आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

RTE अंतर्गत प्रवेशासाठी कसा करावा अर्ज?:कोणती कागदपत्रे लागणार? जाणून घ्या

छत्रपती संभाजीनगरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारच्या RTE म्हणजेच शिक्षणाचा अधिकार या कायद्यानुसार विनाअनुदानित खासगी शाळांना वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुलांसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवाव्या लागतात. या शाळांमधील शिक्षण या 25 टक्के विद्यार्थ्यांसाठी मोफत असते. सरकार त्यांच्या शिक्षणाची रक्कम शाळांना देते.

वंचित आणि आर्थिक दुर्बल घटकातील मुलांनाही चांगले शिक्षण मिळणे या धोरणामुळे सुनिश्चित होते. या शाळांमध्ये RTE अंतर्गत प्रवेशासाठी दरवर्षी ऑनलाईन प्रक्रिया राबवली जाते. RTE प्रवेशासाठी पात्र मुलांच्या पालकांना निकषांनुसार आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करून अर्ज करता येतो.

RTE प्रवेशास पात्र होण्यासाठी काय निकष आहेत आणि यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा आणि यासाठी कोणती कागदपत्रे तुम्हाला लागतील हे जाणून घेऊया, चला तर मग...

RTE प्रवेशासाठी हे विद्यार्थी पात्र

RTE प्रवेशासाठी वंचित आणि आर्थिक दुर्बल अशा दोन घटकातील विद्यार्थी पात्र आहेत. यापैकी पहिल्या म्हणजेच वंचित घटकात -

  1. अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क), भटक्या जमाती(ड), इतर मागासवर्ग, विशेष मागासवर्ग, दिव्यांग बालके, एचआयव्ही बाधित किंवा एचआयव्ही प्रभावित बालके, अनाथ बालके, कोव्हिड प्रभावित बालके(ज्यांच्या पालकांचे निधन कोव्हिडमुळे झाले आहे) यांचा समावेश येतो. या घटकातील विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी कमाल उत्पन्नाची कोणतीही मर्यादा नाही.
  2. आर्थिक दुर्बल घटकासाठी वार्षिक उत्पन्नाची मर्यादा असून ज्यांचे उत्पन्ना वार्षिक एक लाखांपेक्षा कमी आहे अशा पालकांची बालके आर्थिक दुर्बल घटकातून RTE प्रवेशासाठी पात्र ठरतात.

अर्ज कसा करावा?

RTE अंतर्गत प्रवेशासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतो. यासाठी तुम्हाला https://student.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex या लिंकवर जावे लागेल.

या लिंकवर गेल्यावर उजव्या बाजूला कोपऱ्यात ऑनलाईन अर्जाचा टॅब दिसेल, त्यावर क्लिक करून ऑनलाईन पद्धतीने माहिती भरून अर्ज करता येईल.

याशिवाय, प्रशासनाने नागरिकांना अर्ज करण्यास मदत करण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात मदत केंद्रही निश्चित केले आहेत. याठिकाणी जाऊनही तुम्हाला अर्ज भरता येऊ शकतो.

अर्जांची निवड कशी होते?

मिळालेल्या अर्जांतून निवड ऑनलाईन स्वरुपात लॉटरीच्या माध्यमातून होते. तुम्ही अर्ज करत असलेल्या शाळेपासून जितकं जास्त जवळ राहता, तितकी तुमच्या अर्जाची निवड होण्याची शक्यता यामध्ये जास्त आहे.

त्यासाठीचं लॉजिकही वेबसाईटवर देण्यात आलं आहे. त्यानुसार, शाळेपासून पहिल्या एक किलोमीटरच्या परिसरात राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा रिक्त जागेसाठी प्राधान्याने विचार करण्यात येतो. त्यानंतर 1 ते 3 किलोमीटर आणि 3 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरावरील विद्यार्थ्यांचा विचार होतो.

उदा. एखाद्या खासगी शाळेत एकूण विद्यार्थी संख्या 100 आहे. तर त्याच्यापैकी 25 टक्के म्हणजेच एकूण 25 विद्यार्थी RTE मार्फत प्रवेश घेऊ शकतात. त्याचवेळी तितकेच 25 विद्यार्थी वेटिंग लिस्टमध्ये असतात. समजा, त्या शाळेपासून 1 किलोमीटरच्या परिघात राहणाऱ्या 15 विद्यार्थ्यांनी अर्ज केला असेल. तर 1 ते 3 किलोमीटर परिसरातील 30 मुलांनी आणि 3 किलोमीटरवरील 20 अर्ज प्राप्त झाले असतील. अशा स्थितीत 1 किलोमीटरच्या आतील सर्वच्या सर्व 15 विद्यार्थ्यांचा अर्ज स्वीकारला जातो. त्यानंतरच इतर ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार होतो. त्यामुळे यामध्ये अर्ज करणाऱ्या पालकांनी आपल्या राहत्या घराचा पत्त्याचं अक्षांश-रेखांश नोंद(गुगल पिन) याची माहिती योग्यरित्या देणं गरजेचं आहे. प्रवेशावेळी अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी होते. त्यामध्ये तफावत आढळून आल्यास आपला अर्ज बादही ठरवला जाऊ शकतो.

कोणती कागपत्रे आवश्यक आहेत?

RTE अंतर्गत अर्ज करण्यासाठी तुम्हाला खालीलप्रमाणे कागदपत्रे लागतील

  • वंचित घटकातील असल्यास उत्पन्न प्रमाणापत्राची गरज नाही, मात्र वडिलांचा किंवा पालकांचे जातीचे प्रमाणपत्र आवश्यक आहे.
  • दिव्यांग असल्यास त्यासंदर्भातील वैद्यकीय प्रमाणपत्र
  • एचआयव्ही बाधित/प्रभावित असल्यास याचे प्रमाणपत्र
  • कोव्हिड प्रभावित बालकांसाठी सक्षम प्राधिकाऱ्यांचे पालकांचे मृत्यू प्रमाणपत्र किंवा कोव्हिडमुळे मृत्यू झाल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र
  • अनाथ असल्यास अनाथ असल्याचे प्रमाणपत्र
  • आर्थिक दुर्बल घटकासाठी वार्षिक एक लाखापेक्षा कमी उत्पन्न असल्याचे प्रमाणपत्र
  • घटस्फोटित असल्यास, त्याविषयी न्यायालयाचा निर्णय, बालकाच्या आईचे रहिवासी प्रमाणपत्र, उत्पन्न आणि जातीचे प्रमाणपत्र
  • बालक/पालकाचे आधार कार्ड
  • जन्म प्रमाणपत्र
  • रहिवासी प्रमाणपत्र (रेशन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, वीज बिल, भाडेकरार)

अर्ज करताना या गोष्टींची काळजी घ्या

  • पालकांनी अतिशय विचारपूर्वक 10 शाळांची निवड करावी
  • अर्ज करताना शाळेपासून घरापर्यंतचे अंतर गूगल मॅपद्वारे निश्चित करायचे असल्याने पालकांनी राहण्याचे लोकेशन अचूकपणे नोंदवावे.
  • ठरवलेल्या मुदतीत अर्ज पूर्ण भरला जाईल याची काळजी घ्यावी.
  • ऑनलाईन अर्ज करताना अचूक व खरी माहिती भरावी.
  • RTE अंतर्गत आधीच प्रवेश घेतलेल्या बालकांना पुन्हा अर्ज करता येणार नाही.
  • एकच परिपूर्ण अर्ज सादर करावा. एकापेक्षा जास्त अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आल्यास एकाही अर्जाचा लॉटरीसाठी विचार केला जाणार नाही.
बातम्या आणखी आहेत...