आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:सिंग इज किंग...!

विनायक दळवीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

हरभजन म्हणजे धगधगती आग होता. अन्यायाविरुद्ध लढणारा, मैदानात शत्रुशी मुकाबला करताना नेटाने त्यांना भिडणारा... अखेरच्या क्षणापर्यंत हार न मानणारा. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सोनेरी पाने लिहिणारा. हरभजन ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या मोहजाळात फसला. आयपीएलमध्ये किंवा ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये त्याला आरंभी यश मिळाले. मात्र या छोटेखानी क्रिकेटच्या जाळ्यात तोच पुढे अडकत गेला. त्याचा जादूई “लूप” आणि चेंडूला उंची देण्याची, उसळी देण्याची कला, त्या कलेची त्याची धार लोप पावली. अश्विनचा उदय त्याला अस्वस्थ करणारा आणि आव्हानात्मक ठरला. पाठोपाठ रविंद्र जाडेजाच्या आगमनामुळे फिरकी गोलंदाजाची दुसरी जागाही सतत भरत राहीली. हरभजन मग मागे पडत गेला.

“टर्बनेटर” हरभजनसिंग निवृत्त झाला. या बातमीने सर्वप्रथम सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. अरे! हरभजनसिंग अजून निवृत्त झाला नव्हता? ही होती प्रत्येकाची प्रथम प्रतिक्रिया! २०१६ पासून तो भारतीय संघात कधीच नव्हता. भारतीय क्रिकेटच्या यशस्वी कालखंडाचा तो एक आघाडीचा सेनानी होता. कप्तानाला हवा हवासा वाटणारा गोलंदाज! घोड्याच्या ताकदीने गोलंदाजी करणारा, कठीण प्रसंगातही वाघाच्या इर्ष्येने लढणारा. भारताला एकहाती विजयी मिळवून देण्याची क्षमता असणारा गोलंदाज. ऑस्ट्रेलियाला मालिकेत चारी मुंड्या चीत करता येतं हा विश्वास भारतीयांना देणारा. २००१ची ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका त्याने एकट्याने गिळंकृत केली. फॉलोऑननंतर ऑस्ट्रेलियाला धूळ चारण्याची किमया करणारा हरभजन. ‘‘मंकी गेट’’ प्रकरण असो, दक्षिण आफ्रिकेतील कसोटीतील बंदी असो, “श्रीकांतच्या श्रीमुखात भडकाविल्याचे” प्रकरण असो… वादाच्या भोवऱ्यातून प्रत्येक वेळी हरभजन सहीसलामत बाहेर सुखरूप आला. त्याच हरभजनने भारतीय संघाला पराभवाच्या वावटळीमधून अनेकदा बाहेर काढले. फक्त गोलंदाजीच्या नाही तर फलंदाजीच्या बळावरही. संघाला हवाहवासा वाटणारा शिलेदार, प्रत्येक कप्तानाच्या आक्रमणाचा आघाडीचा सेनानी आणि डावपेच लढविण्यात वाक्बगार. संघाला तो नेहमीच आधार वाटायचा आणि प्रतिस्पर्ध्याला तोलामोलाचा प्रतिस्पर्धी. हरभजन म्हणजे धगधगती आग होता. अन्यायाविरुद्ध लढणारा, मैदानात शत्रुशी मुकाबला करताना नेटाने त्यांना भिडणारा... अखेरच्या क्षणापर्यंत हार न मानणारा. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सोनेरी पाने लिहिणारा. हरभजन ट्वेन्टी-२० क्रिकेटच्या मोहजाळात फसला. आयपीएलमध्ये किंवा ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये त्याला आरंभी यश मिळाले. मात्र या छोटेखानी क्रिकेटच्या जाळ्यात तोच पुढे अडकत गेला. त्याचा जादूई “लूप” आणि चेंडूला उंची देण्याची, उसळी देण्याची कला, त्या कलेची त्याची धार लोप पावली. अश्विनचा उदय त्याला अस्वस्थ करणारा आणि आव्हानात्मक ठरला. पाठोपाठ रविंद्र जाडेजाच्या आगमनामुळे फिरकी गोलंदाजाची दुसरी जागाही सतत भरत राहीली. हरभजन मग मागे पडत गेला. हरभजन मागे पडत गेला त्याचे आणखी एक कारण म्हणजे, कप्तानाचा त्याच्यावरचा वरदहस्त धोनीच्या नेतृत्त्वानंतर कमी कमी होत गेला. हरभजन सर्व सिनियर खेळाडूंचा अतिशय आदर करणारा होता. त्यांच्याशी अदबीने आणि विनम्रपणे वागायचा. पण त्याची त्याला ज्युनियर असणाऱ्या खेळाडूंची वागण्याची तऱ्हा वेगळी होती. तो त्यांना आपल्यापेक्षा कमी लेखायचा. संघर्षाच्या क्षणी ती तफावत अधिक स्पष्ट व्हायची. त्यामुळे त्याच्यापेक्षा ज्युनियर असलेल्या खेळाडूंकडे भारताचे नेतृत्व आल्यानंतर हरभजन पूर्वीचा राहीला नाही. ज्येष्ठतेचा जसा त्याला “इगो” होता तसेच गत कामगिरीचाही गर्व होता. मात्र त्यामुळे तो उतरत्या काळातही त्याच यशाच्या धुंदीत वावरला. त्यामुळे त्याचे अधिक नुकसान झाले. शैक्षणिक पात्रता किंवा समज ही गोष्ट त्याच्या कारकिर्दीवर परिणामकारक ठरली. म्हणजे इंजिनियरिंग पार्श्वभूमी असलेल्या कुंबळे, अश्विन यांची तत्कालीन कप्तानासोबतची समज आणि हरभजनला समजून घेण्याची आकलनशक्ती यातही फरक होता. गांगुलीने त्याला जेवढे समजून घेतले किंवा तेंडुलकर आणि त्याच्यात जेवढा समन्वय होता तेवढी एकवाक्यता किंवा एकसूर धोनीसोबत नव्हता. त्याला ज्या सहजतेने गांगुली, तेंडुलकर यांनी समजून उमजून वापरले ती परिपक्वता धोनीला दाखविता आली नाही. त्यामुळे हरभजनच्या फिरकीने भारताला व गांगुली-तेंडुलकर यांना जेवढे यश मिळवून दिले तेवढे यश धोनीच्या पदरात पडले नाही. याची दुसरी बाजू अशी की, धोनी त्याला ज्युनियर होता. त्यामुळे धोनीशी वागताना हरभजनमध्ये सहजता होतीच, परंतु आपण धोनीपेक्षा श्रेष्ठ व ज्येष्ठ असल्याची भावना होती. धोनीशी बोलताना किंवा वागताना ती गोष्ट जाणवायची. धोनी वरवर जरी हरभजनशी चांगला वागत असला तरीही त्याने सतत ती गोष्ट मनात ठेवली. कप्तानाचा जो विश्वास गोलंदाजावर असायला लागतो, तो धोनीने हरभजनच्या बाबतीत फारसा दाखविला नाही. गोलंदाजाला, हवे तसे क्षेत्ररक्षण लावणे, हवे तेव्हा गोलंदाजी देणे, हवे तेवढे मोठे ‘स्पेल’ गोलंदाजी देणे; याबाबतीत हरभजन तेथे कमनशिबी ठरला. कप्तानाचा विश्वास जसा त्याच्याबाबतीत कमी पडला तसा. नंतरच्या काळातील त्याने गोलंदाजीत फारसे बदल किंवा विविधता आणली नाही; ही गोष्ट त्याची कारकिर्द लांबवू शकली नाही. खरंतर हरभजन ऑफ स्पिनर म्हणून आदर्श होता. त्याच्या गोलंदाजीचे शक्तीस्थान होते चेंडूला अधिक उसळी देण्याची त्याची क्षमता. दोन्ही हात हवेत उंचावून तो “हाय आर्म अॅक्शन” ते गोलंदाजी करायचा. कोणत्याही ऑफ स्पिनरला हेवा वाटावा अशी अचूकता त्याच्या गोलंदाजीत होती. त्याच्या गोलंदाजीचा ९० टक्के टप्पा ऑफ स्टम्पवरच असायचा. तेथेच त्याने आपल्या कौशल्याची विविधता निर्माण केली. त्याच स्पॉटवरून त्याने आपल्या गोलंदाजीची विविधता आजमावली. त्यात तो यशस्वीही ठरला. डिव्हिलिअर्स, पॉन्टींग हे त्या काळातील प्रतिथयश फलंदाज त्याने चुटकीसरशी गुंडाळले. ‘पॉन्टींग’ला त्याने बकराच केला होता. त्याच्या या ताकदीवर निर्बंध आणण्यासाठी गोऱ्यांनी मग त्याच्यावर “मंकी गेट”सारखे आव्हान उभे केले. हरभजनवर वांशिक द्वेष पसरविण्याचे आरोपही झाले. गोलंदाजीवरील त्याचे लक्ष विचलित करण्यात मीडिया व ऑस्ट्रेलियन क्रिकेटचे हितचिंतक यशस्वीही झाले. मात्र “मंकी गेट” प्रकरणात भारतीय क्रिकेटपटू, भारतीय क्रिकेट बोर्ड हरभजनच्या पाठीशी उभे राहीले. त्याच्यावरील आरोप सिद्ध होऊ शकले नाहीत. मात्र त्या युद्धात त्याच्या गोलंदाजीची शैली हळूहळू निष्प्रभ ठरत गेली. मानसिक दडपणाखाली त्याच्या ऑफस्पिन गोलंदाजीची जादू काहीशी लुप्त झाल्यासारखे वाटले. त्यानंतरचा हरभजन वेगळा होता. तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले अस्तित्व कायम टिकविण्यासाठी धडपडत राहीला. २०१५ साली श्रीलंकेविरुद्धची गॉल स्टेडियमवरील कसोटी त्याची अखेरची कसोटी ठरली. तरीही २०२१ च्या अखेरपर्यंत त्याने का वाट पाहिली हे एक कोडे आहे. कदाचित दिल्लीच्या विराट कोहलीकडे कप्तानपद आल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा संधी मिळेल याच्या तो प्रतिक्षेत असावा. कोहलीची अश्विनवरील खप्पा मर्जी आपल्याला पुन्हा कसोटी क्रिकेटमध्ये प्रवेश मिळवून देईल, या भोळ्याबाबड्या आशेवर तो असावा. ऑफ स्टम्पवरच्या एक एका स्पॉटवरुन आपल्या फिरकीचे जाळे उभे करणाऱ्या हरभजनला गोलंदाजीत काळानुरूप बदल करता आले नाहीत. त्यामुळे तो मागे पडला. आयपीएल किंवा मर्यादित षटकांच्या क्रिकेटने त्याच्यातील दर्जेदार कसोटी क्रिकेटपटू, दर्जेदार ऑफस्पिनर मारला. मैदानावरील गोष्टींपेक्षा, मैदानाबाहेरील वागणूकीने त्याने त्याच्यातील दर्जेदार क्रिकेटपटूवर अन्याय केला. त्याच्या अपयशाला ती गोष्ट अधिक जबाबदार ठरली. प्रत्येक वेळी तो वादाच्या सभोवताली राहीला, आणि स्वत:च स्वत:च्या अपयशास कारणीभूत ठरला. कौटुंबिक पातळीवरही तो लढवैय्या ठरला. एका गरीब कुटुंबातून तो पुढे आला. संपूर्ण कुटूंबाची जबाबदारी त्याने स्वीकारली. आपल्या पाचही बहिणींची लग्ने त्याने केली आणि वडिलकीचा भार उचलला. कुटुंबाचा तो लहान असूनही कुटुंबप्रमुख बनला. क्रिकेटच्या यशामुळे त्याला आपल्या कुटुंबाला स्थैर्य देता आले. जी गोष्ट त्याने भारतीय क्रिकेट संघाला दिली. तेच कार्य कुटुंबासाठी केले. अखेर स्वत:ही संसारात पडला. तो मॅचविनर होता. तो प्रतिस्पर्ध्यांचा कर्दनकाळ होता. तो क्रिकेट मैदानावरचा “टर्मिनेटर” होता. क्रिकेटमध्ये मक्तेदारी असलेल्या ऑस्ट्रेलियाचा नक्षा त्याने उतरविला. एकहाती कसोटीच नव्हे तर मालिकाच जिंकून दिली. तो टर्बनेटर… टर्मिनेटर… ठरला. ------ vinayakdalvi41@gmail.com

बातम्या आणखी आहेत...