आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हबांग्लादेशात गाय तस्करीचा ग्राऊंड रिपोर्ट:कशा नेतात गाई, कितीला होते विक्री? वाचा सविस्तर...

लेखक: अक्षय बाजपेयीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केळीच्या झाडाच्या मोठ्या बुंध्यांमध्ये गायीची मान बांधलेली. पायाला करकचून दोरी बांधलेली. वरून केवळ गायीचे डोकेच दिसते, उर्वरीत भाग पाण्यात. अशा पद्धतीने पोहत, काही मिनिटांत गाय नदी पार करते. तिथे आधीच उभे असलेले लोक तिला बाहेर काढतात आणि बांग्लादेशात घेऊन जातात. गाय-वासरांना अशाच पद्धतीने पश्चिम बंगालमधून बांग्लादेशात पाठवले जात आहे. प्रत्येक गोष्टीसाठी कोडनेम ठरलेले आहे. तस्कर गायीच्या वासराला पेप्सी म्हणतात. तस्करीचा मास्टरमाईंड अनुब्रत मंडल असल्याचे सांगितले जाते. बीरभूमचे अनुब्रत तृणमूलचे नेते आणि ममता बॅनर्जींचे खास आहेत. CBI ने 11 ऑगस्ट रोजी अनुब्रत मंडलला अटक केली होती.
तस्करीचा व्यवसाय समजून घेण्यासाठी आम्ही भारत-बांग्लादेश सीमेवर पोहोचलो. इथे कळाले की, भारतात 30 हजारांत खरेदी केलेली गाय बांग्लादेशात दीड लाखांपर्यंत विकली जाते. रस्तापासून ते सीमेजवळील शेवटच्या गावापर्यंतची कहाणी तुम्हाला आम्ही सांगणार आहोत. वाचा हा खास एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट...

फोटो घ्यायला लागल्यावर पोलिसांनी थांबवले, चहावाल्याने तस्करीविषयी सांगितले
आमचा शोध कोलकात्यातून सुरू झाला. सूत्राने सांगितले की, मुर्शिदाबाद जिल्ह्यात सीमेवर जालंगी गाव आहे. हे गाव बांग्लादेशपासून 5 किमीपेक्षाही कमी अंतरावर आहे. इथे अनेक वर्षांपासून कॅटल स्मगलिंग होत आहे. म्हणून आम्ही पडताळणीसाठी जालंगीची निवड केली.
यासाठी कोलकात्याहून नॅशनल हायवे 34 वरून आम्ही निघालो. हा डालखोलापासून कृष्णानगरपर्यंत जातो. रस्त्यात नॉर्थ 24 परगणा जिल्ह्याच्या आमडांगा ब्लॉकमध्ये रस्त्याच्या किनाऱ्यावर एक टेम्पो दिसला. यात गाय-वासरू भरलेले होते.
टेम्पोजवळ दोन पोलिसही होते. आम्ही गाडी थांबवल्यावर पोलिस म्हणाले गाडी इथून पुढे घ्या, हा मेन रोड आहे.
आम्ही फेोटो-व्हिडिओ काढायला लागलो, तर पोलिसांनी फोन आत ठेवण्याचा इशारा करत लगेच पुढे जायला सांगितले. आम्ही थोडे पुढे गेलो आणि गाडी थांबवली. हे पाहून पोलिसही तिथे आले आणि म्हणाले, गाडी इथून घेऊन जा, इथे का थांबलात?
आम्ही पुढे गेलो आणि एका चहाच्या दुकानावर थांबलो. चहावाल्याने सांगितले की गाड्या गाय-वासरू घेऊन जातात. पोलिस यांच्याकडून लाच घेतात आणि पुढे जाऊ देतात. जे लाच देत नाही त्याची तपासणी होते.

बाजारात जनावरांचा सौदा, हिशोबासाठी मॅनेजर
थोड्या वेळाने तोच टेम्पो आमच्या समोरून गेला. आम्ही त्याच्या मागे कार लावली. तो नाडिया जिल्ह्यातील हरिंगघाटाच्या बिरोही गावात थांबला. इथे जनावरांचा बाजार भरतो. बाजाराच्या मॅनेजर रस्त्याच्या बाजूला टेबल-खुर्ची लावून बसलेला होता. तो सर्वांचा हिशोब ठेवतो. इथे गायीच्या खरेदी-विक्रीशिवाय सौदा करणारे एजंटही असतात.
मॅनेजरने आम्हाला फोटो-व्हिडिओ घेताना पाहिले आणि म्हणाला, तुम्ही कोण आहात, फोटो-व्हिडिओ का घेतले, लगेच डिलीट करा. त्याला दाखवण्यासाठी आम्ही एक-दोन फोटो डिलीट केले आणि पुढे निघालो. बिरोहीपासून सुमारे दोन तास प्रवासानंतर आम्ही जालंगीला पोहोचलो.
आता वाचा जालंगीची कहाणी...
खबऱ्या म्हणाला - माझा आवाजही बदलून टीका...

आता जी कहाणी मी सांगणार आहे, तिचे तीन पात्र आहेत. पहिले आहे भारत-बांग्लादेश सीमा, जिथून तस्करी होते. दुसरे आहे BSF चे इंटेलिजन्स अधिकारी, ज्यांनी आम्हाला पूर्ण माहिती दिली. पण नाव टाकू नका असे सांगितले.
तिसरा आहे खबऱ्या, जो गावातच राहतो आणि CID-CBI सारख्या संस्थांकडून कमिशन घेऊन त्यांना माहिती देतो. त्याने चेहरा लपवून व्हिडिओत काही गोष्टी सांगितल्या. पण नाव आणि ओळख सांगण्यास मनाई केली. झाल्यास माझा आवाजही बदला असेही तो म्हणाला.

सीमेचा बहुतांश भाग खुला, एका पॉईंटवर केवळ दोन जवान
जालंगी गाव पद्मा नदीच्या किनारी वसले आहे. पद्मा बांग्लादेशच्या मोठ्या नद्यांपैकी एक आहे. बांग्लादेशचे कुष्ठीया, पबना आणि राजशागी जिल्हे तिला लागून आहेत. भारतात ती मुर्शिदाबादमधून वाहते. अनेक वर्षांपासून याच नदीतून कॅटल स्मगलिंग होत आहे. नदी काही ठिकाणी अरूंद तर काही ठिकाणी विस्तीर्ण आहे. कुठे प्रवाह वेगवान तर कुठे मंद आहे.
पावसानंतर काही ठिकाणी ती कोरडीही होते. नदी क्रॉस केल्यानंतर काही पावले चालल्यावर बांग्लादेश सुरू होतो. आम्ही नदीकिनारी पोहोचल्यावर बघितले की, सीमेचा बहुतांश भाग खुला आहे. काही भागावरच फेन्सिंग लावलेले आहे.
बॉर्डर सिक्युरिटी फोर्स म्हणजेच BSF इथे तैनात आहे. पण एका ऑब्झर्व्हेशन पॉईंटवर दोनच जवान असतात. यांना अर्धा ते एक किमीपर्यंतचा भाग सांभाळावा लागतो. अशात तस्करी थांबवणे यांच्यासाठी जवळपास अशक्य असते.

नदीत प्रवाह वेगवान असल्यावर तस्कर जास्त अॅक्टिव्ह असतात
गाईंना नदी पार करण्यासाठी तस्कर केळीच्या बुंध्यांचा वापर करतात. गाईला केळीच्या बुंध्याला बांधून पाण्यात फेकून दिले जाते. नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर आधीच उभे असलेले लोक तिला काढून बांग्लादेशमध्ये घेऊन जातात.
BSF च्या एका इंटेलिजन्स अधिकाऱ्याने आम्हाला याचा व्हिडिओ दाखवला. व्हिडिओत दोन वासरांना बुंध्यांना बांधलेले होते. त्यांचे पाय बांधलेले होते. बुंधा मधोमध फाडून त्यात त्यांचे डोके अडकवून नदीत फेकण्यात आले. जवानांची नजर त्याच्यावर पडल्यावर ते त्यांना किनाऱ्यावर घेऊन आले. दोरी सोडून त्यांना कँपमध्ये ठेवण्यात आले.
अधिकारी म्हणाले की, जनावरांची तस्करी रात्री होते. वेळ आणि जागा बदलत असते. अनेकदा दिवसाही तस्करीचा प्रयत्न होतो. जेव्हा नदीचा प्रवाह वेगवान असतो तेव्हा तस्कर जास्त अॅक्टिव्ह असतात. कारण तेव्हा निगराणी कठिण असते, जवानही सीमेवर राहू शकत नाही.

गावातील लोकांकडून ताग आणि केळीची शेती करवून घेतात तस्कर
आम्ही घटनास्थळावर होतो, तेव्हा गावातील अनेक लोक नदी क्रॉस करून दुसऱ्या किनाऱ्याकडे जाताना दिसले. त्यांच्याशी बोलल्यावर ते म्हणाले, शेती करायला जातो. इथे केळी आणि ताग लावले जाते. इंटेलिजन्स अधिकाऱ्यांनुसार, तस्करच गावातील लोकांना ताग आणि केळीची शेती करायला लावतात, कारण यात लपणे सोपे होते. याबदल्यात ते गावातल्या लोकांना पैसे देतात.
BSF च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले की, आधी मोठ्या प्रमाणात गाई यायच्या तर रात्री आमचे जवान त्यांना थोपवू शकत नव्हते कारण, तस्करांची संख्या जास्त असायची आणि जवानांची कमी. दीड ते दोन हजार गायी एकत्र आणि त्यांच्यासोबत 300 ते 400 तस्कर.
तस्कर गायी पळवत त्यांना नदीत उडी टाकायला लावायचे आणि सहज पोहून दुसऱ्या बाजूने निघून जायचे. त्यांच्याकडे बॉम्ब, पिस्तूल असायची. ते घोळक्यात असायचे आणि हल्लाही करायचे. 2018 पासून गाईंची तस्करी कमी झाली आहे, पण वासरांची मागणी वाढली आहे. त्यांना केळ्याच्या बुंध्याला बांधून नदी पार केली जाते, जेणेकरून ते पाण्यात बुडू नये.

ही तर झाली कोलकाता ते जालंगीपर्यंतची कहाणी, आता जाणून घ्या असे का होत आहे आणि यामागे कोण आहे...
पडताळणीत दिसून आले की या नेक्ससमध्ये तस्कर, पोलिस, कस्टम आणि BSF चा सहभाग आहे. जाणून घ्या कुणाचा काय रोल आहे...

भारतीय कंपन्यांचे नेटवर्क मिळाल्याचा फायदा
खबऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बांगलादेशातील लोकांकडे भारतीय कंपन्यांचे सिम आहेत. नदी ओलांडल्यानंतरही भारताचे नेटवर्क 3 ते 4 किमीपर्यंत येते. फोनवरूनच ते एकमेकांना सिग्नल देतात.

भारतातून पाठवलेल्या गाय आणि वासरावर काही खुणा केल्या जातात. नदीच्या पलीकडे उभ्या असलेल्या लोकांना याबद्दल सांगितले जाते. तो खूण ओळखतो आणि जनावर नेतो. जालंगीच्या घोषपाडा, रायपाडा, मुरादपूर, सरकारपाडा येथूनही तस्करी होत आहे. या चार-पाच गावात सुमारे तीन हजार लोक राहतात. यातील सुमारे 200 लोक तस्कर टोळ्यांशी संबंधित आहेत.

अनुब्रत मंडलच्या अटकेनंतर तस्कर अधिक सतर्क झाले आहेत. ते आता रोजच्या ऐवजी आठवड्यातून-15 दिवसांतून एकदा तस्करी करत आहेत.

तस्करीची अर्थव्यवस्था, दरवर्षी दीड लाख गाईंची स्मगलिंग
BSF अधिकारी आणि खबऱ्यांच्या माहितीनुसार, गाईची किंमत आकार आणि संख्येवरून निश्चित होते. मोठ्या गाईची 30 हजार ते 70 हजार रुपयांत खरेदी होते. एखादा मध्यस्थ शेतकऱ्यांकडून ती घेतो. 15 ते 20 हजार कमिशन घेऊन तस्करांना विकतो. बांग्लादेशमध्ये ती एक ते दीड लाखांत विकली जाते. ईदच्या वेळी याच्या किंमती अनेक पट वाढतात.
तस्करी करून आणलेल्या 100 पैकी 15-20 गाई म्हशी पकडून हे दाखवण्याचा प्रयत्न होतो की तस्करांना पकडे जात आहे. याविषयी आम्ही जालंगी पोलिस ठाण्याचे कर्मचारी, BSF चे जवान आणि अधिकाऱ्यांशी बोलायचा प्रयत्न केला. पण त्यांनी ऑन रेकॉर्ड बोलण्यास नकार दिला. ऑफ रेकॉर्डच ते बोलले.

BSF चे DIG अमरीश आर्या, मुर्शिदाबाद जिल्ह्याचे SP सबरी राज कुमार आणि जालंगी पोलिस ठाण्याचे इन्चार्ज कॅटल स्मगलिंगवर म्हणाले की, तस्करी तर होत आहे पण आधीपेक्षा हे कमी झाले आहे. आता कॅटलपेक्षा ड्रग्सची तस्करी जास्त होत आहे.
गायच नव्हे, जालंगी ड्रग्स तस्करीचाही अड्डा
भारत-बांग्लादेश सीमेवरून कॅटल स्मगलिंगशिवाय ड्रग्सचीही तस्करी होत आहे. ड्रग्स तस्करीचा मार्गही जालंगीतूनच जातो. पुढची एक्सक्लुसिव्ह स्टोरी यावरच असेल. यात आम्ही सांगू की, सीमेपलिकडे ड्रग्स कसे पोहोचवले जात आहे. तस्कर किती कमवत आहेत आणि कोणते ड्रग्स पाठवले जात आहे आणि मुली कसे यात करिअर करत आहेत...

बातम्या आणखी आहेत...