनांसाठी लवकरच नवे धोरण आखण्याचे काम सुरू करण्यात येणार आहे.

- सुनील लिमये (प्रधान मुख्य वनसंरक्षक वन्यजीव महाराष्ट्र मुंबई)

.............

माणसांना स्वतःमध्ये बदल घडवून आणावे लागतील

गडचिरोली जिल्ह्यात नुकताच मानव वन्यजीव संघर्ष वाढलेला दिसून येत असला तरी त्याची पार्श्वभूमी आजची नाही. मागील १० ते १२ वर्षापूर्वी ताडोबाच्या बफर आणि कोअरमधले वाघ हळूहळू स्थलांतरीत झाले. परंतु मागील, वर्षापूर्वीपर्यंत त्यांचा माणसांना फारसा त्रास झालेला नाही. एक वर्षापासून हा संघर्ष अधिक तीव्र का झाला याचा अभ्यास करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी वाघांचे हल्ले झाले तिथे तिथे मी गेलो. लोकांशी आणि वन प्रशासनाशी चर्चा केली. आंदोलनामध्येही सहभागी होउन अभ्यास करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा हे लक्षात आले की हा संघर्ष वन्यजीवांनी निर्माण केलेला नसून माणसांनीच वन्यजीव क्षेत्रात म्हणजे त्यांच्या अधिवास क्षेत्रात अतिक्रमण केले. जंगलतोड, अतिक्रमाण आणि शिकारी वाढल्या. वन्यजीवांचे भक्ष्य कमी होउ लागले म्हणून त्यांचे माणसांसोबत संघर्ष सुरू झाले. वन्यजीव जसे वनाचा कायदा पाळतात तसे माणसांना देखील स्वतःमध्ये बदल घडवून आणत जीवनचक्र सुरळीत चालण्यासाठी माण्सांनीच बनवलेले कायदे पाळावे लागतील तरच हा संघर्ष कमी होईल. तात्पूरती उपाययोजना म्हणून गावांनी सामुहिक पध्दतीने शेतीची काम करणे, अत्यावश्यक असेल तरच जंगलात मोठ्या गटाने जाणे. जागरूक राहून वनविभागाशी समन्वय ठेवूनच संघर्ष कमी करता येईल.

- देवाजी तोफा (समाजसेवक तथा आमच्या गावात आम्हीच सरकार)

hdpurnsatya88@gmail.com

बातम्या आणखी आहेत...