आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:माती आणि नाती जपणारा!

माधुरी बोराडे शेवाळे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महात्मा गांधी मिशन संस्थेतर्फे सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणाऱ्या पण मूळच्या मराठवाड्याच्या असणाऱ्या व्यक्तींना ‘महात्मा गांधी मराठवाडा भूषण’ हा सन्मान प्रदान करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. यावर्षी कृषि व जल क्षेत्रात मोलाची भूमिका बजावणारे विजय अण्णा बोराडे आणि प्रख्यात चित्रकार मुरली लाहोटी यांची या सन्मानासाठी एकमताने निवड झाली आहे. उद्या (सोमवारी) हा सन्मान वितरण सोहळा होणार असून यानिमित्त विजय अण्णा बोराडे यांची कन्या माधुरी बोराडे - शेवाळे यांनी अण्णांच्या कार्याविषयी घेतलेला आढावा...

संपतराव बोराडे आणि गोदावरी (साळूबाई) बोराडे (पाटोदा, जिल्हा जालना) ह्यांच्या पोटी जन्माला आलेले ज्येष्ठ चिरंजीव म्हणजे विजय बोराडे. आई, वडील, तीन भाऊ आणि एक बहीण असं कुटुंब. चार भावंडांत मोठे म्हणल्यावर मोठेपण जन्मतःच मिळालेलं; ज्याचं त्यांनी अक्षरशः सार्थक केलं! पप्पांचं घरातील प्रत्येकाशी नातं अगदी दृढ,परंतु कमी शब्दांचं. राग, प्रेम, काळजी सगळं अगदी अबोल.

आपण लग्न केल्यावर आपल्या जोडीदाराला आपली काम करण्याची तगमग, पद्धत उमजलीच नाही तर? ह्या एका प्रश्नामुळे लग्न न करण्याच्या निर्णयापर्यंत पोहोचलेल्या आमच्या पप्पांना त्यांच्या आईने सांगितले की, तुला हवा तसा जोडीदार शोध! आणि पप्पांच्या आयुष्यात आमची आई आली! हा मेळ म्हणजे मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्र. कुटुंबात हक्काचं माणूस आलं, ज्याच्यावर घरची जबाबदारी ते निर्धास्तपणे टाकू शकत होते. आता त्यांच्या कामाचा व्याप दिवसेंदिवस वाढायला लागला. कारण त्यांची अर्धांगिनीसुद्धा निःस्वार्थपणे घराची धुरा सांभाळत होती. तुम्ही जसे आहेत तसं तुम्हाला स्वीकारणारी, तुमच्यात कोणत्याही बदलाची अपेक्षा न करता तुमच्यासोबत राहणारी व्यक्ती जेव्हा तुमच्या आयुष्यात येते, तेव्हा त्याच्यासारखं दुसरं सुख नसतं. आमची माँ अगदी अशीच आहे.

आमच्या लहानपणची मनावर ठसा उमटवलेली आठवण म्हणजे “किल्लारी भूकंप”! ३० सप्टेंबर १९९३ ह्या दिवशी मध्यरात्री महाराष्ट्रात भूकंपाचे धक्के जाणवले आणि त्याचं केंद्र होतं लातूरजवळील किल्लारी गाव. दुसऱ्या दिवशी वर्तमानपत्रात आणि टीव्हीवर बातम्यांमध्ये किल्लारी येथील मन हेलावून टाकणारी दृश्य बघून डोकं सुन्न झालं. त्यात पप्पांनी तिथे जायचा निर्णय घेतला. माँने त्यांच्या ह्या निर्णयाला अजिबात विरोध केला नाही आणि पप्पा अगदी सहजपणे निघून गेले. पुढचा दीड महिना आमचा त्यांचा संपर्क नव्हता. ते तिथे सुखरूप आहेत ना? त्यांचं सगळं व्ययस्थित असेल ना? असे असंख्य प्रश्न माँला पडत होते. दीड महिन्यानंतर ते जितक्या सहजपणे गेले तितक्याच सहजपणे परत घरी आले, जेवले, दैनंदिनी लिहिली आणि झोपले. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे कामानिमित्त पुन्हा बाहेर! त्या काळात तिथे काय मदतकार्य झालं ते मलाही आजच ह्या लिखाणाच्या निमित्ताने त्यांच्या सोबत मदतकार्यात असलेल्या लोकांकडून समजले.

किल्लारीच्या भूकंपाने संपूर्ण देश हादरला होता, कारण वाताहतच तशी झाली होती. तिथले लोक पूर्णपणे खचले होते. देशभरातून वेगवेगळ्या स्वरूपात मदत येत होती, पण त्या मदतीसोबत तिथल्या लोकांना कोणीतरी दिलासा देणारं, त्यांना जगण्याची उमेद देणारं, त्यांच्या पाठीशी उभं राहणारं माणूस गरजेचं होतं.

पाच तंबू, दहा ट्रॅक्टर, एक टँकर, एक जीप, ड्रायव्हर आणि जवळच्या माणसांची एक तुकडी घेऊन पप्पा माकणी धरणाजवळ तावशी गड गावात पोहोचले, भूकंप झालेल्या अगदी तिसऱ्या दिवशी. वेळ वाचवण्यासाठी ट्रॅक्टरदेखील ट्रकमध्ये लोड करून नेले. महाविद्यालयीन काळात घेतलेले एन.सी.सी.चं प्रशिक्षण पप्पांना नक्कीच ह्या कॅम्प व्यवस्थापनात मदतीचे ठरले असणार. काही लोकांना तिथे जायची इच्छा नव्हती, परंतु पप्पांच्या शब्दाखातर ते तिथे गेले. त्या सगळ्या लोकांना इतक्या वर्षांनंतरही त्यांनी घेतलेल्या निर्णयाचा अभिमान वाटतो. ही सगळी तुकडी पप्पांसोबत रोज 14-15 तास मदतकार्य करत उभी होती. ह्या तुकडीने फार महत्त्वाचं काम केलं आणि ते म्हणजे शेतात पेरणी केली, तेही ५००० एकर जमिनीवर! रोज रात्री तिथल्या शेतकऱ्यांना विचारून, त्यांना पाहिजे असलेलं बियाणं त्यांच्या शेतात पेरलं.

तंबूवर आलेला कोणताही व्यक्ती न जेवता जाता कामा नये, असा पप्पांचा नियम होता. सकाळी 6 वाजता डबे घेऊन तंबू सोडला की रात्रीच तंबूवर परतत. रोज तुकडीमधल्या सगळ्यांनी 4-5 तास ट्रॅक्टर चालवायचं, असा पप्पांचा नियम होता आणि हाच नियम पप्पा स्वतःही कसोशीने पाळायचे. पप्पांचं नेहमी हाती असलेल्या कामाला प्राधान्य असतं, नंतर बाकी गोष्टी, मग समोर कोणीही असले तरी. यादरम्यान पद्मसिंह पाटील ह्यांनी घटनास्थळी भेट दिली. मोठ्या व्यक्तींच्या आजूबाजूला होणारी गर्दी काही नवीन विषय नाही. त्या गर्दीतून माननीय पद्मसिंह पाटील ह्यांनी पाहिले की लांबवर एक व्यक्ती ट्रॅक्टर चालवत आहे, ती व्यक्ती विजयअण्णा आहेत हे कळल्यावर ते स्वतः त्यांना तिथे जाऊन भेटले हा त्यांचा मोठेपणा! मदतकार्य संपवून परत येताना लातूर जिल्हा परिषदेने मदतकार्यास आलेल्या लोकांचा सन्मान केला. त्याकाळात जीवनराव गोरे हे लातूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. ते पप्पांचा सन्मान करताना एक फार छान वाक्य म्हणाले “Gold is great, but greater far is heavenly sympathy!”

मला असं वाटतं की, पप्पा दुसऱ्यांना मदत करताना ते स्वतःला झोकून देण्यात कधीही कमी पडणार नाहीत!! माती आणि नाती जपणारा माणूस दुसरं काय करेल!

१९ जून १९९९ ला राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यावर त्यांना येणारी लोकसभा निवडणूक स्वबळावर लढायची होती त्यासाठी शरद पवार साहेब नवीन उमेदवारांचा शोध घेत होते. बरेचसे उमेदवार तिकीट मिळवण्यासाठी धडपडत होते. राष्ट्रवादीला जालना जिल्ह्यात निडणुकीसाठी एखादा नवीन चेहरा हवा होता आणि तेव्हा पवार साहेबांपुढे नाव होतं “विजयअण्णा बोराडे” म्हणजेच आमचे पप्पा. दुसरीकडे आमचे पप्पा ही बातमी समजल्यावर संपर्क टाळायला लागले, कारण त्यांना माहीत होतं की यदाकदाचित संपर्क झाला तर तिकीट नाकारता येणार नाही. त्यांनी नेहमीप्रमाणे दुसऱ्या उमेदवारांची नावेही सुचवून पहिली. शेवटी त्यांचे सगळे प्रयत्न अपयशी ठरले कारण पवार साहेब पप्पांच्या नावावर ठाम होते. ते म्हणाले की राष्ट्रवादीची ही जागा लोकसभेसाठी अण्णाच लढवणार.

निवडणूक न लढवण्यामागे एक कारण होतं, पप्पांच्या मते समाजकारण करणाऱ्याला राजकारण जमत नाही. त्यांच्या मते समाजकारण आणि राजकारणातील भूमिका नेटकेपणाने बजावणारे आणि त्या दोन्ही भूमिकांचा समतोल सांभाळणारे एकच व्यक्तिमत्त्व आहे आणि ते म्हणजे “मा. यशवंतराव चव्हाण”. अखेर ह्या मातीशी नातं जपणाऱ्या व्यक्तीने फक्त पवार साहेबांच्या शब्दासाठी पाऊल पुढे टाकलं. पप्पांनी १९९९ ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी ते नेहमीच्या सहजतेने जालन्याला गेले आणि तितक्याच सहजतेने निकालानंतर घरी आले, जेवले, दैनंदिनी लिहिली आणि झोपले. दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे त्यांच्या त्यावेळेसच्या कामाच्या ठिकाणी म्हणजेच मराठवाडा शेती साहाय्य मंडळात कामासाठी हजर झाले. त्या लोकसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता, परंतु त्या गोष्टीचा त्यांच्या चेहऱ्यावर किंवा बोलण्यात उल्लेखही नव्हता. त्यांच्या अशा निरलस वागण्यातूनच आमच्यावर ते नकळतपणे संस्कार करत होते. हाती घेतलेल्या कामात स्वतःला पूर्णपणे झोकून देणे हा त्यांचा स्वभावच आहे. प्रचाराला सुरुवात झाल्यावर त्यांनी जालना जिल्हा मतदारसंघातील सगळ्या गावांना भेटी दिल्या. त्यांच्यासाठी रोजचा प्रवास सरावाचा असल्यामुळे ह्या कामात काहीच अडचण आली नाही. कुठल्याही कामासाठी टीम तयार करणे, कामाची रीतसर आखणी करणे, प्रत्येकाला त्याच्या कौशल्याप्रमाणे नियोजन करून देणे, त्या कामाचा वेळोवेळी फॉलोअप घेणे ह्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांचा हातखंडा आहे.

त्यांची प्रचारसभेत भाषणे ही नक्कीच इतरांपेक्षा वेगळ्या धाटणीची होती. नेहमी अशा भाषणांचं स्वरूप हे केलेल्या कामांची माहिती देणे आणि नवीन आश्वासने देणे असंच असतं, पण ह्या प्रचारसभा “मी एक शेतकरी” अशी स्वतःची ओळख सांगणाऱ्या व्यक्तीच्या होत्या. त्यात शेतकऱ्यांना पिकांच्या व्यवस्थापनाचे सल्ले होते तसेच प्रचार साहित्याच्या मागील बाजूस शेतीविषयक मजकूर लिहिलेला असायचा (निवडणुकीदरम्यान झालेला छपाई आणि स्टेशनरीचा खर्च लोकपत्रने उचलला होता).

खरं सांगू का! पप्पांना पुरस्कारांची भुरळ कधी पडलीच नाही. 1988 मध्ये पप्पांना महाराष्ट्र सरकारचा “कृषिभूषण’ पुरस्कार जाहीर झाला आणि तेव्हापासून सगळे त्यांना “कृषिभूषण विजयअण्णा बोराडे” असं संबोधायला लागले. 1990 “कृषिसम्राट”, 1991 “ग्रामीण विकास”, 2006 “कृतिशील समाजसेवक”, 2008 “कृषिरत्न” हे आणि असे अनेक पुरस्कार त्यांना आतापर्यंत मिळाले आहेत. त्यांनी कधीच कोणत्याही पुरस्काराचा एंट्री फॉर्म स्वतः भरलेला नाहीये. मिळालेल्या पुरस्काराच्या बातम्या कधीच कुठे स्वतः छापून आणल्या नाहीत. त्यांना हे सगळे पुरस्कार घरात दर्शनी ठेवलेले आवडत नाहीत. बऱ्याच पुरस्कार समारंभांचे फोटोदेखील आमच्याकडे नाहीत. त्यांच्यासाठी पुरस्कार म्हणजे “सन्मानास न भुलता पुढे काम करत राहण्याचे व्हिजन”!

महाराष्ट्र राज्य जलसंधारण सल्लागार परिषद, महाराष्ट्र सरकार ह्या अशा, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरील 20 ते 22 संस्था, विद्यापीठे तसेच शासनाचे बरेचसे प्रोजेक्ट्‌स, अशा विविध ठिकाणी त्यांनी महत्त्वाची पदे भूषविली आहेत आणि आजही त्यांच्या ऑफिसमध्ये त्यांचे स्वतःचे कॅबिन नाही की, आरामखुर्चीही नाही! त्यांना भेटायला येणाऱ्याला कोणत्याही व्यक्तीला संकोच वाटू नये असाच विचार ते करत असावेत, असा माझा अंदाज आहे. त्यांचा हा साधेपणा त्यांच्या सान्निध्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीला जाणवतोच.

समारंभ, पुरस्कार सोहळा, लग्न, अंत्यविधी, परदेश दौरा, ते कुठेही गेले तरी ती जागा, कार्यक्रमाचे स्वरूप किंवा आजूबाजूचे लोक अशा कोणत्याच गोष्टीमुळे त्यांच्या पोशाखात अजिबात बदल होत नाही. “साधी राहणी आणि उच्च विचारसरणी” खरोखर काय असते हे पप्पांकडे बघून कळतं. गेले कित्येक वर्षे एकाच घडणावळीचा चष्मा, फिक्कट रंगातले कपडे आणि पायात चप्पल, असंच आम्ही त्यांना पाहतोय. कार्यक्रमात काय घालून जायचं ह्यापेक्षा लोकांशी भेट महत्त्वाची हाच त्यामागे विचार.

बदलत्या काळानुरूप, तत्त्वनिष्ठ राहून, प्रगतिपूरक धोरणात्मक बदल करण्याची वृत्ती आणि प्रखर इच्छाशक्ती असलेले स्थितप्रज्ञ असे माझे लाडके पप्पा विजयअण्णा सं. बोराडे!

बातम्या आणखी आहेत...