आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:ईशान्येकडे जरा ‘असेही’ पाहा!

शाहू पाटोळेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

अप्पर आसाम आणि ईशान्येकडच्या राज्यांतील लोकांची मानसिकता आणि त्यांचा लढा हा ‘स्वतंत्र ओळख' टिकवण्यासाठीचा आहे. शे-दीडशे वर्षांत शिक्षणामुळे माणसे किती बदलू शकतात, याची प्रचिती घ्यायची असेल, तर ईशान्येकडील सध्याच्या जमातींचा अभ्यास करायला हवा. इतके बदल होऊनही या जमातींनी आपले ‘जमातीय सत्व’ सोडलेले नाही. ‘पूर्वेकडे पाहा’ (Look East) या आपल्या धोरणाचा सुकाणू ईशान्येतील राज्यांकडे आहे, असे देशाचे सरकार मानत असेल, तर सरकारने आणि उर्वरित देशानेही आधी ईशान्येकडे जरा वेगळ्या दृष्टीने पाहिले पाहिजे.

आपल्यासारख्या तथाकथित मुख्य भूमीतील वा मेनलँडमधील ‘सुजाण' नागरिकांना आणि ‘सूज्ञ' माध्यमांना ईशान्य भारतात कोणत्या घडामोडी होतात, याच्याशी एरवी काही देणे-घेणे नसते. पण, तिकडे काही अवचित, अघटित घडल्यावर मात्र लगेच खडबडून जाग येते. माध्यमे तेवढ्यापुरते त्यावर व्यक्त होतात आणि तो ‘इश्यू' त्यांच्या दृष्टीने संपला की, येरे माझ्या मागल्या. अलीकडेच इकडच्या माध्यमांना आणि नागरिकांना असाच विषय मिळाला, तो आसाम व मिझोराम या दोन राज्यांतील सीमावाद आणि त्यातून उभाळलेल्या संघर्षाचा. भूतकाळातही ईशान्येकडील राज्यांत अशा प्रकारच्या घडना घडल्या आहेत. खरे तर अशा घटना एकदम घडत नसतात, नाहीत. अशा घटना ही त्यावेळची टोकाची प्रतिक्रिया असते, तो अपघात नसतो. त्याची कारणे भूतकाळात आणि इतिहासात दडलेली असतात, हे आपल्या लेखी नसते. पण, आपण सूज्ञ वा भद्र लोक त्या घटनेत कुण्या धर्मीयांचे नुकसान झाले, कोणत्या जातीचे, स्तरातील लोक होते याचा कानोसा घेऊन आपले खोटे, खरे मत तयार करुन व्यक्त होतो.

आसाम आणि मिझोराम यांच्यात सीमांवरून असलेला वाद हा काही अशातला आहे का? किंवा एकमेव आहे का? आसामचा अशाप्रकारचा वाद मिझोरामशिवाय अरुणाचल प्रदेश, मेघालय आणि नागालँडशी आहे. सीमा वेगवेगळ्या असल्या तरी वाद त्यावरुनच आहेत. या सगळ्या संघर्षाची कारणे ईशान्य भारताच्या इतिहासात आणि भौगोलिक परिस्थितीबरोबरच सामाजिक व्यवस्थांमध्येही दडली आहेत. स्वातंत्र्योत्तर भारतातील सीमावादांचे कार्यकारणभाव बघायचे झाले, तर आसाम आणि मिझोंच्या (लुशाई हिल्स) वादाची मुळे १८७५ पासून सुरू होतात. तर, आसाम याच मुद्द्यावर १९३३ सालावर अडून बसले आहे. मेघालयाशी असलेला सीमावादही मेघालय १९७२ साली स्वतंत्र राज्य झाल्यापासूनचा आहे. त्यापूर्वीही गारो हिल, खासी आणि जयंतीया यांवरून कुरबुरी होत्याच. आसाम आणि नागालँडचा वाद नागा हिलपासूनचा, १९२४ पासूनचा आहे. १९६६ च्या तत्कालीन नागा लोकांच्या प्रदेशाचा भाग नागालँडला देण्याची जुनी मागणी आहे. १ डिसेंबर १९६३ ला नागालँड राज्याची निर्मिती झाल्यानंतर १९६५ पासून आजवर अनेकदा दोन्ही राज्यांच्या पोलिसांत आणि नागरिकांमध्ये संघर्ष झाला आहे. या वादामागची कारणे तपासताना त्याचे दोन मुख्य भाग करावे लागतात. ते म्हणजे ब्रिटिशपूर्व कालखंड आणि ब्रिटिशोत्तर कालखंड.

स्वातंत्र्योत्तर काळात ईशान्येकडच्या भागातील मूळच्या वांशिकतेवर आधारित जुन्याच स्वातंत्र्याच्या मागणीचा आणखी जोर वाढला. अनेक वांशिकगट सशस्त्र होऊन केंद्राविरुद्ध उभे ठाकले. काही गट हे ब्रिटिशांनी आपल्याला पोरके करु नये, या मताचे होते. सैन्याच्या बळावर त्यांना किती वर्षे दाबून ठेवणार म्हणून केंद्र सरकारने काही भागांना स्वतंत्र दर्जा दिला, काही भागांचा केंद्रशासित प्रदेश केला. नागालँडसारख्या तीव्र विरोध असलेल्या नागा हिल्सचे रुपांतर स्वतंत्र राज्यात केले आणि त्यानंतर आसाम टेरिटरीतून काही राज्यांचे केंद्रशासित प्रदेश करून नंतर त्यांनाही राज्यांचा दर्जा देण्यात आला. अशाप्रकारे आसाममधून सहा वेगळी राज्ये निर्माण होऊन त्यांना ‘सेव्हन सिस्टर्स’ म्हटले जाऊ लागले. ही राज्ये निर्माण होताना त्यांच्या सीमा ब्रिटिशांनी त्यांच्या प्रशासकीय सोयीसाठी जसे जिल्हे केले होते, तशा असल्याचे गृहीत धरण्यात आले होते. मुळात आताच्या ईशान्येत आसाम, त्रिपुरा आणि मणिपूर वगळता इतर भागांमध्ये जी राजेशाही होती तिचा जीव अगदीच जेमतेम होता. कारण ती राजेशाही त्याच्या जमातीपुरती मर्यादित होती. ईशान्य भारताचे प्रवेशव्दार म्हणजे गुवाहाटी शहर. रस्त्याने वा रेल्वेने ईशान्येकडील कोणत्याही राज्यात जाण्यासाठी आजही गुवाहाटीवरुनच जावे लागते. यातील कोणत्याही राज्यात जाताना भौगोलिकदृष्ट्या आपल्या सहज लक्षात येईल की, आसामची हद्द संपल्याची सोपी खूण म्हणजे डोंगररांगा सुरू होणे. आसाम वगळता इतर राज्यांच्या हिश्श्याला जास्त करुन पर्वतीय प्रदेश आले आहेत. आसामच्या सीमेपासून दूर असलेला मैदानी प्रदेश अपवादानेच त्या-त्या राज्यांच्या अखत्यारित आला असल्याचे आपल्याला दिसेल. कदाचित त्यामुळेच आसामचा मणिपूर आणि त्रिपुरासोबत सीमेचा तंटा नसावा.

ईशान्येकडील पर्वतीय प्रदेशात वास्तव्यास असणाऱ्या विविध वांशिक टोळ्या सुदूरच्या चीन आणि पूर्व आशियाई देशांतून हजारो वर्षापूर्वी इकडे आल्या आणि स्थिर जीवन जगू लागल्या. त्यामुळे इकडच्या पर्वतीय प्रदेशातील जी गावे किंवा ग्रामरचना आजही अस्तित्वात आहेत, तिथे फक्त एकाच जमातीचे लोक गावात असतात, आहेत. फक्त त्यांची गोत्रं वेगळी असतात. बहुतेक जमातींची गावे हीच सार्वभौम राष्ट्र होती. गावाच्या मालकीच्या शेतजमिनी, नद्या, नाले, जंगल, तेथील प्राणी-जीव सगळे काही. छोट्या-मोठ्या कुरबुरीवरून अनेक गावागावांत वर्षानुवर्षे रक्तपात घडले आहेत. आणि ही फार जुनी गोष्ट नाही. एकाच जमातीची जशी गावे आहेत, तसेच प्रदेशही होते, आहेत. उदा. आजचा मिझोराम म्हणजे ‘लुशाई हिल' नागालँड म्हणजे “नागा हिल्स', मेघालयातील गारो, खासी आणि जयंतीया हिल्स आदी प्रदेश ज्या-त्या जमातींचे प्रदेश होते. ब्रिटिशपूर्व कालखंडात थायलंडमधून येऊन स्थानिक हिंदू राजवटींचा पाडाव करुन राज्य स्थापन करणारे ‘अहोम' राजे असोत वा त्यापूर्वीच्या मैदानी प्रदेशातील स्थानिक राजवटी असोत; त्यांनी या स्वतंत्र वृत्तीच्या लोकांना आपल्या अंकित ठेवण्याचे प्रयत्न केले. पण, त्या जमातींच्या स्वातंत्र्य राखण्याच्या चिवटपणामुळे शेवटी त्यांचा नाद सोडून दिला. मैदानी प्रदेशातील लोकांशी पहाडी प्रदेशातील लोकांचा संपर्क होता, तो बाजारापुरता. त्या स्वतंत्र जमाती जसे अहोम थायलंडहून वा पुढे चालून आलेल्या अहोमना, कचारींना स्थानिक ब्राह्मणांनी हिंदू क्षत्रिय केले. पण, या पहाडावर वास्तव्य करणाऱ्या जमाती ना हिंदू झाल्या ना बौध्द. त्या परंपरेप्रमाणे निसर्गपूजक राहिल्या. आजही त्या-त्या जमातींची पहिली ओळख ही मिझो, नागा, गारौ, खासी, कुकी, गांते इत्यादी असते अन् मग ख्रिश्चन अशी असते, आहे.

१७ जानेवारी १८२४ ला झालेल्या ब्रिटिश- बर्मीज युद्धापासून या प्रदेशाचा इतिहास आणि भूगोलाचा दुसरा टप्पा सुरू होतो. बर्माकडे जाण्या-येण्यासाठी या भागातून ब्रिटिश व मैदानी प्रदेशातील सैनिकांची वर्दळ वाढली आणि पहाडी प्रदेशातील लोकांशी त्यांचा संपर्क व संघर्ष वाढला. पुढे पुढे संघर्षाचे स्वरुप तितके तीव्र राहिले नाही, पण संपर्क वाढत गेला. ब्रिटिश अधिकारी आणि त्यांच्या सैन्यातील, प्रशासनातील कर्मचाऱ्यांपाठोपाठ आसाममार्गे इकडे सेवावृत्तीने चिवट असे बॅप्टिस्ट मिशनरी दाखल झाले. तत्कालीन सरकार आणि मिशनऱ्यांचा उद्देश होता तो या लोकांचे नागरीकरण करणे, जसे आपल्याकडे आजही काही लोकांना इतरांना ‘मुख्य प्रवाहात आणण्याचा' ध्यास लागलेला असतो. ब्रिटिशांच्या आणि त्यांच्यातील संशोधक, अभ्यासकांच्या लवकरच हे लक्षात आले की, हे लोक मैदानी प्रदेशातील लोकांसारख्या स्वभावाचे नाहीत. त्यांच्या धार्मिक आणि आध्यात्मिक संकल्पना, सामाजिक व्यवस्था वेगळ्या प्रकारची आहे. या जमाती साध्या आहेत, पण त्यांना इतर भारतीयांप्रमाणे सरळ करणे शक्य नाही. म्हणून ब्रिटिशांनी आसाम ही वेगळी टेरिटरी असतानाही त्यात मध्य पहाडावरील जमातीनिहाय जिल्हे केले. तिथे वेगळी प्रशासकीय व्यवस्था सुरू केली. त्यांच्या सामाजिक व्यवस्थेचा गाभा तसाच ठेवला. म्यानमारमधील नागांच्या बाबतीत मिशनऱ्यांनी जो प्रयोग केला, तो नागालँड वा इतरत्र करण्याचाही प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. त्या प्रदेशातील जमातींना धर्मभेद,जातीयता याबद्दल किंवा अन्नातील भेदाभेद, पवित्र-अपवित्रता याबद्दल कसलीही जाणीव नव्हती. ब्रिटिशांनी स्थानिकांच्या कलाने राज्यकारभार केला असला, तरी ब्रिटिश भारतातून जाईपर्यंत बराच भूभाग त्यांच्या अंमलाखाली आलेला नव्हता.

ब्रिटिश सरकारच्या आणि मिशनऱ्यांच्या संपर्कात आल्याने इकडच्या या जमातींच्या बाह्य प्रवृत्तीत आमूलाग्र परिवर्तन घडले. त्यांची युरोपियन भाषा, संस्कृती (संस्कृत नव्हे!) यांची ओळख झाली. शे-दीडशे वर्षांत शिक्षणामुळे माणसे किती बदलू शकतात, याची प्रचिती घ्यायची असेल, तर ईशान्येकडील सध्याच्या जमातींचा अभ्यास करायला हवा. इतके बदल होऊनही इकडच्या जमातींनी आपले जमातीय सत्व सोडले नाही. त्यांची जमाती-जमातींमध्ये बरीच भांडणे आहेत. छोट्या-छोट्या कारणांवरून आजही रक्तरंजित संघर्ष घडतात. पण, आपल्या भूभागावर कुणी अन्य अतिक्रमण करतेय असे वाटले, तर मतभेद विसरून त्या एकत्र येतात.

अप्पर आसाम आणि ईशान्येकडच्या राज्यांतील लोकांची मानसिकता आणि त्यांचा लढा हा ‘स्वतंत्र ओळख' टिकवण्यासाठीचा आहे. अठराव्या शतकाच्या प्रारंभी आसाममध्ये चहाच्या मळ्यांची सुरूवात झाली, तेव्हा स्थानिक आसामी माणसाला शेतमजुरी करायची असते, ही संकल्पना कळली नव्हती. मग चहाच्या मळ्यात राबण्यासाठी १९२३ मध्ये ५ लाख २७ हजार मजूर बिहारमधून आणले होते, तर चहाच्या मळ्यांचे क्षेत्र २ लाख ६३ हजार एकरांवर पोहोचले होते. तिथून पुढचा संघर्ष आजही या ना त्या पातळीवर सुरू आहे. मग मिझो आणि अन्य जमातीचे लोक तर शतकानुशतके झूम शेती करतात. शेती करण्यासाठी मैदान किंवा सपाट जागा नसेल तर माणूस काय करेल? मूळ आसामी लोकांना बंगाली आणि हिंदी भाषकांबद्दल तीव्र राग आहे, तो काही एकाएकी निर्माण झाला असेल का? असे काही संघर्ष झाले की, आसाम वरच्या सगळ्या राज्यांची जीवनावश्यक वस्तूंची कोंडी करु शकतो.

मणिपूरमध्ये इंफाळ खोऱ्यातील लोकांची अशीच कोंडी काही महिने मणिपूरमधील नागांनी केली होती. हिंदी वा बंगाली भाषकांशिवाय आंतरसंघर्षात नेपाळी नागरिक हा पण एक कळीचा मुद्दा राहिला आहे. अशा अनेक गोष्टींकडे माध्यमे दुर्लक्ष करताना दिसतात. उदा. तिथे जातीयता, धार्मिक कट्टरता, अस्पृश्यता, बालविवाह, लग्नासाठी पाल्यांवर केली जाणारी जबरदस्ती वा सामाजिक दबाव शाकाहार-मांसाहार यात श्रेष्ठ- कनिष्ठ वा भेदाभेद मंगळ-अमंगळ पाहिले जात नाही, नव्हे त्यांच्या मनाला अद्यापही या गोष्टी शिवलेल्या नाहीत. अशा अनेक बाबी आहेत, ज्या मैदानी प्रदेशापेक्षा किती तरी वेगळ्या आणि चांगल्या आहेत. गेल्या काही वर्षांत ईशान्येतील नागरिकांना आणि सत्तेतील लोकांना चांगली राजकीय जाणीव आलेली आहे, ती म्हणजे केंद्रीय सत्तेचे वारा जिकडे वाहत असेल त्याला पाठ द्यावी, म्हणजे फायदाच होतो. तात्पर्य : कोणत्याही संघर्षाची बीजं ही इतिहासात, भूतकाळात पेरलेली असतात. अशात आसाम-मिझोराम आणि आसाम -नागालँडचा सीमेवरून सुरू असलेला वाद काही एकाएकी उद्भवलेला नाही, हे उर्वरित देशाने समजून घेतले पाहिजे.

आसाम- मिझोरामचा ‘आयडेंटिटी क्रायसिस’

या ३१ जुलैला आसाम-मिझोराम या राज्यांच्या सीमेवर झालेल्या चकमकीत मिझोरामच्या पोलिसांकडून आसामच्या पाच पोलिसांसह सहा जणांचा बळी गेला, काही जण जायबंदी झाले. तेव्हा कुठे उर्वरित भारतातील माध्यमे आणि लोकांचे तिकडे लक्ष गेले. त्याच काळात असाच वाद तिकडे नागालँड-आसामच्या सीमेवरही सुरू होता. तिथे एका घटनेत गोळीबार झाला होता, पण जीवित हानी झाली नाही. मिझोरामच्या घटनेनंतर ३१ जुलै व एक ऑगस्टला आसाम आणि नागालँडच्या मुख्य सचिवांच्या पातळीवर बोलणी होऊन एक ऑगस्टला आपापले पोलिस दल मागे घेऊन परिस्थिती ‘जैसे थे' ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या-ज्या वेळी अशा घटना घडतात, तेव्हा तेवढ्यापुरत्या चर्चा होतात. पुढे देशातील लोक आणि माध्यमे त्या विसरून जातात. पुन्हा ‘ये रे माझ्या मागल्या'प्रमाणे काही काळाने कुरबुरी सुरू होतात. या भागात असे सशस्त्र झगडे यापूर्वी घडून गेले आहेत, हेही आपण विसरून जातो.

पाच जानेवारी १९७९ ला आसाम-नागालँड सीमेवर ५४ आसामी मारले गेले होते आणि सीमावर्ती भागातील तेवीस हजारांपेक्षा अधिक नागरिक घरदार सोडून पळून गेले होते. याच सीमेवर १९८५ च्या जून महिन्यात २८ आसाम पोलिसांसह ४१ लोक मारले गेले होते. तिकडे अरुणाचल प्रदेश आणि आसामच्या सीमावर्ती भागात असाच तणाव असतो. या लहान राज्यांमध्ये लोकसंख्या कमी असली, तरी आपण ज्याला ‘आयडेंटिटी क्रायसिस' वा “स्वतंत्र वांशिक ओळख’ हा कळीचा मुद्दा आहे, जो मैदानी प्रदेशातील लोकांना कधीच कळला नाही. या राज्यांतील मूळ लोकांना ‘मूळ असमिया' नागरिकांबद्दल ‘प्रॉब्लम' नाही, कारण ते शतकानुशतके एकमेकांना परिचित आहेत. सीमावर्ती भागातील हिंदी भाषक, बंगाली वा निश्चित माहीत नसलेले बांगलादेशी, नेपाळी आपल्या संस्कृतीवर अतिक्रमण करतील अशीही एक भीती आहे.

एक तर, ईशान्येकडील राज्यांमध्ये राजकारण्यांपेक्षा जे ‘जिवंत पण सुप्तावस्थेत वाटणारे' सक्रिय “पॉलिटिकल ग्रुप' प्रभाव टाकून असतात, त्यांना अशा वादांतून आणखी बळ मिळते. अशात आसामच्या नव्या सरकारने अन्य राज्यांमध्ये बैल-गाय यांसारखे प्राणी ‘निर्यात' करण्यावर बंदी घातली आहे. भविष्यात आसाम आणि या शेजारच्या राज्यांमध्ये नवीन ‘वाद' उद्भवण्यास हे एक नवे कोलित तयार झाले आहे. शिवाय, ड्रग ट्रॅफिकिंगची छुपी, पण उघड समस्या आहेच.

shahupatole@gmail.com

बातम्या आणखी आहेत...