आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:युक्रेनमध्ये स्फोट सुरू, रशियाशी युद्ध झाल्यास जगावर काय याचा होणार परिणाम; जुना मित्र रशियाला भारत साथ देईल का? वाचा सविस्तर...

अभिषेक पाण्डेय6 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • रशिया-युक्रेन युद्धाच्या उंबरठ्यावर का उभे आहेत? या युद्धाचा जगावर कसा परिणाम होईल? या वादात भारताची बाजू काय आहे? जाणून घेऊया...

रशियासोबत युद्धाची परिस्थिती उद्भवली असताना पूर्व युक्रेनमध्ये अनेक स्फोट झाले आहेत. रशियन समर्थित फुटीरतावादी नियंत्रित डोनिस्क शहरात हे स्फोट झाले. त्याचवेळी फुटीरतावाद्यांनी केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे दोन सैनिक ठार झाल्याची बातमी आहे. दरम्यान, रशियाने बॅलेस्टिक आणि क्रूझ क्षेपणास्त्रांच्या चाचण्यांसह अण्वस्त्रांचा सराव सुरू केला आहे.

रशियाच्या या चाचणीला अमेरिकेने युक्रेनवरील हल्ल्याचे काउंटडाउन म्हटले आहे. हे युद्ध झाले तर त्याचे गंभीर परिणाम संपूर्ण जगाला भोगावे लागतील, अशी भीती व्यक्त केली जात आहे.

रशिया-युक्रेन युद्धाच्या उंबरठ्यावर का उभे आहेत? या युद्धाचा जगावर कसा परिणाम होईल? या वादात भारताची बाजू काय आहे? जाणून घेऊया...

प्रश्न 1: रशिया-युक्रेन वादाचे कारण काय आहे?

रशिया-युक्रेनमधील ताज्या वादामागील खरे कारण समजून घेण्यासाठी इतिहासात थोडे मागे जावे लागेल.

 • 20 व्या शतकाच्या सुरूवातीस, युक्रेन हा रशियन साम्राज्याचा भाग होता. 1917 मध्ये व्लादिमीर लेनिन यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या रशियन क्रांतीनंतर 1918 मध्ये युक्रेनने स्वातंत्र्याची घोषणा केली होती, परंतु 1921 मध्ये लेनिनच्या सैन्याकडून झालेल्या पराभवानंतर युक्रेन 1922 मध्ये सोव्हिएत युनियनचा भाग बनला.
 • युक्रेनमध्ये रशियापासून स्वातंत्र्याचा संघर्ष सुरूच राहिला आणि अनेक सशस्त्र गटांनी रशियाविरुद्ध उठाव करण्याचा प्रयत्न केला, जो यशस्वी झाला नाही.
 • 1954 मध्ये, सोव्हिएत युनियनचे सर्वोच्च नेते निकिता ख्रुश्चेव्ह यांनी हे बंड दडपण्यासाठी क्रिमिया आयलँड युक्रेनला भेट म्हणून दिली होती.
 • 1991 मध्ये सोव्हिएत युनियनचे विघटन झाल्यानंतर युक्रेनने आपले स्वातंत्र्य घोषित केले.
 • स्वतंत्र होताच युक्रेनने रशियन प्रभावापासून मुक्त होण्याचा प्रयत्न सुरू केला आणि त्यासाठी पाश्चात्य देशांशी जवळीक वाढवली.
 • 2010 मध्ये, रशिया समर्थित व्हिक्टर यानुकोविच युक्रेनचे अध्यक्ष झाले. यानुकोविचने रशियाशी घनिष्ठ संबंध ठेवले आणि युक्रेनचा युरोपियन युनियनमध्ये सामील होण्याचा निर्णय नाकारला, ज्याला युक्रेनमध्ये तीव्र विरोध झाला.
 • यामुळे व्हिक्टर यानुकोविचला 2014 मध्ये पायउतार व्हावे लागले होते. त्याच वर्षी, पेट्रो पोरोशेन्को, जे युक्रेनचे अध्यक्ष झाले, त्यांनी युरोपियन युनियनशी करार केला.
 • 2014 मध्ये रशियाने युक्रेनच्या क्रिमिया शहरावर हल्ला करून कब्जा केला होता.
 • डिसेंबर 2021 मध्ये, युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी NATO च्या सदस्यत्वाची घोषणा केली. युक्रेनच्या या घोषणेपासून रशिया नाराज आहे, ज्याला युक्रेनने नाटोमध्ये सामील होऊ नये असे वाटते.
 • युक्रेनवर दबाव आणण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून लाखो रशियन सैनिक युक्रेनच्या सीमेवर तैनात आहेत आणि रशिया युक्रेनवर कधीही हल्ला करू शकतो, असे मानले जात आहे.

प्रश्न 2: रशियाने 2014 मध्ये युक्रेनवर हल्ला का केला होता?

व्हिक्टर यानुकोविच पायउतार झाल्यानंतर रशियाने 2014 मध्ये युक्रेनवर आक्रमण केले होते आणि 1950 पासून युक्रेनचा भाग असलेल्या क्रिमियावर कब्जा केला.

त्याचबरोबर पूर्व युक्रेनमधील लोहान्स्क आणि डोनेस्तक या दोन शहरांमध्ये रशियन समर्थित फुटीरतावाद्यांनी युक्रेनविरुद्ध उठाव केला आणि तेथे बंडखोर प्रजासत्ताकांच्या स्थापनेची घोषणा केली.

 • युक्रेनियन फुटीरतावाद्यांना पैसा आणि शस्त्रे देऊन मदत केल्याचा रशियावर आरोप आहे, जो रशियाने नाकारला आहे.
 • युक्रेनमध्ये गेल्या आठ वर्षांपासून सरकार आणि रशियन समर्थक फुटीरतावादी यांच्यात संघर्ष सुरू आहे, ज्यामध्ये 14,000 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

प्रश्न 3: रशिया-युक्रेन संबंध कसे आहेत?

 • प्रदीर्घ काळापासून रशियाचा भाग असलेल्या युक्रेन आणि रशियाचे ऐतिहासिक संबंध आहेत. युक्रेनची राजधानी कीवला रशियन शहरांची जननी म्हटले जाते. युक्रेनमध्ये रशियन वंशाचे सुमारे 80 लाख लोक राहतात.
 • 2014 मध्ये क्रिमियावर कब्जा करताना रशियाने म्हटले होते की, तेथे राहणाऱ्या रशियन लोकांच्या संरक्षणासाठी त्यांनी हे पाऊल उचलले.
 • युक्रेनमध्ये रशियन वंशाच्या लोकसंख्येच्या मोठ्या संख्येमुळे, तेथील लोक दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. यापैकी एक गट रशियाला पाठिंबा देतो, तर दुसरा युरोपियन युनियन आणि यूएस समर्थित नाटोचा समर्थक आहे.

प्रश्न 4: रशिया आणि पाश्चात्य देशांसाठी युक्रेन महत्त्वाचे का आहे?

 • रशिया हा युक्रेनच्या सीमेला लागून असलेला देश आहे, त्यामुळे युक्रेन त्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे.
 • रशियाचा असा विश्वास आहे की युक्रेन नाटोमध्ये सामील होणे म्हणजे रशियाचे शिर शरीरापासून वेगळे करणे होय.
 • अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याने माघार घेतल्याने निर्माण झालेल्या नाराजीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना युक्रेनच्या मुद्द्यावरून आपली प्रतिमा उजळवायची आहे.
 • युक्रेनला आपल्या बाजुला करुन अमेरिकेला पुन्हा एकदा मुत्सद्देगिरीच्या खेळात रशियाला हरवायचे आहे.
 • रशियाला युक्रेनच्या माध्यमातून युरोपातील वर्चस्व वाढवण्यापासून रोखण्यासाठी युरोपीय देश आणि अमेरिका प्रयत्नशील आहेत.
 • रशियाने युक्रेनवर हल्ला केल्यास शीतयुद्ध जिंकलेल्या अमेरिकेच्या वर्चस्वाला मोठा धक्का बसेल.

प्रश्न 5: रशिया युक्रेनच्या नाटोमध्ये सामील होण्यास विरोध का करत आहे?

 • युक्रेनची रशियासोबत मिळून 2 हजार किलोमीटरहून अधिक सीमा आहे. युक्रेन नाटोमध्ये सामील झाल्यास नाटोचे सैन्य रशियाच्या सीमेपर्यंत पोहोचेल, अशी भीती रशियाला आहे.
 • अशा स्थितीत युक्रेनशी युद्ध झाल्यास नाटो देश रशियाविरुद्ध युद्ध पुकारू शकतात, जे रशियाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अजिबात चांगले होणार नाही.
 • जर युक्रेन नाटोमध्ये सामील झाले तर रशियाची राजधानी मॉस्को पश्चिमेपासून फक्त 640 किलोमीटर दूर असेल. सध्या हे अंतर सुमारे 1600 किलोमीटर आहे.
 • यामुळेच रशिया युक्रेन नाटोमध्ये सामील होण्याबाबत चेतावणी देत आहे. युक्रेन कधीही नाटोमध्ये सामील होणार नाही याची हमी रशियाला हवी आहे.

प्रश्न 6: युक्रेनच्या सीमेवर किती रशियन सैनिक तैनात आहेत?

 • गेल्या दोन महिन्यांपासून युक्रेनच्या सीमेवर 1.50 लाखांहून अधिक रशियन सैनिक तैनात आहेत. यातील हजारो सैनिक युक्रेनजवळ आणि रशियाच्या ताब्यातील क्रिमिया शहरात तैनात आहेत.
 • यासोबतच रशियाने युक्रेनच्या सीमेभोवती अनेक लढाऊ विमानेही तैनात केली आहेत. रशियन लढाऊ विमाने हल्ल्यासाठी सज्ज स्थितीत ठेवण्यात आल्याचे सॅटेलाइट इमेजमधून दिसून आले आहे.

प्रश्न 7: जर रशिया-युक्रेन युद्ध झाले तर जगावर काय परिणाम होईल?

 • रशिया आणि युक्रेनमध्ये युद्ध झाले तर फक्त या दोन देशांनाच फटका बसणार नाही, तर त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होण्याची शक्यता आहे.
 • जगातील कच्च्या तेलाच्या उत्पादनात रशियाचा वाटा 13% आहे. युक्रेनशी युद्ध झाल्यास, रशियाकडून कच्च्या तेलाचे उत्पादन आणि पुरवठा खंडित होईल, ज्यामुळे जगभरात कच्च्या तेलाच्या किमती वाढतील.
 • फेब्रुवारीमध्ये कच्च्या तेलाच्या किमती 2014 नंतरच्या सर्वोच्च पातळीवर म्हणजे 95 डॉलर प्रति बॅरलवर पोहोचल्या. रशिया-युक्रेन वाद वाढत असल्याने कच्च्या तेलाच्या किमती आणखी वाढण्याची शक्यता आहे.
 • नैसर्गिक वायू पुरवठ्यात रशियाचा वाटा 40% आहे. युरोपच्या गॅस पुरवठ्यापैकी एक तृतीयांश भाग रशियाचा आहे, बहुतेक गॅस पाइपलाइन युक्रेनमधून जाते. युक्रेनशी युद्ध झाल्यास या पुरवठा साखळीवर परिणाम होईल. यामुळे युरोप आणि इतर देशांमध्ये गॅस महाग होईल.
 • जगातील धान्य पुरवठ्याचा मोठा भाग काळ्या समुद्रातून जातो, जो रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांच्या सीमेवर आहे. रशिया आणि युक्रेन हे जगातील दोन सर्वात मोठे गहू उत्पादक देश आहेत. रशिया हा जगातील तिसरा सर्वात मोठा गहू उत्पादक देश आहे आणि युक्रेन नवव्या क्रमांकाचा गहू उत्पादक देश आहे.
 • जर रशियाने युक्रेनवर आक्रमण केले तर त्याचा परिणाम केवळ धान्याच्या पुरवठ्यावरच होणार नाही तर त्याच्या उत्पादनावरही होईल, ज्यामुळे जगभरातील धान्याच्या किमतीत मोठी वाढ होऊ शकते.

प्रश्न 8: रशिया-युक्रेन वादात भारत कोणासोबत आहे?

 • रशिया-युक्रेन वादात भारताने आतापर्यंत कोणत्याही बाजूचे समर्थन केले नाही, परंतु तटस्थ भूमिका घेतली आहे.
 • भारताने दोन्ही बाजूंना हे प्रकरण शांततेने सोडवण्याचे आवाहन केले आहे. 2014 मध्ये रशियाने क्रिमियावर कब्जा केला तेव्हाही भारताने उघडपणे रशियाला विरोध केला नव्हता.
 • युक्रेनमध्ये 20 हजार भारतीय अडकले असून त्यात 18 हजार वैद्यकीय विद्यार्थ्यांचा समावेश आहे, ज्यांना बाहेर काढणे हे भारताचे प्राधान्य आहे.

प्रश्न 9: रशिया-युक्रेन वादात भारत रशियाला विरोध का करत नाही?

 • रशिया हा भारताला सर्वात मोठा शस्त्र पुरवठा करणारा देश आहे. 2020 मध्ये, भारताने त्याच्या एकूण शस्त्रास्त्र खरेदीपैकी सुमारे 50% रशियाकडून खरेदी केली होती.
 • भारत आणि रशिया यांच्यातील संरक्षण व्यापार 2018 ते 2021 या अवघ्या तीन वर्षांत 15 अब्ज डॉलर (1.12 लाख कोटी रुपये) इतका झाला. अशा परिस्थितीत भारत आपल्या सर्वात मोठ्या शस्त्रास्त्र पुरवठादाराला रशियाला विरोध करून नाराज करू शकत नाही.
 • सोव्हिएत युनियनचे विघटन होण्यापूर्वी, भारताच्या निर्यातीत रशियाचा वाटा 10% होता, परंतु 2020-21 पर्यंत तो 1% पर्यंत घसरला. 2020-21 मध्ये भारताच्या आयातीमध्ये रशियाचा वाटा 1.4% होता.
 • 2020 मध्ये भारताचा रशियासोबतचा एकूण व्यापार 9.31 अब्ज डॉलर (69.50 हजार कोटी रुपये) होता. हे 2025 पर्यंत 30 अब्ज (2.2 लाख कोटी) पर्यंत वाढवण्याचे दोन्ही देशांचे उद्दिष्ट आहे.
 • रशियाशी व्यापार वाढवण्याच्या प्रयत्नात असलेला भारत युक्रेन किंवा अमेरिकेसोबत जाऊन हे प्रयत्न कमी करु इच्छित नाही.

प्रश्न 10: रशिया-युक्रेन वादात भारत अमेरिकेला विरोध का करत नाही?

 • भारत-अमेरिका संबंध गेल्या दशकभरात मजबूत झाले आहेत. या दोन्ही देशांमधील व्यापारापासून ते लष्करी संबंध दृढ झाले आहेत.
 • 2019 पर्यंत भारत-अमेरिकेचा एकूण व्यापार 146 अब्ज ( 10 लाख कोटी रुपये) होता. हा भारताकडून रशियासोबत होणाऱ्या व्यापाराच्या 15 पट आहे. अशा स्थितीत रशियाला उघडपणे पाठिंबा देऊन भारत अमेरिकेसोबतच्या वाढत्या व्यापाराला धक्का देऊ शकत नाही.
 • रशियानंतर अमेरिका हा भारताचा दुसरा सर्वात मोठा संरक्षण मित्र आहे. भारताच्या शस्त्रास्त्र खरेदीत 14% वाटा असलेल्या रशियानंतर अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे.
 • भारताचा अमेरिकेसोबतचा संरक्षण व्यापार 21 अब्ज डॉलर (1.56 लाख कोटी रुपये) वर पोहोचला आहे. अशा स्थितीत अमेरिकेला नाराज करणे भारताला परवडणारे नाही.
बातम्या आणखी आहेत...