आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:‘वर्णभेद न मानणं आणि वर्णभेदविरोधी असणं...’

सागर नाईक16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

क्विंटन डी कॉक या दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूने ‘निलिंग’ म्हणजे वर्णभेदाच्या विरोधात एक गुडघा टेकवण्याची निषेधकृती करण्यास नकार दिल्यानंतर वर्णभेद आणि क्रीडाक्षेत्र यांच्या सहसंबंधावर नव्याने चर्चा सुरु झाली आहे. सदर विवादावर जाहीर दिलगिरी व्यक्त करत डी कॉकने ‘मी वर्णभेद करणारा (रेसीस्ट) नाही’ असे स्पष्टीकरण दिले खरे, पण इतिहासाचा आणि वर्तमानाचाही विचार करता वंशवाद-वर्णभेदाने ग्रासलेल्या देशात ‘मी रेसीस्ट नाही’ एवढे म्हणणे पुरेसे आहे का? किंवा भूमिका न घेण्याचा डी कॉकचा निर्णय केवळ खाजगीच राहतो का? दक्षिण आफ्रिकेचा इतिहास बघता हा मुद्दा फक्त वर्णभेदी नसण्यापुरता मर्यादित नाही, तर वर्णभेदविरोधी असण्याचा आहे असेच म्हणावे लागते.

क्विंटन डी कॉक या दक्षिण आफ्रिकेच्या क्रिकेटपटूने ‘निलिंग’ म्हणजे वर्णभेदाच्या विरोधात एक गुडघा टेकवण्याची निषेधकृती करण्यास नकार दिल्यानंतर वर्णभेद आणि क्रीडाक्षेत्र यांच्या सहसंबंधावर नव्याने चर्चा सुरु झाली आहे. (२०१६ साली कॉलीन केपार्निक या अमेरिकन ग्रीडायरन फुटबॉलपटूने काळ्यांच्या विरोधातील वांशिक हिंसेला विरोध करण्यासाठी राष्ट्रगीत सुरु असतांना मैदानावर गुडघा टेकवून निषेध नोंदविला होता. तेव्हापासून "निलिंग'ला वर्णभेद-विरोध आणि मानवी हक्कांसाठीची कृती म्हणून महत्व प्राप्त झालेले आहे.) डी कॉकच्या वादात भूमिका घेणे हा ज्या त्या व्यक्तीचा खाजगी निर्णय असतो, त्याबाबतीत संबंधित व्यक्तीवर कोणी दबाव आणू शकत नाही असा सर्वसामान्य चर्चेचा सूर होता. डी कॉकने वेस्ट इंडीजविरुद्धच्या पुढील सामन्यात ‘व्यक्तिगत कारणामुळे’ न खेळण्याचा निर्णय घेतला. कर्णधार तेम्बा बवूमाने या वादावर संयत भूमिका घेत डी कॉकच्या व्यक्तिगत मताचा आम्ही आदर करतो असे म्हटले. पुढील सामना श्रीलंकेसोबत होणार होता त्या आधी डी कॉकने सदर विवादावर जाहीर दिलगिरी व्यक्त करत लांबलचक स्पष्टीकरण दिले. ‘मी वर्णभेद करणारा (रेसीस्ट) नाही’ असे डी कॉक त्यात म्हणाला. पण इतिहासाचा आणि वर्तमानाचाही विचार करता वंशवाद-वर्णभेदाने ग्रासलेल्या देशात ‘मी रेसीस्ट नाही’ एवढे म्हणणे पुरेसे आहे का? किंवा भूमिका न घेण्याचा डी कॉकचा निर्णय केवळ खाजगीच राहतो का? दक्षिण आफ्रिकेचा इतिहास बघता हा मुद्दा फक्त वर्णभेदी नसण्यापुरता मर्यादित नाही, तर वर्णभेदविरोधी असण्याचा आहे असेच म्हणावे लागते. दक्षिण आफ्रिकेत ‘निलिंग’चे अनन्यसाधारण महत्व का आहे हे जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासात जावे लागेल.

क्रिकेट, साम्राज्यवाद आणि वंशवाद:

युरोपियन साम्राज्यावादाने जगभरात आपले वर्चस्व केवळ बळाच्या जोरावरचं स्थापित केलं नाही तर युरोपियन संस्कृती इतरांवर थोपविण्याचासुद्धा त्यात महत्वाचा वाटा होता. डार्विनच्या सिद्धांताचा तोडून-मरोडून ‘बळी तो कान पिळी’ असा अर्थ युरोपीयन साम्राज्यवाद्यांनी लावला आणि माणसांचे ‘वंश’ (Race) असल्याची निराधार कल्पना उभी केली. ‘गौरवर्णीय वंश’ हा जात्याच ‘श्रेष्ठ’ आहे आणि जगातील ‘निकृष्ट वंशांवर’ तो सत्ता गाजविण्यासाठी ‘पात्र’ आहे असे तर्क मांडून साम्राज्यवाद्यांनी त्यांच्या राज्याला ‘वैधता’ प्राप्त करून दिली. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर सुरवातीला ‘डच सिव्हिलायझेशन मिशन’ने सतराव्या-अठराव्या शतकात प्रवेश केला. त्यांच्या मते आफ्रिकेतील काळी माणसं ही प्राणीसदृश्य (creatures) आहेत आणि आम्ही त्यांना ‘सुसंस्कृत’ करण्यासाठी आलो आहोत असाही त्यांचा दावा होता. आफ्रिकेतील लोकांना गुलाम बनवून त्यांची खरेदी-विक्रीसुद्धा यानंतरच्या काळात सुरू झाली. (डच भाषिक लोकांचा हा समूह आफ्रिकान्स म्हणून ओळखला जायचा). एकोणिसाव्या शतकाच्या सुरवातीला ब्रिटिशांनीही दक्षिण आफ्रिकेत आपला हस्तक्षेप वाढवत वसाहती स्थापन केल्या. क्रिकेट हा खेळ आफ्रिकेत वसाहतीकरणाच्या प्रक्रियेसोबतच गेला. क्रिकेट खेळण्यासाठी लागणारी सचोटी ही फक्त ‘श्रेष्ठ’ वंशाकडे असते असे ‘वांशिक मूल्य’ क्रिकेटला चिकटलेले होते. क्रिकेट हे गोऱ्यांचे ‘अस्सलपणाचे लक्षण’ मानले जायचे. म्हणूनच वसाहतींचे ‘शिस्तीकरण’ करण्यासाठी क्रिकेट हे एका प्रकारचे सांस्कृतिक मध्यम म्हणून वापरले गेले. युरोपीय लोकांच्या दृष्टीने आफ्रिकेतील काळ्यांपासून ‘अंतर’ ठेवण्यासाठी आणि काळ्या महिलांशी संपर्क टाळण्यासाठी क्रिकेट हे महत्त्वाचं साधन होतं. आफ्रिकेतील वसाहतकारांमध्ये डच आणि ब्रिटीश अशा दोन गौरवर्णीय भाषिक समूहांची ‘साउथ आफ्रिकन’ म्हणून जी सामूहिक ओळख निर्माण झाली त्यात क्रिकेटने महत्वाची भूमिका पार पाडली होती. गोऱ्या वसाहतवाद्यांनी आपला ‘अस्सलपणा’ आणि ‘वांशिक श्रेष्ठत्व’ जोपासण्यासाठी क्रिकेटच्या नियमनामध्ये आणि प्रशासनामध्ये हिरीरीने सहभाग घेतला. अशा प्रकारे दक्षिण आफ्रिकेत क्रिकेटचं संस्थात्मक स्वरूपचं मुळात वंशवादी होतं.

अपरथाइड आणि क्रिकेट :

बोअरच्या युद्धानंतर १९०५ मध्ये ‘साउथ आफ्रिकन नेटिव्ह अफेयर्स कमिशन’ (SANAC) ची स्थापना करण्यात आली. या कमिशनचे चेअरमन गोडफ्रे लॅक्डेन यांनी असं म्हटलं होतं की, आफ्रिकेतील लोकं बुद्धीने कमी असतात, किंबहुना याबाबतीत ते बबून माकडांसारखे असतात. यानंतर काळे आणि गोऱ्यांच्या वेगळ्या वस्त्या झाल्या ज्याला आपण ‘विलगीकरण’ म्हणतो. ‘वंशनिहाय’ वस्त्या, दवाखाने, खेळाची मैदाने, नागरिकता इ. सर्व गोष्टी ‘वंशा’च्या आधारावरच वाटल्या गेल्या. यात अर्थातच काळ्यांना शेवटचे स्थान होते. गोरे, कलर्ड, एशियन, काळे अशी उतरंड वंशाच्या कृत्रिम कल्पनेच्या आधारावर उभी केली गेली. पुढे ‘वंशा’ला अधिकृत कायदा मानून ‘अपरथाइड राजवट’ (वंशवादी-वर्णभेदी राजवट) १९४८-९४ मध्ये लागू झाली. खेळ खेळण्याच्या सर्वच सोयी सुविधा गोऱ्यांच्या वस्त्यांमध्ये असल्याने इतर वर्णीयांना क्रिकेटमध्ये समान संधी नाकारली गेली. अशा सर्व प्रकारच्या अभावग्रस्ततेही काळ्यांच्या वस्त्यांमध्ये क्रिकेट खेळले जायचे. नारळाच्या काथ्यापासून बनवलेल्या जुनाट चटईवर खेळूनही याकुब ओमर आणि बॅसील डी’ऑलीवेरा सारख्या काळ्या खेळाडूंनी देदिप्यमान कामगिरी केली होती. डी’ऑलीवेरा (१९६६-७२) हा ‘कलर्ड’ (मिश्रवर्णीय) खेळाडू वांशिक कायद्यामुळे दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करू शकत नव्हता, परिणामी तो इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय सामने खेळला. दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यात १९६८ साली होणाऱ्या मालिकेत डी’ऑलीवेरा इंग्लंडकडून खेळणार असे स्पष्ट झाल्यावर दक्षिण आफ्रिकेचे तत्कालीन प्रधानमंत्री बी. जे. वोर्स्टर यांनी डी’ ऑलीवेराच्या खेळण्याच्या शक्यतेला स्पष्ट नकार देत दौरा रद्द केला. दक्षिण आफ्रिका क्रिकेटच्या अशा वंशवादी धोरणामुळे जागतिक क्रिकेटने त्यांच्यावर बंदी घातली.(१९७०-९१) दरम्यानच्या काळात अपरथाइड शासनाने काळ्यांच्या मुक्तीसाठी चालणाऱ्या चळवळींना बेकायदेशीर ठरविले होते, राजकीय संघर्षाची ही पोकळी ‘काळ्या खेळां’नी black sports ने भरून काढली. क्रिकेटच्या मैदानावर अधिकार सांगणे ही काळ्यांच्या प्रतिरोधाची कृती ठरत होती. वंशवादी राजवटीने प्रतिरोध करणाऱ्या अशा खेळाडूंची संभावना ‘स्पोर्ट्स टेररिस्ट’ म्हणून केली. काळ्यांच्या चळवळी उत्तरोत्तर बळकट होत गेल्या आणि शेवटी अपरथाइड राजवटीचा पाडाव होऊन लोकशाही आणि मानवी हक्क मानणाऱ्या नव्या साउथ आफ्रिकेचा जन्म झाला. ‘नो नॉर्मल स्पोर्ट्स इन अॅन अॅबनॉर्मल सोसायटी’ अशी घोषणा करण्यात आली. वंशवादी धोरणाचा त्याग करून क्रिकेट आता सर्वसमावेशक होणार याच अटीवर दक्षिण आफ्रिका संघाचं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन शक्य झालं.

ट्रान्सफॉर्मेशन आणि क्रिकेट:

क्रिकेटमधील वंशवादाच्या या पूर्वइतिहासामुळे नवीन दक्षिण आफ्रिका वर्णभेदाशी जो लढा देत होता, त्यात क्रिकेटला अर्थातच महत्त्वाचं स्थान होतं. मानवी हक्क आणि लोकशाहीवर आधारित समाजाची स्थापना करण्याच्या या प्रक्रियेला ‘ट्रान्सफॉर्मेशन’ म्हटले गेले. परंतु वांशिक पूर्वग्रह/भेदाभेद आणि संसाधनांच्या अभावामुळे क्रिकेटमध्ये काळ्यांचे राष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्व अजूनही दिसत नव्हते. म्हणूनच काळ्यांना प्रतिनिधित्व देण्यासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली. वर्णभेदामुळे ज्यांना वगळले जाते अशा समूहांचे प्रतिनिधित्व निश्चित करण्यात आले. त्यानुसार दोन काळे खेळाडू संघात असावे असे अनिवार्य करण्यात आले. मखाया न्टीनी आणि पॉल अॅडम्स हे पहिल्या पिढीतील काळे खेळाडू होते. हे दोघे ‘कोटा’ (आरक्षित) खेळाडू आहेत आणि मेरीटधारी असूनही आम्हाला वगळले गेले अशी तक्रार पॅट सिमकॉक्स आणि निकी बोये या गौरवर्णीय खेळाडूंनी केली होती. पुढे न्टीनीने त्याच्या कारकिर्दीत ६००च्या वर बळी घेतले आणि अॅडम्सचे गोलंदाजीचे आकडे सुद्धा बोये आणि सिमकॉक्स यांच्यापेक्षा सरस होते. आरक्षणाची तरतूद नसती तर न्टीनी आणि अॅडम्स यांना संधी मिळाली नसती अशीच तेव्हा परिस्थिती होती. पुढे हाशीम आमला, वर्नेन फीलँडर, कगीसो रबाडा यांसारख्या महान खेळाडूंना आरक्षणाच्या तरतुदीमुळेच संधी मिळू शकली.

निलिंग कशासाठी?

जॉर्ज फ्लॉईडच्या हत्येनंतर जगभरात जी ‘ब्लॅक लाइव्ह्ज मॅटर’ चळवळ सुरू झाली तिला समर्थन आणि वर्णभेदाला विरोध दर्शविण्यासाठी आपण भूमिका घ्यायला हवी, असे मत लुंगी इंगिडी या काळ्या खेळाडूने मांडले. मानवी हक्कांसाठीच्या या प्रतीकात्मक कृतीला कोणाचा विरोध असण्याचे काहीच कारण नव्हते पण दक्षिण आफ्रिकेच्या माजी खेळाडूंनी इंगिडीला या भूमिकेसाठी लक्ष्य केले. या निमित्ताने आपल्या वंशवादी पूर्वग्रहांचे जाहीर प्रदर्शन पॅट सिमकॉक्स, बोएटा डीपेनार, रुडी स्टेन हे माजी खेळाडू करत होते. याला प्रतिक्रिया म्हणून हाशीम आमला आणि अॅश्वेल प्रिन्स यांनी इंगिडीची पाठराखण करत वर्णभेदाचे त्यांचे अनुभव आणि मत जाहीर केले. मखाया न्टीनीने खेळत असताना त्याच्या वाट्याला आलेला एकाकीपणा आणि भेदाभेदाचे अनुभवकथन केले. जीयोफ्री टोयना यांना वर्णभेदामुळेच दक्षिण आफ्रिका संघाचं प्रशिक्षक होता आले नाही. अहमद ओमर या माजी खेळाडूने गोऱ्या खेळाडूंना काळ्यांच्या तुलनेत तिप्पट पगार होता असे म्हटले, खाया झोन्डो, लोन्वाबो सोत्सोबे आणि थामी त्सोलेकिले यांच्यासोबत तत्कालीन गौरवर्णीय कर्णधारांनी कसा भेदभाव केला हे त्यांनी उघडपणे बोलून दाखविले. कोटा प्लेयर्स’ना आधी बोलायची सोय नव्हती, ‘निलिंग’च्या चर्चेमुळे दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधील वर्णभेदाच्या कितीतरी गोष्टी उघड होऊ शकल्या. पॉल अॅडम्सची वांशिक मानखंडना करण्यासाठी ‘ब्राऊन शीट इन द रिंग, ट्रा ला ला ला’ असे गाणे ड्रेसिंग रूममध्ये गायले जायचे हे मार्क बाउचर या माजी गौरवर्णीय खेळाडूने अलीकडेच मान्य केले आहे. या समकालीन घटना दक्षिण आफ्रिका क्रिकेट मधील वर्णभेदावर भाष्य करतात. वर्णभेदावर जाहीर लोकचर्चा ‘निलिंग’च्या निमित्ताने होते आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेटमधील वर्णभेदाचा गतकालीन इतिहास आणि समकालीन वास्तव बघता, भूमिका न घेणे हा क्विंटन डी कॉकचा ‘खाजगी’ निर्णय असू शकत नाही. कारण डी कॉक नव्या दक्षिण आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करतो ज्याला ‘रेनबो नेशन’ (सर्व वर्णीय समूहांना सामावून घेणारं राष्ट्र) म्हटलं जातं. ज्या संघाच्या खेळाडूंना आता स्प्रिंगबॉक्स (अपरथाइड राजवटीचे चिन्ह असलेले हरीण) च्या ऐवजी प्रोटीया (नवीन दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रीय फूल ज्यातून सर्वसमावेशकतेचा बोध होतो). वंशभेदविरोधी कटीबद्धतेमुळेच दक्षिण आफ्रिका संघाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन होऊ शकले हे इथे विसरता कामा नये. म्हणूनच फक्त वर्णभेद न मानण्यापुरतं मर्यादित न राहता वर्णभेदविरोधी भूमिका घेणं महत्त्वाचं ठरतं.

(लेखक इतिहास विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे येथे संशोधन सहाय्यक आहेत.)

------------------

sagarnaik4511@gmail.com

बातम्या आणखी आहेत...