आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजेव्हा कुठलाही महापुरुष किंवा महास्त्री मानवमुक्तीचा विचार मांडत असते तेव्हा त्यात निश्चितपणे एक वैश्विक भान असते. मानवमुक्ती हा आंबेडकरी विचारांचा गाभा असल्यामुळे जगभरातील तळागाळातील शोषित समूह आंबेडकरांच्या विचारांकडे आज आकृष्ठ होत आहेत. आता वैश्विक पातळीवर आंबेडकरी तत्वज्ञानाचा विचार व्हायला लागलेला आहे. वंशभेदाने ज्यांचे अमानवीकरण केले असे हंगेरी मधील रोमा समाजसमूह आणि आफ्रिकेतील घाना विद्यापीठातले विद्यार्थी यांच्या मुक्तीलढ्याचे प्रेरणास्थान आंबेडकर कसे आहेत हे आपण या लेखात बघणार आहोत.
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार आणि व्यवहाराने भारतीय जनमानस इतका ढवळून काढला आहे की त्यांना वगळून भारतीय समाज, लोकशाही, इतिहास, तत्वज्ञान, धर्म-संस्कृतीचा कुठलाही मूलगामी विचार करताच येत नाही. आंबेडकरी विचारांच्या प्रेरणेने इथे अनेक जन-चळवळींचा जन्म झाला, त्याला बाबासाहेबांच्या विचारांनी मानवमुक्तीचा निश्चित असा ध्येयवाद दिला हे आपण जाणतोच. जेव्हा कुठलाही महापुरुष किंवा महास्त्री मानवमुक्तीचा विचार मांडत असते तेव्हा त्यात निश्चितपणे एक वैश्विक भान असते. मानवमुक्ती हा आंबेडकरी विचारांचा गाभा असल्यामुळे जगभरातील तळागाळातील शोषित समूह आंबेडकरांच्या विचारांकडे आज आकृष्ठ होत आहेत. आता वैश्विक पातळीवर आंबेडकरी तत्वज्ञानाचा विचार व्हायला लागलेला आहे. वंशभेदाने ज्यांचे अमानवीकरण केले असे हंगेरी मधील रोमा समाजसमूह आणि आफ्रिकेतील घाना विद्यापीठातले विद्यार्थी यांच्या मुक्तीलढ्याचे प्रेरणास्थान आंबेडकर कसे आहेत हे आपण या लेखात बघणार आहोत.
‘धम्माचे प्रयोजन जगाची पुनर्रचना करणे आहे’ असे जेव्हा बाबासाहेब म्हणतात तेव्हा त्यांच्या विचारांमध्ये एक निश्चित असा विश्वदृष्टिकोन (वर्ल्ड विव्ह) आहे हे आपण लक्षात घेतले पाहिजे. आंबेडकरांच्या विश्वदृष्टीकोनात मुक्ती शोधणारा रोमा समाजसमुह अकराव्या-बाराव्या शतकात भारतीय उपखंडातून युरोपात स्थलांतरित झाल्याचे सांगितले जाते. भटका आणि पशुपालक असणाऱ्या रोमा समाजसमूहाला मध्ययुगीन काळात गुलामगिरी भोगावी लागली. नाझी राजवटीखाली रोमा लोकांना वंशउच्छेदाला सामोरे जावे लागले होते. याला ‘रोमानी जीनोसाईड’ म्हणून ओळखले जाते. आधुनिक काळात गुलामीप्रथा कायद्याने बंद झाल्यावरही त्यांना "घेटो' मध्ये राहावे लागायचे. इतिहासात गुलामी, वंशभेद, वंशसंहार आणि सेग्रीगेशन सहन करणारा रोमा समाज आजही युरोपातील असा वर्ग आहे ज्यांना वंशद्वेषाला सामरे जावे लागते. आजही रोमा लोकांना नागरी सुविधा आणि मानवी हक्क नाकारले जातात. त्यांच्या सांस्कृतिक आणि भाषिक ‘असण्याला’ तिथे हीन लेखले जाते. आधुनिक काळात रोमा लोकांच्या सांस्कृतिक आणि वैचारिक हस्तक्षेपामुळे ‘सेन्ट्रल युरोपियन युनिव्हर्सिटी’ मध्ये ‘रोमा स्टडीज’ चे विभाग आहे. रोमा लोकांच्या सांस्कृतिक, भौतिक आणि लिंगभावाविषयी तिथे मोठ्या प्रमाणात अभ्यास होतो. अनेक विचारवंतांनी रोमा लोकांच्या मुक्तीच्या विविध शक्यता वर्तविल्या आहेत आणि तसे प्रयोगही झाले आहेत. परंतु या सर्वांमध्ये डेरडॅक टीबॉर यांचा विचार तुलनेने अनन्य आणि अतिमहत्वाचा आहे. समाजशास्त्रज्ञ असणारे टीबॉर हे हंगेरियन पार्लमेंटचे माजी सदस्य आहेत. पॅरिसमध्ये ख्रोस्तोफर जेफरलॉट यांचे बाबासाहेबांवर लिहिलेले पुस्तक त्यांना मिळाले आणि तेव्हापासून त्यांचा आंबेडकरांकडे जाणारा अभिनव प्रवास सुरु झाला. भारतातील दलित आणि रोमा यांच्या इतिहास आणि वर्तमानात कमालीचे साधर्म्य असल्याचे त्यांच्या लक्षात आले. आंबेडकरांच्या शोधार्थ टीबॉर यांनी आपले सहकारी ओर्सोस जानोस यांच्यासमवेत २००५ साली महाराष्ट्र गाठले. आंबेडकरांचे कार्य आणि तत्वज्ञानाचा अभ्यास करून हंगेरीत परतल्यावर त्यांनी रोमा लोकांच्या मुक्तीसाठी बाबासाहेबांच्या विचारांचे अधिष्ठान असणाऱ्या ‘जय भीम नेटवर्क’ ची स्थापना केली. आता जय भीम नेटवर्कच्या अंतर्गत तिथे डॉ. आंबेडकर हायस्कूल चालवले जाते. हंगेरीमधील साजोकाझा येथे स्थित या हायस्कूलमध्ये रोमा विद्यार्थी शिक्षण घेतात. हे हायस्कूल हंगेरी मध्ये आंबेडकरी विचारांचे केंद्र मानले जाते.
ज्या साजोकाझा गावात डॉ. आंबेडकर हायस्कूल आहे तिथे रोमा लोकांना गावकुसाबाहेर राहावे लागते तिथे पिण्याच्या पाण्यासारख्या अत्यावश्यक नागरी सुविधांचाही अभाव आहे. वंशभेदामुळे रोमा विद्यार्थ्याना आजही शाळेमध्ये वेगळ्या खोलीत बसावे लागते. युरोपभर पसरलेल्या रोमा समाजाची स्थिती कमीअधिक याच स्वरुपाची आहे. जिप्सी (रोमा लोकांसाठी जिप्सी हा शब्दप्रोयोग वाईट अर्थाने आणि त्यांना हीन लेखण्यासाठी केला जातो) लोकं घाण असतात, ते चोर आहेत, ही लोकं गोऱ्या शेतकऱ्यांच्या कोंबड्या चोरून नेतात, ते लुटारू आहेत असे एक ना अनेक सामाजिक पूर्वग्रह रोमा लोकांबद्दल हंगेरीच्या जनमानसात आहे. अशा पूर्वग्रहांमुळे कुठेही चोरी झाली दरोडा पडला तर रोमा लोकांनाच जबाबदार धरले जाते.
टीबॉर यांनी सुरु केलेल्या या हायस्कूल मध्ये भारतातील तरुण दलित विद्यार्थी कार्यकर्त्यांना आमंत्रित करून त्यांचा रोमा विद्यार्थ्यांशी संवाद घडवून आणला जातो. रोमा लोकांच्या वाट्याला येणाऱ्या शोषण, भेदभाव आणि मानखंडनेचाचा निरास बाबासाहेबांनी सांगितलेल्या लोकशाही आणि धम्माच्या मार्गानेच होऊ शकतो यासाठी रोमा समाजाने स्वतः चा आत्मसन्मान आणि सामाजिक उन्नतीचा मार्ग म्हणून बौद्ध धम्म आणि आंबेडकरी विचारांचा स्वीकार केलेला आहे.
शोषित असण्याचा धागा रोमा समाजाला जगभरातल्या विविध तळागाळातल्या समूहांशी जोडतो अशा सगळ्यांशी असणारे जैविक नाते जोपासण्याचे काम जय भीम नेटवर्क करत आहे. भारत, आफ्रिका ते म्यानमारमधल्या अल्पसंख्यांक आणि शोषित समूहांवर होणाऱ्या अन्याय, अत्याचार आणि वंशसंहार अशा मुद्द्यांवर जय भीम नेटवर्क नेहमी भूमिका घेत असतं. शोषणमुक्तीच्या बाबासाहेबांच्या तत्वज्ञानावर जनचळवळ उभी राहण्याची शक्यता जय भीम नेटवर्क च्या निमित्ताने हंगेरीतही वर्तविली जाऊ शकते.
अमेरिकेतल्या ब्लॅक पँथर चळवळीने ज्याप्रकारे इथल्या दलित पँथरला प्रभावित केले त्याचप्रमाणे आता काळ्यांच्या चर्चाविश्वात आंबेडकरांचा विचार व्हायला लागला आहे. आफ्रिकेतल्या घाना विद्यापीठात २०१६ साली महात्मा गांधींच्या पुतळ्याचे अनावरण माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी केले. गांधींचा पुतळा हटवला जावा म्हणून तिथल्या विद्यार्थ्यांनी चळवळ सुरु केली. गांधीजी साउथ आफ्रिकेत असतांना वंशभेदाचे पुरस्कर्ते होते. स्थानिक आफ्रिकी आणि ब्रिटीश साम्राज्यात झालेल्या बोअर युद्धादरम्यान गांधीजींनी वंशभेदी भूमिका घेतली होती आणि ब्रिटिशांना समर्थन देणारी कृतीही केली होती, त्यानंतरही साउथ आफ्रिकेत वास्तव्यास असतांना गांधीजींनी अशाच प्रकारच्या भूमिका घेतल्या होत्या. गांधीजींचे भारतातल्या दलितांसंबंधी यापेक्षा वेगळे म्हणणे नव्हते आणि त्यांची राजकीय कृतीसुद्धा भेदभावग्रस्त होती असे गांधीजींच्या समग्र वाङ्मयाच्या अभ्यासाअंती घाना विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे मत बनले आहे. म्हणून गांधींच्या जागी आम्हाला काळ्यांच्या लढ्याला बळ देणाऱ्या डॉ. आंबेडकरांचा पुतळा हवा अशी मागणी चळवळीचे नेते प्रा. कम्बोन यांनी केली आहे. २०१८ मध्ये दोन वर्षांनी गांधींचा पुतळा हटवला गेला. या चळवळीच्या निमित्ताने पुन्हा जाती आणि वंशभेदाची चर्चा एकत्रित रीत्या समोर आली आणि आंबेडकरी विचारांची वैश्विकता अधोरेखित झाली.
भारतातील शोषित वर्गाचा प्रश्न आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी बाबासाहेबांनी प्रा. डब्ल्यू.इ.बी. द्यूबॉईस या आफ्रो-अमेरिकन विचारवंताना १९४६ साली एक पत्र लिहिले होते त्या पत्रात बाबासाहेब म्हणतात की, त्यांनी काळ्यांच्या प्रश्नाचा अभ्यास केला आहे आणि त्या विषयाचे ते विद्यार्थी सुद्धा राहिलेले आहेत, काळ्यांचा आणि भारतीय अस्पृश्यांच्या लढ्यात दुवा साधला जावा अशी अपेक्षा त्या पत्रात बाबासाहेब व्यक्त करतात. घाना विद्यापीठातले विद्यार्थी त्या अपेक्षेला मूर्त रूप देताना दिसत आहेत. म्हणूनच त्यांना आंबेडकरांचा पुतळा हवा आहे. जातीव्यवस्था आणि वर्णभेदाचा सहसंबंध आता आकादमिक अभ्यासाचाही विषय होत आहे. इसाबेल विल्कर्सन या अमेरिकन लेखिकेने नुकतेच त्यांच्या ‘कास्ट द ओरिजिन ऑफ अवर डीसकंटेंट’ या पुस्तकात जात आणि वंशभेदाचे सहसंबंध उलगडतांना म्हटले आहे की, जातीव्यवस्था समजून घेतल्याशिवाय वंशभेदाची रचना आपल्याला कळू शकत नाही. त्याचप्रमाणे हार्वर्ड विद्यापीठातील माजी प्राध्यापक आणि तत्वज्ञ कॉर्नेल वेस्ट यांनी तर वारंवार दलित आणि काळ्यांच्या आकादामिक आणि संघर्षात्मक एकतेची आवश्यकता बोलून दाखवली आहे. वैश्विक स्तरावरच्या या आकादामिक विस्ताराचा संदर्भबिंदू हा बाबासाहेबांचा क्रांतिकारी विचार आहे.
सुरवातीला म्हटल्याप्रमाणे भारताच्या संदर्भात बाबासाहेबांच्या विचारांचे जसे मूलगामी चिंतन झाले आहे तितकासा विचार त्यांच्या विश्वदृष्टीकोणाविषयी झालेला नाही. मानवमुक्तीचा बाबासाहेबांचा विश्वदृष्टीकोन हा जगातल्या शोषितांना एकत्र आणणारा आहे. सामाजिक लोकशाही व नवयान बौद्धधम्माच्या समता आणि मैत्री या मुल्यांवर जगाची पुनर्रचना करणारा असा हा मानवमुक्तीचा विचार येणाऱ्या काळातही असाच वृद्धिंगत आणि वैश्विक होत राहील यात शंका नाही.
सागर नाईक
sagarnaik4511@gmail.com
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.