आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Roja From Hindus, Pillar Of Unity In The Village From Muslim Palanquin; Dargah Of Hazrat Kamarali Durvesh In Khed Shivapur Is A Symbol Of Hindu Muslim Unity Across The Country

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:हिंदूंकडून रोजे, मुस्लिमांच्या पालखीतून गावात एकतेचा मिनार; खेड-शिवापूरमधील हजरत कमरअली दुर्वेश यांचा दर्गा देशभरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक

मंगेश फल्ले | पुणे3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • श्रावण आणि आषाढ महिन्यात दर्ग्याच्या वतीने पाच पालख्यांची ग्रामफेरी केली जाते

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यातील पत्रापत्री मुख्यत: चर्चेत आहे ती मंदिरे उडवण्यावरून राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या शरसंधानामुळे. मंदिरे दर्शनासाठी खुली करण्याचा विषय राज्यपालांनी हिंदुत्वाशी जोडल्यापाठोपाठ काही मंडळींनी धार्मिक स्थळांची सांगड ‘सेक्युलॅरिझम’शी घालण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र, पुरोगामी महाराष्ट्रात ठिकठिकाणी अशी उदाहरणे दिसतात की, एखाद्या धर्माच्या पवित्र स्थळी अन्य धर्मीय लोकसुद्धा तेवढ्याच श्रद्धेने आणि भक्तिभावाने हजेरी लावत असतात. राज्यपाल आणि मुख्यमंत्री यांच्यातील पत्रयुद्धाच्या पार्श्वभूमीवर अशा काही वैशिष्ट्यपूर्ण धार्मिक स्थळांचा परिचय...

पुणे-सातारा रस्त्यावरील खेड-शिवापूर येथील हजरत कमरअली दुर्वेश यांचा दर्गा हा देशभरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानला जाताे. मुस्लिम भाविकांसाेबतच हिंदूधर्मीय येथे दर्शनास येतात. रमजानच्या काळात गावातील हिंदू कुटुंबीयांकडून पाच दिवसांपासून २१ दिवसांपर्यंत राेजे धरले जातात. तसेच श्रावण आणि आषाढात दर्ग्याच्या वतीने पालखीचे आयोजनही केले जाते.

सुमारे ८५० वर्षांपूर्वी हजरत कमरअली दुर्वेश हे खेड-शिवापूर येथे स्थायिक झाले आणि नंतरच्या काळात त्यांचा दर्गा निर्माण झाला. खेड-शिवापूर येथे दाेन उरूस हाेतात, त्यापैकी पहिला गुढीपाडव्याच्या दिवशी असताे. यात दाेन्ही धर्मांतील लाेक सामील हाेतात. हनुमान जयंतीनंतर येणाऱ्या पहिल्या गुरुवारपासून पुढे पाच दिवसांचा उरूस पार पडताे. त्यात पालखी, अभिषेक, कव्वाली, कुराण पठण, नमाज आदी कार्यक्रम होतात. दर्ग्यातील गायमुखामधून वर्षभर पाणी पडते आणि त्या पाण्याचा गुण अनेक भाविकांना आतापर्यंत आल्याची भाविकांची श्रद्धा आहे. हिंदूधर्मीयांत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या श्रावण आणि आषाढ महिन्यात दर्ग्याच्या वतीने पाच पालख्यांची ग्रामफेरी केली जाते. आषाढी एकादशीनंतरच्या काल्याच्या दुसऱ्या दिवशीसुद्धा पालखी निघते. त्यातील एक पालखी राेगराई समाप्त व्हावी या उद्देशाने जवळपासच्या १० ते १२ गावांत पारंपरिक पद्धतीने अनेक वर्षांपासून जाते.

दर्ग्याला पारंपरिक महत्त्व

खेड-शिवापूरचे माजी ग्रामपंचायत सदस्य शफिक जाफरभाई तांबाेळी यांनी सांगितले की, हा ऐतिहासिक दर्गा आहे. दाेन्ही धर्मांतील लाेक या ठिकाणी नवस बाेलतात. लाेकांचे प्रश्न सुटत असल्याने त्यांची अधिक श्रद्धा आहे. हिंदूंचे आणि मुस्लिमांचे सण गावातील लाेक सक्रिय सहभागाने पार पाडतात.

दर्ग्याच्या उपवासाने समाधान

आमच्या गावातील हजरत कमरअली दुर्वेश यांचा दर्गा हा प्राचीन असून अनेक वर्षांपासून सर्वधर्मीय लाेक या ठिकाणी दर्शनास येतात. रमजानमध्ये आम्ही २१ दिवसांचा उपवास करत असताे. दर्ग्यावरील श्रद्धेमुळे आम्ही उपवास करत असून उपवास केल्यानंतर आंतरिक समाधान आम्हास लाभते. - बेबी काेंडे व संगीता काेंडे, खेड-शिवापूरच्या रहिवासी

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser