आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:सेवाग्रामचे कॉर्पोरेट बापू ...

महेश जोशी (सेवाग्राम, वर्धा)23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गांधीजींचा "मिनीमायझेशन' म्हणजे कमीत कमी संसाधनाच्या वापरावर भर होता. त्यांचे विकास आणि निसर्ग रक्षणाबाबतचे विचार शाश्वततेच्या संकल्पनेवर आधारित होते. प्रकृतीपासून कमीतकमी घेतले तरच ती जीवंत राहेल, असे त्यांचे मत होते. सेवाग्राममध्ये याविरूद्ध कामे सुरू आहेत. लोकांना भव्यता अावडते. पण यातून त्यांना गांधी कसा समजणार? मातीच्या कुटी जे बोलू शकतील, ते या इमारती कसे सांगतील. हे सर्वांना समजतंय. पण काय करणार दुश्मन से पंगा ले सकते है, अपनों से नही... गांधी जयंतीच्यानिमित्ताने "दिव्य मराठी रसिक'चा खास रिपोर्ताज...

गांधी आश्रमातून परतणाऱ्या दोघा तरूणांच्या डोक्यात बापू कुटीतील कमोड घोंघावत होता. साधे वाटायचे बापू आपल्याला... पण ते संगमरवरी टबमध्ये अंघोळ करायचे. कमोड वापरायचेे. मोठा माणूस होता तो...! कुटीत कमोड आणि बाथटब पाहिल्यावर असा विचार करणारी ही आजची तरूणाई... सेवाग्राममधील चकाचक रस्ते, भल्यामोठ्या इमारती, महागडे कॉटेज, संगमरवरी फर्शी, डोळे दिवपवणारी रोशनाई आणि चौपाटीवरील श्रीमंती पाहून काय विचार करेल? कॉर्पाेरेट सेवाग्रामध्ये त्यांना दूरदूरपर्यंत बापूंचा साधेपणा दिसणार नाही. नव्या पिढीला गांधी समजणार नाही. कदाचित राज्यकर्त्यांनाही हेच हवे आहे. म्हणूनच सेवाग्रामचे साबरमती होत असतांना ते डोळे मिटून शांत आहेत. दोन वर्षांपूर्वीपर्यंत वर्ध्याहून आश्रमात जाण्यासाठी एकपदरी डांबरी रस्ता होता. आता शहरभर सिमेंटचे चारपदरी रस्ते होत आहेत. गावात ठिकठिकाणी जेसीबी, पोकलेन, ट्रॅक्टर, टीप्पर आणि पाण्याचे टँकर नजरेत भरतात. वेगवेगळ्या साईट्सवर परप्रांतीय मजुरांच्या टोळ्या दिसून येतात. वाहने, यंत्र आणि मजुरांचे आवाज, मोबाईलवरील कर्कश्श गाणे सेवाग्राममधील शांतता भंग करतात.

१९३० मध्ये मिठाच्या सत्याग्रहासाठी गांधीजींनी साबरमती आश्रमातून दांडी यात्रा काढली. स्वातंत्र्य मिळविल्याशिवाय आश्रमात परतणार नाही, असा त्यांचा संकल्प होता. त्यांचा मध्य भारतात स्वातंत्र्य चळवळीचे मुख्यालय स्थापण्याचा मानस होता. १९३४ मध्ये जमनालाल बजाज यांच्या आग्रहास्तव ते वर्धा जिल्ह्यातील मगनवाडी येथे आले. १६ जून १९३६ रोजी वर्ध्याहून ८ किलोमीटरवरील सेवाग्राम (तेव्हांचे शेगाव) ला आले आणि येथेच राहिले. येथील आदी निवास, बा-कुटी, बापु कुटी, दफ्तर आणि आखरी निवास बापूंच्या आठवणी जिवंत करतात. दहा वर्षे राहिल्यावर २५ ऑगस्ट १९४६ रोजी दिल्ली आणि तेथून नवखालीला गेले. येथून सेवाग्रामामध्ये परतले नाहीत. या काळात हा आश्रम स्वातंत्र्य चळवळीचे केंद्र बनला. १९४२ चा भारत छोडो आंदोलनाची बैठक येथे झाली. एवढा समृद्ध इतिहास, बापूंचा सहवास लाभलेले सेवाग्राम आता कॉर्पाेरेट पद्धतीने बदलत आहे.

बापूंच्या वर्ध्यातील आगमनाचे ७५ वर्ष आणि १५० व्या जयंतीचा इव्हेंट करण्यासाठी राज्यातील तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारने २०१३ मध्ये "गांधी फॉर टुमॉरो' संकल्पनेचा पाया रचला. पुढे वर्षभरात आलेल्या भाजप सरकारने त्यावर निधी मिळवून कळस चढवला. त्याचे नाव "सेवाग्राम विकास आराखडा' केले. १५० व्या जयंतीला २०१९ मध्ये प्रकल्प पूर्ण होणे अपेक्षीत होते. २०१९ मध्ये काँग्रेस सत्तेत परतले. त्यांनी भाजपच्या कामांना सुरू ठेवले आणि गांधीवाद्यांची नाराजी ओढवून घेतली. काँग्रेसच्या "गांधी फॉर टुमॉरो'मध्ये वर्धा-सेवाग्राम-पवनेर हा त्रिकोण गांधीमय करण्यासाठी विविध उपक्रमांचे आयोजन अपेक्षित होते. भाजपने यात नागपूरचा समावेश केला आणि प्रकल्पाचे स्वरूपच बदलले. गांधी विचारांऐवजी सिमेंट, वीटा आणि लोखंडी बांधकामाची भाषा सुरू झाली. बांधकामे म्हणजे विकास असा राज्यकर्त्यांचा समज असतो. त्यामुळे जुन्या इमारती, रस्ते दुरूस्त करण्याऐवजी ते पाडून नवीन बांधले जातात. त्यासाठी निधीही मिळतो. तो कसाही खर्च करण्याचा चंग असतो.

या बांधकामांतून गांधी हरवले आहेत का? यावर सेवाग्राम आश्रम प्रतिष्ठानचे अध्यक्ष टी.आर.एन. प्रभू म्हणाले, गांधी प्रत्येकाला हवे आहेत. गांधींचे नाव आल्याने आम्ही बांधकामांना विरोध नाही केला. नंतर सरकार बदलले, सल्लागार समितीही बदलली. त्यांनी कार्यक्रमाचे नाव बदलले आणि या कामातून गांधीजी हरवले. आता आमच्या विरोधाला कोणी जुमानत नाही. आमचा आवाज क्षीण आहे. आम्हाला अधिकार नाहीत. रडण्याशिवाय पर्याय नाही.

प्रभू यांच्या भूमिकेवर आश्रम प्रतिष्ठानचे सदस्य आणि अखिल भारतीय सर्व सेवा संघाचे पदाधिकारी अविनाश काकडे यांचा आक्षेप आहे. ते म्हणतात, आम्ही जबाबदारी नाही झटकू शकत. प्रभू यांना मूळ आराखडा आणि आताच्या कामात फरक जाणवत असेल तर त्यांनी सत्याग्रह करावा. आम्ही आश्रमाचे पदाधिकारी असल्याने दोषमुक्त नाही हाेवू शकत. या कामांसाठी सरकार एवढेच आम्हीही दोषी आहोत. काकडे यांच्या मते बांधकामे काळाची गरज होती. बापू गेले त्यावेळी सेवाग्रामची लोकसंख्या ३०० होती. आता १० हजार झाली आहे. त्यावेळी वर्षाला १० हजार लोकं यायचे. आता ही संख्या ३ लाख झाली आहे. मग बापू गेले त्यावेळचा रस्ता आता कसा चालेल? बापूंना पाहण्यासाठी, अनुभवण्यासाठी आणि अभ्यासण्यासाठी जगभरातून येणाऱ्या लोकांसाठी सुविधा द्याव्याच लागतील. सुविधा नसतील तर सरकार गांधींकडे जाणिवपूर्वक दुर्लक्ष करतेय, अशी टीका होईल. बापूंचाही सुविधांना विरोध नव्हता. साधनांचा विवेकाने उपयोग करा, अनाठायी खर्च नको, असे ते सांगायचे. शासनाने व्हीजन ठेवून सुविधा निर्माण केल्या असत्या तर त्याचे कौतुकच झाले असते. व्हीजन अभावी इमारती निरस वाटतायत. त्यांची उपयोगिता दिसत नाहीय.

नाविन्याच्या नादात सेवाग्राममध्ये जुने, पक्के बांधकामे पाडण्याचा धडाका सुरू आहे. मगन संग्रहालयासमोर १०० वर्षे जुना ब्रिटीशकालीन रस्ता तोडून सिमेंटचा तयार करण्यात आला. पर्यटकांना वर्धा स्टेशन जवळच्या बडी भाजी मंडईतील कचरा, गरीबी दिसू नये यासाठी त्यासमोर भिंत बांधण्याचा प्रस्ताव होता. िवराेधामुळे तो रद्द झाला. गांधींच्या काळात वर्धा येथे जिल्हाधिकरी कार्यालयासमोर मुख्य टपाल कार्यालय होते. दररोज ४ हजारावर पत्र यायचे. पोस्टमेन बापूंना बघता येईल यासाठी जंगलातून वाट काढत आश्रमात टपाल आणून द्यायचा. इंंग्रजांना ही अडचण लक्षात आल्यावर त्यांनी आश्रमात स्वतंत्र टपालघर बांधून दिले. १९७३ ला पोस्टाची नवीन इमारत बांधण्यात आली. जुने टपालघर अडगळीत पडले. विकास आराखड्यात याच्या समोर गटार तर मागे स्वच्छतागृह बांधण्यात आले आहे. टपाल कार्यालयावर दारूच्या बाटल्यांचा खच असतो.

आश्रम प्रतिष्ठानच्या माजी पदाधिकारी आणि मगन संग्रहालय समितीच्या अध्यक्ष विभा गुप्ता यांचा विकास कामांना मोठा विरोध आहे. त्यांच्या मते, राज्यकर्त्यांचा एक वर्ग असा आहे ज्याने भारत गरीब देश असल्याची समजूत करून घेतलीय. देशाला गरीब ठरवले तर काहीही मागून जगण्याचे मार्ग खुले होतात. ही मागून जगण्याची मानसिकता धोकादायक आहे. या मानसिकतेतून नवीन घर घेताच त्याला विकल्यावर काय भाव मिळेल याचा विचार सुरू होतो. सरकारनेही आपल्या संसाधनांचा बाजार मांडला आहे. पण बाजार भावनांनी नव्हे तर आकर्षणेे, देखावे आणि ढोंगाने चालतो. माल विकण्यासाठी तो आकर्षकरित्या सजवावा लागतो. राज्यकर्ते आपल्या वस्तू विकण्यासाठी त्याची सजावट करताय. प्रत्येक गोष्टीत पर्यटन आणि त्यातून मिळणाऱ्या पैशांचा विचार करताय. यातूनच मग साबरमती आणि सेवाग्रामसारखी ठिकाणेे पर्यटकांना विकण्यासाठी त्याची सजावट केली जाते. सेवाग्राम विकास आराखडा त्याचेच द्याेतक आहे.

गांधीवादी कार्यकर्त्या ओजस म्हणाल्या, आश्रमात २०१३ पर्यंत सरकारी पैसा नाही येवू दिला. तोपर्यंत देणग्या व स्वत:च्या उत्पन्नावर आश्रम चालायचा. नंतर सरकारी योजना आणण्यास सुरूवात झाली आणि आश्रमाचे रूपच बदलले. सद्या जे सुरू आहे ते गांधी विचारांशी सुसंगत नाहीय. गांधीजी सांगायचे पाच मैलाच्या परिसरात मिळणारी संसाधने आणि स्थानिक मजुरांपासून कामे करून घ्या. सेवाग्राममध्ये आर्किटेक्टपासून सर्वकाही बाहेरचे आहे. दिवसरात्र मोठाली यंत्रे सुरू आहेत. गांधींचा यांत्रिकीकरणाला विरोध नव्हता. पण त्यांना मर्यादा माहिती होती.

वर्धा-सेवाग्राम रस्त्यावर भव्य चरखाघर बांधले आहे. चरख्यावर सूत कातले गेले पाहिजे. मात्र या चरखाघरात चरखाच नाही. सेल्फीसाठी एक भलामोठा चरखा उभा केलाय. येथे गांधी आणि विनोबा भावेचे इंडस्ट्रीयल वेस्टपासून बनवलेले पुतळे आहेत. पण गांधी औद्योगिकीकरणाच्या विरोधात होते. त्याच्याच वेस्टपासून हे पुतळे बनवले. पुतळ्याजवळ गाजर गवत वाढले आहे.

ओजस म्हणतात, गांधीजी हसले असते या चरख्यावर. तुम्हाला गांधी समजलेच नाहीत. भव्य हॉलचे लाखभर भाडे कोणाला परवडणार आहे? उद्या तेथे भाजपचे झेंडे लागतील. रामदेवबाबाचे कार्यक्रम होतील. विकासकामाच्या नावाखाली सेवाग्राममध्ये गांधी सांगतात तशी "मॅड रेस' म्हणजे वेड्यांची स्पर्धा सुरू आहे. आपल्यालाच कळत नाहीय आपण कोणासाठी, कशासाठी धावतोय. सेवाग्राममध्ये गांधी फक्त चार झोेपड्यापुरता मर्यादीत ठेवल्याची खंत त्या व्यक्त करतात.

रस्ता रूंदीकरणासाठी आश्रमाच्या स्थापनेच्या आधीची तर काही गांधीजींच्या काळात अनुयायांनी लावलेल्या १२० झाडांची दोन टप्प्यात कत्तल करण्यात आली. तुषार गांधी आणि त्यांच्या ६ कुटूंबियांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहीले. तरी दुसऱ्या टप्प्यात पोलिस बंदोबस्तात, वाहतूक अडवून रात्री १२ ते ३ दरम्यान अजून झाडे कापले. येथे गांधी आणि विनोबा मॉर्नींग वॉक करायचे. लोकांनी दातून म्हणून ती तोडू नये म्हणून साेबत दातून आणायचे. सेवाग्रामचा या झाडांशी भावनीक संबंध होता. झाडे कापल्याने रस्ता मोठा झाला. त्यावर जोरात धावणाऱ्या वाहनांमुळे अपघाताच्या भीतीने आसपासच्या खेड्यातील पालक आपल्या मुलांना "नई तालीम' शाळेत सायकलवर पाठवायला घाबरत आहेत. कदाचित त्यांची शाळाही सुटेल, अशी ओजस यांना भीती वाटतेय.

ओजस यांच्याच घरात भेटलेल्या अाश्रमी मालती ताई रागात म्हणाल्या, अाफ्रिकेत गांधी कसा रहायचे, हे तिथले सरकार साकारू शकते. पण आम्ही मात्र आंधळे झालोत. डोळ्यांना पट्टी बांधली आहे. कितीही इमारती उभारा, त्यात गांधी दिसणार नाही.

पर्यावरणवादी कार्यकर्ते आलोक बंग म्हणाले, सरकारची नितीच आहे, थेट विरोध नाही करायचा पण हवे तेच करायचे. त्यांनी आम्हाला वर्षभर झुलत ठेवले, थकवले आणि रात्रीतून झाडांची कत्तल केली. ते आम्हाला तोंडी आश्वासने देतात. लिखीत द्यायला तयार नाहीत. आम्ही दर १५ दिवसाला पत्र पाठवतोय. तुम्ही बोलणारे कोण, तुमचा काय संबंध, आश्रमातले लोकं बोलतील, असे प्रश्न विचारत बांधकाम खात्याचे अधिकारी आम्हाला परतवून लावतात.

झाडाप्रमाणेच विनोबा भावेंच्या पवनार आश्रमा शेजारून वाहणाऱ्या धाम नदीतही विकासकामे घुसली. नदीच्या एका बाजूला युरोपीयन नद्यांवर असताे तसा घाट बांधण्यात आला आहे. आश्रमाच्या विरोधामुळे त्यांच्या बाजूला घाट बांधणे थांबले.

आलोक बंग म्हणाले, नदी पात्रात गांधीजींच्या अस्थी आणि विनोबा भावेंची समाधी आहे. तिथपर्यंत दर्शनासाठी जाण्याकरिता रॅम्प आहे. तो उंच करण्याचे नियोजन होते. त्यासाठी नदी पात्रातील दगडात छिद्रे पाडावे लागले असते. नदीतील जैविविधतेवर हल्ला झाला असता. ही योजना आम्ही हाणून पाडली. आता येथे "अॅग्रो टूरिझम ऑन दि बँक्स ऑफ पवनार रिव्हर' अशी जाहिरात सुरू आहे. हळू-हळू येथे चौपाटी होईल. आताच िकत्येक टपऱ्यांनी बस्तान बसवले आहे. प्रशासन ग्रामस्थ आणि आमच्यात भांडणे लावत आहे. घाट झाला तर लोकांना रोजगार मिळेल, असे सांगत आहे. आवाज उठवणारे कमी आणि समर्थनातील जास्त लोक असल्याने आमचा आवाज कमी पडतो, असे बंग म्हणाले.

पुढे काय?

विभा गुप्ता म्हणतात, सरकारने जे करायचे ते केले आहे. आता पुढे काय हे पहावे लागेल. सिमेंटच्या रस्त्याऐवजी डावीकडून शेतातून आश्रमात प्रवेश दिला जावा. अर्धा किलोमीटरची पायवाट मातीतून, पीकातून, झाडाझुडपातून आश्रमात गेली तर गांधी या रस्त्याचा कसा वापर करत असतील, हे लोकांना जाणवेल. ते येथे बापूंना शोधतील. मोठ्या इमारती स्कूल ऑफ मड आर्किटेक्चर, स्कूल ऑफ नॅचरोपॅथी अशा विविध विषयाच्या प्रशिक्षण संस्था बनवून टाका.

सरकाराने साबरमतीतून गांधींना हद्दपार केले. स्टॅच्यु ऑफ युनिटीद्वारे सरदार पटेलांनाही भाजपचा रंग चढवला. अशीच शक्यता सेवाग्राममध्येही व्यक्त होत आहे. यावर प्रभू म्हणाले, सेवाग्रामचे साबरमती करण्याचा कट सुरू आहे. साबरमतीतून त्यांनी एका झटक्यात गांधींना बाहेर नाही काढले. तेथे पाच ट्रस्ट आहेत. आधी त्यात आपल्या विचारांचे लाेकं घुसवले. तेथील भाडेकरूंना मालकीची घरे दिली. यामुळे सरकारविरूद्ध बोलणारा आवाजच क्षीण झाला. सेवाग्राममध्ये अशी शक्यता नाही. ही खाजगी संस्था आहे. आम्ही सरकारकडून एक पैसाही घेत नाही. यात सरकारचा एकही सदस्य नाही. अविनाश काकडे यांनीही तूर्तास तशी भीती नसल्याचे सांगीतले.

गांधीजींचा "मिनीमायझेशन' म्हणजे कमीत कमी संसाधनाच्या वापरावर भर होता. त्यांचे विकास आणि निसर्ग रक्षणाबाबतचे विचार शाश्वततेच्या संकल्पनेवर आधारित होते. प्रकृतीपासून कमीतकमी घेतले तरच ती जीवंत राहेल, असे त्यांचे मत होते. सेवाग्राममध्ये याविरूद्ध कामे सुरू आहेत. लोकांना भव्यता अावडते. पण यातून त्यांना गांधी कसा समजणार? मातीच्या कुटी जे बोलू शकतील, ते या इमारती कसे सांगतील. हे सर्वांना समजतंय. पण काय करणार दुश्मन से पंगा ले सकते है, अपनों से नही, असे ओजस सांगते.

mahitri@gmail.com

बातम्या आणखी आहेत...