आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:वो "दो' थे सरकार...!

विनायक दळवी16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठरला’’

रवी शास्त्रीची भारतीय क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदाची सद्दी एकदाची संपली. विराट कोहली - रवी शास्त्री यांची मिलिभगत असलेला एक कठीण कालखंड संपला. कठपुतळ्यांच्या निवड समितीचे अस्तित्वच नव्हते. एकेकाळी विभागीय वर्चस्वाच्या संघ निवडीच्या अपेक्षांच्या आरोपांची जागा आता आयपीएल फ्रॅंचायजींनी घेतली आहे. ज्यांचे वर्चस्व त्यांच्या मालकांच्या ताकतीवर अवलंबून आहे. ती ताकद भारतीय संघनिवडीवर परावर्तीत होताना स्पष्ट दिसत आहे. विराट कोहलीसारख्या कप्तानाकडे निर्णय प्रक्रियेची ताकद दिल्यानंतर काय होऊ शकते याचे चित्र गेल्या चार-पाच वर्षात अधिकाधिक स्पष्ट होत गेले. क्रिकेटशी फारसा संबंध नसलेले पदाधिकारी आणि आपली खुर्ची शाबूत रहावी म्हणून मूग गिळून बसणारा प्रशिक्षक लाभल्यानंतर विराट अधिकाधिक उन्मत होत गेला. काही प्रमाणात तो उर्मटपणा सहन केला गेला. विरोध करणारे संघाबाहेर फेकले गेले. अन्य खेळाडूंची गळचेपी झाली. परिणामताः भारताने भारतातील क्रिकेटमध्ये शंभर टक्के यश मिळवले. पण कोहलीचा हाच संघ परदेशात “पानीकम’’ ठरला.

गेल्या पाच वर्षात कोहली-शास्त्री जोडगोळीच्या कार्यकाळात भारताला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आली नाही. अगदी भारतातील स्पर्धांमध्येही विजेतेपदाने भारतीय संघाला सातत्याने हुलकावणी दिली. यशाचे श्रेय घेण्यास पुढे सरसावणारी ही जोडगोळी अपयशाच्या वेळी मात्र तोंड लपवून पाठी पाठी राहिली. अशा वेळी अपयशाची जबाबदारी कप्तान स्वतःवर जाहीरपणे घेतो. कोहलीने ती स्वीकारण्याचा देखावा करताना, अपयशाचे खापर सतत गोलंदाज किंवा फलंदाजांवर फोडले. कसोटी क्रिकेटमध्ये नेतृत्वगुणात उजवा ठरलेला अजिंक्य राहणे कोहलीचा सतत शत्रू क्रमांक एक राहीला. राहणेचे खच्चीकरण त्याने बेमालूमपणे केले. एकदिवसीय क्रिकेटमधून त्याने राहणेला बाहेर केले; त्यानंतर ट्वेंटी-२० क्रिकेटमधून बाहेरचा रस्ता दाखवला. मग त्याची नजर राहणेच्या कसोटी कारकीर्दीवर पडली. तेथेही तो धावांचे सातत्य राखणार नाही यासाठी मानसिक खच्चीकरणाची एकही संधी सोडली नाही. ड्रेसिंग रूममध्ये तर काही वेळा तो सर्वांसमोर त्याचा अपमान करायलाही मागे पुढे पहायचा नाही, असं म्हणतात.

कोहलीपेक्षा नेतृत्वगुणात उजवा ठरूनही रहाणे जसा मागे पडत गेला तसे चेतश्वर पुजारा, आर. अश्विन हे आणखी दोन संभाव्य कप्तानपदाचे दावेदार कोहली-शास्त्री जोडगोळीने हेरले, आणि त्यांना लक्ष्य केले. खरं तर चेतेश्वर पुजारा याने भारताला ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आपल्या खंबीर फलंदाजीने सावरले होते. खंबीर यासाठी, कारण ऑस्ट्रेलियाचा वेगवान मारा त्याने शरीरावर घेतला होता. ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना खच्ची करण्याचे काम त्याने केले होते. त्यामुळेच चेंडूची लकाकी गेल्यानंतर भारताचे मधल्या व तळाच्या फळीतील फलंदाज खेळपट्‌टीवर उभे राहीले होते. चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर स्थिरावत असताना त्याच्याही मानसिक खच्चीकरणाला सुरुवात झाली. चेतेश्वर पुजारानेही शेवटी असह्य झाल्यानंतर आवाज उठविला होता. रहाणे-पुजारांनी आपली कैफियत थेट बीसीसीआयकडे मांडली. पुजाराने सांगितले की, ऑस्ट्रेलियात आम्ही संघाला वाचविले. पण त्याची दखलही त्यानंतरच्या दौऱ्यात घेतली गेली नाही. कसोटी चॅम्पीयनशीप स्पर्धेत अपयशी ठरल्याचा ठपका फक्त आमच्यावरच कसा? आम्हाला तुम्ही कसे बोलू शकता?

खरं तर पुजारा आणि रहाणे यांच्यापेक्षा कोहलीच्या गेल्या दोन वर्षांतील कसोटी धावांची सरासरी कमी भरते. मात्र रहाणे, पुजारा यांना फक्त धावा करण्याची संधी कसोटी क्रिकेटमध्येच मिळते. कोहलीला आपली बॅट तळपविण्याची संधी एक दिवसीय आणि टी-२० क्रिकेटमध्येही उपलब्ध असते. तेथेच कोहली संधी मिळताच हात धुवून घेतो आणि क्रिकेट रसिकही त्याचे कसोटी क्रिकेटमधील फलंदाज म्हणून अपयश विसरून जातात. पुन्हा पुजारा-रहाणे यांना नावे ठेवायला कोहली – शास्त्री मोकळे.

फिरकी गोलंदाजीत जागतिक क्रमवारीत अग्रेसर असलेल्या भारताच्या प्रमुख फिरकी गोलंदाज आर. अश्विनला वगळण्याचे षड्यंत्र बऱ्याच आधीपासून सुरू होते. अश्विन तोंडाचा फटकळ आहे. अनेकदा त्याची संघनिवडीच्या बाबतीत कुरबूर सुरू असते. संपूर्ण गत इंग्लंड दौऱ्यात या जोडगोळीने अश्विनला डावलले. फिरकीला अनुकूल ठरणाऱ्या खेळपट्‌टीवरही सातत्याने वगळले. संघांच्या एका सपोर्ट स्टाफने तर म्हणे, विराटला स्पष्टच सांगितले होते, की तुझी वैयक्तिक खुन्नस भारतीय संघासाठी कधीतरी महागात पडणार आहे. इंग्लंडमध्ये दोन कसोटी जिंकल्यामुळे कोहलीची ती कुटनीती कधी चर्चेला आली नाही. मात्र टी-२० विश्वचषकात दोन प्रमुख सामन्यांमध्ये जेव्हा अश्विनला वगळून आपण पायावर धोंडा पाडून घेतला; त्यानंतर अश्विनला वगळण्याबाबत चर्चा झाली.

स्कॉटलंड, नामिबिया, अफगाणिस्तान हे तीन कच्चे लिंबू असलेल्या दुबळ्या गटात आपल्याला पाकिस्तान व न्यूझीलंड यांच्यापैकी फक्त एकाच संघाला हरवायचे होते. उपांत्य फेरीचा प्रवेश त्यामुळे निश्चित होत. जोडगोळीने तेथेही माती खाल्ली. संघाची निवड गरजेनुसार, परिस्थितीनुसार न करता आपल्या मर्जीतल्यांची केली. हार्दिक पंड्या फिट नव्हताच. तरीही त्याला खेळविण्याचा हट्‌ट भारताला महागात पडला. अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात आल्यानंतर त्याने गोलंदाजी केली नव्हती. ओरड झाली तेव्हा न्यूझीलंडविरुद्ध २ षटकात १७ धावा देऊन हार्दिक पंड्याचे नाव धावफलकावर गोलंदाजांच्या पंक्तीत आले. त्याआधी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या महाशयांनी एकही षटक टाकले नाही. सामना जिंकला असता, तर जोडगोळीची ही चूक लपविली गेली असती. हार्दिक पंड्या गोलंदाजी करण्याइतपत फिट नसतानाही, त्याला संघात स्थान कसे मिळाले?

खरंतर सर्वप्रथम संघाचे फिझिओ नितीन पटेल यांना या गोष्टीचा जाब विचारला गेला पाहिजे. त्यानंतर विराट-शास्त्री जोडीवर या चुकाच्या निर्गमाची जबाबदारी येते. विराटने आपली एवढे दहशत निर्माण केली आहे की ना बीसीसीआय किंवा अन्य कुणीही याबाबत प्रश्न विचारू शकत. आणखी एक अनाकलनीय निवड म्हणजे वरूण चक्रवर्तीची पाकिस्तानविरुद्ध सामन्यातील निवड.

हा वरूण चक्रवर्ती अचानक कुठून आला. दुबळ्या असलेल्या श्रीलंकेविरुद्ध मालिकेत त्याने चांगली कामगिरी केली. पण भारताच्या मुख्य संघात घेताना त्याला ‘‘मिस्ट्री बॉलर’’चे लेबल लावण्यात आले. त्याने विश्वचषक स्पर्धेत असा एकही “मिस्ट्री बॉल” टाकला नाही. मात्र त्याला संघात स्थान देताना ज्येष्ठ आणि अनुभवी गोलंदाजांना डावलले गेले. अशा अनेक चमत्कारीक आणि अनाकलनीय गोष्टी जोडगोळीने निवड समितीत करायला लावल्या. याआधीची निवड समिती म्हणजे कठपुतळ्यांची खोगिर भरती होती. कुणामध्येही कोहलीच्या विरुद्ध जाण्याचे धाडस नव्हते. कारण समिती सदस्यांचे कागदावरचेच कर्तृत्व कवडीमोल होते. रणजी खेळाडू आंतरराष्ट्रीय संघ निवडत होते. समितीचे अध्यक्ष जेमतेम ७ कसोटी खेळलेले. त्यांच्या कर्तृत्वाची छबी कागदोपत्री नव्हे तर प्रत्यक्षात उठून दिसत होती. रुबाबदार, सुटाबुटातले निवड समिती अध्यक्ष जेव्हा कप्तानच्या पत्नीला ‘कॉफी’ देताना दिसत होते तेव्हा भारतीय क्रिकेट कप्तानाच्या किती आज्ञेत आहे याची प्रचिती येत होती. असे चेअरमन गेले आणि त्यांच्याजागी चेतन शर्मा आले. तुलनेत खूप अनुभवी आणि कोहलीच्याच प्रांतातले. ज्येष्ठ आणि जरब असणारे.

या चेतन शर्माना संभाव्य संघातील खेळाडूंबाबतची माहिती दिशाभूल करून देणारी मिळाली. चेतन शर्मा यांचे निकटवर्तीय तरी तसे म्हणतात. विराट कोहलीने याबाबतीत प्रशिक्षक रवी शास्त्री यांचेही कधी ऐकले नाही. उपकप्तान अजिंक्य रहाणेला कसोटी संघ व्यवस्थापन निवड समितीच्या बैठकीतूनही हद्दपार करण्यात आले होते. प्रत्येक वेळी विराटने स्वत:ला हवा तसाच संघ निवडला. अंतिम ११ नव्हे तर दौऱ्यावर किंवा मालिकेसाठीचा संघ देखील असाच निवडला जायचा.

खरंतर टी-२० विश्वचषक स्पर्धेआधी तेथेच आयपीएल स्पर्धा झाली होती. याआधी निवड समितीने आयपीएल कामगिरीच्या आधारे कसोटी मालिकेसाठी संघ निवडण्याचा चक्रमपणा केला होता. यावेळी निवड समिती त्यापुढे गेली. आयपीएल स्पर्धा ज्या मैदानावर झाली, तेथे सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्यांना घरी पाठविण्यात आले. त्यामध्ये आयपीएलचा यंदाचा सर्वोत्तम सलामीचा फलंदाज होता शिखर धवन. आयपीएलचा सर्वाधिक धावा फटकाविणारा ऋतुराज गायकवाड होता. आयपीएलचा सर्वाधिक बळी घेणारा हर्षल पटेल होता. आयपीएलमध्ये सर्वाधिक किफायतशीर गोलंदाजी करणारा सिराज यालाही घरी पाठविण्यात आले. आयपीएलचा सर्वोत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू वेंकटेश अय्यर घरीच होता. आयपीएलचा सर्वोत्कृष्ट फिरकी गोलंदाज चहलही संघात नव्हता. आणि अश्विन राखीव खेळाडूंच्या पंक्तीत.

असं का झालं? निवड समितीला चुकीची माहिती संघव्यवस्थापनाकडून पुरवली गेली. संघव्यवस्थापन म्हणजे काय? जेथे संघाच्या व्यवस्थापकाला थारा नाही. उपकप्तानाला विचारले जात नाही. प्रशिक्षक नंदीबैलाचे काम करतो आणि एकटा कप्तान सारं काही ठरवितो.

दुसरी वाईट बाजू आयपीएल फ्रॅन्चायझी किंवा संघमालकांची वाढलेली लालसा. याआधी खेळाडू आपल्या राज्याचा किंवा विभागाचा असावा म्हणून झुकते माप दिले जायचे. ते चित्र आत्ता पूर्णपणे बदलले आहे. आपल्या, राज्य संघाची कुणालाही काळजी वाटत नाही. फ्रॅन्चायझीचा संघ म्हणजे त्या शहराची, राज्याची प्रतिष्ठा असल्याच्या जाहिरातींचा सातत्याने आपल्यावर भडिमार होतोय. अशा संघमालकांची आपल्या फ्रॅन्चायझींचे खेळाडू अधिकाधिक संख्येत भारतीय संघात असावेत स्वप्न वाढत गेल्यास आश्चर्य वाटू नये. याआधी खेळाडूंचे जाहिरात एजंट निवड समिती आणि बीसीसीआय पदाधिकाऱ्यांवर प्रभाव आणि दबाव आणण्याचा प्रयत्न करायचे. फ्रॅन्चायझींचे संघमालक त्यापुढेही गेले आहेत. फ्रॅन्चायझींशी संबंधितांनी संघ निवड प्रक्रीयेत असणाऱ्यांवर दडपण आणल्यास आश्चर्य ते काय? म्हणूनच हार्दिक पंड्यासारखा अनफिट आणि अपात्र, फॉर्ममध्ये नसलेला खेळाडू खेळविण्याचे धाडस केले जाऊ शकते. संघात आपल्या खेळाडूंची वर्णी लावण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाल्यास भारतीय संघाचे भवितव्य मात्र बिघडणार आहे.

यापूर्वीची विभागिय दुश्मनी आत्ता फ्रॅन्चायझींमधील वादामध्ये बदलली गेली आहे. हे वाद चव्हाट्यावर येत नाहीत एवढेच.

---------------

vinayakdalvi41@gmail.com

बातम्या आणखी आहेत...