आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवीन डायरी घ्यायचीय...नव्या वर्षासाठी. आणि मग ही जुन्या डायरीची निखळलेली पाने डोळ्यासमोर फडफडू लागतात. या पानातून नवीन वर्ष झाडांच्या पानातून झरणाऱ्या कोवळया उन्हासारखे अंगणात नाचू लागते. ऊन सावलीचा खेळ शब्दशब्दांत भिनत जातो. नवीन डायरी घ्यायचीय...नव्या वर्षासाठी. नव्या कोऱ्या पानांची. हुंगायची आहे तिला, श्वासात चांदणे फुलेपर्यंत. आणि मग मला तुझी आठवण येते. तू जवळ आलीस की माझ्या कानात म्हणायचीस," माझ्या श्वासात श्वास मिसळ ना तुझे!" आणि मग देहभर नुसता श्वास खेळत राहायचा. नवीन वर्षात तू नव्याने भेटशीलच...नक्की. हो ना? आणि मग ही जुन्या डायरीची निखळलेली पाने डोळ्यासमोर फडफडू लागतात. या पानातून नवीन वर्ष झाडांच्या पानातून झरणाऱ्या कोवळया उन्हासारखे अंगणात नाचू लागते. ऊन सावलीचा खेळ शब्दशब्दांत भिनत जातो.
१. तुझा श्वास दे ना मला. प्लीज. वातावरणातील ऑक्सिजन कमी होत चाललाय. घुसमट होतेय. पळू पाहतोय पण श्वास अपुरा पडतोय अगदी. नाशिक, जळगाव, धुळे, मुंबई, पुणे, ठाणे सगळीकडे फिरुन आलोय. प्रत्येक हॉस्पिटलच्या आवारात चंदेरी लंबकुळी नळकांडी उभी आहेत, ऑक्सिजन तयार करण्याकरिता. काळ्याकुट्ट सिलेंडरमध्ये ऑक्सिजन भरलाय ठासून! पण या नळकांड्यातील ऑक्सिजन माझ्यात कसा उतरेल? माझ्या रक्तपेशी हा प्राणवायू पिवून पुन्हा लाल तांबड्या कधी होतील? रक्तसरोवरात पुन्हा तांबडे फुटेल? प्राणवायू...किती समर्पक नाव. तसेही एक पंचमांशच असतो तो अवतीभवती पण त्याच्यामुळे जगण्याची हिरवळ ताजीतवानी होती. तिला गोजिरी फुले येतात. पण परवा फिरतीत श्रीनिवास आणि शकीलची दुक्कल भेटली. शकीलची बायको फिरदौस कोवीड विषाणूच्या पहिल्या लाटेत कोमेजली. अल्लाला प्यारी झाली. हा चांगला इंजिनियर पोरगा. बायको गेल्याने वादळात भले थोरले झाड मुळापासून हलावे तसा नखशिखांत हलला. पण मग सावरला. जी वेळ आपल्यावर आली तशी इतरांवर येऊ नये, यासाठी आपण काही केले पाहिजे,असे त्याच्या मनाने घेतले. दुसऱ्या कुणाची फिरदौस हरवू नये या विषाणूच्या फेऱ्यात म्हणून त्याने आपली बावीस लाखाची गाडी विकली, काही सोने विकले. आणि श्रीनिवास नावाच्या मित्रासोबत गरजू लोकांना मोफत ऑक्सिजन सिलिंडर पुरविणे सुरू केले. रात्री, मध्यरात्री, पहाटे कधीही कुणाचाही फोन येऊ दे. ही जोडी त्यांना ऑक्सिजन सिलिंडर नेऊन देणार म्हणजे देणार. प्रत्येक वाचणाऱ्या जीवासोबत त्याला त्याची फिरदौस भेटत असेल का? मी त्याला भेटलो. त्याच्या चेहऱ्यावर एन ९५ मास्क होता. पण तो डोळ्यांनी बोलला, हसला आणि माझी दोन्ही फुप्फुसे ऑक्सिजनने ओतप्रोत भरून गेली. खरेखुरे ऑक्सिजन जनरेशन प्लांट हे अशा जिव्हाळ्याने भरलेल्या डोळयात असतात. हो ना? नव्या वर्षात प्रवेश करताना हे ऑक्सिजन प्लांट आपल्या सोबत असायला हवेत.
२. आपण हरिद्वारला गेलो होतो तेव्हाची गोष्ट. संध्याकाळची वेळ होती आणि गंगा आरती करता गंगेच्या विशाल पात्राच्या दोन्ही बाजूला आपल्यासारखी कित्येक माणसं उभी होती. आपल्या मागं शंकराची एक भव्य मूर्ती देखील होती. संध्याकाळची कातरवेळ, गंगेची आरती सुरु झाली आणि गंगेच्या पात्रातून अक्षरश: शेकडो-हजारो असंख्य दिवे हेलकावे खात आपल्या बाजूने येऊ लागले. किती मनोहर दृश्य होतं ते. साक्षात शंकराच्या जटेतून धरेवर अवतरलेली गंगा आपल्या समोरून वाहते आहे, असा भास होत होता. माझ्या मनाच्या पडद्यावर ती चित्रफित तशीच कायमची कोरलेली आहे असं वाटायचं की हात वर केला तर निळ्या आभाळाला लागेल. परवा त्याच हरिद्वारमध्ये धर्मसंसद भरली होती. ज्यांना धर्म आणि संसद या दोन्ही शब्दांचे अर्थ कळत नाहीत, अशी सगळी माणसं तिथे एकत्र आली होती. जिच्या वक्षातून अवघ्या मानवतेसाठी वात्सल्य वहावे अशी एक साध्वी इतर धर्माच्या लाखो लोकांना मारण्यासाठी सगळ्यांना आवाहन करत होती. आपण सगळ्यांनीच शस्त्रधारी झालं पाहिजे, असा सगळ्यांचा आग्रह होता. आपण जन्माला का येतो, कोss हम हा प्रश्न घेऊन आपण आयुष्यभर फिरत असतो, पण इतर धर्माला धडा शिकवण्यासाठी आपण अधिक पोरं जन्माला घातली पाहिजेत,असे आवाहन कोणी करत होते. आयुष्याचा अर्थ इतका कोता, इतका संकुचित असतो का गं? मला गंगेतून वाहणारे असंख्य दिवे आठवत होते. प्रयोगशाळेतून फोन होता. व्हायरस मध्ये बदल होताहेत. अजून म्युटेशन झाली आहेत. नवा विषाणू जन्माला आला आहे. पुन्हा नवीन बारसे..! नवा विषाणू आपली प्रतिकार शक्ती भेदून आपल्या शरीरात प्रवेश करु शकतो. त्याचा प्रसाराचा वेग प्रचंड वाढतोय. प्रत्येकास त्याच्या संसर्गाचा धोका आहे. असा किती बदलणार हा ! नवीन वर्षात प्रवेश करताना कॅलेंडरच्या प्रत्येक पानावर हा नवीन विषाणू देखील असेल या कल्पनेनेच मनाचा थरकाप उडतो. आणि मग काही दिवसांपूर्वी वाचलेली प्रमोद मुजुमदार यांची फेसबुक पोस्ट आठवली. पुण्याहून साताऱ्याकडे जाताना खंबाटकी घाट उतरला की साई पार्क नावाचं एक हॉटेल आहे. तिथं सकाळी सहज नाश्त्याकरता थांबल्यावर प्रमोद आणि निशाला त्या साध्याशा हॉटेलच्या परिसरात एक विलक्षण गोष्ट दिसली. वॉशरूमकडे जाताना त्यांना एका खोलीवर ठळक अक्षरात 'नमाज का इंतजाम' अशी अक्षरे दिसली आणि ते चमकलेच. कारण हॉटेलमध्ये छानसा सजवलेला देव्हारा होता म्हणजे हॉटेल मालक हिंदू होते आणि तरीदेखील त्यांनी आपल्या हॉटेलच्या परिसरात एका वेगळ्या खोलीत मुस्लिम धर्मियांसाठी नमाज का इंतजाम म्हणजे नमाजची सोय करून ठेवली होती. हॉटेलचे मालक असणाऱ्या सुधीर यादवांशी गप्पा झाल्या तेव्हा कळालं की काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडं एक दोन मुस्लिम गिऱ्हाईक आली होती आणि ती नेमकी नमाजाची वेळ होती. त्यांनी हॉटेल समोरच्या एका झाडाखाली नमाज अदा केला. हॉटेल मालक असणाऱ्या यादवांना हे माहीत होतं की, त्या झाडाखाली अनेक दारुडे, गांजेकस तरुण रात्री तिथं नाही नाही ते प्रकार करतात.अशा ठिकाणी नमाज अदा करणं बरं नाही." देव त्यांचा काय आणि आपला काय सारखाच की," असं म्हणाले ते आणि मग मला वाटलं, माझी एक खोली मोकळीच आहे. या ठिकाणी आपण मुस्लिम धर्मियांसाठी नमाज पडण्यासाठी सोय का करू नये आणि त्यातून मी असं केलं. सुधीर यादवासारखी माणसं आहेत तोवर खरंच या बदलणाऱ्या विषाणूची भीती नाही. कोणतेच पोथी पुराण न वाचताही अशा साध्या वाटणाऱ्या लोकांना धर्म नेमका कळतो. कबीर उगीच का म्हणाला, "पोथी वाचून ना पांडित्य येते ना माणूसपण कळते." नवीन वर्षात अशी माणसं वाढत राहोत. त्यांची संख्या मोजायला दोन्ही हातांची बोटे अपुरी पडोत. मी मलाच शुभेच्छा दिल्या.
३. आईची नजर चुकून ती त्याला भेटायला टेरेसवर आली. " कशाला बोलावलं होतंस?," ती उगीच घाबरत घाबरत म्हणाली. तो म्हणाला, "तुला एक कविता ऐकवायची होती." " वाच ना," तिने डोळ्यानेच खुणावले, आजूबाजूला कोणी नाही ना याची खातरजमा ती करून घेत होती. " तुझ्या घराच्या भिंतीवर कॅलेंडर उद्या लागेल नवं, कॅलेंडर बदल म्हणून सांग वर्ष कसे येईल नवं?," ती हसली, म्हणाली, जुनीच कविता आहे, माहीत आहे मला. तोही हसला आणि म्हणाला," कविता जुनीच आहे पण मला काही नवीन सांगायचं आहे. नवीन वर्षात तरी काही नवीन घडलं पाहिजे. कधी सांगणार आहेस तू आई बाबांना?," " सांगेन रे , तू उगीच घाई करु नकोस. या कोविडमुळे तसेही सारे वैतागले आहेत. आणि तुझीही..." आणि ती अडखळली. त्याची नोकरी गेली होती याच काळात. तसाही तो बेकार होता. उगी तिच्यासाठी म्हणून या शहरात थांबला होता. गावाकडून सगळे 'इकडे ये' म्हणून मागे लागले होते. त्याच्या डोळ्यात एकदम पाणी आले. हळूच ओढणीतून काही तरी काढत ती म्हणाली, " मी आणलयं काही तरी तुझ्यासाठी!" तिच्या हाताकडे पाहत तो म्हणाला, " पेरु? नको .. काल ही दिला होतास तू. अजिबात चव नव्हती." " पण याला मस्त चव आहे. हा स्पेशल आहे," ती हसत म्हणाली. त्याने पेरु घेतला आणि त्याच्या लक्षात आले तिने पेरु थोडासा खाल्ला होता. त्याने डोळे पुसले आणि म्हणाला," ओह, शबरीचा पेरु!" आणि ती एकदम गोड हसून लाजून त्याच्या मिठीत शिरली. तेवढ्यात तिच्या आईची हाक आली. टेरेसच्या कोपऱ्यात मी उभा होतो. आणि त्या दोघांना पाहून ग्रेस माझ्या मनात कविता गात उभा होता, "वैराण आयुष्य झाले तरीही, फुलांना कुणी बोल लावू नये मी बांधलेल्या उन्हाळी घरांच्या, गवाक्षातला चंद्र झाकू नये." जोवर नवी फुलं फुलताहेत आणि जोवर तिच्या इवल्या खिडकीतून चतकोर चंद्र डोकावतो आहे तोवर उगवणारा प्रत्येक दिवस, येणारे प्रत्येक नवीन वर्ष तिची वाट पाहण्यातल्या हुरहुरी इतके गोड आहे. तू सांग,खरे ना ! --------------- dr.pradip.awate@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.