आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:आता आम्हीच मुख्य प्रवाह...

प्रशांत रुपवते4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारधी समाजाच्या आत्मसन्मानाची लढाई लढणाऱ्या सुनिता भोसले यांना नुकताच महाराष्ट्र फाऊंडेशनचा कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाला आहे. एका आरपार लढाऊ कार्यकर्तीचं जगणं म्हणजे सुनीता भोसले यांचे 'विंचवाचं तेल' हे आत्मकथन! या अात्मकथनाचे सहलेखक असणाऱ्या प्रशांत रुपवते यांनी सुनिता भोसले यांना मिळालेल्या पुरस्कारानिमित्त आत्मकथनाच्या निर्मितीदरम्यानच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.

स्वतः बद्दल बोलणं कोणाला आवडत नाही? अगदी आयुष्यात सांगण्यासारखं काही नसताना आपल्या इथं लोकं अभिव्यक्त होत असतातच की तेही अर्थहीन, उथळ आणि दांभिकपणे. एकूणच आपली कथित सृजनता त्यावरच तर उभी आहे. पण पारधी समाजाच्या आत्मसन्मानाची लढाई लढणाऱ्या सुनिता भोसलेची तर सारी जिती जागती जिदंगानी, एखाद्या चित्रपट, नाटकापेक्षाही नाट्यपूर्ण. ती सांगताना लोंढा फुटावा तसं तीचं अव्याहत श्वास घ्यायलाही उसंत न देता बोलणं. आणि बोली सारी पोलीस डिपार्मेंटची... म्हणजे तो इसम, त्यावर वहीम, त्याच्या नामे अन् त्यात भर फौजदारी कलमांच्या ३९५,३९८,११० वगैरे. मराठीत बोलत असली तरी तिच्या माझ्या संवादात काहीसा भाषेचा अडसर होताच.

खरं तर मला जातव्यवस्था त्यातील शोषण, अन्याय, अत्याचार हे विषय नवीन नव्हेतच मुळी. दादासाहेब रुपवते यांनी दलित विद्यार्थ्यांसाठी सुरु केलेल्या वसतिगृहात माझ्या वडिलांचं (दिवगंत प्रा. जी.व्ही. रुपवते) शिक्षण झालेले. वसतिगृहाची त्यांची दुसरी बॅच. तर पहिल्या बॅचमध्ये पदमश्री दया पवार, डॉ. रावसाहेब कसबे, मधुकर पिचड आदी. नंतरही वडीलांचा संबंध सदोदित परिवर्तन चळवळशी जोडलेला. त्यामुळे लक्ष्मण माने, पार्थ पोळके वगैरेंच्या घरी राबता असेच. या वातावरणातून येऊनही जेव्हां मी सुनिताचं ऐकलं तेव्हा खरचं आतून प्रचंड हललो आणि ठरवले की तीची ही जिदंगानी .... २१ शतकातही आपल्या सहिष्णू, महाओजस्वी संस्कृतीमधील एका मोठया समूहाच पशूपेक्षाही हीन जगणं समाजा समोर आणायचं. आणि त्यातून आकाराला आलं ‘विंचवाच तेल !’

सुनिता भोसले मला कुठे भेटली ? त्याचीही एक गंमतच आहे! मला एका संस्थेची जात पंचायत या विषयी फेलोशीप मिळाली होती. परंतु त्यातील पदाधिकाऱ्यांचं संकोचित सदाशिव पेठी अँप्रोच, दांभिकता अन मुख्य म्हणजे अप्रमाणिक बौद्धिकता वगैरे अनेक कारणांमुळे मी ते संशोधनाचं काम अर्धवट सोडलं. या दरम्यान संशोधन करताना जाणीवपूर्वक वर्षोनवर्षे चालल्या एका चुकीच्या गृहितकाचा शोध लागला. गुन्हेगारी जमाती इंग्रजांनी या देशात तयार केल्य, असे आपणास सरसकट शिकवले जाते ते तद्दन खोटं आहे. इंग्रजांचे पाचपन्नास देशावर राज्य होतं. परंतु तेथे कुठेही गुन्हेगारी जमाती सोडा पंथ, टोळ्याही नाहीत. इंग्रजांना इथे राज्य करायचे होते. त्यासाठी त्यांनी इथल्या जातव्यवस्थेचा अभ्यास केला. त्यामध्ये त्यांच्या लक्षात आलं की, इथे जात जन्माने मिळते आणि इथे जातीनुसार व्यवसाय ठरतात. ते अनुमान त्यांनी लावले. एखाद्या शेतात जर एखादी व्यक्ती मिरची चोरताना पकडली आणि त्या व्यक्तीची जात समजा "क्ष' असेल, तर देशात कुठेही मिरच्यांची चोरी झाली तर इंग्रज प्रथम "क्ष' जातीतील वा समकक्ष जातीतील लोकांना पकडायचे. म्हणजे गुन्हेगारी जमाती तयार करण्यासाठी इंग्रज नाही तर इथली जातव्यवस्था आधार आहे. यासंदर्भात पुस्तकाच्या परिशिष्टात संदर्भासह सविस्तर महिती दिली आहे. ही माहिती मी छायाचित्रकार संदेश भंडारे यांच्याशी शेअर केली, त्यांनी ती गणेश देवींशी. त्यानिमित्ताने देवी सरांशी संवाद झाला. त्यांना पुस्तकाचा विषय भावला आणि त्यांनी आनंदाने पुस्तकाला प्रस्तावना देण्याचे मान्य केले.

त्याअगोदर पत्रकार म्हणून मी ‘संपर्क’ने गठीत केलेल्या, भूम- परंडा येथे झालेल्या पारधी हत्याकांड सत्यशोधन समितीचा सदस्य म्हणून सहभागी झालो होतोच. साधरणतः २००३-०४ साल असावं. त्यानिमित्ताने एकनाथ आवाड (जीजा) आणि बाळकृष्ण रेणके यांच्याशी परिचय झाला होताच. या साऱ्या उचापतीत सुनिता भोसलेची थोडशी माहिती मिळाली... जीजांनी ती वयाच्या अकराव्या वर्षी कार्यकर्ती झाल्याचं सहज म्हणून सांगितलं. त्या दोन शब्दांनी माझं लक्ष वेधलं. तिचा नंबर मिळवला, तिच्याशी संपर्क केला आणि मुंबईवरून थेट शिरुरला तिला भेटायला गेलो.

आमची पहिली भेट शिरुर बसस्टँण्ड समोरील एका कळकट, तेलकट हॉटेलात झाली. तसे दोघेही फाटके असल्यामुळे उगी पोषाखीपणा नव्हताच. त्यामुळे थेट सुनिताचा एखाद्या लोंढ्यासारखा बोलण्याचा ओघ सुरु झाला ... ती सांगत होती.. बुंदीचा किस्सा, ‘मे महिना. सकाळी आठ वाजताच उन्हाचा तडाका बसायचा. दहा वाजेपर्यंत तर तापमान ३०-३५ पर्यंत जायचं. हाच काळ लग्नसराईचाही. ती आम्हाला मोठी पर्वणीच. या टायमालाच आंबळया पासून दोन किलोमीटरवर कळवंतवाडीला एक मराठ्याचं लग्न व्हतं. मी ल्हान्या भावाला घेऊन लग्नाच्या ठिकाणी गेले. सकाळी साखरपुडा होण्याअगुदार पासून आम्ही तिडल्या उकीरड्यावर थांबलो होतो. जेवणाच्या उष्ट्या पत्रावळ्या टाकल्या की, मी अन भाऊ कुत्र्यांना हुसकवत त्या उष्ट्या पत्रावळ्यावर धावून जायचो. त्या पत्रावळ्यातील बुंदी उचलून प्लॅस्टिकच्या पिशव्यांत भरायचो. सकाळी साखरपुड्यापासून सांजच्यापर्यंत लग्नाच्या पंगती झडत होत्या. आम्हीबी घडीभरबी न थांबता बुंदी गोळा करत व्हतो, त्यामुळे जेवायखावायची सूद नव्हती. उपाशीपोटीच सारा मामला चालू होता. कारण भ्याव होतं उगी काही बांलट अंगावर यायचं.नाही तर कोणी पारधी म्हणून हूसकावून लावायचं नाही तर हटकायचं. म्हणून आम्ही बुंदीच्या पिशव्या लांब झाडाखाली दडवल्या होत्या. नंतर त्या घ्यायला गेलो तर... त्या कुत्र्यांनी पळवल्या होत्या. दिसभर उपाशी राहून केलेली मेहनत वाया गेली होती. ते पाहून आविनाशने, माझ्या ल्हान्या भावाने मोठयाने भोकंाड पसरलं. बर मी तरी त्याला काय समजवणार...मी तव्हा असल नव- दहा वर्षाची अन मला धाकटा अविनाश. आमचं हमसाहमसून रडण्याने लग्नघरातले माणसं आली काय झालं ते पाहयला. त्यांना खरी परिस्थिती समजली तव्हा त्यांनी मोठया मनानं आम्हाला फ्रेश बुंदी काढून दिली.’

सुनिता हा किस्सा सांगत होती शिरुर स्टँण्ड समोरील त्या कळकट होटेलमध्ये... आणि त्याच दरम्यान हॉटेलमधील ब्लॅक अॅन्ड व्हाईट ३२ इंची टिव्हीच्या खोक्यामध्ये देशाचे पंतप्रधान महत्वाकांक्षी मंगळयान कक्षेत स्थिरावलं, मोहिम यशस्वी झाली म्हणून शास्त्रज्ञांबरोबर त्याक्षणी उपस्थित राहून त्यांचं कौतुक करत होते.. भारताच्या उज्ज्वल परंपरा, आपल्या प्राचीन संस्कृतीत हे सर्व होतं असं सांगत आपल्या महान महाओजस्वी संस्कृतीचा अभिमान पंतप्रधान व्यक्त करत होते... बास, तोच क्षण होता, माझा ठाम निश्चय व्हायचा की ही आपली गौरवस्पद संस्कृती हा आपला प्राचीन वारसा जगा समोर आणण्याचा! अन ठरल सुनितावर पुस्तक करायचंच!

मुंबई – शिरुर - आंबळे चकरा सुरु झाल्या पण आर्थिकदृष्टया झेपेना, पण सुनिताच्या जिंदगाणीने गारुड केलेले. सहज म्हणून एकदा संपर्कच्या मेधा कुळकर्णी यांच्याशी बोललो त्यांनी स्वतःहून प्रवास खर्च देण्याची तयारी दर्शवली आणि मग कामाने वेग घेतला. दोन-एक वर्षात काम पूर्ण झाले. प्रकाशकाचा शोध सुरु होता. माझं पहिलं पुस्तक प्रकाशित करणारा मित्र, नवता बुक वर्ल्डचा किर्तीकुमार शिंदे याला पुस्तक जाम आवडलं. आणखी एकदोन प्रकाशकांनी याबाबतची तयारी दर्शवली. मात्र सर्वजण परिवर्तन वर्तुळाशी जोडलेले. मी किर्तीकुमारला समजावलं. म्हटलं ‘तोड ही चाकोरी’ या धर्तीवर भोसलेवर रुपवते लिहिणार अन् शिंदे, कांबळे वाचणार हे बदलू या. कथित ‘मुख्य प्रवाहा’च्या प्रकाशकाला देऊ या. रोहन प्रकाशनने मग हे ‘विंचवाचं तेल’ प्रसिद्ध केले.

‘विंचवाचं तेल’ म्हणजे ‘गुन्हेगारी जमाती’ विरुध्द वापरलं जाणारं जहाल अस्त्र. बाहेर याला ‘सूर्यनारायण तेल’ म्हणूनही ओळखतात. पोलिस खाते आरोपीने केलेले, न केलेले गुन्हे कबूल करण्यासाठी ‘थर्ड डिग्री’मध्ये या तेलाचा वापर करतात. आरोपीच्या लिंगाला हे तेल लावलं जातं. त्यामुळे लिंगाला सूज येऊन प्रचंड दाह होतो. आरोपीच्या िलंगावर हे तेल चोळल्याने मरणाची आग आग होऊन आरोपी गुन्हा कबूल करतो. एक प्रकारे माणसाच्या निर्मितीक्षमतेवरचाच हा घाला आहे. सरकारी व्यवस्थेखाली माणसाला संपूर्ण चिरडणं आहे.

पोलिस खात्याचं हे ‘विंचवाचं तेल’ या समाज व्यवस्थेने ... या संस्कृतीने साऱ्या बहुजन समष्टीच्या विशेषतः दलित-भटक्या-विमुक्तांच्या भेजाला चोळलय, नाना रुपात ते वापरलं, कधी जातपात कधी स्पृश्य-अस्पृश्यतेच्या रुपाने तर कधी मंदीर-मस्जिद आणि कधी सामाजिक आरक्षणाच्या विरोधाच्या रुपाने ...

तर याच समष्टीतील ही पोर ... पारधी या ‘गुन्हेगार’ असा शिक्का बसलेल्या जमातीत सुनिता भासलेचा जन्म झाला. पारधी असल्याचे भोग तिलाही सुटले नाहीत. पण पोर बहाद्दर... तिने या ‘विंचवावर’ जालीम उपाय शोधला तो म्हणजे भारतीय संविधानाचा! जयभीमच्या नाऱ्याचा! समस्त पारधी समष्टीत भिनलेलं विष उतरवण्याचा प्रयत्न ती तिच्या वयाच्या अकराव्या वर्षापासून करते, त्या कार्यकर्तीची ही ज्वलंत जिंदगानी ... विंचवाचं तेल!

शेवटी नामदेव ढसाळ ‘आंधळे शतक’ या पुस्तकात म्हणातात तसे ही प्रकाशकांची ‘जात’ म्हणजे भर चौकात यांच्या पार्श्वभाग कोडाने सोलून काढावेत अशी. पण संस्कृती, व्यवस्था अन् हर दिन उगवणारा सूर्य यांच्याच मालकीचा... पण हे चित्र बदलायला आम्ही सुरुवात केलीये. बाबासाहेबानं पेरलेले आता रुजून उगवायला लागलंय ... प्रत्येक गावातील दलित वस्त्या रुप बदलून आहे तेथेच ठाम उभ्या होत्या, आहेत ... चार-सहा पदरी महामार्गच त्यांच्या दिशेने आले आहेत... अन आता तेच मुख्य प्रवाह झाले आहेत.. "बलुत'ने केलेली पायवाट ... विंचवाच्या तेलाने शिंपडीत आम्ही त्या साऱ्या रोगट ‘स्मृत्या’ उध्दवस्त करायला निघालोत... तुमचे वाडे अन पेठा सनातन संकोचिततेने रोगट अंधाराने, गंडाने शिगोशिग भरलेल्या त्या आता मरणासन्न होऊ घातल्या आहेत ... अन् नाहीच मेल्या तर त्यासाठी आम्ही आहोतच, परसू,त्रिशूल,तलवारी नाही तर ...संविधानाचे, जयभीमच्या नाऱ्याचे हत्यार परजून तयार ...

‘विंचवाचं तेल’

सुनीता भोसले

सहलेखन- प्रशांत रूपवते,

रोहन प्रकाशन, पृष्ठे- २०८,

मूल्य- २५० रु.

-----------

prashantrupawate@gmail.com

बातम्या आणखी आहेत...