आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गझलेच्या गावात:गझलेतील रसिक - बदीऊज्जमा बिराजदार

18 दिवसांपूर्वीलेखक: बदीऊज्जमा बिराजदार (साबिर सोलापुरी)
  • कॉपी लिंक

मनाला 'दिव्य' वेड लागल्याशिवाय 'मराठी' गझलेतील 'रसिकता' निर्माण नाही होत. ही रसिकताच माणसाचं जीवन संपन्न करते, श्रीमंत करते माणसानं कलात्मक जीवन जगलं पाहिजे. याचा पाठ रसिकता शिकवत असते. म्हणून मानवी जीवनात रसिकतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दिव्य मराठीच्या वर्धापन दिनानिमित्त गझलकार अन् रसिक यांच्यातील जवळीकता अधोरेखित करणं अवचित्यपूर्ण ठरेल.

एखाद्या कलाकृतीचं, साहित्यकृतीचं रसिकतेनं आस्वाद घेण्यात भारून टाकणारी तृप्ती असते. सुंदरशी बेहोशी असते. एक निरागस कैफ असतो. मनाला 'दिव्य' वेड लागल्याशिवाय 'मराठी' गझलेतील 'रसिकता' निर्माण नाही होत. ही रसिकताच माणसाचं जीवन संपन्न करते, श्रीमंत करते माणसानं कलात्मक जीवन जगलं पाहिजे. याचा पाठ रसिकता शिकवत असते. म्हणून मानवी जीवनात रसिकतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गझलेतील एखादा छानसा शेर जेव्हा रसिकांच्या कानावर पडतो तेव्हा त्यांच्याकडून मिळणारा उत्कट, उत्स्फूर्त प्रतिसाद गझलकाराचा हुरुप वाढविणारा असतो. ज्या गझलकाराला मोठ्या प्रमाणात रसिकाश्रय लाभतो तो गझलकार खऱ्याअर्थानं भाग्यवान ठरतो. गझलकार अंतरंगात बुडून गझल लिहीत असतो. अशी गझल रसिकांशी सहज संवाद साधत असते. त्याप्रमाणं रसिकांना आस्वादासाठी गझल हवीच असते त्याच प्रमाणं गझलकारानं लिहिलेली गझल जोखून पाहण्यासाठी रसिकांची आवश्यकता असतेच. आपली गझल रसिकांच्या चावडीवर पोहोचावी असं कोणत्याही गझलकाराची मनोमन इच्छा असते. यात गैर काहीच नाही. कारण रसिक हा गझलेचा आयना असतो. त्यात गझल कशी दिसते. तिचं रंगरूप कसं आहे हे दिसत असतं.

प्रत्येक कवी हा बोलका रसिक असतो अन् प्रत्येक रसिक हा मुका कवीच असतो. दोघंही एकमेकांना पूरक, पोषक असतात. गझलकार अन् रसिक याच्यातील नातं अमीट असतं हे नातं गझलकारही चांगल्या तऱ्हेनं जाणून असतात. चांगला गझलकार कधीही रसिकांच्या विस्मरणात नाही जात. आशयपूर्ण लयदार, तालदार, चमकदार शेरांची तर अशी खासियतच असते की तो शेर वर्षानुवर्षे रसिकांच्या ओठावर रेंगाळत राहतो. त्यातला तजेला कधीही नाही ओसरत. त्यात गझलकाराचं भावविश्व अविष्कृत झालेलं असतं. अशी रसिकमान्य गझल मग इथून तिथून सगळ्यांनाच भावते, वेडावते, नादावते. गझलकाराच्या गझलेचा फैसला रसिकांच्या दरबारात होत असतो. म्हणून गझलकारांसाठी रसिकांची दाद लाखमोलाची असते. आपल्या शब्दांच्या सप्तरंगाची रसिकांवर मुक्तपणे उधळण करण्यासाठी गझलकारांच्या वृत्तीत कलंदारीही असावी लागते. जगाच्या दुःखानं ज्याचं अंतरंग व्याकुळ होतं. अशा सर्वोत्तम गझलकाराचं स्थान नेहमीच रसिकांच्या अंतःकरणात सहीसलामत असतं. याची खूणगाठ सुरेश भट देखील त्यांच्या मनाशी बांधून होते. ते रसिकाला उद्देशून म्हणतात.

शोध रसिका मला तुझ्यापाशी, मी तुझ्या खोल अंतरी आहे!

गझल लिहून हातावेगळी झाली की, त्यातील शब्दांचा सगळा ऐवज रसिकांसाठीच असतो. अशा गझलेवर रसिकांनी आपल्या पसंतीची मोहोर उमटविली की ती जगाची होऊन जाते. ही रसिकांनी दिलेली एक प्रकारची हमी असते. हे गझलकरालाही पक्कं ठाऊक असतं याच निष्ठेनं गझलकार गझल लिहीत असतो. मक्त्यावरील त्याचं नाव जगाचं होऊन जातं. ही किमया रसिकतेच्या पसंतीची असते. ज्या गझला रसिकप्रिय होतात त्या लोकप्रियदेखील होतात, किंबहुना त्या अजरामर ठरतात. त्यासाठी वेगळे प्रयास, सायास करावे नाही लागत. आप्पा ठाकूर यांचा शेरही त्यांच्या दिलदारीची ओळख करून देतो.

शब्द न माझे गझल न माझी ऐवज रसिकांसाठी मी गझलेच्या मक्त्यावरती नाव जगाचे कोरत आहे

रसिकतेमध्ये इतकं सामर्थ्य सामावलेलं असतं की, फुलांना नियमितपणे बघितल्यावर डोळ्यांचे आजारसुद्धा डोके वर नाही काढू शकत. गझलेच्या बाबतीतही हीच मात्रा लागू पडते. ज्याच्या दृष्टीत रसिकतेची सृष्टी असते तिथं सौंदर्याचे मळे फुलत राहतात. जे चित्ताला चैतन्याची चालना देतात. मग आजार नावाचं लचांड मागं नाही लागत. चित्तातली वृत्ती उल्हासित झाली की आतून फुलाचं फुलणं, बहरणं सुरू होतं. सोबत काट्यांची असली तरी भोवताल सुगंधित करणं हेच तर फुलाचं काम असतं. फूल असो वा गझल असो. त्यांना त्यांच्याकडं बघणाऱ्यांच्या डोळ्यातली रसिकता आपली वाटत आलीय. रसिकतेचं हे मोल नितीन देशमुख त्यांच्या शेरातून असं सांगतात.

फुलांना नित्यनेमाने रसिकतेने बघितल्यावर असे म्हणतात की बसती, पुरे आजार डोळ्यांचे

गझल हा नुसता शब्दप्रधान काव्यप्रकार नाही तर तो गायकीप्रधान काव्यप्रकारही आहे. गझल निव्वळ शब्द घेऊन जन्माला नाही येत. त्यात शब्दागणिक सूर ऐकू येत असतो. शब्दांच्या अंतरंगात संगीतच संगीत दडलेले असते. हे संगीत ऐकण्यासाठी, कानात साठवून घेण्यासाठी गरज असते ती रसिकांची. शब्दसुराच्या या प्रवासात रसिकाचा सहभागही तितकाच महत्त्वाचा असतो. गझलकाराचं घर म्हणजे 'शब्दालय' असतं. तिथं सुरांची वर्दळ असतेच. या वर्दळीत मनाला गंधित करणारा दरवळ असतो. रसिकानं या घरी येऊन तर पाहावं खरं, अशी साद शोभा तेलंग घालतात.

आज शब्दातून येती सूर ही तू रसिक होवून ये माझ्या घरी

जगाचं वागणं विचित्र असतं. ते मुळातून समजून घ्यायला आयुष्य नाही पुरत. जग असतं अफाट विस्तीर्ण. आयुष्याला असतात मर्यादा. इथं नेहमीच न्यायाची, सन्मानाची, कौतुकाची अपेक्षा बाळगून नाही चालत. गझलकार तर हळव्या मनाचा असतो. जगानं बहाल केलेल्या दु:खानं तो पार व्यथित होऊन जातो. मनात सल घेऊन जगत असतो. या व्यथेला तो शब्दातून मांडतो तेव्हा त्याची ही मांडणी रसिकास गझलच वाटते. व्यथा ही तर गझलकाराच्या जगण्याचा आधार असतो. अनुभूतीची अभिव्यक्ती ठसठसणारी असली तरी ती सदानकदा ताजीच असते. ज्यात जगानं दिलेल्या निराशेची, कटुतेची तीव्रता अन् उत्कटता असते. या वैफल्याला गझलकार जेव्हा काळजातले शब्द देतो तेव्हा त्याची गझल होऊन जाते. अशा गझलेचा सर्व रसिक सहर्ष स्वीकार करतात तेव्हा लिहिणं सार्थकी लागतं. व्यथेतूनच तर अस्सल वाङमयीन मूल्यांची निर्मिती होत असते. या पार्श्वभूमीवर मसूद पटेल यांचा शेर येतो तो असा...

मांडली मी खरे तर स्वतःची व्यथा सर्व रसिकास पण ती गझल वाटली!

गझलेच्या रसिकांसाठी गझलकार काय काय करतो. तो गझल तर लिहितोच लिहितो. तो रसिकांसाठी गझलांतर्गत गझलेचे स्तवनही करतो. आपल्या रसिकांसाठी त्याच्या मनात ही आदराची, श्रद्धेची भावना असते. रसिकांसाठी गझलेचे स्तवन करणं ही फार मोठी गोष्ट आहे. रसिकजन जसं गझलेवर जिवापाड प्रेम करतात तव्दतच गझलकारही रसिकांना एकाहून एक सरस, सकस गझलांचा नजराणा पेश करत असतात. इथं एकतर्फी प्रेमाचा प्रकार नसतो, तोंडदेखला व्यवहार नसतो. आतून उमटणारे शब्दध्वनी तितक्याच रसिकतेनं ऐकण्याचा, समजून घेण्याचा तो एक निखळ विचार असतो. रसिकांचं मन इतकं स्वागतशील असतं. दोन्हीकडून परस्परांवर प्रेमाचा, स्नेहाचा वर्षाव होत राहातो. गझलकाराची उत्कृष्ट गझल अन् रसिकांची नितळ दाद यांचा हा सुंदर मिलाफ असतो. घन:श्याम धेंडे यांचं हे रसिकांसाठी गझलेचं स्तवन पाहा. रसिकांसाठी करतो आहे गझलांतर्गत स्तवन गझलेचे

रसिक हे मायबाप असल्यानं गझलकारांनी आपल्या गझलांमध्ये रसिकाला आवर्जून स्थान दिलंय्. इतकेच नव्हे तर काही गझलकारांनी रसिकांचे मोठ्या मनानं आभार मानलेत. गझलकारचं मन आभाळाएवढं असतं. काही गझलकारांनी तर 'रसिका तुझ्याचसाठी' असं म्हणत आपला गझलसंग्रहच समर्पित केलाय्. यावरून गझलकार अन् रसिक यांच्यातील आदरभाव, जिव्हाळा अधिक अधोरेखित होत जातो.

साबिर सोलापुरी
contact@sabirsolapuri.com

बातम्या आणखी आहेत...