आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Rasik Special | The Journey Of Global Human Consciousness | Marathi Article | Divya Marathi | Journalist Who Will Talk To People

रसिक स्पेशल:वैश्विक मानवी संवेदनेची सहयात्रा

ऋषिकेश देशमुखएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रगती बाणखेले यांचे 'ऑन द फिल्ड' हे पुस्तक लोकल ते ग्लोबल अशा विस्तृत पटाचा वेध घेणारे वैश्विक वेदनांचे भान देणारे आहे. वेगवेगळ्या दिवाळी अंकात किंवा वृत्तपत्रासाठी म्हणून केलेले हे लेखन आज पुस्तक रूपात येत आहे असं लेखिका विनम्रपणे म्हणत असल्या तरी या सर्व लेखांंचे वेगवेगळे विषय व या विषयांचा त्यांनी केलेला सखोल अभ्यास, त्या विषयांच्या वेगवेगळ्या पैलूंचा/संकेतव्युव्हांचा चिकित्सक मागोवा घेत ज्या तन्मयतेने त्यांनी विषयाची मांडणी केली आहे ती अत्यंत मौलिक आहे आणि जे मौलिक असतं ते सार्वकालिक असतं.

प्रगती बाणखेले यांचे 'ऑन द फिल्ड' हे लेखांचे पुस्तक नुकतेच प्रकाशित झाले असले तरी त्यांच्या 'अर्धी दुनिया' या सदर लेखनातून त्यांनी त्यांची स्वतंत्र नाममुद्रा उमटवलेली आहे. समकाळातल्या अत्यंत स्पष्ट व परखड भूमिका असणाऱ्या त्या महत्वपूर्ण लेखिका व पत्रकार आहेत. 'अर्धी दुनिया' मध्ये इथल्या सर्वस्तरीय व्यवस्थांमध्ये स्त्रीचे तिच्या अस्तित्वाचे अनेकमितीय तळशोध त्यांनी घेतलेले आहेत. त्यांच्या लिहिण्याची असोशी व त्यांची तीव्र संवेदनशीलता ही त्यांनी लिहिलेल्या प्रत्येक शब्दातून वाचकांना जाणवते. हे त्यांच्या लिखाणाचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य आहे.

आजच्या अत्यंत स्पर्धेच्या बाजारयुगाचा परिणाम पत्रकारिता या क्षेत्रावरही मोठ्या प्रमाणात झालेला दिसतो आणि त्यामुळेच पत्रकारिता मग ती प्रिंट मीडियातली असो की इलेक्ट्रॉनिक मीडियातली आज तिच्याबद्दलच्या एकूणच विश्वासार्हतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. मात्र काही मोजक्याच पत्रकारांमुळे या क्षेत्रातील विश्वासार्हता व या क्षेत्राचा रुतबा अबाधित राहील असे वाटते त्या मोजक्या पत्रकारांमध्ये प्रगती बाणखेले हे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल.

'ऑन द फिल्ड' हे पुस्तक लोकल ते ग्लोबल अशा विस्तृत पटाचा वेध घेणारे वैश्विक वेदनांचे भान देणारे आहे. वेगवेगळ्या दिवाळी अंकात किंवा वृत्तपत्रासाठी म्हणून केलेले हे लेखन आज पुस्तक रूपात येत आहे असं लेखिका विनम्रपणे म्हणत असल्या तरी या सर्व लेखांचे वेगवेगळे विषय व या विषयांचा त्यांनी केलेला सखोल अभ्यास, त्या विषयांच्या वेगवेगळ्या पैलूंचा/संकेतव्युव्हांचा चिकित्सक मागोवा घेत ज्या तन्मयतेने त्यांनी विषयाची मांडणी केली आहे ती अत्यंत मौलिक आहे आणि जे मौलिक असतं ते सार्वकालिक असतं. प्रगती बाणखेले यांच्या या लिहिण्याला भूत-वर्तमानाचा स्पष्ट व ठसठशीत आधार आहे आणि त्यामुळेच हे लेखन भविष्यवेधकही ठरते. सगळ्यात मोठी नि महत्वाची गोष्ट म्हणजे लिहिण्यात अत्यंत सहजता व प्रवाही ओघवतेपणा आहे. जे वाचकांची उत्सुकता वाढवते त्यांची वाचनीयता वर्धिष्णू करते. 'आँखो को विसा नहीं लगता.. सपनों की सरहद नहीं होती' हा लेख प्रेम या सार्वकालिक सत्यासाठी केलेला प्रवासाची रोमांचक नि हृदय पिळवटून टाकणारी अस्वस्थता प्रक्षेपित करते. प्रेमाला वय , जात , धर्म , भाषा किंवा वंश वा कुठल्याही देश-प्रांत यांच्या सीमा असत नाहीत. प्रेम हेच एक सत्य आणि त्या सत्याचा शोध घेत माणूस कुठल्याही परिस्थितीत ते मिळवण्याची अविरत धडपड करत असतो. हमीद अन्सारी हा सुशिक्षित भारतीय तरुण पाकिस्तानातल्या फिझा खान या बी.एड करणाऱ्या तरुणीच्या प्रेमात पडतो. त्यांची ओळख फेसबुकवर झालेली असते. फेसबुकवरची ओळख हळूहळू प्रेमात परावर्तित होते आणि हमीद तिला भेटण्यासाठी तिच्याशी विवाह करण्याचे स्वप्नं उराशी बाळगून अत्यंत असुरक्षित वाटेचा धोका पत्करतो. पाकिस्तानला जाण्याचा व्हिसा मिळत नाही हे लक्षात येताच काबुलमार्गे पाकिस्तानात पोहचतो पण तिथे हा पोहचण्यापूर्वीच तिचे वडील तिचा विवाह दुसऱ्याच मुलाशी लावून देतात. हमीद तिथे भारतीय गुप्तहेर असण्याच्या संशयाने कैद केला जातो. दोन्ही देशांचे संबंध आधीच ताणलेले त्यात हे असं घडणं फारच अस्वस्थ करणारं. या कोंडीतून त्याची सुटका करण्यासाठी त्याच्या प्राध्यापिका असणाऱ्या आईने फौजिया अन्सारी यांनी दिलेला लढा, त्याची सुखरूप सुटका व्हावी म्हणून केलेला संघर्ष फारच प्रेरणादायी आहे. दोन्ही देश त्यांचे परराष्ट्रीय संबंध तणावाचे असतानाही परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी केलेली मदत सगळंच स्वप्नवत वाटावं असं सत्य. खरंतर ज्या प्रेमासाठी हमीद अन्सारी देशाच्या सीमा ओलांडून गेला ते त्याला प्राप्त झाले नाही मात्र त्याच्या आईचे शाश्वत प्रेम मात्र त्याची तिथूनही सुखरूप सुटका करण्याचे सामर्थ्य ठेवणारे आहे याची प्रचिती देते. हा लढा प्रत्येक आईचा प्रातिनिधिक लढा आहे तो ती तिच्या मुलांसाठी कायमच लढत असते. शिवकालीन हिरकणी असो की आत्ताच्या फौजिया अन्सारी यांच्यातली आई मुलांना सुरक्षित पाहण्यासाठी तेवढ्याच लढावू आणि झुंझार आहेत. या लेखातून प्रगती बाणखेले यांच्यातली मातृहृदयताही जाणवते हे विशेष. असं म्हणतात की, प्रेम माने दो दिलो के बीच, कुछ असंभव सा घट जाना ... हा लेख अशा असंभवाचीच शृंखला गुंफणारा, अशक्य वाटाव्यात अशा पण प्रत्यक्षात घडलेल्या योगायोगाच्या मितींनी प्रेमाला, प्रेमाच्या पावित्र्याला दृश्यमान करणारा आहे. 'मैने लाहोर देख्या'या लेखामधून लाहोर शहर त्याच्या ऐतिहासिक/सांस्कृतिक पार्श्वभूमीपासून ते आजच्या वर्तमानापर्यंतचा त्याच्यात सामावलेल्या विविध बदलांसह चित्रित झालेला आहे. शहरातील ऐतिहासिक वास्तू सौंदर्य, खाद्यसंस्कृती, तिथला हृद्य पाहुणचार व लाहोर म्युझियम वाचताना ते डोळ्यांसमोर अगदी जशास तसे तरळून जाते. खरंतर हा प्रवास लेखिका घडवते. फाळणीनंतर एकच इतिहास आणि संस्कृती असणारे देश एकमेकांपासून दूर गेले. मात्र आजची तिथली तरुणाई नेमका काय विचार करते. तिला भारत-पाकिस्तान या देशांचे संबंध असेच कायम ताणलेले असावेत असे वाटते का? तर त्याचे उत्तर मात्र समाधानकारक आहे. तिथली तरुणाई शांतीचा पुरस्कार करते आहे, सजग होते आहे वाचून आजपर्यंत झालेलं झालं परंतु यापुढचे भविष्य आश्वासक राहील असा विश्वास वाटतो. पोटाचा प्रश्न हाच माणसाला वारंवार स्थलांतरित/विस्थापित करत आलाय. एक भूकच आहे जी कुठलाही जीवावरचा धोका पत्कारायला भाग पाडत आलीय माणसाला. 'निळा दर्या लाल रेघ' हा लेख याचीच प्रचिती देणारा आहे. खरंतर देशांना सीमा असतात त्या सीमांचे काही कठोर नियम असतात जे दोन्ही देशातील नागरीकांकडून पाळले जातात मात्र समुद्रात केली जाणारी मासेमारी याला अपवाद ठरते. एकतर सभोवार पाणी त्यामुळे सीमेरेषा नेमकी कुठे आहे याचा अंदाज येत नाही. कधी कधी सिग्नल मिळत नाही तर कधी थोडी अधिकची चांगली मासळी मिळावी म्हणूनही धोका घेतला जातो. दोन्ही देशांकडे असे असंख्य मच्छिमार आहेत ज्यांनी सीमारेषा ओलांडली म्हणून कैद केले गेले आहेत. ही अतिशय सर्वसामान्य माणसं त्यांची कुठलीही मोठी चूक नाही चूक एवढीच आहे की त्यांचे पोट त्या व्यवसायावर अवलंबून आहे. मात्र ते पोटासाठी गुन्हेगार ठरतात. दोन्ही देशांच्या नियम-कायदे यांच्या कचाट्यात हकनाक भरडली जातात. अशा अनेक मच्छिमारांना भेटून त्यांच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या दुःखद कहाण्या या लेखात आहेत ज्या वाचताना अंगावर अक्षरशः शहारे येतात.

'पाचूच्या बेटावरील अश्रू' हा लेख श्रीलंकेतल्या यादवीमुळे निर्माण झालेली युद्धजन्य परिस्थिती त्यात मानवी हक्कांची होत असणारी खुलेआम पायमल्ली सर्वसामान्य नागरिकांना गुन्हेगार ठरवून त्यांच्या भविष्याशी खेळलं जाणं व हे सर्व गुन्हे करणारे गुन्हेगार मात्र उजळ माथ्यानं वावरणं या सर्वांचा अंतस्थ वेध घेतो.

'गणेश ते गौरी ... एका अर्धुकाचा प्रवास' हा लेख एका अत्यंत महत्त्वाच्या समुदायाच्या जगण्याची रीत उलगडून दाखवतो. खरंतर आपण स्त्री-पुरुष या दोनच बाजू नेहमी गृहीत धरलेल्या असतात तिसरी बाजूही तेवढीच मोठी नि समांतर आहे हे समजून घ्यायचा प्रयत्नच आपल्याकडून केला जात नाही. तिसरी बाजू म्हणजे तृतीयपंथी. तिसरी बाजू मान्य केली की आपल्या गृहितकाला खूप मोठा तडा जातोय असं वाटायला लागतं आणि मग तिसऱ्या बाजूची, तिसऱ्या जगाची नेहमी अवहेलना केली जाते त्यांना तिरस्कृत वागवलं जातं. नदीष्ट या मनोज बोरगावकर यांच्या कादंबरीने या तिसऱ्या जगाविषयी मनामध्ये अपार आस्था निर्माण केल्या त्याच आस्थाचा परीघ गणेश ते गौरी हा लेख वाचून विस्तीर्ण झाला यात शंका नाही.

गौरी सावंत यांच्या जगण्याचा पैस प्रगती बाणखेले यांनी खूपच आत्मीयतेने समजून घेतला व तेवढ्याच आत्मीयतेने उलगडून दाखवला आहे. एलजीबीटी समूहाची प्रश्न, त्यांची समाजकडूनची केवळ समानतेच्या वागणुकीची अपेक्षा व त्यांच्या जगण्याचा पराकोटीचा संघर्ष हे सगळंच किती अकल्पित वास्तव आहे हे लेख वाचून लक्षात येते. 'तिसऱ्या जगात' तृतीयपंथी समूहातील आचार-विचार, त्यांच्यात दिक्षाविधी झाल्यानंतर त्यांच्या गुरुचे आणि त्यांचे संबंध, आपापसातील राग-लोभ, हेवेदावे त्यांची जीवनरीत या सगळ्यांना दृश्यमान करण्यात आले आहे. जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या उपजीविकेसाठी त्यांना भीक मागावी लागते अर्थात ती त्यांना खरंतर मागावी वाटत नाही मात्र आपला समाज त्यांना जी वेगळी वागणूक देतो ते उपजीविका भागावी म्हणून वेगळं काही करायला गेले तर घनघोर अवहेलना करतो, तिरस्कृत करतो, दुसरं काही करायचा त्यांना अधिकारच नाही असं त्याच्याशी वागतो . त्यांची ही सामूहिक सन्मानासाठीची झुंज वाचून मन सुन्न होते .

गर्भलिंग तपासणीत स्त्रीभ्रूण असल्याचे लिंगनिदान झाले की स्त्रीभ्रूणहत्या करणे ही खूप मोठी समस्या आहे. आजही चोरून-लपून ही साखळी कार्यान्वित आहे. मुलीच्या जन्माला नाकारणारी मानसिकता भयंकर मोठा रोग आहे आपल्या समाजाला लागलेला. २०११ च्या जनगणना अहवालात हरयाणातील मुलींची संख्या प्रचंड घटली आहे हे लक्षात आले. त्यानंतर त्या राज्याने मुलींचा जन्मदर वाढवण्यासाठी काय काय प्रयत्न केले, ते कितपत यशस्वी होतील हे सगळं 'ए छोरे , छोरीया म्हारा हरयाणा बदल देंगे' या लेखातून समजून घेता येते.

स्त्रीभ्रूणहत्या जेवढी मोठी समस्या आहे त्याएवढीच मोठी समस्या बालवधूंंची आहे. मुलींचे अगदी चौदाव्या-पंधराव्या वर्षांच्या बालवयात लग्न लावून दिले जाते. स्त्री शिक्षणाविषयी अनास्था, तिच्या शारीरिक मानसिक वाढीचे होणारे कुपोषण त्यातच बालवयात लग्न लावून संकटातून मुक्त झालो तिचे आता काही का होईना अशी मनोवृत्ती यामुळे स्त्रीयांच्या जगण्याचा, संवेदनांचा कोंडमारा अविरत सुरूच आहे. हे 'बालाघाटातल्या बालवधू' या लेखामधून दृग्गोचर होते. ही बालाघाट या प्रदेशापूर्ती सीमित समस्या नाही त्या समस्येने संपूर्ण महाराष्ट्र किंबहुना संपूर्ण भारतच ग्रासलेले आहे.

२००९ च्या शिक्षण हक्क कायद्याने १४ वर्षांपर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षणाचा अधिकार मिळाला मात्र तरीही खरोखरच १४ वर्षापर्यंतची सर्व मुलं शाळेत जातात का? तर त्याचे उत्तर नाही असेच आहे. ऊसतोडणी कामगारांच्या मुलांचे शिक्षण हा ज्वलंत प्रश्न आहे. सहा महिने शाळा तर सहा महिने ऊसतोडणी असं त्या मुलांचं जगणं. मग या मुलांच्या शिक्षणाच्या नेमक्या दिशा व दशा कोणत्या याबद्दल 'शिक्षणाच्या हक्कावर अर्धा कोयता' प्रकाश टाकतो. हा लेख केवळ शिक्षणाच्या अनुषंगानेच मार्गक्रमण करीत नाही तर संपूर्ण ऊसतोडणी कामगारांच्या जगण्याचा कोलाज चित्रित करतो.

आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून एवढी वर्षे झाली तरीही काही समूह त्यांचं जगणं शोधण्यासाठी अजूनही भटकतच आहेत. सांगण्यापुरते गाव नाही, डोक्यावर छप्पर नाही की कुठलीही ठसठशीत ओळख नाही अशा अनाम समूहाची ओळख 'भटक्यांची मुबई'त घेतलेला आहे. तर ग्राम पंचायतींमध्ये ५० टक्के महिला आरक्षण मिळाल्यानंतर खरोखरच स्त्रियांना त्याचा लाभ घेता येतोय का यावर 'गावकारभारणी' या लेखात लिहिले आहे.

"ऑन द फिल्ड' वाचत असताना एक गोष्ट लक्षात येते की प्रगती बाणखेले यांची लेखकीय निष्ठा ही सर्वसामान्य माणसाच्या न्याय हक्काच्या बाजूने लढणारी आहे . त्यांच्या या लेखनाला 'ऐसी कळवळ्याची जाती I करी लाभेंविण प्रीती ।।' या तुकोबांच्या अभंगाची मातृहृदयता आहे. या लेखनात अनेक कथा/कादंबऱ्यांच्या घनदाट क्षमता असतानाही त्यांनी रिपोर्ताज या त्यांच्या निष्ठेच्या लेखनप्रकारातच लेखन केले आहे हे विशेष. प्रगती बाणखेले यांनी त्यांच्या 'ऑन द फिल्ड' मधून वैश्विक मानवी संवेदनेची सहयात्रा घडवली आहे यात शंकाच नाही. पुस्तक : ऑन द फिल्ड लेखिका : प्रगती बाणखेले मुखपृष्ठ : संतोष घोंगडे प्रकाशन : प्राजक्त प्रकाशन, पुणे. किंमत : २४०. पृष्ठे : १८४.

बातम्या आणखी आहेत...