आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Rasik Special | Online Skills Training? Yes, It Is Possible!| Marathi Article | Divya Marathi | Journalist Who Will Talk To People

रसिक स्पेशल:ऑनलाईन पद्धतीने कौशल्य प्रशिक्षण? होय, हे शक्य आहे!

आशय गुणेएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

'प्रथम इन्स्टिट्यूट' ही 'प्रथम एड्युकेशन फाऊंडेशन' या संस्थेची कौशल्य विकास कार्यक्रम सांभाळणारी टीम. २००५ पासून "प्रथम'ने कौशल्य विकासाच्या कोर्स मार्फत देशातील १, २५,००० व महाराष्ट्रातील जवळजवळ ३५,००० युवक युवतींना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून दिला आहे. तरुण पिढीला मेहनत करायची नाही किंवा गावाकडील युवा नवे काही शिकण्यात रुची घेत नाही हा गैरसमज आहे. खरं तर 'प्रत्यक्ष' न भेटता ही मुलं स्वतःहून प्रशिक्षित झाली आहेत. हे यश त्यांचं आहे.

कोविड महामारीमुळे मोठ्या प्रमाणात स्थलांतर, छोटे व माध्यम आकाराचे उद्योग बंद पडणे, अनेकांचे रोजगार जाणे व अनेकांच्या उत्पन्नात घट होणे हे परिणाम समोर आले. या वर्षी फेब्रुवारी पासून विषाणूचा प्रभाव आणखी तीव्रतेने जाणवू लागल्याने पुन्हा निर्बंध आणणे क्रमप्राप्त झाले. आपला समाज पुन्हा एकदा नव्याने ढवळून निघाला. याचा परिपाक म्हणजे 'ऑनलाईन' ह्या शब्दाची व्याप्ती वाढली. बहुतेक सर्व कंपन्या, संस्था यांची कार्यपद्धती बदलली. 'प्रथम' देखील याला अपवाद नाही. 'प्रथम इन्स्टिट्यूट' ही 'प्रथम एड्युकेशन फाऊंडेशन' या संस्थेची कौशल्य विकास कार्यक्रम सांभाळणारी टीम. २००५ पासून आम्ही कौशल्य विकासाच्या कोर्स मार्फत देशातील १, २५,००० व महाराष्ट्रातील जवळजवळ ३५,००० युवक युवतींना प्रशिक्षण देऊन त्यांना रोजगार मिळवून दिला आहे. फेब्रुवारी २०२० पर्यंत ही मुलं विविध भागातून राज्यभर पसरलेल्या आमच्या १५ प्रशिक्षण केंद्रांवर दाखल होत होती. कोविड महामारी सुरु झाल्यापासून आम्ही त्यांना ऑनलाईन प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.

मात्र केवळ ऑनलाईन पद्धतीने पूर्णपणे कौशल्य प्रशिक्षण दिले जाऊ शकते असा आमचा दावा नाही. प्रत्यक्ष पद्धतीला एक पूरक पद्धती म्हणून ऑनलाईन मार्गाचा वापर करू शकतो. योग्य संसाधनं, सोपी भाषा व तंत्रज्ञानाचे मूलभूत ज्ञान असल्यास देशातील युवा ऑनलाईन पद्धतीने नवीन कौशल्य शिकू शकतात हा आमचा मागच्या वर्षापासूनचा अनुभव आहे. आमचा कौशल्य प्रशिक्षणाचा अभ्यासक्रम Pratham Open School Marathi या आमच्या YouTube Channel वर उपलब्ध आहे. आमच्या संपर्कात असलेल्या गावातील समुदाय सदस्यांनी ही सामग्री युवांपर्यंत पोचवली. शिवाय आम्ही व्हाट्सऍप व टेलिफोन कॉलची मदत घेतली. त्याचबरोबर संबंधित समुदायांबरोबर काम करणाऱ्या संस्था देखील या उपक्रमात आमच्याशी जोडल्या गेल्या.

आमच्या आठ विषयांपैकी (Automotive, Electrical, Beauty, Plumbing, Hospitality, Welding, Construction आणि Healthcare) आपल्याला आवडेल तो कोर्स संबंधित विद्यार्थी निवडतात. या कोर्सच्या जोडीला स्वतःचा व्यवसाय सुरु करायचा कोर्स देखील उपलब्ध आहे. स्मार्टफोन वापरण्यात अडचण येणार असेल तर आमचे शिक्षक त्यात मदत करतात व व्हिडियो कॉल वापरण्याचे मार्गदर्शन देतात. कोर्सचे पहिले दोन आठवडे विद्यार्थी संबंधित क्षेत्राचे व्हिडियो बघतात व वेबिनार ऐकतात. संबंधित क्षेत्राची जाणीव होणे व त्यातील संधीची माहिती मिळणे हा त्यामागचा उद्देश आहे. दोन आठवड्यांनंतर ऑनलाईन पद्धतीची सवय झाल्यानंतर घरच्या घरी काही विषयांचे प्रात्यक्षिक करायचे प्रोत्साहन दिले जाते. उदा: facial, eyebrows कसे करावे ('ब्युटी' कोर्स), हातात 'ट्रे' कसा पकडावा ('हॉस्पिटॅलिटी') किंवा घरातील किंवा गावातील एखाद्या दुचाकी वाहनाचा अभ्यास (ऑटोमोटिव्ह कोर्स) इत्यादी.

या क्रिया करतानाचे फोटो किंवा व्हिडियो काढावे लागत असल्यामुळे परिवारातील इतर सदस्य देखील सामील होतात. हे फोटो/व्हिडियो विद्यार्थी त्यांच्या 'बॅच'च्या व्हाट्सऍप ग्रुपवर किंवा Workplace या ऍपवर सामायिक करतात व शिक्षक त्यात सुधारणा सुचवतात. गृहपाठ, चाचणी हे सारं तिथेच घडतं. मात्र प्रात्यक्षिक प्रशिक्षण (practical training) घेणं याचे महत्व अबाधित आहे. हे प्रशिक्षण या तीनपैकी कोणत्याही प्रकारे होऊ शकते. हे प्रकार म्हणजे - १) गावापासून जवळ असल्यास प्रथमच्या केंद्रावर २) गावातील स्थानिक कारागिरा बरोबर (प्लम्बर, इलेक्ट्रिशियन, बांधकाम कंत्राटदार, मेकॅनिक, ब्युटी क्षेत्राशी संबंधित). किंवा ३) उद्योगसमूहांकडे, जसे की कारखाना, उद्योग, हॉस्पिटल. हे सगळं घडत असताना कोविड काळातील नियम पाळले जातात. या प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा कालावधी जवळजवळ दोन महिने असतो. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरीच्या संधी कुठे आहेत याची माहिती विद्यार्थ्यांना दिली जाते.

या नव्या 'मॉडेल'च्या साहाय्याने आम्ही गेल्या वर्षी (२०२० - २०२१) महाराष्ट्रातील जवळजवळ १०,००० युवांशी संपर्क केला व त्यातील ३,१४८ युवांना नोकरीची संधी देऊ शकलो तर १७८ विद्यार्थ्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरु केला. (राष्ट्रीय पातळीवर नोकरीची संधी मिळणाऱ्या युवांची एकूण आकडेवारी ११ हजार आहे). या विद्यार्थ्यांमध्ये यवतमाळ जिल्ह्यातील विहीरगाव या गावातून ऑटोमोटिव्हचा कोर्स करून पुण्याला नोकरी मिळवणाऱ्या युवतीचा समावेश आहे व वेल्डिंगचा कोर्स करून उस्मानाबाद जिल्ह्यातील अहमदाबादला प्लेसमेंट झाल्याचेही उदाहरण आहे. सांगलीतील कवठे महांकाळ या तालुक्यातील काही मुलींनी 'हेल्थकेअर' कोर्स केला व संबंधित हॉस्पिटलच्या पुढील प्रशिक्षणामुळे त्या तिथल्या रुग्णांचा सांभाळ करीत आहेत. त्यांना ऑनलाईन प्रशिक्षणामुळे मूलभूत ज्ञान मिळू शकलं ही बाब हॉस्पिटल ने मान्य केली व त्यांच्या आयुष्याला नवी दिशा मिळाली.

या प्रशिक्षणामुळे स्वतःच्या गावी देखील अनेक संधी निर्माण होताना दिसत आहेत. लॉकडाऊन व वारंवार होणाऱ्या संचारबंदीमुळे अनेकांना नोकरीवरून काढलं जाण्याची उदाहरणं समोर आहेत. त्यामुळे आरोग्य-सुरक्षा, घटते उत्पन्न व शहरात न परवडणाऱ्या जीवनपद्धतीमुळे अनेक मुलं गावाकडे परतण्याची उदाहरणं आहेत. अशा पार्श्वभूमीवर हे कोर्स गावी काम मिळवण्यासाठी पूरक ठरू शकतात. गावातील वाढते बांधकाम पाहता तिथे योग्य कौशल्य असलेल्या तरुणांची गरज आहे. तसेच बांधकामाची प्रक्रिया पुढे सरकू लागते तेव्हा वेल्डर, इलेक्ट्रिशियन, गवंडीकाम व प्लंबर यांची मागणी वाढते. गावातील लग्न किंवा अन्य कार्यक्रमांच्या वेळेस ब्युटी व हॉस्पिटॅलिटी क्षेत्राचे प्रशिक्षण घेतलेल्यांची मागणी आहे. तसंच एरवी 'ब्युटी पार्लर' सुरु करणे किंवा घरोघरी जाऊन ही सेवा प्रदान करणे हा देखील पर्याय आहे. विशेष म्हणजे बांधकाम क्षेत्राचा कोर्स करणाऱ्या काही मुलांनी प्लम्बिंग व इलेक्ट्रिशियनचे कोर्स करून स्वतःचा व्यवसाय सुरु केल्याचीही उदाहरणं समोर आली. शिवाय या कोर्ससाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये मुलींची संख्या लक्षणीय आहे. आणि ही संख्या महिलांशी संबंधित असं मानल्या गेलेल्या विषयांमध्येच नाही तर ऑटोमोटिव्ह, प्लम्बिंग, इलेक्ट्रिशियन या कोर्ससाठी देखील आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील कदमवाडी गावातील एका मुलीने स्वतःचे गॅरेज सुरु करून मेकॅनिक नसण्याचा प्रश्न सोडविला आहे. शिवाय लॉकडाऊनमुळे अनेक परिवारांच्या उत्पन्नात घट झाली आहे. अशा वेळेस मुलींची लवकर लग्न करून देण्याची शक्यता बळावली आहे. या पार्श्वभूमीवर मुलींनी कोर्सद्वारे आर्थिक स्वातंत्र्य अनुभवणे हे महत्वाचे आहे.

या व्यतिरिक्त देशभरातील जवळजवळ २२,००० गावात आम्ही इतर काही कोर्स सुरु केले आहेत. त्यात गावातील १४ ते १८ वर्षांच्या मुलांसाठी कौशल्यांची ओळख करून दिले जाणारे कोर्स आहेत तर १८ ते ३५ वयोगटातील युवांसाठी व्यावसायिक व नोकरीभिमुख कोर्स आहेत. किशोरवयीन व युवांना या कोर्सशी जोडण्याची जबाबदारी संबंधित गावातील स्वयंसेवक पार पाडत आहेत. या उपक्रमासाठी लागणाऱ्या स्मार्टफोन व इंटरनेटची जबाबदारी गावातील समुदाय घेऊ शकतो. वापरलेले लॅपटॉप किंवा स्मार्टफोन यांचा संच तयार करणे हा पर्याय आहेच. गावातील समुदायाच्या पुढाकाराने 'डिजिटल लायब्ररी' तयार होऊन युवांना नोकरीभिमुख शिक्षण व सर्व वयोगटातील मुलांपर्यंत शिक्षणाचा 'कन्टेन्ट' पोचेल. तरुण पिढीला मेहनत करायची नाही किंवा गावाकडील युवा नवे काही शिकण्यात रुची घेत नाही हा गैरसमज आहे. खरं तर 'प्रत्यक्ष' न भेटता ही मुलं स्वतःहून प्रशिक्षित झाली आहेत. हे यश त्यांचं आहे.
तुमच्या परिचयातील युवकांना आमच्या कोर्सशी जोडायचं असल्यास 8879611244 व sachin.chandorkar@pratham.org येथे संपर्क करा.
aashay.gune@pratham.org

बातम्या आणखी आहेत...