आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाकवीची जन्मशताब्दी:गीत भीमायन-  सांगितीक दीपस्तंभ!

(रोशनी शिंपी)4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आंबेडकरी चळवळीचा ‘सुवर्ण कालखंड’ म्हणून महाकवी वामनदादा कर्डक यांची ओळख आहे. १९२० ते १९५६ या इतिहासपर्वात आंबेडकरी समूहाचा प्रातिनिधिक आणि भावनिक उद्गार म्हणजेच वामनदादा. बाबासाहेब आंबेडकर यांची जीवनगाथा आणि चारित्र्य नितळपणे शब्दांच्या माध्यमातून मांडण्याची एक नवी रीत त्यांच्या कविकर्तृत्वाने दिली. अशा या महाकवीचे जन्मशताब्दी वर्ष आजपासून सुरू झाले असून यानिमित्ताने वामनदादा कर्डकांच्या १०० गीतांचा ‘गीत भीमायन’ हा संगीत अल्बम औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने हाती घेतला आहे.

जरी संकटाची काळरात होती
तरी भीमराया तुझी साथ होती.
तुझी तेवण्याची सुरूवात होती,
प्रकाशात माझी पिढी न्हात होती....
व्यक्ती आंबेडकरी चळवळीतली असो वा सर्वसामान्य ज्याचे बाबासाहेबांवर अपार प्रेम, निस्सीम श्रद्धा आहे अशा मराठी माणसाला महाकवी वामनदादा कर्डक यांचे नाव माहिती नाही असे होत नाही. याचे कारण वामनदादांनी लिहिलेली अवीट गोडीची आवेशकारक भीमगीते आणि आंबेडकरी चळवळीची गीते! शाहिरी जलसा हे आंबेडकरी चळवळीच महत्त्वाचं अंग. नव्या युगाचे नवे विचार गावागावात पोचवण्याचं काम महाराष्ट्रातील लोकशाहीरांना जाईल आणि या शाहिरी परंपरेचा मानबिंदू म्हणून वामनदादा यांचं नाव आदराने घेतले जाईल...फक्त शाहीर नाही तर महाकवी उपाधीने गौरवण्यात येणारे वामनदादा एकमेवच..‌ वामनदादांच्या गीतांवरून नुसती नजर फिरवली तरी ध्यानी येते की, हा लोकांचा आवाज आहे, हा लोकांच्या डोळ्यातला तप्त अंगार आहे, हा निळ्या क्रांतीचा एल्गार आहे.
'तुफानातले दिवे आम्ही तुफानातले दिवे
तुफान वारा पाऊस धारा मुळी न आम्हा शिवे.
अठराविश्व दारिद्र्यामुळे शिक्षणापासून वंचित राहिलेल्या वामनदादांनी १९४३ दरम्यान लिखाणाला सुरुवात केली. लिहीता वाचता येत नसलेल्या या व्यक्तीने आयुष्यात दहा हजाराहून अधिक आशयसंपन्न गाणी लिहून शब्दप्रभु हे बिरुद स्वत:कडे खेचून घेतले. अशा वामनदादा कर्डकांच्या १०० गीतांचा ‘गीत भीमायन’ हा संगीत अल्बम त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त औरंगाबादेतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने हाती घेतला आहे. यातील ६० गाणी तयार झालेली असून १० गाण्यांचे व्हिडीओ प्रकाशनही टाईम्स म्युझिकच्या माध्यमातून झाले आहे. असा प्रकल्प हाती घेणारे डॉ. आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ हे देशभरातील पहिलेच विद्यापीठ ठरले आहे.
वामनदादा कर्डक यांच्या जन्मशताब्दी निमित्त वामनदादांच्या साहित्यावर निर्माण झालेल्या ‘गीत भीमायन’ या कलाकृतीचा आंतरवेध घेण्याचा हा प्रयत्न. प्रत्येक आंदोलनाला सांस्कृतिक जोड असल्याशिवाय त्याला धार मिळत नाही. समानतेच्या लढ्यात डॉ. आंबडेकरांच्या विचारांचे लोण संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देशभर रुजवण्याचे मोलाचे काम वामनदादांच्या साहित्याने, शाहिरीने केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त २०१५ मध्ये डॉ. बाबाासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले गेले. आंबेडकरी विचारांचा वारसा गीतांतून आजच्या पिढीपर्यंत पोहचवण्याचे श्रेय वामनदादांचे असल्याने त्यांच्या गीतांवर काहीतरी केले पाहीजे, असा विचार तत्कालिन कुलगुरु चोपडे यांनी बोलून दाखवला. सरस्वती भुवन कला वाणिज्य महाविद्यालयाचे संगीत विभागप्रमुख प्रा. संजय मोहड यांनी हे शिवधनुष्य हाती घेतले. वामनदादांच्या शब्दांना प्रा. मोहड यांनी संगीतबद्ध केले. तर प्रख्यात गायिका पद्मश्री कविता कृष्णमुर्ती, पद्मश्री हरिहरन, पद्मश्री सुरेश वाडकर, पं.रवींद्र साठे, पं. रघुनंदन पणशीकर, विदुषी शुभा जोशी, विदुषी आरती अंकलीकर, विदुषी साधना सरगम, विदुषी मंजुषा पाटील, विदुषी सावनी शेंडे आणि विदुषी बेला शेंडे यांनी स्वरसाज चढवला आहे. पद्मश्री विजय घाटे यांनीही या प्रकल्पात तबलावादन केले. ख्यातनाम संगीत संयोजक नरेंद्र भिडे यांनी संगीत संयोजन केले आहे. मराठवाड्यातील कलावंत डॉ.गिरीश काळे यांनी बासरीवर, प्रफुल्ल काळे यांनी तबल्यावर, पंकज शिरभाते यांनी व्हायोलीनवर साथ केली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे संगीत विभागातील विद्यार्थ्यांनी या महान कलावंतांसोबत सहगायन केले आहे. विद्यार्थ्यांसाठी हा महान अनुभव ठरला. कोणत्याही विद्यापीठाने अशा पद्धतीने गीतांचा अल्बम प्रकाशित करण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कलाकृतीचे कॉपीराईटस देखील विद्यापीठाला मिळाले आहेत. विद्यापीठाच्या इतिहासतील ही पहिलीच घटना आहे, प्रा. मोहड सांगतात. टाईम्स म्युझिक करारासाठी गौरी यादवडकर यांची भूमिका मोलाची ठरली.
महाड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला,अन् तेव्हापासूनच समानतेचे आंदोलन खऱ्या अर्थाने छेडले गेले. नाशिकच्या काळाराम मंदिर प्रवेशाच्या आंदोलनाची दखल जगभरातील माध्यमांनी घेतली. वंचित शोषितांच्या प्रश्नांना वाट करून देण्यासाठी पहिल्यांदाच एक मुकनायक शड्डू ठोकून उभा राहीला, याची जाणीव वामनदादांना झाली होती. त्यांनी या आंदोलनात आपल्या भावनांना वाट करुन देण्यासाठी शब्दांचा आधार घेतला. ‘आपली मोजदादच मुळी गुलामात होती अन 'आहे रे' वर्गाला सलाम ठोकण्यात सारी हयात गेली होती !' मात्र केवळ आपल्या पायात असणाऱ्याच नव्हे तर मनामनात वास करून असणारया गुलामगिरीच्या बेड्या तोडणे केवळ बाबासाहेबांच्यामुळे शक्य झाले असं ते सहजतेने लिहून जातात.
'सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठाय हो?
सांगा धनाचा साठा आमचा वाटा कुठाय हो?
जाज्वल्य अभिमान पेटवणारी १० हजाराहून अधिक गाणी त्यांनी पाहता पाहता शब्दबद्ध केली. या १० हजार गाण्यांतून १०० गाणी निवडून प्रकाशित करणे हे खरेच मोठे आव्हान होते. कारण, प्रत्येकच गाणे अतिशय ताकदीचे आहे. आजही आंबेडकर जयंतीला जलशातून वामनदादांनी लिहीलेली गाणी गायली जातात, तेव्हा तरुणाईच काय पण संपूर्ण समाज एका प्रेरणेने भारावून निघतो.
‘गीत भीमायन’च्या पहिल्या दहा गाण्याचे प्रकाशन उर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याहस्ते १४ एप्रिल २०२१ ला झाले. याशिवाय ६० गाणी ऑडिओ फॉरमॅटमध्ये तयार आहेत. लवकरच उर्वरित ६० गाणी उपलब्ध होतील. पहिल्या गाण्याला ३ महिन्यांत एक लाखांहून अधिक लोकांनी पाहीले आहे. टाईम्स म्युझिकने ही गाणी ११ विविध प्लॅटफॉर्म्सवर उपलब्ध करुन दिली आहेत.
प्रा. मोहड म्हणतात, गदिमा आणि वामनदादा कर्डक सांस्कृतिक अंगाने दोन टोकावरचे कवी. पण श्रद्धेच्या पातळीवरील त्यांची अभिव्यक्ती एका समान रेषेवर येऊन थांबणारी. पुरुषोत्तम प्रभू रामचंद्र एकाला भावला आणि दुसरा कवी क्रांतिसूर्याची गाणी गाणारा. ज्याप्रमाणे सुधीर फडके आणि गदीमांनी निर्मिलेले गीत रामायण आजही रसिकांच्या मनात रुंजी घालते, त्याप्रमाणेच वामनदादांनी लिहीलेल्या आंबेडकरी विचारधारेला पुढे नेणाऱ्या गीतांच्या प्रकल्पाला जाणीवपुर्वक ‘गीत भीमायन’ असे नाव देण्यात आले. सहा वर्षांच्या या प्रकल्पात ६० गाणी तयार झालेली आहेत. उर्वरित ४० गाणीही लवकरच तयार होतील. यामध्ये इंडस्ट्रीतील दिग्गज्ज कलावंतांनी गायन केले आहे. कविता कृष्णमुर्ती यांनी गायनावेळी वामनदादांच्या गीतांचे पोत आणि जातकुुळी समजावून घेतले. त्यांच्या लिखाणााने त्या भारावून गेल्या होत्या. गायक, संगीतकार हरिहरन यांनी या प्रकल्पातील तीन गाणी गायली आहेत. वामनदादांच्या लिखाणातील निराळीच बाब त्यांनी प्रकाशात आणली ती म्हणजे, ‘मी मुकनायक’ या गाण्याचे धृवपद फक्त दोनच शब्दांचे आहे. सर्वसाधारणपणे गाण्याचा मुखडा किमान दोन ते चार ओळींचा असतो. पण, वामनदादांनी केलेला शब्दांचा हा प्रयोग त्यांना विलक्षण वाटला.
ज्याप्रमाणे छत्रपती शिवरायांचे कार्य जनसामान्यांत पोहचवण्यासाठी शाहिरी, पोवाडे यांची भूमिका महत्त्वाची आहे. ज्याप्रमाणे स्वातंत्र्य संग्रामात लोककलावंतांचे योगदान तितकेच मोलाचे मानले जाते, त्याप्रमाणेच आंबेडकरी विचारधारा जनसामान्यात रुजवण्यासाठी वामनदांदांनी केलेले हे लिखाण मोलाचे ठरले. कोणत्याही आंदोलनाला यशस्वी करण्यात सांस्कृतिक आधार महत्त्वाचा असतो, तोच वामनदादांनी दिला. विद्यापीठाच्या संगीत विभागाने नेमकेपणाने हेरुन त्याला संगीताच्या माध्यमातून जनमाणसासमोर आणले आहे. मुळात विद्यापीठाचे कार्य समाजा उद्धाराची सूत्र तयार करणे हे आहे. तेच या प्रकल्पातून नेमकेपणाने डॉ. आंबेडकर विद्यापीठाने साधले आहे.
औरंगाबादेत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे वास्तव्य बराच काळ होते. मिलिंद महाविद्यालयाची पायाभरणी त्यांनी केली. यादरम्यान नागसेनवनात त्यांनी वास्तव्य केले. वामनदादा या काळात सक्रीय होते. त्यांनी आंबेडकरी विचारधारेवर चिंतन मननातून अनेक गीतांची निर्मिती केली. औरंगाबादेतच १९८७ साली त्यांचा पहिला नागरी सत्कार झाला. औरंगााबाद महानगरपालिकेने सुद्धा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते. विशेष म्हणजे त्यांच्या जाण्यानंतर २००८, २००९ आणि २०१० मध्ये औरंगाबादेत झालेले वामनदादा कर्डक आंबेडकरी साहित्य संमेलन हे देखील पहिल्यांदाच औरंगाबादेत झाले. वामनदादांच्या गीतांवरील ‘गीत भिमायन’ हा पहिला प्रकल्पही औरंगाबादेतच झाला. हा प्रकल्प म्हणजे एक ऐतिहासिक दस्तावेज आहे.
या कलाकृतीचे वैशिष्ट्य म्हणजे वामनदादांचे संपूर्ण आयुष्य डॉ. आंबेडकरांच्या विचारांनी भारलेले होते. डॉ. आंबेडकरांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवानिमित्त गीत भीमायन प्रकल्प हाती घेण्यात आला. त्यामुळे वामनदादांनी रचलेले डॉ. आंबेडकरांचे काव्यमय जीवनचरित्र यातून उभे करण्यात आले आहे. डॉ. आंबेडकरांच्या जन्मापासून मृत्यूपर्यंतच्या घटनांचे भावनिक, वैचारिक वर्णन असलेली गाणी यामध्ये निवडण्यात आली आहेत. वामनदादांच्या गीतांमधून उभे राहिलेले "गीत भीमायन' समाजामध्ये सांस्कृतिक धृवीकरणाची नांदी ठरणार आहे. थोडक्यात एक सांगितिक दीपस्तंभ म्हणून गीत भीमायन समाजाला मार्गदर्शक राहणार आहे.

roshani.shimpi@dbcorp.in

बातम्या आणखी आहेत...