आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:लतादीदींना आठवताना...

औरंगाबाद2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लतादीदी आज आपल्यात नाहीत, पण त्यांचं गाणं चिरतरुण आहे, चिरंतन आहे. ते झोपडीत अन् बंगल्यातही वाजतं. पुढेही साऱ्या विश्वात गुंजत राहील. कारण त्या सुरांना जात-धर्माची आवरणं नाहीत अन् भाषा, प्रदेशाची बंधनंही नाहीत. दीदींचं गाणं एखाद्या मोरपिसासारखं आहे. त्यात मृदुता आहे, माया आहे, ऋजुता आहे नि सात्त्विकताही आहे. बस! ते नुसतं ऐकत राहावं.. जगण्याला उभारी मिळण्यासाठी हे मोरपीस मनावरती अलवार फिरत राहावं... गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा उद्या (६ फेब्रुवारी) पहिला स्मृतिदिन. त्या निमित्ताने ज्येष्ठ संगीतकार अशोक पत्की यांनी जागवलेल्या आठवणी...

ल तादीदींना आपल्यातून जाऊन उद्या एक वर्ष होतंय. पण, आपलं मन अजूनही सांगतं की दीदी आपल्यातच आहेत. त्यांच्या मखमली आवाजाच्या रूपात.. नितांत कोमल सुरांच्या रूपात... माझा आणि दीदींचा अगदी जवळचा किंवा सततचा म्हणावा असा संबंध आला नाही. एक वादक म्हणून मी इंडस्ट्रीमध्ये आर. डी. बर्मन, एस. डी. बर्मन, रोशनजी, जयदेवजी, लक्ष्मी-प्यारे, शंकर जयकिशन यांच्यासोबत काम केलं. त्या काळी एकत्र काम करण्याची पद्धत होती. दोनच ट्रॅकवर गाणी संगीतबद्ध होत असत. एक ट्रॅक म्युझिशियन्ससाठी आणि दुसरा गायकांसाठी असायचा. अशाच काही गाण्यांच्या रेकाॅर्डिंगदरम्यान लतादीदींना पाहण्याची, त्यांना ऐकण्याची संधी लाभायची. ‘लतादीदींकडून गाणं गाऊन घे..’ असं मला माझ्या मराठी निर्मात्यांकडून तीन-चार वेळा सांगण्यात आलं होतं. पण, कधी आवाज किंवा गळा साथ देत नाही म्हणून, कधी त्यांच्या कामाच्या व्यग्रतेमुळे, तर कधी त्या भारताबाहेर असल्याने माझ्यासाठी गाऊ शकल्या नाहीत. दीदी आपल्यासाठी गाऊ शकत नसल्याची भावना आपल्या हातून खूप मोठं पाप घडत असल्यासारखी बोचत राहायची. पण, देवाला माझी दया आली असावी. ‘मिले सूर मेरा तुम्हारा..’ करायचं ठरलं अन् माझ्यासाठी तो बहुप्रतीक्षित योग जुळून आला.

‘मिले सूर..’चे निर्माते मलिक यांनी पंडित भीमसेन जोशी, लता मंगेशकर आणि दक्षिणेतील बालमुरली या तिघांना एकत्र आणण्याची जबाबदारी स्वत:वर घेतली होती. मग बाकीचे जे होते, ते आमच्या जिंगल्स करणाऱ्यांपैकीच होते. १३-१४ भाषांतील लेखकही तिथे हजर होते. इतर गायकांमध्ये कविता कृष्णमूर्ती, सुषमा श्रेष्ठ, कुरुविला, बाळू आणि घनश्याम वासवानी ही मंडळी होती. सकाळी दहा ते रात्री दहापर्यंत ‘वेस्टर्न आउटडोअर’ स्टुडिओमध्ये या गाण्यावर काम चालू होतं. त्यादरम्यान लतादीदी रशियाला गेल्या होत्या. दीदी पंधरा दिवसांनंतर परतणार, असं मलिक यांना कळलं तेव्हा ते गर्भगळीतच झाले. कारण अमिताभ बच्चन, जितेंद्र, हेमामालिनी, शर्मिला टागोर या दिग्गज मंडळींबरोबर शूटिंगचं शेड्यूल निश्चित झालं होतं. मी मलिकना म्हटलं की, या गाण्याचा जो पार्ट दीदी गाणार आहेत, तो कविताच्या आवाजात करून घ्या. शूटिंग करा आणि दीदी आल्या की त्यांच्या आवाजात डबिंग करून घ्या. त्यांना ही कल्पना आवडली अन् त्यांचं शूटिंगचं टेन्शनही गायब झालं. दीदी पंधरा दिवसांनी भारतात परतल्या आणि त्यांनी या गाण्यातील त्यांचा तो पार्ट डब केला. त्यांचं शूटिंगही तेव्हाच झालं. १९८८ मध्ये आम्ही केलेली ती निर्मिती, साकारलेली अनोखी कृती आजही ताजी वाटते. आजही ‘मिले सूर मेरा तुम्हारा..’ कानी पडले की ते पूर्ण होईपर्यंत आपले पाय तिथेच खिळून राहतात. या गाण्याच्या सुरांतून मनात एकात्मतेची भावना दाटून येते नि त्याचे संगीत आपल्या भारतीयत्वाच्या जाणिवेने अंगावर रोमांच उभे करते.

लहानपणापासून मला संगीताबद्दल विशेष आस्था होती. शंकर जयकिशन आणि लतादीदी म्हणजे माझं दैवत. मंदिरात जशी देवाची मूर्ती असते तशा माझ्या घरातील भिंतीवर वर्षानुवर्षे शंकर जयकिशन आणि लतादीदींच्या तसबिरी आहेत. त्यांच्या आशीर्वादाने मला कधी काही कमी पडलं नाही. दीदींचे स्वर ऐकून मी श्रीमंत झालो. आपण सारेच त्याबाबतीत नशीबवान आहोत. संगीत हा दीदींचा श्वास होता. इतर विषयांमध्येही त्यांना रस होता. साहित्य, नाटक, खेळ यांमध्येही त्यांना विशेष रुची होती. त्यांचा सर्वात आवडीचा विषय क्रिकेट. दीदींना लंडन शहर खूप आवडायचं. त्यांनी लंडनमध्ये घर घेतलं, तेही थेट लाॅर्ड‌्सच्या समोर. क्रिकेटच्या मोसमात त्या लंडनलाच असत. १९८३ मध्ये भारताने विश्वचषक जिंकला, तेव्हा भारतीय संघाबरोबर त्याही तिथेच होत्या. मी आणि सुमन कल्याणपूरही त्या वेळी लंडनमध्येच होतो, पण तिकीट नसल्यानेे आम्ही तो अंतिम सामना टीव्हीवर पाहिला.

लतादीदींचा जन्म इंदूरचा. २८ सप्टेंबर १९२९ या दिवशीचा. त्या वेळी मा. दीनानाथ वैभवाच्या शिखरावर होते. त्यांची बळवंत नाटक कंपनी अत्यंत लोकप्रिय होती. ‘मानापमान’,“रणदुंदुभी’ ही नाटके जोरात सुरू होती. लताचा पायगुण म्हणून आज ही भरभराट आहे, असे ते नेहमी म्हणायचे. त्यांचं गाणं, स्वभाव आणि स्वाभिमान लतादीदींमध्ये उतरला होता. मा. दीनानाथांनी त्यांच्या अखेरच्या दिवशी अवघ्या १२-१३ वर्षांच्या दीदींच्या हातात आपली चिजांची वही नि तानपुरा दिला अन् म्हणाले, ‘हेच मी तुला देऊ शकतो. हाच माझा ठेवा आहे. खूप मेहनत कर, मोठी हो. मी असलो नसलो तरी माझं तुझ्याकडे लक्ष असेल.’ दीनानाथांचा हा आशीर्वाद आणि स्वत:च्या अपार मेहनतीच्या बळावर पुढे लतादीदींनी गायनात अढळ स्थान निर्माण केले. दत्ता डावजेकरांनी संगीत दिलेल्या ‘पहिली मंगळागौर’मध्ये दीदींनी पहिलं गाणं गायलं. पुढे गुलाम हैदर, हुस्नलाल भगतराम, श्यामसुंदर, शंकर जयकिशन अशा मोठमोठ्या संगीतकारांबरोबर त्यांनी गाणी संगीतबद्ध केली. ‘आयेगा आनेवाला..’ या गाण्याप्रमाणेच ‘बरसात’मधील ‘हवा में उडता जाये..’, ‘जिया बेकरार है..’ या गाण्यांनी रसिकांना भुरळ घातली. त्यानंतर दीदींनी कधी मागे वळून पाहिले नाही. वयाच्या अठराव्या वर्षी जेव्हा त्यांनी पहिली गाडी घेतली, तेव्हा त्यांचे वैभवाचे दिवस सुरू झाले होते.

एक ऐकिवातली गोष्ट आहे, ती अशी - संगीतकार गुलाम हैदर यांनी एस. मुखर्जींना दीदींच्या आवाजातील काही गाणी ऐकवण्यासाठी फिल्मीस्तान स्टुडिओमध्ये बोलावलं होतं. त्यांनी काही गाणी ध्वनिमुद्रित केली आणि ती मुखर्जींना ऐकवली. त्यानंतर मुखर्जी म्हणाले, ‘हिंदी सिनेसृष्टीत हा आवाज चालणार नाही. हिचा आवाज खूप पातळ आहे.’ गुलाम हैदर चिडले आणि म्हणाले, ‘संगीत क्षेत्रात लता मंगेशकर सर्वश्रेष्ठ गायिका ठरू शकते. आज तुम्ही या गायिकेला नाकारताय, पण उद्या तुम्ही सगळे निर्माते तिच्या दारात रांग लावून उभे असाल!’ आणि त्यांचं ते भविष्य खरं ठरलं. १९४३ नंतर लतादीदी खूप मोठ्या गायिका झाल्या. दीदी फक्त मराठी-हिंदीसाठीच गाणी गात नव्हत्या, तर बंगाली, गुजराती, पंजाबी अशा अनेक भाषांमधून त्यांनी गाणी गायिली. अनेक भाषा त्यांना अवगत होत्या. लतादीदींचा आवाज हा मदनमोहन यांच्या गाण्यांचा आत्मा होता. त्या मदनमोहन साहेबांना ‘मदनभय्या’ म्हणत. त्यांची पहिली भेट झाली, ती बाॅम्बे टाॅकीजच्या ‘शहीद’ चित्रपटावेळी. अनेक गझलनुमा गाणी दीदींकडून गाऊन घेत मदनजींनी त्यांचं सोनं केलं होतं. लतादीदी आणि मदनमोहनजींची ‘लग जा गले..’, ‘आपकी नजरों ने समझा..’ अशी एक ना अनेक गाणी आहेत. ओ. पी. नय्यर आणि लतादीदी यांच्यातील वादाविषयी अनेक प्रवाद आहेत. ‘ओपीं’कडे लता मंगेशकरांनी एकही गाणं गायिलं नाही. चित्रपटसृष्टीतील हे एक आश्चर्य आहे, असं लाेक म्हणतात. इतकं असूनही ‘ओपी’ आघाडीचे संगीतकार म्हणून प्रसिद्ध होते. तसंच ‘अल्ला तेरो नाम, ईश्वर तेरो नाम’ हे संगीतकार जयदेव यांचं नितांत सुंदर गाणं आहे.

दीदींनी रफी साहेबांसोबत सर्वाधिक द्वंद्वगीते गायली आहेत. दीदी आणि किशोरकुमार यांची पहिली भेट फार रंजक आहे. लतादीदी त्या वेळी मालाडच्या बाॅम्बे टाॅकीजमध्ये रेकॉर्डिंगसाठी जात असत. मालाड स्टेशनवर उतरून पायी किंवा टांग्याने स्टुडिओकडे जात. एके दिवशी दीदी नेहमीप्रमाणे ग्रँट रोड येथून ट्रेनमध्ये चढल्या. पुढच्या स्टेशनला एक शिडशिडीत मुलगा त्याच डब्यात चढला अन् अगदी दीदींच्या जवळच बसला. तो दीदींकडे एकटक पाहत होता. दीदींना हे थोडंसं विचित्र वाटलं. त्या मालाड स्टेशनवर उतरल्या. त्यांच्यापाठोपाठ तो मुलगाही उतरला. त्याचा पिच्छा सोडवण्यासाठी दीदींनी टांगा केला अन् बाॅम्बे टाॅकीजकडे निघाल्या. त्या मुलानेही टांगा केला नि मागोमाग टाॅकीज गाठलं. तो मुलगा आपल्याच मागं आला आहे, असं त्यांना वाटलं आणि त्या धावतच एका रूममध्ये शिरल्या. तिथं संगीतकार खेमचंद प्रकाश बसले होते. दीदींनी त्यांना त्या मुलाबाबतचा सगळा प्रकार सांगितला. ‘हा मुलगा माझा पाठलाग करतोय,’ असं त्यांनी सांगितल्यावर खेमचंदजी हसले अन् म्हणाले, ‘अगं, हा या स्टुडिओचा मालक अशोककुमार यांचा भाऊ आहे. त्याचं नाव आभासकुमार आहे.’ हेच आभासकुमार पुढे किशोरकुमार बनले!

लेखक, क्रीडा समीक्षक द्वारकानाथ संझगिरी म्हणतात, ‘मी आस्तिक आहे. लोक मला विचारतात, देव कुठे आहे? मी म्हणतो, रविशंकर सतार वाजवतात तेव्हा तो मला त्यांच्या बोटात दिसतो. सचिन तेंडुलकर मैदानात फटके मारतो तेव्हा त्याच्या मनगटात दिसतो अन् लताबाई गातात तेव्हा देव त्यांच्या गळ्यात दिसतो!’ लता मंगेशकर आणि पंडित रविशंकर हे दोघेही ‘भारतरत्न’. पण, दीदींनी स्वत: एके ठिकाणी म्हटलंय की, आम्ही दोघे ‘भारतरत्न’ असलो, तरी पंडितजी माझ्यापेक्षा खूपच मोठे आहेत. ते एक विचारपीठ आहेत. ते सतार वाजवतात, तेव्हा देवाशी संवाद साधताहेत, असं वाटतं.

दीदी आज आपल्यात नाहीत, पण त्यांचं गाणं चिरतरुण आहे, चिरंतन आहे. ते झोपडीत अन॰ बंगल्यातही वाजतं. पुढेही साऱ्या विश्वात गुंजत राहील. कारण त्या सुरांना जात-धर्माची आवरणं नाहीत अन् भाषा, प्रदेशाची बंधनंही नाहीत. दीदींचं गाणं एखाद्या मोरपिसासारखं आहे. त्यात मृदुता आहे, माया आहे, ऋजुता आहे नि सात्त्विकताही आहे. बस! ते नुसतं ऐकत राहावं.. जगण्याला उभारी मिळण्यासाठी हे मोरपीस मनावरती अलवार फिरत राहावं... दीदींना त्यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त शतश: प्रणाम!

अशोक पत्की ashokpatki41@gmail.com

बातम्या आणखी आहेत...