आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Remdesivir Injection Supply Shortage India Update; What Is Anti Viral Drug's And Effectiveness? Coronavirus Second Wave

एक्सप्लेनर:कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत रेमडेसिवीरचा मोठा तुटवडा, रुग्णांना इंजेक्शन मिळेना; भारतात दररोज तयार केले जाऊ शकतात 1.3 लाख डोस

9 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • 'रेमडेसिवीर'चे संकट अचानक कसे उद्भवले?

कोरोनाच्या दुस-या लाटेत रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. पुन्हा रुग्णांसाठी हॉस्पिटलमध्ये बेड, व्हेंटिलेटरर्स, ऑक्सिजनची कमतरता जाणवते आहे. या कमतरतेबरोबरचं 'रेमडेसिवीर' या इंजेक्शनचा मोठा तुटवडा जाणवतोय. कोरोनाचा संसर्ग झालेल्या गंभीर रुग्णांना 'रेमडेसिवीर' इंजेक्शन द्यावे लागते. 'रेमडेसिवीर'ची मागणी वाढल्याने भारताने या इंजेक्शनच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. यानंतरही परिस्थिती सुधारली नाही. केवळ मुंबई-दिल्लीतच नव्हे, तर देशातील प्रत्येक राज्य सरकारला या अँटी-व्हायरल औषधासाठी आपत्कालीन व्यवस्था करावी लागत आहे. सध्या देशातील सात कंपन्या हे इंजेक्शन तयार करत असून दर महिन्याला 39 लाख डोस तयार केले जात आहेत. याचाच अर्थ म्हणजे दर दिवसाला 1.30 लाख डोस तयार करण्याची या कंपन्यांची क्षमता आहे. या इंजेक्शनची मागणी सातत्याने वाढत आहे.

रेमडेसिवीर औषधाचे उत्पादन आणि पुरवठा वाढवण्याचा तसेच त्याच्या किंमती कमी करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. आता या इंजेक्शनची किंमत 3500 रुपये निश्चित करण्यात आली आहे. एप्रिलच्या अखेरीस त्याचे उत्पादनही दुप्पट होईल, असेही यात म्हटले आहे. यासाठी, आणखी सहा कंपन्यांना त्याच्या उत्पादनासाठी मान्यता देण्यात आली आहे. सध्या देशात दर महिन्याला 38.80 लाख इंजेक्शन तयार केले जात आहेत. या महिन्याच्या अखेरपर्यंत 80 लाख इंजेक्शन तयार होतील. मंत्रालयानुसार, सध्या देशात हे औषध तयार करणा-या सात कंपन्या आहेत. आता आणखी सहा कंपन्यांना मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे दरमहिन्याला आणखी 10 लाख इंजेक्शन्स तयार होऊ शकतील.

चला, समजून घेऊया की 'रेमडेसिवीर' आणि त्याच्याशी संबंधित संकट का आले?

 • 'रेमडेसिवीर' म्हणजे काय?

'रेमडेसिवीर' हे एक अँटी-व्हायरल औषध आहे, जे संसर्गाचा फैलाव रोखण्याचे काम करते. 2009 मध्ये अमेरिकेच्या गिलिड सायन्सेसने हेपेटायटीस सीवर उपचार करण्यासाठी हे औषध तयार केले होते. यावर 2014 पर्यंत संशोधन केले गेले होते आणि नंतर ते इबोलाच्या उपचारात वापरले जात होते. त्यानंतर 'रेमडेसिवीर'चा वापर कोरोना व्हायरसच्या मिडिल ईस्ट रेस्पिरेटरी सिंड्रोम (मर्स - MERS) आणि सीवियर एक्यूट रेस्पिरेटरी सिंड्रोम (सार्स - SARS) च्या उपचारात केला जात आहे.

हा फॉर्मुला शरीरात पसरणा-या विषाणुसाठी आवश्यक असलेल्या एंजाइमवर मात करतो. 28 ऑक्टोबर 2020 रोजी अमेरिकन नियामक यूएस-एफडीएने कोविड - 19 च्या उपचारांसाठी 'रेमडेसिवीर'ला मान्यता दिली. त्यावेळी डोनाल्ड ट्रम्प यांना संसर्ग झाला होता तेव्हा त्यांनादेखील 'रेमडेसिवीर' देखील देण्यात आले होते.

 • 'रेमडेसिवीर' खरोखर प्रभावी आहे का?

माहित नाही. आतापर्यंत 50 पेक्षा जास्त देश 'रेमडेसिवीर' हे औषध कोविड - 19 च्या उपचारांत वापरत आहेत. तथापि, WHO ने चाचण्यांमध्ये या दाव्याची पुष्टी केली नाही. डब्ल्यूएचओने म्हटले आहे की 'रेमडेसिवीर'ने रुग्णाच्या गंभीर लक्षणे किंवा जीवघेणा परिस्थितीवर कोणताही परिणाम दर्शवला नाही. दुष्परिणाम नक्कीच पाहिले गेले आहेत. यामध्ये लिव्हर एंजाइम्सची वाढलेली पातळी, अॅलर्जीक रिअॅक्शन, रक्तदाब आणि हृदय गती बदलणे, ऑक्सिजन रक्ताची पातळी कमी होणे, ताप, श्वास घेण्यात अडचण, ओठ आणि डोळ्यांना सूज येणे, रक्तदाबही वाढला असल्याचे दिसून आले आहे.

पुण्यात रेमडेसिवीरसाठी लागलेली रांग
पुण्यात रेमडेसिवीरसाठी लागलेली रांग
 • 'रेमडेसिवीर'चे संकट अचानक कसे उद्भवले?

डिसेंबर 2020 आणि फेब्रुवारी 2021 याकाळात दररोजच्या प्रकरणांची संख्या 30 हजारांपेक्षा कमी झाली होती. फेब्रुवारीमध्ये भारतात कोरोना विषाणूची प्रकरणे कमी होऊन काही काही हजारांवर आली होती. जणू ही महामारी संपत आली आहे, असे चित्र उभे झाले होते. नवीन रुग्णांची संख्या कमी झाल्याने डिसेंबरपासून औषध कंपन्यांनी 'रेमडेसिवीर'चे उत्पादन कमी केले होते. गेल्या सहा महिन्यांत भारताने 100 हून अधिक देशांना 11 लाख इंजेक्शनची निर्यातदेखील केली आहे.

त्यावेळी यूरोप-अमेरिकेसह जगातील अनेक देशांत कोरोनाची दुसरी किंवा तिसरी लाट आली होती. अशा परिस्थितीत भारताला सजग राहायला हवे होते. परंतु तसे झाले नाही. लोक बेफिकिर झाले आणि देशात कोरोनाची दुसरी लाट आली आणि तिने भयावह रुप घेतले. पहिल्या लाटेमध्ये 98 हजारांचा आकडा पीकवर होता. तर दुस-या लाटेत एका दिवसात 1.80 लाख प्रकरणे नोंदवली गेली आहेत.

दरम्यान, गरज नसतानाही रुग्णालयांमध्ये रुग्णांना 'रेमडेसिवीर' इंजेक्शन देणे, त्याचे वाढलेले दर, काळाबाजार आणि इतर अनेक कारणांमुळे 'रेमडेसिवीर'चे संकट ओढवले आहे. मागणी वाढल्याने औषध कंपन्यांना तातडीने त्याचे उत्पादन वाढवता येणे सोपे नाही. कारण कंपन्यांची कच्चा मालासाठी पुर्व तयारी नव्हती.

 • प्रत्येक कोरोना रुग्णाला 'रेमडेसिवीर'ची आवश्यकता असते का?

नाही.. 'रेमडेसिवीर' फक्त अशा रुग्णांना दिले जावे, जो रुग्णालयात दाखल असेल आणि ऑक्सिजनची गरज असेल, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. जे लोक घरी आयसोलेशनमध्ये आहेत त्यांना या इंजेक्शनची मुळीच गरज नाही. नीती आयोगाचे सदस्य (आरोग्य) डॉ. व्हीके पॉल म्हणाले की, घरी क्वारंटाइनमध्ये असलेल्या रुग्णांना या इंजेक्शनची मुळीच गरज नाही. लोक औषधांच्या दुकानांबाहेर का गर्दी करत आहेत आणि डॉक्टरदेखील हे इंजेक्शन का प्रिस्क्राइब करत आहेत, हे समजण्यापलीकडे आहे.

 • भारतात 'रेमडेसिवीर' किती कंपन्या बनवतात?

30 जून 2020 पासून हे इंजेक्शन महाराष्ट्रात वापरायला परवानगी देण्यात आली. सिप्ला (मुंबई), हेट्रो हेल्थकेअर (हैद्राबाद), ज्युबीलियंट लाईफसायंन्सेस (दिल्ली), इलिया लेबोरेटरीज (अर्जेंटीना), डॉ. रेड्डीज (हैद्राबाद), झायडस् कॅडिला (अहमदाबाद) या सहा कंपन्यांची रेमडेसिवीर इंजेक्शन्स महाराष्ट्रात वापरली जात आहेत. या कंपन्यांची एकुण उत्पादन क्षमता दर महिन्याला 39 लाख कुप्या बनवण्याची आहे. झायड्सने मार्च महिन्यात 100 ग्रॅम कुपीची किंमत 2,800 वरुन कमी करुन 899 रुपये केली आहे.

 • संकट संपवण्यासाठी केंद्र व राज्य सरकार काय करत आहेत?

11 एप्रिल रोजी केंद्र सरकारने 'रेमडेसिवीर' इंजेक्शन आणि रेमडेसिवीर अ‍ॅक्टिव्ह फार्मास्युटिकल साहित्य (एपीआय) च्या निर्यातीवर देशातील परिस्थिती सुधारण्यापर्यंत बंदी घातली आहे. केंद्र सरकारने सर्व घरगुती उत्पादकांना वेबसाइटवर स्टॉकिस्ट आणि वितरकांचे तपशील दर्शवण्यास सांगितले जेणेकरुन लोकांना कोणतीही अडचण येऊ नये. आरोग्य मंत्रालयाने औषध निरीक्षक आणि इतर अधिका-यांना 'रेमडेसिवीर' इंजेक्शन्सचा साठेबाजार आणि काळाबाजार रोखण्यासाठी शक्य ते उपाय करण्यास सांगितले आहे.

गुजरातमध्ये, भाजपने जाहीर केले होते की, 'रेमडेसिवीर'च्या 5000 डोसचे मोफत वाटप केले जाईल. त्यावरुन एकच गोंधळ उडाला होता. यावरुन बरेच राजकारण रंगले होते. शिवाय राज्य सरकारवर कडाडून टीकादेखील झाली होती.

महाराष्ट्रात जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापित करण्यात आले आहेत. 'रेमडेसिवीर' इंजेक्शनचा पुरवठा स्ट्रीमलाइन करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी नागपुरात इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सन फार्माच्या अधिका-यांना फोन करुन 5000 इंजेक्शनचे डोस जमवले. राज्य सरकारने 'रेमडेसिवीर'च्या इंजेक्शनची किंमत 1,200 रुपये ते 1,400 रुपयांपर्यंत निश्चित केली आहे.

मध्य प्रदेश सरकार दुर्बल घटकातील गंभीर रूग्णांना 'रेमडेसिवीर' इंजेक्शन विनाशुल्क उपलब्ध करुन देत आहे. येथेही इंदूर-भोपाळसह अनेक शहरांमध्ये 'रेमडेसिवीर'चे संकट उभे राहिले आहे. केमिस्टच्या दुकानात लांबच लांब रांगा लागल्या आहेत. इंजेक्शनच्या उपलब्धतेबाबत राज्य सरकारने विशेष व्यवस्था केली आहे.

बातम्या आणखी आहेत...