आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी एक्सक्लुझिव्ह:मोदींनी पवित्र माती भाळी लावताच संत-महंतांना आनंदाश्रू अनावर...

अयोध्याएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यात उपस्थित जळगावच्या जनार्दन हरिजी महाराजांनी व्यक्त केली भावना

थेट अयोध्येतून महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज (संतपंथ मंदिर संस्थान, फैजपूर, जि. जळगाव)

अयोध्येतील राम मंदिर भूमिपूजन सोहळ्यासाठी जळगाव जिल्ह्यातील फैजपूरच्या संतपंथ मंदिर संस्थानचे महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांना श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टतर्फे निमंत्रण देण्यात आले होते. २ ऑगस्ट रोजी ते कारने अयोध्येकडे रवाना झाले. बुधवारी झालेला सोहळा त्यांनी अनुभवला. सोहळ्यासाठी उपस्थित साधू-संतांमध्ये भूमिपूजनप्रसंगी नेमकी काय भावना होती व अयोध्येतील वातावरण कसे भावुक होते हे थेट अयोध्येहून त्यांच्याच शब्दांत...

बुधवारची पहाट सर्वात अविस्मरणीय अशी होती. आजचा सूर्यच जणू नवी आशा, अपेक्षा आणि नवनिर्माणाची नांदी घेऊन उगवला. गेल्या अनेक वर्षांपासून ज्या दिवसाची प्रतीक्षा होती तो दिवस उजाडला आणि आम्हा साधुसंतांच्या आनंदाला पारावार उरला नाही. रोज पहाटे ५ वाजता माझा दिवस सुरू होतो. पण रामायणाच्या जन्मभूमीत कालची मंतरलेली रात्रच आम्ही जागून, नव्हे जगून घेतली. भूमिपूजन सोहळा बुधवारी होता. पण आदल्या दिवशी रात्रीच दिवाळी साजरी केली. ही दिवाळीही शतकानुशतकानंतर आल्याची अनुभूती होत होती. अयोध्येतील घराघरांवर भगव्या पताका, दारोदारी रांगोळ्या अन् दिव्यांची आरास पाहून मन अगदी प्रफुल्लित झाले. मोदीजींचे आगमन होताच त्यांनी रामरायांसमोर दंडवत घालून तेथील पवित्र माती कपाळाला लावताच विराजमान साधुसंतांच्या डोळ्यातून आनंदाश्रू तरळले. हे अश्रू कैक दशकांपासून सुरू असलेल्या संघर्षाची साक्ष देत होते.

देशाच्या प्रगतीसाठी सर्व समाजघटक संघटित व्हावेत

सोहळ्यात संत-महंतांशी बोलताना एक बाब प्रकर्षाने जाणवली. ती म्हणजे आता नवीन पर्वाची, युगाची, विचारांची अन् आदर्शाची वाटचाल सुरू झाली आहे. यापुढे देशाच्या मजबुतीसाठी व प्रगतीसाठी सर्व समाजघटकांनी संघटित राहणे अतिशय गरजेचे आहे. मार्गदर्शन करताना मोदीजींनी थोडक्यात रामकथाच सांगितली. त्यांचे भाषण सुरू असताना उपस्थितांपैकी एक ना एक संत टाळ्यांचा कडकडाट करत होते. मध्येच ‘जय सियाराम’, ‘जय श्रीराम’, ‘भारत माता की जय’ असा जयघोषही वातावरणात उत्साह भरणारा होता.

अयोध्येतील सर्वधर्मीयांतही आता सुरक्षिततेची भावना

यापूर्वी अयोध्येत जाताना एक प्रकारची धास्ती असायची. भूमिपूजनादिवशी मात्र कुणाच्याही चेहऱ्यावर भीतीचा लवलेश नव्हता. हा मोकळेपणा मी स्वत: अनुभवला. अयोध्येतील काही भागात फिरण्याचा योग आला तेव्हा मंदिराच्या भूमिपूजनावरून सर्वधर्मीयांमध्येही सुरक्षिततेची भावना असल्याचे जाणवले.

बातम्या आणखी आहेत...