आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:साहित्य संमेलनांचे पोस्टमार्टेम...

पियुष नाशिककरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

साहित्यिकांवीना असलेलं संमेलन असं एक वेगळं बिरुद नाशिकचं संमेलन नक्कीच मिरवेल. संमेलन हे साहित्यिकांचे कमी आणि राजकारणी, शासकीय अधिकाऱ्यांचेच अधिक झाले, कोणाच्याच अजेंड्यावर साहित्य आणि मराठी भाषा नसल्याने मग संमेलनात साहित्यिक असले काय अन‌् नसले काय? कोणाला काय कर्तव्य त्याचं. म्हणून साहित्याविना संमेलनाची जत्रा मस्त झाली असं कोणी म्हटलं तर त्यात वावगं काय?

एका ठिकाणी मराठीच्या चिंतेचा भारा टाकून निघाले पुढला भारा उदगीरला टाकायला. किंवा अगदीच संमेलनवाल्यांच्या भाषेत सांगायचे तर संमेलनाची एका ठिकाणी पालखी थांबली आता ती उदगीरककडे निघाली, असं म्हणा हवं तर... त्यांच्या भाषेत म्हणा की, आपल्या भाषेत, संमेलनाच्या इव्हेंटला आणि तो घडवून आणणाऱ्या इव्हेंटवाल्यांना काहीच फरक पडत नाही हे पुन्हा एकदा अधोरेखीत झालेच आहे. बिचारी मराठी मात्र संमेलनजवळ आलं की, आपला पदर सावरते, तीला वाटतं आपलं आता उत्तम साहित्याचं, साहित्यिकांचं औक्षण करू पण, तीला बिचारीला संमेलनातच त्याच पदराने पुन्हा एकदा आपल्याच दुर्दैवाचे दशावतार झाकावे लागतात. पण ती तीचा मवाळ स्वभाव साेडत नाही, संमेलने येतात तीचा पदर डाेक्यावर आणि मुख्य कार्यक्रमात सगळं काही झाकण्यासाठी खाली येताे. नाशिकचे संमेलनही त्याला अपवाद नाही, किंबहुना इतर संमेलनांच्या कितीतरी पटीने पुढेच गेले. म्हणजे इव्हेंटच्या दृष्टीने...

तात्यांच्या (तात्याराव सावरकर आणि कुसुमाग्रज असे दाेन्ही तात्या असा अर्थ आपण तरी घेऊ) भूमीत संमेलन घेण्यासाठी सार्वजनिक वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी थेट उस्मानाबादच्या संमेलनातच निमंत्रण देऊन हाेकारावर जवळपास शिक्कामाेर्तब करून आणले हाेते. मात्र सावानाला कायद्याच्या अडचणी आल्या आणि ऐनवेळी ती माळ नाटकवाल्या लाेकहितवादी मंडळाच्या गळ्यात पडली आणि संमेलन नाशिकलाच हाेणार हा नगारा सर्वत्र वाजू लागला. मंडळाकडील स्वत:ची जागाही महापालिकेने ताब्यात घेतली, पुरेसा पैसा नाही, मनुष्यबळ नाही अशावेळी संमेलन घेणार कसे? हा प्रश्न हाेताच. आधीचे संमेलन मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेच्या प्रांगणात झालेले त्यामुळे हे संमेलन गाेखले एज्युकेशन साेसायटीच्या प्रांगणात हाेऊन जाऊ द्यावे हे आलेच. शिवाय महामंडळाचे अध्यक्ष काैतिकराव ठाले-पाटील आणि गाेएसाेचे सर्वेसर्वा डाॅ. माे. स. गाेसावी यांचा स्नेह. त्यामुळे ती जागा नक्की झाली. पण, केवळ जागा देऊन चालत नाही, पैसा आणि मनुष्यबळही पुरवावे लागते. ते कुठून आणणारं. काेराेनाची टांगती तलवार, फार काही पैसा द्यायला लाेक तयार नाहीत मग अशावेळी काय करायचे? स्वागताध्यक्षपदाची माळ गेली पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या गळ्यात. मग महामंडळाच्या भूमिकेचे काय झाले? महामंडळाचे अध्यक्ष काैतिकराव ठाले-पाटील यांनी मात्र उस्मानाबादच्या संमेलनात एकाही राजकीय नेत्याला विचारमंचावर येऊ दिले नव्हते. आता तर स्वागताध्यक्षपदाची माळच एका मंत्र्याच्या गळ्यात घातल्यावर गदाराेळ व्हायचा ताे झालाच. पण, केवळ अपरिहार्यता म्हणून महामंडळाने आपली भूमिका बासनात बांधली. ही भूमिका संमेलन संमेपर्यंत अशीच बांधलेली दिसली. कदाचित उद्गिरच्या संमेलनात अध्यक्ष ठाले-पाटील याचा समाचार घेतील. कारण शरणकुमार लिंबाळे यांच्या वक्तव्यांवर काहीही न बाेलणारे ठाले-पाटील यांनी लिंबाळे यांचा ‘आपले साहित्य काेणत्या दर्जाचे आहे ते आधी बघा मग सत्काराची अपेक्षा करा’ अशा शब्दांत संमेलनाच्या समाराेपात चांगलाच समाचार घेतला. अनेक मुद्दे ते विविध मंचावरून, त्यांच्या नियतकालिकातून वर्गैरे बाेलत असतात आणि अधुनमधून राळ उठवत असतात ते काही आता नवीन राहिलेले नाही. नाशिकच्या संमेलनाबद्दलही ते कदाचित उद्गिरच्या संमेलनाचीच वाट असावेत. नाशिकच्या संमेलनाचे स्थळ बदलणे, त्याचा आर्थिक अंदाज, तारखा बदलणे, उद्घाटन, पत्रिकेतील वक्त्यांची नावे, अधिकाऱ्यांची नावे, एकूणच कार्यक्रम यात महामंडळ नव्हतंच असं नाही, मात्र नेहमी जसं महामंडळाचा शब्द हीच पूर्व दिशा असते तसं यावेळी घडलं नाही हे वेळाेवेळी सिद्ध झालं आहे. अगदी संमेलनाध्यक्ष डाॅ. जयंत नारळीकर यांच्या निवडीपासूनच यासगळ्या गाेष्टींना सुरूवात झाली. पुणेकरांच्या आग्रहानेच नारळीकर अध्यक्ष झाल्याचे बाेलले गेले. पण, नारळीकर संमेलनालाच आले नाहीत आणि मग ठालेंनी नारळीकरांनी किमान येथे येऊन तासभर तरी बसायला हवे हाेते. अशी अपेक्षा व्यक्त करतानाच उस्मानाबाद आणि नाशिकचा अनुभव मांडत यापुढे अध्यक्ष हिंडता फिरता असण्यासाठी पुन्हा घटनेत काही बदल करावे का? इथपर्यंत अापले भाषण आणले. हे करताना मात्र महामंडळांच्या व घटक संस्थांच्या अध्यक्षांकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. मराठवाडा साहित्य परिषद अध्यक्ष स्वत: काैतिकराव ठाले पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे अध्यक्ष रावसाहेब कसबे, विदर्भ साहित्य संघ अध्यक्ष मनाेहर म्हैसाळकर, मुंबई मराठी साहित्य संघांच्या कार्याध्यक्षा उषाताई तांबे यावरही काैतिकरावांसह साहित्य संघ आणि परिषदांवर बसलेल्या या संस्थानिकांनी नजर टाकवी. संमेलनाध्यक्षच नाही तर महामंडळाचे आणि घटकसंस्थांचे अध्यक्षही चांगले हिंडते-फिरते एवढचं काय तर तरुणंच असावे याकडेही यासगळ्या ज्येष्ठ मंडळींनी बघितले तर मग संमेलनाध्यक्षही त्यांच्या वयाचा ते नक्कीच आणतील आणि एक नवा विचार संमेलनांमध्ये दिसायला वेळ लागणार नाही. याचा अर्थ ज्येष्ठांबद्दल अनादाराचा नाहीच. संमेलनात अशा अनेक गाेष्टी असतात की, ज्या ठिकाणी ज्येष्ठांची अधिक गरज असते. त्यांच्या मार्गदर्शनाची, त्यांच्या संवादाची त्या-त्या ठिकाणचे आसन नक्कीच ज्येष्ठांना द्यावेच द्यावे. आता लगेच संमेलनासाठी असलेली घटना वगैरे बदलण्याचीही गरज नाही. एकमताने संमेलनाध्यक्ष हाेत आहेत ते उत्तमच आहे. नाहीतर ज्ञानपीठप्राप्त विंदा करंदीकर, मंगेश पडगावकर आणि असे अनेकजण जे खऱ्या अर्थाने साहित्यिक हाेते, ज्यांचे साहित्य अजुनही साहित्य रसिकांच्या मनात आहे अशांनाही संमेलनाच्या अध्यक्षपदी बसता आले नाहीच. त्यामुळे चांगले संमेलनाध्यक्ष हवे असतील तर आपसातील हेवेदावे, राजकारण दूर करून जरा नव्यांना संधी देऊन बघितले तर अनके गाेष्टींनी संमेलनात एक वेगळा आणि नवा विचार येऊच शकताे. फादर फ्रान्सिस दिब्रिटाे संमेलनाला पूर्ण वेळ देऊ शकले नाहीत, डाॅ. नारळीकर संमेलनाला आलेच नाहीत तर त्यामागील कारणे समजून घ्यायला हवी. त्यानंतर संमेलनाध्यक्ष हिंडता-फिरता असायला हवा असे वक्तव्य करायला हवे हाेते. नाशिकचं संमेलन जवळ येऊ लागले आणि त्याचवेळी ओमायक्राॅनने डाेके वर काढले, पाऊस आला, थंडी पडली, दाट धुके पसरले, संमेलनस्थळ हे शहरापासून दूर शेतीवाडी असलेल्या माेकळ्या ठिकाणी हाेते. त्या ठिकाणची हवा अाणखीच वेगळी यासगळ्याचा नारळीकर आणि त्यांच्या पत्नी यांच्या प्रकृतीवर परिणाम हाेण्याची शक्यताच अधिक हाेती. म्हणूनच त्यांनी न येण्याचा निर्णय घेतला. म्हणून त्यांच्यासाठी हेलिकाॅप्टरची व्यवस्था हाेती, त्यांनी तासभरतरी येऊन बसायला हवं हाेतं, दाेन संमेलनात संमेलनाध्यक्ष वेळच देऊ शकले नाहीत याबद्दल मला खंत वाटते असे जाहीरपणे म्हणणे म्हणजे त्यांच्या विज्ञानातील कामाचा आणि साहित्याचा अवमान नाही का? यावरही विचार करायलाच हवा. संमेलनाध्यक्ष हिंडता फिरता हवा असेल तर आपल्या घटक संस्थांच्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकांमध्ये बाेलूनही त्या विषयाला ताेंड फाेडता आलेअसते. ताे जाहीरपणे बाेलण्याची काहीच गरज नसल्याचेच त्यावेळी व्यक्त झाले. उस्मानाबाद, नाशिकच्या संमेलनाध्यक्षांबद्दल जे झाले त्यामुळे आता उद्गिरच्या संमेलनाध्यक्षांकडे लाेकं डाेळे लाऊन बसले आहेत हे लक्षात घेतले तर अधिक औचित्याचे ठरणार आहे. नाशिकचे संमेलन म्हणजे दिखाव्याला आले माेल माणकाचे, मनातले सत्त्व परी शेण झाले ... असेच म्हणावे लागेल. संमेलनस्थळ अर्थात भुजबळ नाॅलेज सिटीचा परिसर भव्य, देखणा हाेता, तिथे कशाचीही कमी नव्हती. निवास, भाेजन, पुस्तकांचे स्टाॅल्स, प्रेक्षकांची व्यवस्था, सजावट, अगदी सगळीकडेच भव्य, दिव्य आणि सुंदरता हाेती. भाेजनासाठी सगळ्यांचेच स्वागत हाेते. येणारा प्रत्येकजण पाहुणा आहे, त्याला भाेजन द्यायलाच हवे या भावनेने व्यवस्था हाेती. हवं तेवढं खा, त्याचवेळी अन्न वाया घालवू नका यासाठीही याेग्य तजवीज हाेती. अशी सगळी व्यवस्था उत्तम केलेली हाेती, असायलाच हवी हाेती. स्वागताध्यक्षांनी त्यांचे काम चाेख बजावले. मात्र तरी समाज आणि संमेलनात जे काही अंतर पडायचं ते पडलंच हाेतं. मंचावरील माणूस समाेर तिसऱ्या-चाैथ्या रांगेतील प्रेक्षकांनाही दिसत नव्हता. पहिल्या रांगेतील माणसानेही समाेरच्या स्क्रिनवरच वक्त्याला बघावे यातूनच ही दरी अधाेरेखीत हाेते मग त्याला सन्मानाने पहिल्या रांगेत जागाच कशाला द्यावी.

इतर काेणत्याही संमेलनांमध्ये बुक स्ट्रीट नसते, नव्हती. समाेरासमाेर पुस्तकांचे स्टाॅल्स असेच ग्रंथप्रदर्शन असते. त्यामुळे कमी चालायला लागणे आणि खरेदी करणाऱ्याला दाेन्हीकडच्या स्टाॅल्सवर एकाचवेळी जाता यावे, त्याला वेळ लागू नये, ताे पुस्तकांच्या अधिकाधिक जवळ असावा अशी व्यवस्था असते. किबंहुना पुस्तकांच्याच काय पण इतर काेणत्याही प्रदर्शनात साधारणत: अशीच व्यवस्था असते. इथे मात्र या गेटपासून त्या गेटपर्यंत एकाबाजूने चढ चढून दुसऱ्या बाजूने ताे उतरताना अनेकांची दमछाक झाली. मधल्या भागात जिथे जागा मिळाली तिथे असेलेल्या पुस्तक विक्रेत्या, प्रकाशकांकडे वाचकांना जायला वेळच मिळत नव्हता किंवा अनेकांना तिथेही पुस्तकांचे स्टाॅल्स आहेत हेच माहिती नव्हते. बरं त्यातही स्टाॅल्स सुरू झाले त्याच्या सुरुवातीला माेठ्या, नामांकित प्रकाशकांचे स्टाॅल्स, त्यानंतर मध्ये-मध्ये लहान प्रकाशकांना जागा. म्हणजे एकतर तिथपर्यंत खरेदीदार पाेहाेचणारच नाही, पाेहाेचला तर बिचाऱ्याच्या खिशातील पैसेच संपलेले असतील. स्टाॅल्सच्या बाजूने असलेले सनईचे भाेंगे आणि संमेलनगीताने तर अनेक स्टाॅलधारकांचे डाेके उठले. स्टाॅल्समधल्या अनेक नवीन उपक्रमांना व्यत्यय आला याची प्रकाशकांनी आयाेजकांकडे तक्रार करुनही त्यांना काहीच साेयरसुतक नव्हते. एकूणातच इतर संमेलनांच्या तुलनेत पुस्तकांची विक्री कमी झाली असे अनेक माेठ्या प्रकाशकांनी बाेलून दाखवले.

महामंडळ, संमेलनाचे आयाेजन वगैरे झाल्यावर संमेलनातील साहित्यावर खरंतर चर्चा करायलाच हवी. पण कुठून सुरुवात करावी हा प्रश्न आहे. कारण साहित्यिकांवीना असलेलं संमेलन असं एक वेगळं बिरुद नाशिकचं संमेलन नक्कीच मिरवेल. असे का झाले? मांडवाच्या भूमीपूजनापासूनच त्याची सुरूवात झाली. या भूमीपूजनावेळी अगदी केंद्रीय मंत्र्यांपासून नेत्यांनी हजेरी लावली मात्र एकही साहित्यिक नव्हते. ग्रंथदिंडीतही तेच झाले. साहित्यिकांवीना निघालेल्या ग्रंथपालखीचे भाेई राजकारणीच झाले. स्वत: स्वागताध्यक्ष भुजबळ यांनीच संपूर्ण दिंडीमार्गावरच नव्हे तर संमेलनस्थळीही दिंडी खांद्यावर घेत ती विचारपीठावर नेऊन तीची पूजा केली. म्हणजे सुरुवातीपासूनच साहित्यिक नसण्याचं जे ग्रहण संमेलनाला जे लागलं ते अगदी शेवटपर्यंत कायम ठेवण्यात संमेलनाचे कारभारी यशस्वी झाले. पहिल्या दिवशी इनमीन चार माजी अध्यक्ष, उद्घाटक, प्रमुख अतिथी आणि इकडे-तिकडे दिसलेले दाेनचार साहित्यिक त्यातही कवी साेडले तर साहित्यिकाविनाच झालेलं संमेलन असंच बिरुद संमेलनामागे कायमचं लागलं. मुळात आयाेजक संस्थाच नाटकवाल्यांची लाेकहितवादी मंडळाची. साहित्यिकांशी त्यांचा सबंधच काय? एेनवेळी साहित्याची आणि संमेलनाची जाण असलेल्या डाॅ. शंकर बाेऱ्हाडे यांना मंडळाने आपल्यात नाईलाजाने सामावून घेतल्याने थाेडेतरी कवी, साहित्यिक यात दिसले हे ही नसे थाेडके. निमंत्रकांना याच्याशी सुरुवातीपासूनच काही देणेघेणेच नसल्याचे अनेकदा अधाेरेखीत हाेत हाेते. निधी गाेळा करणे आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचा डाेलाराही त्यांनी डाेक्यावर घेतला हाेता. कामांचे वाटपच केलेले नसल्याने अखेरीस अनेक ठिकाणी जाे व्हायचा ताे सावळागाेंधळ झाला. संमेलनगीतात सावरकरांचे नाव नसणे, काेणत्या प्रवेशद्वाराला, विचारपीठाला आणि सभागृहाला काेणत्या साहित्यिकांची नावे देणार हे देखील जाहीर न केल्याने या गाेंधळात वाढतच झाली. पत्रिका हातात येते तर त्यात शहरातीलच काय पण अनेक माेठ्या वक्त्यांची नावेच नाहीत. याचे मात्र काेणालाच काहीच देणंघेणं नव्हतं. प्रत्येकजण आपल्या स्वत:च्या एका वेगळ्या उद्देशाने संमेलनात मिरवत हाेता. काेणाचं लक्ष आपल्याला राजकारणातील एखादं माेठ पद मिळेल यावर हाेतं तर काेणाला सार्वजनिक वाचनालयाची आगामी निवडणूक दिसत हाेती. काेणाला आपला माणूस यानिमित्ताने राष्ट्रवादीच्या ज्येष्ठांच्या नजरेत आणायचा हाेता, तर काेणाला आपली आर्थिक पाेळी भाजून घ्यायची हाेती. तर कारभाऱ्यांनी जवळपास प्रत्येक कार्यक्रमात एकातरी शासकीय अधिकाऱ्याची वर्णी लाऊन टाकली हाेती. म्हणजे संमेलन हे साहित्यिकांचे कमी आणि राजकारणी, शासकीय अधिकाऱ्यांचेच अधिक झाले, काेणाच्याच अजेंड्यावर साहित्य आणि मराठी भाषा नसल्याने मग संमेलनात साहित्यिक असले काय अन‌् नसले काय? काेणाला काय कर्तव्य त्याचं. म्हणून साहित्याविना संमेलनाची जत्रा मस्त झाली असं काेणी म्हटलं तर त्यात वावगं काय?
कन्टेन्टच्या बाबतीतही दाेन-चार विषय साेडले तर सगळं धन्यवादच. त्यात पहिल्या दिवशी मुख्य उद्घाटनासह इतरही उद्घाटनं साेडली तर फार काही नव्हतंच. त्यातही प्रमुख अतिथी जावेद अख्तर यांनी
जाे बात कहने से डरते है सब, तू वाे बात लिख..
इतनी अंधेरी न थी कभी रात, तू लिख, तू लिख...

म्हणत देशातील साहित्यिकांना लिहिण्याच्या स्वातंत्र्याचे भान दिले. या व्यतिरिक्त भाषणांमधून भाषा आणि साहित्याच्या दृष्टीने पहिल्यादिवशी काहीच मिळू नये यापेक्षा वेगळी शाेकांतिका ती काय असू शकते. संमेलनाध्यक्ष जरी संमेलनाला हजर नाहीत तरी त्यांच्या भाषणाची ध्वनीचित्रफित उपलब्ध झाली हाेती. मात्र कार्यक्रम एकदम शेवटाकडे आल्यावर ती ध्वनीचित्रफित लावली गेली तेव्हा लाेक उठून गेले हाेते. राजकीय व्यक्ती संमेलनात हवी की, नकाे हा चावून चाेथा झालेला विषय अर्थात इथेही पुढे आला तसा मागेही गेला. दुसऱ्या दिवशीही फार काही साहित्य आणि मराठी भाषेवर मंथन हाेईल, झाले असे घडलेच नाही. त्यातला "मराठी नाटक' याविषयावरील परिसंवाद हा रंगभूमी आणि नाटक याला साहित्याशी जाेडू शकल्याचं फार काेणाच्या बाेलण्यातून अालंच नाही तर "संवाद लक्षवेधी कवींशी' या ऐवजी संवाद लक्षवेधी कवितांशी किंवा कवितांवर असायला हवा हाेता. की, आता लक्षवेधी कविताच नाहीत? त्यामुळे विषय असा घेण्यात आला. त्याच परिसंवादात खलील माेमिन म्हणाले की, सध्या कविता, गझल माेठ्या संख्येने लिहिल्या जात आहेत. पण, निकषांचे काय? असा प्रश्न पडताे. या निकषांसंदर्भातच परिसंवादाची गरज हाेती.

काेराेनानंतरचे अर्थकारण आणि साहित्य व्यवहारावर तज्ञांची मते छान हाेती पण,त्यातून साहित्य व्यवहारासाठी फारसे पर्याय पुढे आलेच नाहीत. कादंबरीलेखन माेठ्या प्रमाणात हाेते तुलनेने कथासंग्रह फारसे येत नाहीत त्याची कारणे शाेधणे महत्त्वाचे नव्हते का? मात्र त्यावर चर्चा न करता थेट कथाकथनाचे सत्र या संमेलनात आणले गेले. अभिनेते दिलिप प्रभावळकर बालकुमार साहित्य मेळव्यात उपस्थित राहिले. मात्र त्यांच्या साहित्य निर्मितीपेक्षा त्यांच्या अभिनयावरच चर्चा अधिक झाली. समाराेपाच्या दिवशी "शेतकऱ्यांची दुरवस्था व कलावंतांचे माैन' या परिसंवादातून शेतकऱ्यांनी हाती मशाल घेतली तर लेखक गप्प का? असा थेट सवाल वक्त्यांनी विचारल्याने ताे परिसंवाद चर्चेचा आणि संमेलनाच्या उद्देशाजवळ जाणारा ठरला. तर वृत्तमाध्यमांचे मनाेरंजनीकरणच झालंय हे गृहीत धरूनच तसा विषय दिला यावरच "वृत्तमाध्यमांचे मनाेरंजनीकरण' या परिसंवादात चर्चा अधिक झाली. "ऑनलाईन वाचन वाङमयीन विकासाला तारक की मारक' या परिसंवादात काही वक्ते अगदीच नकारात्मक बाेलत असताना परिसंवादाच्या अध्यक्षांनी त्यातील सुवर्णमध्ये काढत ऑनलाईन वाचन वाङमयीन विकासाला तारकंच मात्र त्रुटी दूर हाेणेही गरजेचे असल्याचे मत मांडल्याने त्यातील नकारात्मकता खाेडली गेली. बालकुमार साहित्य मेळाव्यातील विषय म्हणजे मुलांसाठी हाेते की, पालकांसाठी हाेते, हाच प्रश्न पडला. निमंत्रितांचे कवीसंमेलन हे स्थानिक कवींचे अधिक म्हणावे लागेल. त्यात भरणाच तसा केलेला हाेता. त्यामुळे एरवी निमंत्रितांच्या कविसंमेलनाला रात्री उशीरापर्यंत थांबणारी गर्दी या मांडवाने पाहिलीच नाही. कवीकट्ट्याचेही तेच झाले. अनेक कविता या र ला र ट ला ट हाेत्या. फक्त सगळ्या भागांना संधी द्यायला हवी, म्हणून कविता निवड. त्यातून तरी समाज, साहित्य, मराठी भाषेला काही मिळालं का? याचं उत्तर काेण देणार? म्हणजे आपण विविध विषयांमधूनही भाषा आणि साहित्याचं मंथन हाेऊ दिलं का? हा प्रश्न संमेलनाच्या कारभाऱ्यांनी स्वत:लाच विचाराला हवा. त्याचं उत्तर नाही असंच मिळणार आहे आणि जेव्हा ते तसं मिळेल तेव्हा संमेलनाला आपाेआपच इव्हेंट म्हटलं गेलं तर त्यात काय चूक आहे?

संमेलनाच्या समाराेपात मात्र प्रत्येक संमेलनाप्रमाणे मराठीच्या चिंतेचा जप मान्यवरांनी केला. प्रथेप्रमाणे साहित्य महामंडळाने विविध ठरावही मांडले. पण, मराठीच्या चिंतेवर झालेली चर्चा सरकारदरबारी येणार का? की तीचे बुडबुडे त्या समाराेपाच्या मंचावरच हवेत विरले हे येत्या काळात कळेलंच. संमेलनाच्या समाराेप सत्रात ठराव का मांडले जातात हे न उमगलेलं काेडं आहे. या ठरावांचं पुढे काहीच हाेत नाही. ते फक्त कागदावर मांडायचे आणि पुढील संमेलनात पुन्हा नवे ठराव ठेवायचे. आधीच्या ठरावांचं काय झालं? हे बघण्याची जबाबदारी महामंडळाची नाही का? पण ती साेयीस्करपणे टाळली जाते. मग ताे ठराव मांडण्याचा साेपस्कार तरी कशासाठी करतात? त्यातही मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा ठराव असताेच. पण, ताे ठराव मांडताना त्या उपक्रमासाठी महामंडळ म्हणून आपण काय पावले उचलताे? महाराष्ट्र आणि कर्नाटकातील मराठी शाळा, राज्याबाहेर वास्तव्यास असलेला मराठी माणूस, महाराष्ट्र परिचय केंद्र, बाेलिभाषा यासह अनेक ठराव मांडले गेले, मांडले जातात... त्याचा पाठपुरावा मात्र कधीच हाेत नाही. ठराव मांडणे हे फक्त समाराेपातील साेपस्कार झाल्याचे या संमेलनातही पुन्हा एकदा अधाेरेखित झाले.

एकूणात काय तर संमेलनाचा इव्हेंट छान झाला. काेराेनाच्या काळानंतर प्रथमच एवढी माेठी जत्रा भरल्याने नाशिकच्या बाहेर असलेल्या संमेलनस्थळावर आसपासच्या छाेट्या गावांमधून लाेकांचे जथ्थेच्या जथ्थे आले. त्यांना साहित्य, मराठीशी फार काही करायचं हाेतं का? हा संशाेधनाचा विषय. मुळात मराठी भाषेचा असा एक माेठा साेहळा आपल्या नाशिकमध्ये आहे हेच त्यांच्यापर्यंत पाेहाेचलेलंच नव्हतं. त्यात त्यांची काहीच चूक नव्हती. शनिवार, रविवार असल्याने अनेकजण तिथे फिरायला आले. विविध खाण्याच्या पदार्थांचे स्टाॅल्स तिथे हाेतेच. रहाटपाळणे मात्र नव्हते. अनेक कुटुंबांनी झाडांच्या लाईटींग, माेठ माेठे स्कल्पचर्स, रंगवलेल्या भींती, सजावटी येथे फाेटाे काढून मजा केली आणि घरी गेले. तीन दिवस माेफत वाहन व्यवस्था हाेतीच. म्हणजे व्यवस्थेच्या दृष्टीने उत्तम असे नाशिकचे संमेलन म्हणता येऊ शकते. पण, मराठी भाषा, मराठी साहित्य या दृष्टीने हे संमेलन उत्तीर्ण झालं का? याचं चिंतन हाेण्याची गरज आहे. याउलट सासवड, उस्मानाबाद, यवतमाळसारख्या लहान गावांमध्ये विविध विषयांवर ठाेस चर्चा झाली, लेखकांच्या लिहिण्याच्या स्वातंत्र्यावर सातत्याने बाेललं गेलं, साहित्यिक आले त्यांनी निर्धाराने विचार मांडले. साहित्यिकांची भूमी म्हटल्या जाणाऱ्या स्वातंत्र्यवीर सावरकर, ज्ञानपीठप्राप्त कुसुमाग्रज, वामनदादा कर्डक, बाबुराव बागुल आणि यांच्यासारख्या महान साहित्यिकांच्या अंगणात मराठीचा हा उत्सव हाेत असताना मात्र मुळ उद्देशालाच साेयिस्करपणे बगल दिली गेली हेच खरे..!

या संमेलनात एक बाब हट्टाने झाली ती म्हणजे कलाप्रदर्शन. कला आणि साहित्य यांचे महत्त्वाचे नाते आहे हे अधाेरेखित करणारे असे कलाप्रदर्शन या संमेलनात पार पडले. पुस्तकांचे मुखपृष्ठ, आतील पानं यात अनेकदा चित्र असतात, विविध कलांचा त्यात समावेश केलेला असताे. मग साहित्य संमेलनात त्याला स्थान का नाही? असा विचार पुढे आल्याने या प्रदर्शनाला जागा मिळाली, त्यासाठी नावाजलेले चित्रकार, मूर्तीकार या ठिकाणी आले आणि हा उपक्रम विशेष यशस्वी केला. हा उपक्रम पुढे हाेणाऱ्या साहित्य संमेलनांमध्येही राबवावा असा आग्रह या संदर्भातील समितीने धरला हे विशेष. याबराेबरच अभिजात मराठी दालनानेही विशेष लक्ष वेधले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी राज्यशासनाने आवश्यक ती सगळी कागदपत्रे, पुरावा केंद्रसरकारकडे साेपविली आहेत. त्यातील काही विशेष गाेष्टी या दालनात कलात्मकतेने लावण्यात आल्याने या दालनाकडे विशेष ओघ हाेता. हे दालनही राज्यसरकारने पुढील संमेलनात लावावे अशी अपेक्षाही अनेकांनी व्यक्त केली.

विद्राेहाची धार तीव्र पण...

मुख्य प्रवाहातील साहित्य संमेलनाच्याच दिवशी विद्राही मराठी साहित्य संमेलन घेऊन विद्राेहाची तीव्र धार आपणचं क्षीण करताे आहाेत हे आता विद्राही संमेलन घेणाऱ्यांनी समजून घ्यायला हवे. त्याच दिवशी आपण संमेलन घेतले म्हणजे आपला विद्राेह अधिक अधाेरेखित हाेताे असे जर वाटत असले तर ते चूक नाही का वाटत? किंबहुना त्यामुळे अनेकांना आपल्या विद्राेही संमेलनाला येताच येत नाही. ज्या ठिकाणी उत्सव, जत्रा असते त्या ठिकाणी माणून आधी डाेकावताे ही सहाजिकता आहे. मात्र विद्राेही, आक्रमकतेने मांडलेले विचार ऐकायला काेणाला आवडणार नाही. पण, आपणच ती संधी हिरावून घेताे यावर विचार व्हायला हवा. उलट मूळ साहित्य संमेलन झाल्यावर एक-दाेन दिवसांनी किंवा नंतर चांगले संमेलन घेऊन त्यावेळी प्रस्थापितांच्या या संमेलनातील विषयावरच प्राहर कर आपले विचार मांडताना इतरही महत्त्वाचे विषय मांडण्याची आता गरज निर्माण झाली आहे. पहिल्या विद्राेही साहित्य संमेलनाचे अध्यक्ष बाबुराव बागुल यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे नाशिकला विद्राेही साहित्य संमेलन घेण्याचा प्रयत्न यशस्वी झाला. बहुजन समाजातील वेदना, दु:ख साहित्यातून पुढे येत असले तरी आदिवासी, गाेरगरिब, दलित, वंचित चळवळीतील विविध घटकांतील साहित्य आणि साहित्यिकांची मुस्काटदाबी जेव्हा हाेते तेव्हा अशी संमेलने त्यांचा आवाज हाेत असतात. डाॅ. गाैहर रझा, साहित्यिक डाॅ. सुखदेवसिंग सिरसा, डाॅ. भालचंद्र मुणगेकर, डाॅ. श्रीमंत काेकाटे, प्रा. डाॅ. आनंद पाटील यांसारखे ज्येष्ठ विचारवंत जेव्हा या संमेलनात येतात तेव्हा ताे प्रस्थापितांना माेठा धक्का असताे. त्यामुळे प्रस्थापितांना बसणारा हा धक्का सर्वसामान्य समाजालाही कळायला हवा, म्हणूनच विद्राही मराठी साहित्य संमेलनाची नव्याने बांधणी करण्याची गरज निर्माण झाली आहे.

आपण विद्राेही आहाेत, आपल्याकडे निधीच नाही, सरकार निधी देत नाही, किंवा आम्ही त्यांच्याकडे मागतच नाही, काम करायला लाेकंच नाहीत वगैरे वगैरे म्हणत आपण शेवटाला उत्तम संमेलन करताे. मग हे आधीच का हाेत नाही. संमेलन दाेन दिवसांवर येते तरी आपली कार्यक्रम पत्रिका तयार नसते, संमेलनात काेण मान्यवर येणार हे देखील जाहीर केलेलं नसतं, विराेधाला विराेध म्हणून की, विद्राेही साहित्य निर्मितीतून मुख्य प्रवाहात जगण्याच्या मूळ प्रश्नांवर आपल्याला बाेलायचे आहे हे देखील आधी ठरवले तर विद्राेही साहित्याकडे वाचक म्हणून असलेला प्रवाह या संमेलनातही प्रत्यक्ष दिसेल यात शंकाच नाही. विद्राेही मराठी साहित्य संमेलन असे आपण एकीकडे म्हणत असताना दुसरीकडे त्यातील मराठी साहित्य हे शब्दच हरवत जाताे आणि मग ते फक्त विद्राेही संमेलन रहातं. त्यामुळे प्रत्येकाच्या बाेलण्यात, भाषणात सरकार किंवा प्रस्थापितांच्या विराेधाची टाेकं दिसू लागतात. मग पुन्हा इथेही विद्राेही मराठी साहित्याचे काय? असा प्रश्न उभा रहाताे. एकीकडे विद्राेही साहित्य संमेलने हे महाराष्ट्र सरकारचे पैसे घेणारे आणि उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांचे नाही, तर कष्टकऱ्यांच्या भाकरीवर जगणारे संमेलन आहे. येथे जनमाणूस कष्टकरी, स्त्रीयांचे हक्क, महापुरुष आणि जल, जंगल जमिनीचा विचार मांडला जाताे असे म्हटले जाते मग हाच विचार मराठी साहित्यातून कसा येईल आणि ताे जनमाणसाच्या मनावर कसा खाेलवर रुजला जाईल हे या संमेलनातून अधाेरेखित करण्यासाठी का प्रयत्न हाेत नाहीत.
लाेकसहभाग म्हणून "एक मुठ धान्य एक रुपया' हा उपक्रम अत्यंत स्तुत्यच आहे. मात्र त्याच्या अंमलबजावणीची तीव्रता कमी आहे हे काेणीही नाकारु शकत नाही. याचे कारण म्हणजे आपल्याकडे संमेलनासाठी कार्यकर्त्यांची फळी नाही. मग प्रस्थाापितांना, त्यांच्या सनातनी विचारांना जाेरदार धक्का देण्यासाठी गटातटाचे राजकारण न करता आधी कार्यकर्त्यांची माेठी माेट बांधायला हवी. गटचर्चेसारखे तीन-तीन, चार-चार तास चालणारे सत्र यात काळानुरुप बदल व्हायला हवे. मुळात या संमेलनाने आता कूस बदलायला हवी जी आजच्या काळात समाजालाच हवी आहे कारण अनेक साहित्यिक, साहित्य प्रेमींही विद्राेही विचारांकडे आकर्षित हाेत आहेत. कितीवर्ष त्याच त्या चाैकटीतून संमेलन मांडणार आहाेत. जसे प्रस्थापित विचार झुगारुन विद्राेह मांडला जाताे तशाच आयाेजनातील या प्रस्थापित चाैकटींना माेडून पुढे जाण्याची गरज यानिमित्ताने अधाेरेखित हाेते.

piyushnashikkar@gmail.com

बातम्या आणखी आहेत...