आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी शॉर्टफिल्म:आभासी विश्व अन् वास्तवाचं भान...

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

लॉकडाऊनमध्ये मोबाईलच्या वापरात झालेला बदल विस्मयकारी होता. सगळे घरात कोंडलेले, स्क्रोलिंग करत बसलेले. त्या पुढच्या स्थितीच्या विचाराने मेंदूत जणू वीज सळसळत गेली. आणि याच विषयावर शॉर्टफिल्म करायची असं ठरवलं. मोबाइलच्या स्क्रीनवरुन बोट पुढं सरकत जावं अन् एखाद्या खिळवणाऱ्या पोस्टवर थांबावं, तसं मनाच्या पटलावर उमटलेल्या एका नावापाशी येऊन विचार थांबले.. ‘स्क्रोल स्क्रोल’..! नाव तर ठरलं, आता फिल्म बनवायची होती..

कोरोना महामारीनं भयंकर अनुभव दिले, आजही तिची भयावहता संपलेली नाही. गेल्या वर्षी एकीकडं कोरोनाची पहिली लाट थडकलेली आणि दुसरीकडं लॉकडाऊनने आयुष्याची घडी विस्कटलेली, असे दुहेरी संकट ओढावले. त्या अस्वस्थ काळात सगळे जण घरात सक्तीने कोंडले गेलो होतो. काही जण दिवसभर टीव्हीसमोर. उरलेले मोबाइलवर. आता टीव्हीवर काही नवं नाही, हे लोकांना काही दिवसांनी समजलं. एक तर तेच सिनेमे आणि भीती दुप्पट करणाऱ्या बातम्या. त्यामुळं टीव्ही पाहणारे हळूहळू मोबाइलवर शिफ्ट झाले. ही दुनियाच वेगळी. साऱ्यांकडून मोबाइलचा वापर प्रचंड वाढला. माझ्या आईला अँड्रॉइड मोबाइलवर कॉल घेणं कठीण वाटायचं. मात्र, लॉकडाऊन संपेपर्यंत ती मोबाइल वापरण्यात पटाईत झाली. आता तर ती स्वयंपाक करतानाही मोबाइल सोडत नाही ! प्रत्येकाचं असं मोबाइलवर सतत स्क्रोलिंग सुरू असतं.

मोबाइलमध्ये इतकं गुंतण्यानं त्याच्या चांगल्या- वाईट परिणामांकडं दुर्लक्ष झालं. खरं तर कोरोना आणि लॉकडाऊननं सगळा मेंदू चोक अप् केला होता. पण, हा बदल विस्मयकारी होती. तो मला आतून ढुसण्या देऊ लागला. सगळे घरात कोंडलेले, स्क्रोलिंग करत बसलेले दिसू लागले. त्या पुढच्या स्थितीच्या विचाराने मेंदूत जणू वीज सळसळत गेली. आणि याच विषयावर शॉर्टफिल्म करायची असं ठरवलं. मोबाइलच्या स्क्रीनवरुन बोट पुढं सरकत जावं अन् एखाद्या खिळवणाऱ्या पोस्टवर थांबावं, तसं मनाच्या पटलावर उमटलेल्या एका नावापाशी येऊन विचार थांबले.. ‘स्क्रोल स्क्रोल’..! नाव तर ठरलं, आता फिल्म बनवायची होती..

लॉकडाऊनमध्ये पूर्ण टीम घेऊन फिल्म करणं शक्य नव्हतं. मग करायचं काय? म्हणतात ना, इच्छा तिथं मार्ग ! मग एक पात्र घेऊन हा लघुपट करायचं ठरवलं. त्यानुसार कथेला वळण दिलं. आपल्याला जे वाटतंय, जे सुचलं ते त्या फॉर्ममध्ये सांगणं महत्त्वाचं. माझंही तसंच झालं. माझी बहीण रोहिणी गाडगे हिला आयुष्यात एकदा तरी अॅक्टिंग करायची इच्छा होती. त्यामुळं फिल्मची सारी कथा मी स्त्री पात्राभोवती गुंफली. सुरूवातीला मोबाइलवर शूट करायचा विचार होता. पण, घोडं पेंड खाल्लं. मला हवं ते त्यातून मिळत नव्हतं. त्यात माझा जास्त अनुभव डीएसएलआर कॅमेऱ्याचा. पण, सब्र का फल मिठा होता है म्हणतात, तसंच झालं. काही दिवसांनी लॉकडाऊन शिथिल झाला. माझा मित्र प्रणव बहादुरेने कॅमेऱ्यासाठी जुगाड करत तो मिळवून दिला. फिल्म तशी खूप लहान, त्यामुळं ती करताना खूप अवघड वाटलं नाही. फक्त तिघांनी मिळून ती पूर्ण केली.

स्वतंत्र निर्मिती करायची म्हटलं, की बजेटचा प्रश्न आ वासून उभा राहतो. पण, मी कथेनुसार सर्व गोष्टी पार पाडल्याच नाहीत. बजेट, लोकेशन आणि इतर सर्व जे सहजशक्य आहे, जवळपास आहे, त्यातच भागवलं. भागवलं की होतंय, याचा वेगळाच अनुभव आला. कथा सुचणं आणि ती मांडणं या दोन्ही गोष्टी चित्रपट माध्यमात खूप वेगळ्या अंगानं येतात. या माध्यमात एखादी कथा सांगताना तिची पटकथा, चित्रीकरण, ध्वनिमुद्रण, संकलन यांचा वापर सर्वांना समजेल, असा करावा लागतो. मी तेच केलं. फिल्ममध्ये मोबाइलचा वापर करावा की करू नये, या भानगडीत शिरलोच नाही. फक्त काय घडते आहे आणि काय घडू शकतं यावर भर दिला. हा लेख वाचण्यासाठी तुम्हाला जितका वेळ लागेल, अगदी तितक्याच वेळात ‘स्क्रोल स्क्रोल’ तुम्हाला काही तरी वेगळं सांगेल. मोबाईल आणि समाज माध्यमांच्या अतिवापरामुळे आभासी विश्वात अनाठायी अडकून पडणाऱ्या प्रत्येकाला ती वास्तवाचं थोडंफार भान नक्कीच देईल...

आगळवेगळं शूट...
या शॉर्टफिल्ममध्ये सर्वांत महत्त्वाची गोष्ट होती व्हीएफएक्स. त्याशिवाय ही फिल्म झालीच नसती. आमच्या टीममध्ये व्हीएफएक्सची पूर्ण जबाबदारी रोहन इंगळे सांभाळतो. त्याला थोडं चार्ज केलं, चर्चा केली. व्हीएफएक्स कशाप्रकारे करता येतील, ते जास्त परिणामकारक कसे ठरतील, यावर बराच काथ्याकूट झाला. व्हीएफएक्ससाठी शॉट कसे घ्यायचे, हे रोहननं सांगितलं. लॉकडाऊनमध्ये प्रत्येक वेळी गाठीभेटी शक्य नव्हत्या. त्यामुळं शूटिंग सुरू असताना रोहनचा व्हिडिओ कॉल यायचा. त्यावर तो मार्गदर्शन करायचा. असं हे आगळंवेगळं शूट. त्याचा अनुभवही कायम लक्षात राहणारा आहे.

रोहित गाडगे (लेखक, दिग्दर्शक)
संपर्क: ९०९६८०३७९०

बातम्या आणखी आहेत...