आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इस्लामपूरचे 'रँचो' शेतकऱ्यांचे 'सारथी':रोलिंग सपोर्ट बैलगाडीसाठी वरदान; मुक्या जीवांचे ओझे हलके

अनिकेत दिलवाले6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अफलातून कल्पना डोक्यात असली की, ती पूर्णत्वास नेल्याशिवाय शांत बसणे मुळातच एक गुन्हा असतो. आर.आय.टी ऑटोमोबाइलचे विद्यार्थी मात्र, या गुन्ह्यास पात्र ठरत नाहीत. मेहनत, चिकाटी आणि जिद्द जर असली, तर कल्पना सत्यात उतरायला वेळ लागत नाही. थ्री इडियट्स फिल्ममध्ये रँचो त्याच्या अभियांत्रिकी अभ्यासातून काही संशोधने करतो. अशाच काही रँचोंनी त्यांच्या कल्पनेतला आविष्कार खरा करून दाखवला. इस्लामपूरच्या या विद्यार्थ्यांनी त्यांच्या अफलातून कल्पनेतून जन्म दिला शेतकऱ्यांच्या नव्या 'सारथी'ला.

शेतीशी जोडलेली नाळ...

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर मधल्या 'राजारामबापू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी'च्या (R.I.T) काही विद्यार्थ्यांनी हा आगळा-वेगळा प्रयोग केला. आपल्या देशात शेतीला मोठे महत्त्व आहे, पण तेच महत्त्व शेती कसणाऱ्या शेतकऱ्याला व त्याच्या सारथीला म्हणजेच बैलाला मुळातच नाही. आर.आय.टी. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा शेजारीच असणाऱ्या राजारामबापू सहकारी साखर करखान्याशी नेहमीच संबंध येतो. महाविद्यालयातले अनेक विद्यार्थी शेतकरी कुटुंबातले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मेहनतीची जाण त्यांना नेहमीच आहे. ऑटोमोबाइल इंजिनिअरिंग विभागाच्या शेवटच्या वर्षात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कॅपस्टन प्रोजेक्ट करावा लागतो. ज्यात विविध संकल्पनांवर त्यांना काम करण्याची संधी मिळत असते.

सारथीच्या प्रवासाला सुरुवात...

महाविद्यालयातील सौरभ भोसले, आकाश कदम, निखिल तिपायले, आकाश गायकवाड आणि ओमकार मिरजकर हे विद्यार्थी सुद्धा प्रोजेक्टच्या शोधात होते. अनेक संकल्पनांचे थैमान डोक्यात सुरू असताना, जानेवारी 2021 मध्ये या विद्यार्थ्यांना एक भन्नाट कल्पना सूचली. या प्रोजेक्टमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सौरभ भोसले या विद्यार्थ्याने आम्हाला 'सारथी'चा प्रवास सांगितला. जानेवारी महिन्यात साखर कारखान्याचे सीझन सुरू असल्याने महाविद्यालयासमोरून ऊसाने भरलेल्या अनेक बैलगाड्या जात असत. त्यातच रस्त्यावर असलेली गतिरोधके बैलगाड्यांसाठी चिंतेची बाब ठरत होती.

'रोलिंग सपोर्ट'ची सुचली कल्पना...

काही टन ऊस घेऊन गतिरोधक ओलांडणे बैलगाड्यांसाठी आव्हानात्मक ठरत असे. विद्यार्थ्यांच्या डोळ्यादेखत ऊसाने खचाखच भरलेल्या बैलगाडीच्या बैलाचा पाय गतिरोधकावरून घसरला. तो बैल जागीच बसला. त्याच्या मानेवर उसाचे भले मोठे ओझे होते. ते ओझे घेऊन बैलाला पुन्हा उभा राहणे शक्य होईना, शेतकऱ्याने विद्यार्थ्यांच्या मदतीने शक्य ते प्रयत्न केले. मात्र, या सर्व प्रयत्नात बैलाला दुखापत झाली. बैलाची यातना, त्याच्या वेदना शेतकऱ्यासोबतच सौरभला आणि त्याच्या मित्रांना सुद्धा जाणवत होत्या. कदाचित शहरात राहणाऱ्या आणि बैलगाडीशी कधीही संबंध न येणाऱ्यांना ती भावना लक्षात येणार नाही. परंतु शेतीशी कुठे ना कुठे संबंध असल्याने विद्यार्थ्यांपर्यंत ती भावना पोहोचली. बैलाच्या पायाला झालेली दुखापत बाजूला ठेवून त्याला उठवण्यासाठी नकळतपणे त्याच्यावर होणारा अत्याचार विद्यार्थ्यांनी डोळ्यांनी पाहिला. वास्तविक येथूनच सारथीच्या प्रवासाला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. विद्यार्थ्यांना आता एकच प्रश्न भेडसावत होता. बैलाच्या मानेवरचे ओझे नेमके कमी कसे होणार? रोलिंग सपोर्टच्या रूपाने त्यांना उत्तर मिळाले.

आपल्या प्राध्यापकांना ही कल्पना पटवून सांगणे आणि ती सत्यात उतरवणे हे विद्यार्थ्यांसमोरील मोठे आव्हान होते. ऑटोमोबाइल विभागाच्या प्राध्यापक डॉ.सुप्रिया सावंत यांच्याकडे विद्यार्थी आपली कल्पना घेऊन पोहोचले. कल्पना मुळातच भन्नाट होती. परंतु विद्यार्थ्यांना त्याबाबत किती गांभीर्य आहे, हे तपासण्यासाठी सावंत यांनी विद्यार्थ्यांना गोंधळून टाकणारे काही प्रश्न विचारले. तांत्रिकदृष्ट्या विद्यार्थी त्या प्रश्नांना उत्तर देण्यात अपयशी ठरले. मात्र, विद्यार्थ्यांची आत्मियता, प्रामाणिकता आणि मुक्या जनावरासाठी असलेली तळमळ विद्यार्थ्यांच्या डोळ्यात सावंत यांना दिसली. या प्रामाणिकतेच्या जोरावर त्यांना यश नक्कीच गाठता येईल, हा विश्वास सावंत यांच्या मनात ठाम बसला.

सारथीच्या संशोधनाला सुरुवात...

सारथी प्रोजेक्टच्या टीममधील अनेक विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातले होते. पश्चिम महाराष्ट्रातील असल्याने त्यांनी पूर्वीपासूनच शेतीला आणि शेतकऱ्यांना जवळून अनुभवले होते. शेवटी ठरल्याप्रमाणे विद्यार्थी या प्रोजेक्टच्या कामाला लागले. आजवर बैलगाडीला तिसरे चाक कदाचित कुणी पाहिले देखील नसेल. ऊस तोडीच्या हंगामात विद्यार्थी अनेक लोकांना भेटले. राजारामबापू साखर कारखानाच नव्हे तर इतर कारखान्यांमध्ये जाऊन सुद्धा त्यांनी या विषयी माहिती गोळा करण्यास सुरुवात केली. मुळात बैलगाडीतून ऊस वाहत असताना अशा कित्त्येक समस्यांना शेतकरी तोंड देत होते. महत्त्वाचे म्हणजे बैलांना होणाऱ्या त्रासाला कोणीही समस्या म्हणून पाहत नव्हते, सोबतच वेळोवेळी या समस्येकडे दुर्लक्ष करण्यात आले, ही गोष्ट विद्यार्थ्यांच्या अभ्यासातून समोर आली. मात्र, संशोधन केवळ एवढ्यावरच थांबले नाही तर विद्यार्थ्यांच्या मनात अनेक प्रश्न व शंका आता घर करू लागल्या होत्या. मात्र, या शंकांनाच आव्हान समजत विद्यार्थी प्रोजेक्टसाठी सज्ज झाले.

मेकॅनिकल फेल्युअरचा अडथळा...

येत्या एक वर्षात हा प्रोजेक्ट पूर्ण करायचा आणि या प्रोजेक्टमुळे बैलाच्या मानेवरील किमान 70 ते 80 टक्के भार कमी व्हायलाच हवा, या दोन ध्येयांना समोर ठेवत सारथीला सुरुवात झाली. मात्र, यासाठी योग्य तो मार्ग सापडत नव्हता. यातूनच बैलाला जर तिसरे चाकच आपण लावले तर बैलांवरील काही टन भार नक्कीच कमी होऊ शकेल ही कल्पना विद्यार्थ्यांना सूचली. बैलगाडीसाठी हा रोलिंग सपोर्ट बनवत असताना तो केवळ प्रोजेक्ट राहिला नव्हता, तर समाजाचे काहीतरी दायित्व म्हणूनही आर.टी.आय.चे विद्यार्थी काम करत होते. यानंतर पुढची पायरी होती ती डिझाईनिंगची. रोलिंग सपोर्टचे डिझाईन पूर्ण करून विद्यार्थ्यांनी ते बनवायला सुरुवात केली. डिझाईननुसार रोलिंग सपोर्ट तयार झाले. त्यांचा पहिला प्रयोगही विद्यार्थ्यांनी पूर्ण केला. परंतु यशाचे शिखर गाठताना इतरांप्रमाणे त्यांना देखील अपयश आले. अभियांत्रिकी भाषेत मेकॅनिकल फेल्युअर आल्यामुळे पहिला प्रयोग यशस्वी झाला नाही.

यशस्वी प्रयोगाकडे वाटचाल...

तांत्रिकदृष्ट्या या रोलिंगमध्ये अनेक बदल करत विद्यार्थ्यांनी 18 फेब्रुवारी 2022 रोजी रोलिंग सपोर्टचा यशस्वी प्रयोग केला. प्रयोग करत असताना समाजातले कुतूहल समोर येत होते. पहिल्याच प्रयोगावेळी (टेस्टिंग) प्रत्यक्ष एका शेतकऱ्यासोबत रोलिंग सपोर्ट काम करणार होते. शेतकऱ्याच्या मनात अनेक प्रश्न व कुतूहल निर्माण झाले. वास्तविक त्या शेतकऱ्याला रोलिंग सपोर्टचा नेमका वापर करायचा कसा? हे समजवून सांगण्यात विद्यार्थ्यांची चांगलीच कसरत झाली. परंतु रोलिंग सपोर्ट प्रत्यक्षात बसवल्यावर, 'हे तर तुम्ही लय भारी केले' अशी शेतकऱ्याची प्रतिक्रिया होती. 'त्यामुळे माझ्या बैलाला त्रास होणार नाही', ही भावना त्या शेतकऱ्याने व्यक्त करून दाखवली.

अभियांत्रिकीचे विद्यार्थी अन्...

आर.आय.टी मधील प्राध्यापक डॉ. सुप्रिया सावंत यांनी विद्यार्थ्यांना वेळोवेळी मार्गदर्शन करत त्यांच्या या प्रोजेक्टला चालना दिली. हा भन्नाट प्रोजेक्ट करत असताना 'समाजातल्या लोकांच्या गालातला हसू काही लपवू शकले नाही' हा अनुभव सुद्धा त्यांनी आवर्जून सांगितला. अभियांत्रिकीचे विद्यार्थी बैलगाडीवर काम करत असल्याचे लक्षात येताच अनेकांच्या भुवया उंचावल्याचे त्यांनी नमूद केले. प्रोजेक्ट करताना हा केवळ प्रोजेक्ट नसून तो समाज उपयोगी व्हायला हवा. प्रोजेक्ट पूर्ण झाल्यावर महाविद्यालयाच्या एखाद्या कोपऱ्यात धुळखात पडलेले हे एखादं इन्स्ट्रुमेंट होऊ नये ही भावना सुद्धा सावंत यांनी विद्यार्थ्यांमध्ये निर्माण केली. प्रा. पी. एस. घाटगे व ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुखडॉ. एस. आर. कुंभार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाच्या संचालिका डॉ. सुषमा कुलकर्णी, डॉ. एल. एम. जुगुलकर, डॉ. ए.बी. काकडे, प्रा. सुधीर आरळी आणि प्रा. हर्षल पाटील यांनी विद्यार्थांचे कौतुक केले.

विलक्षण प्रयत्नांनी प्रयोग...

प्रोजेक्ट महाविद्यालयातून समाजापर्यंत पोहोचत होता. आर.आय.टी च्या या विद्यार्थ्यांवर संमिश्र प्रतिक्रियांचा पाऊस पडत होता. समाजात आजवर विविध संशोधने झालीत. शेतकऱ्यांचा गाडा ओढणारा बैल मात्र मुके जनावर असल्याने कदाचित त्याच्या वेदना आजवर कोणी समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही. मात्र, आर.आय.टी च्या विद्यार्थ्यांनी तो केवळ समजूनच घेतला नाही, तर तो सोडवण्यासाठी त्यांनी विलक्षण प्रयत्नही केलेत. या प्रयत्नांची जाण ठेवत आर.आटी.ने या रोलिंग सपोर्टचा पेटेंट देखील नोंदविला आहे. अशा भन्नाट कल्पनेतून जन्मलेल्या या प्रोजेक्टची चर्चा सगळीकडेच होत आहे. आर.आय.टी ऑटोमोबाइल इंजिनिअरिंगचे हे विद्यार्थी केवळ एवढ्यावरच थांबले नाहीत. या अद्भुत अशा प्रोजेक्टमध्ये योग्य ते बदल करत समाजाला त्याचा जास्तीत जास्त उपयोग कसा होईल, या विचारातून त्यांचे पुढचे पाऊल पडत आहेत. या प्रोजेक्टला 'सारथी' हे नाव देत या संशोधनाला आणि शेतकऱ्यासोबत दिवसरात्र राबणाऱ्या मुक्या जनावराला विद्यार्थ्यांनी योग्य तो न्याय दिला आहे.

बातम्या आणखी आहेत...