आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
‘सरकारी शस्त्रे असलेल्या लोकांनी ती परत करावीत, अन्यथा त्यांच्यावर कारवाई केली जाईल,’ अशी दवंडी बिकरू गावातून पिटवली जात आहे. कानपूर शहरापासून केवळ ३५ किमी अंतरावरील हे गाव आधी पोलिसांची हत्या व नंतर गँगस्टर विकास दुबेच्या चकमकीमुळे चर्चेत आले आहे. गावाला आधीच छावणीचे रूप आले आहे. चकमकीनंतर गावात बंदोबस्तात वाढ झाली हाेती.
गावात सध्या दीडशेहून जास्त जवान उपस्थित आहेत. त्यांच्यासोबतच आता एन्काउंटरनंतर आरआरएफची तुकडीदेखील तैनात करण्यात आली आहे. घटनेत विकास व त्याच्या साथीदारांनी पोलिसांची शस्त्रे लुटली होती. पोलिस ही सरकारी शस्त्रे पुन्हा हस्तगत करण्याच्या प्रयत्नात आहेत. लोकांनी शस्त्राबद्दल पोलिसांना अद्यापही काही माहिती दिली नाही. त्यामुळेच पोलिसांना लाउडस्पीकरवरून इशारा द्यावा लागत आहे. तसे फेरफटका मारताना गावात भरून राहिलेला सन्नाटा जाणवतो. परंतु अनेक वेळा विचारल्यानंतर महिलांनी भीतीपोटी घरातील पुरुषांनी पलायन केल्याचे सांगितले. गावातील दोन डझनहूून जास्त घरे कुलूपबंद दिसतात. या घरांतील पुरुषांसह संपूर्ण कुटंुबाने गाव सोडले. पोलिस गावात चौकशी करत आहेत. गावाची लोकसंख्या १४०० आहे. सध्या विकासच्या फरार साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे. सुमारे ५०० मोबाइल क्रमांकावर निगराणी ठेवली जात आहे. एवढेच नव्हे तर आजूबाजूच्या ४-५ गावांत सुमारे २ हजार मोबाइल क्रमांकही निगराणीखाली आहेत. गावात पोलिसांनी प्रत्येक घरात जाऊन दोन-दोन वेळा चौकशी केली. विकासच्या दहशतीबद्दल शिबली न्याय पंचायतचे माजी अध्यक्ष लल्लन बाजपेयी म्हणाले, चौबेपूर, बिल्होर, बिठूर, शिवराजपूर व शिबलीसह कानपूरच्या सीमेवरील भागात एखाद्याला कारखाना, फार्महाऊस किंवा मोठा बंगला बांधण्यासाठी जमीन खरेदी करायची असल्यास विकास दुबेची परवानगी घ्यावी लागे. त्याच्या बदल्यात तो गुंडा टॅक्स वसूल करत होता. एखाद्याने चुकीने किंवा लपून खरेदी व्यवहार केल्यास त्याच्यावर विकासची टोळी हल्ला करायची. शिबलीचे एक व्यापारी म्हणाले, या भागातील चांगली किंमत देऊ शकणाऱ्या जमिनीवर विकास दुबे स्वत:चा बोर्ड लावत असे. त्याच्या बदल्यात मालकाला धमकावून पैशाची वसुली करायचा. जमिनीला वादग्रस्त करून त्याची खरेदी-विक्री करणे हेच त्याचे काम होते. वरिष्ठ पत्रकार अनुप वाजपेयी म्हणाले, विकासचा डोळा बिठूरवर होता. तेथे त्याने मोठा पैसा कमावला. बिठूर ऐतिहासिक व धार्मिकदृष्ट्या समृद्ध आहे. लव-कुश यांच्या वास्तव्याने पुनीत असलेले हे ठिकाण. इतिहासात राणी लक्ष्मीबाई राहिल्याचाही उल्लेख येतो.
या पार्श्वभूमीवर प्रदेशातील मोठमोठ्या व्यक्ती बंगला, फार्महाऊस इत्यादी येथे उभारत. विकास शेतकऱ्यांकडून जमिनीला बळकावयाचा आणि मोठ्या किमतीत तो विकायचा. गुंड विकासमध्ये संवेदना नसे. त्याला केवळ फायदा दिसायचा. गावात एक बुजुर्ग झन्नू बाबा राहत. ते एकटे होते. वयस्कर होते. त्यांच्याकडे जमीन होती.
काही दागिने त्यांनी शेतात लपवून ठेवले होते. त्याची माहिती गुंड विकासला मिळाल्यानंतर तो त्यांच्यामागे लागला. कागदावर अंगठा लावून घेण्यासाठी त्याने त्यांचा अंगठा कापला होता. गावातील एक ७२ वर्षीय बुजुर्ग म्हणाले, १९९४ मध्ये विकास दुबेवर पहिला गुन्हा दाखल झाला होता. त्याच्यावर हत्या, लूट इत्यादी प्रकरणांत गुन्हा दाखल होता. कन्नौजचा शेतकरी सरमन यांची हत्या केली होती. हा शेतकरी विकासला जमीन देण्यास तयार नव्हता. विकासने त्याची हत्या केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.