आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Resumption Of Vaishnodevi Yatra After 5 Months, Shriganesha With Special Worship At Guha Temple; 200 Reached, All Tested

भास्कर ग्राउंड रिपोर्ट:5 महिन्यांनंतर वैष्णोदेवी यात्रेस पुन्हा प्रारंभ, गुहा मंदिरात विशेष पूजेने श्रीगणेशा; 200 जण पोहोचले, सर्वांची चाचणी

मोहित कंधारी | कटराएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रोपवे, हेलिकॉप्टर, ई-वाहन सेवा सुरू, घाेडा पिट्टू व पालखी सेवा बंद
  • मार्गातील सर्व हॉटेल-दुकाने बंद, काही जागी लंगरची व्यवस्था

जवळपास ५ महिन्यांनंतर माता वैष्णोदेवी यात्रा मार्ग “जय माता दी’च्या जयघोषात दुमदुमला. यात्रा सुरू होण्याआधी देवस्थान मंडळाने पवित्र गुहेत विशेष पूजा केली. पहिल्या दिवशी जम्मू-काश्मीरच्या विविध भागांतून दर्शनासाठी २०० यात्रेकरू पोहोचले. १३ किमीच्या मार्गाच्या प्रवेशद्वारावर (बाणगंगानजीक)प्रत्येक यात्रेकरूची कोविड-१९ अँटिजन चाचणी करण्यात आली. अहवाल निगेटिव्ह आल्यानंतरच त्यांच्या यात्रेस मंजुरी देण्यात आली.

अखनूरहून दर्शनासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या गटाने सांगितले की, खूप दिवसांपासून मातेच्या दर्शनासाठी आतुर होतो. मंदिर उघडण्याची माहिती मिळताच ऑनलाइन नोंदणी केली आणि येथे आलो. मंदिर मार्गावर ठिकठिकाणी ध्वनिक्षेपक प्रणाली लावली आहे. त्यात यात्रेकरूंना मास्कचा वापर आणि लोकांमध्ये ठरावीक अंतर राखण्याचा संदेश दिला जात आहे. याशिवाय हात निर्जंतुक करण्यासाठी पॉइंट स्थापन केले आहेत.

जम्मूहून आलेल्या नवविवाहित जोडप्याने सांगितले की, लग्नानंतर मां वैष्णोदेवीचे दर्शन घेण्याची इच्छा होती. मात्र, टाळेबंदीमुळे ते शक्य होत नव्हते. आज आम्ही पवित्र गुहेतील मातेचे दर्शन आणि आशीर्वाद घेण्यासाठी जात आहोत. यात्रेकरूंच्या सुविधेसाठी बॅटरीवरील वाहन, रोपवे आणि हेलिकॉप्टर सुविधा चालू आहे. घोडा पिट्टू आणि पालखी पालखीला परवानगी दिली नाही. मात्र, खराब हवामानामुळे पहिल्या दिवशी हेलिकॉप्टर सेवा सुरू होऊ शकली नाही. ताराकोट मार्गावर मोफत लंगर आणि संजीघाटात प्रसाद केंद्र सुरू आहे. कटरा, अर्धकुमारी आणि भवनमध्ये भोजनालये उघडली आहेत. मात्र, यात्रा मार्गावर मेडिकल दुकाने वगळता अन्य सर्व प्रतिष्ठाने बंद राहिली. हॉटेल संघटनेचे अध्यक्ष राकेश वजीर म्हणाले, आम्ही देवस्थान मंडळासोबतच्या बैठकीत यात्रेकरूंची संख्या वाढवण्याची मागणी केली आहे. एवढ्या कमी संख्येत हॉटेल चालवणे शक्य नाही.कटरा आणि बाणगंगादरम्यान गाडी चालवणारे रविकुमार म्हणाले, आमचे गेले ५ महिने खूप खडतर गेले. आता यात्रा मार्ग सुरू झाल्यामुळे देवस्थान मंडळ यात्रेकरूंची संख्या वाढवण्यावर विचार करेल, अशी आशा आहे. मंडळाने सकारात्मक निर्णय घेतल्यास आमच्यासारख्या लोकांना काम मिळू शकेल.

अटका आरतीसह सर्व विशेष पूजेवर तूर्त स्थगिती

> ऑनलाइन नोंदणीवर प्रवेश मिळेल. कोरोना चाचणी अहवाल घेऊन यावा लागेल. {पोहोचल्यावर रॅपिड टेस्ट होईल. आरोग्य सेतू अॅप ठेवावे लागेल.

> १० वर्षांपेक्षा कमी वय, गर्भवती, ६० पेक्षा जास्त वयाच्या लोकांना यात्रा न करण्याचा सल्ला.

> मंदिर परिसरातील गर्दी रोखण्यासाठी अटका आरती, श्रद्धासुमन विशेष पूजा बंद आहे.

> घोडा पिट्टू व पालखी सेवा स्थगित केली आहे. {भाविक पारंपरिक मार्गाने अर्धकुमारीहून गुहा मंदिरात पोहोचत आहेत.

बातम्या आणखी आहेत...