आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:‘जय भीम’चे प्रेरणास्थानः न्यायमूर्ति के. चंद्रू

शुभाश्री देसिकन13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

मी तरुण वकीलांना नेहमी एक सल्ला देतो की या व्यवसायात त्यांना सिक्स पॅक एब्स असण्याची गरज नाही तर दीड किलो वजनाचा तल्लख मेंदू जवळ असणं आवश्यक असतं./strong>. चटकन पैसा कमावण्याची हाव, ऐशोआरामाची जिंदगी आणि न्यायिक प्रक्रियेविषयीचं अज्ञान यापासून त्यांनी स्वतःचा बचाव करावा असं मी म्हणेन. शासन व्यवस्था आणि समाजात ज्यांना अनेकदा वंचित राहावं लागतं अशांच्या विरोधात असलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी तुम्हाला अत्यंत कणखर राहणं भाग आहे.

अभिनेता सूर्याची प्रमुख भूमिका असलेला, टी. जे. गनानवेल दिग्दर्शित तमिळ चित्रपट, ‘जय भीम’, हा न्यायासाठी झगडणाऱ्या, इरूला आदिवासी समुहातील, सेंगनी नावाच्या एका महिलेच्या न्यायालयीन संघर्षावर आधारीत आहे. चोरीच्या खोट्या आरोपाखाली सेंगनीच्या पतीला, राजाकन्नूला पोलिस अटक करतात. पोलिस तपासादरम्यान तो नाहीसा होतो पण पोलिस सांगतात की तो फरार झाला आहे. वकील चंद्रू, ज्यांची भूमिका सूर्याने केली आहे, सेंगनीच्या वतीने न्यायालयात हेबियस कॉर्पसची (ज्यात संबंधित इसमाला न्यायालयासमोर हजर करण्यासाठी पोलिसांना आदेश देण्यात येतात) याचिका न्यायालयात दाखल करतो आणि चित्रपटाची कथा वेग घेऊ लागते.

वृद्धाचलम् गावात घडलेल्या एका सत्य घटनेवर हा चित्रपट आधारीत आहे. १९९३ मध्ये वकील म्हणून कार्यरत असलेल्या के. चंद्रू यांनी हा खटला लढवला होता. मद्रास उच्च न्यायालयातून न्यायमूर्ति म्हणून निवृत्त होऊन आता चेन्नईत स्थाईक असलेल्या चंद्रू यांनी त्यांच्या न्यायालयीन कार्यकाळात ९६००० खटले निकालात काढले आहेत. योग्य योजना, संघटन आणि वर्गीकरण असेल तर हे शक्य होऊ शकतं असं त्यांचं म्हणणं. दिवसाला ७५ खटल्यांच्या सुनावण्या ते करत असत. प्रस्तुत मुलाखतीत त्यांनी, उपरोल्लिखीत चित्रपट, सत्याची मांडणी आणि कायद्याचा व्यावहारीक उपयोग यावर विविधांगी भाष्य केलं आहे.

जय भीम बघतांना तुमच्या मनांत काय भावना येत होत्या?

पहिल्यांदा मी हा चित्रपट इतर सर्वसामान्य प्रेक्षकांसारखाच पाहिला. पण लवकरच, वकील म्हणून रंगवण्यात आलेल्या अनेक प्रसंगांमध्ये, माझी स्वभाव वैशिष्ट्ये मला ओळखू येऊ लागली आणि त्या वेळी मी जे काही बोललो असेन किंवा केलं असेन त्याही घटना मला आठवू लागल्या. प्रत्येक प्रसंग ३० वर्षांपूर्वीच्या माझ्या आयुष्याची मला पुन्हा एकदा आठवण करून देत होता.

या चित्रपटांत, वकील चंद्रू यांचा ठाम विश्वास असतो की सत्य अखेर त्यांच्या अशिलाच्या बाजूने उभे राहिल आणि तिला न्याय मिळेल, गरज आहे ती फक्त ते सत्य उघड करण्याची. या बाबतीतला तुमचा व्यक्तिगत अनुभव काय होता?

सामान्य परिस्थितीत, जर का काही जास्तीच्या गोष्टी शिकवण्यात आल्या नाहीत तर एखादी पिडीत व्यक्ती किंवा गुन्ह्याशी संबंधित लोक जे जसं घडलं आहे तसंच सांगतात. पण तुम्ही त्यांत स्वतःचा मसाला घालायला सुरूवात केली तर ते बिचारे गोंधळून जातात आणि अशा वेळी त्यांची उलट तपासणी केली तर मग त्यांचा तमाशा बनतो.

त्यामुळे जेव्हा ती महिला माझ्याकडे आली, तेव्हा तिनं तिच्या नवऱ्याच्या बेपत्ता होण्याविषयी जे जे काही म्हटलं ते ते सारं मी रेकॉर्ड केलं आणि त्यावरच माझा खटला तयार केला. नंतर मी तमिळमध्ये त्याचं भाषांतर करून तिला ते वाचून दाखवलं आणि तिच्याकडून ते अधिकृत करून घेतलं. परिणाम असा झाला की जेव्हा ती न्यायालयात साक्षीदार म्हणून उभी राहिली तेव्हा तिनं तेच म्हटलं जे तिच्या याचिकेत लिहिलं गेलं होतं. त्यामुळे प्रतीपक्षाला एकदाही तिचं म्हणणं खोडून काढण्याची संधी मिळाली नाही. गरीब आणि प्रतिकूल परिस्थितीत जगणाऱ्या लोकांना न्यायालयात न्याय मिळण्याची शक्यता फारच कमी असते. तरी देखील आम्ही सर्वस्वी विरोधात जाणाऱ्या वातावरणातही लढाई करण्यास सज्ज झालो. लोक विचारायचे आम्हाला की तुमच्या गरीब अशिलांना कायद्याची दीर्घकालीन कंटाळवाणी आणि थकवणारी प्रक्रिया किती काळ झेपणार आहे? आम्ही त्यावर उत्तर द्यायचो की, “जोवर त्यांना न्याय मिळत नाही तोवर ही लढाई सुरूच राहिल.” पण असल्या फुशारक्या मारण्याबरोबरच आम्ही गांभीर्यानं खटल्याची सारी माहिती खणून काढत होतो, आणि आमच्या मर्यादा किती आहेत तेही जाणून घेत होतो. काही वेळेस आमचं समाधान होत नसतांनाही आम्ही काही तडजोडीही केल्या होत्या. शेवटपर्यंत हा खटला लढवण्याचा निर्धार आमच्या मनांत येण्याचं प्रमुख कारण म्हणजे न्यायालयात जाण्याआधीच आम्ही विस्तृत तपास केला होता आणि आमची खात्री झाल्यानंतरच आम्ही खटला दाखल केला.

प्रत्येकजण वस्तुस्थितीच्या आपापल्या आकलनानुसार निर्णय घेत असतो. ती वस्तुस्थिती खरी आहे असा त्यांचा समज असतो. ही माणसं ज्या गोष्टींनाखरंमानतात त्या खोट्या नाहीत असं गृहीत धरलं तर सत्य बहुपदरी होतं.

सत्य हे नेहमीच सापेक्ष असतं याची मला जाणीव आहे. पण ते सापेक्ष असतं म्हणून आपण दरवेळेस सत्याच्या केवळ जवळपासच पोहोचण्याचा प्रयत्न करतो असंही नाही. या चित्रपटातील सेंगनीचीच केस घ्या. तिचा नवरा बेपत्ता झाला हे सत्य आहे. त्यामुळे त्याला जीवंत किंवा मृत शोधून काढणं हेच आमचं पहिलं उद्दीष्ट होतं. हेबियस कॉर्पसचा शब्दशः अर्थच मुळी ‘शरीर सादर करणे’ असा आहे. आम्ही उच्च न्यायालयात गेलो आणि न्यायालयाने पोलिसांना राजाकन्नूला शोधण्याचे निर्देश द्यावेत यासाठी हेबियस कॉर्पसची याचिका दाखल केली. तो बेपत्ता होण्याआधी पोलिस स्टेशनमध्येच शेवटचा बघण्यात आला होता त्यामुळे न्यायालयात त्याचा ठावठिकाणा सांगण्याची जबाबदारी पोलिसांवर होती. पण ज्यावेळी पोलिसांनी त्यांचा भयंकर गुन्हा लपवण्यासाठी खोटी केस उभी करण्यास सुरूवात केली तेव्हाच सत्य उघडकीस आणण्याची वेळ आली. अशा परिस्थितीत सत्य ही एखादी काल्पनिक गोष्ट नसून अंतिम गोष्ट असते. त्या पिडीत बाईचा जाब नोंदवून न्यायालयात हेबियस कॉर्पसची याचिका दाखल केल्यानंतर, पोलिसांनी लॉकअपमध्ये राजाकन्नुचा खून केला याविषयी माझ्याकडे एकही पुरावा नव्हता. शिवाय त्यांच्याकडे रोज नव्या नव्या खोट्या गोष्टी रचण्यासाठी आवश्यक असलेली सारी साधनं होती. त्यामुळे आम्ही राजाकन्नुसोबत असलेली जी दोन माणसं बेपत्ता झाली होती त्यांचा शोध घेण्यावर भर दिला. वकील म्हणून माझं काम तिथं संपुष्टात आलं आणि मी गुन्हेगारी तपास करणारा डिटेक्टिव्ह झालो. ती दोन्ही माणसं केरळच्या आंतल्या भागांत लपून बसली होती त्यांचा आम्ही शोध लावला. त्यांना आम्ही लॉकअपमध्ये काय काय घडलं त्याविषयी बोलण्यास भाग पाडलं आणि त्यानंतर या खटल्याचा पुढचा भाग सुरू झाला. त्यामुळे सुरूवातीला तरी यातील सत्य हुलकावनी देत होतं असं म्हणता येईल पण त्यासाठीचा आमचा शोध जिद्दीचा होता. प्रतिकूल न्यायालयीन परिस्थितीत कोणीही हेच करणं अत्यावश्यक असतं.

एका वकीलानं कोणत्या गोष्टींसाठी जागरूक राहायला हवं?

मी तरुण वकीलांना नेहमी एक सल्ला देतो की या व्यवसायात त्यांना सिक्स पॅक एब्स असण्याची गरज नाही तर दीड किलो वजनाचा तल्लख मेंदू जवळ असणं आवश्यक असतं. चटकन पैसा कमावण्याची हाव, ऐशोआरामाची जिंदगी आणि न्यायिक प्रक्रियेविषयीचं अज्ञान यापासून त्यांनी स्वतःचा बचाव करावा असं मी म्हणेन. शासन व्यवस्था आणि समाजात ज्यांना अनेकदा वंचित राहावं लागतं अशांच्या विरोधात असलेल्या अडथळ्यांवर मात करण्यासाठी तुम्हाला अत्यंत कणखर राहणं भाग आहे. न्यायिक व्यवसायात एखाद्या तरुण वकीलाला जगण्यासाठी पुरेसा पैसा कमवायला जो काळ लागतो तो बराच दीर्घ असू शकतो. त्यामुळे ज्यांच्या घरातच वकीलीचा पिढीजात व्यवसाय आहे अशांना इतर नवख्या वकीलांच्या तुलनेत हा व्यवसाय बराच सोपा जातो.

वकीलीच्या तुमच्या सुरूवातीच्या दिवसांत इथला समाज, न्यायव्यवस्था आणि माणसांना समजून घेण्यासाठी तुम्ही काही विशेष प्रयत्न केले होते का?

मी तर वकील होण्याचा विचारही केला नव्हता कधी. मी डाव्या चळवळीतला एक सक्रिय विद्यार्थी कार्यकर्ता होतो. पदवी मिळवल्यानंतर समाजसेवा आणि पूर्णवेळ राजकीय काम करण्याचा माझा इरादा होता. त्यासाठी मी प्रवास करून तामिळनाडू पिंजून काढला, अनेक वेगवेगळ्या लोकांसोबत राहिलो आणि आपल्या समाजाची आणि संस्कृतीची विविधता समजून घेण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर माझं विद्यार्थी दशेतील राजकारण सुरू ठेवण्यासाठी म्हणून मी कायद्याचा अभ्यास करण्याचं ठरवलं. पण त्याच दरम्यान आणीबाणी (१९७५-७७) लागू झाली आणि अनेक लोक त्यांच्या घटनात्मक अधिकारांपासून वंचित झाल्याचं मी पाहिलं. त्याच वेळी मी निश्चय केला की लोकांना त्यांचे हक्क मिळवून देण्यासाठी कायद्याचा उपयोग केला गेला पाहिजे. आणि मी वकीलीकडे वळलो.

अनुवाद – प्रतिक पुरी

(सौजन्य - द हिंदू)

बातम्या आणखी आहेत...