आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जागरण-गोंधळ:आज वंदन करितो, गौरीनंदना

औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जय गणपती गुणपती गजवदना...
महाराष्ट्राच्या लोकपरंपरेत अनेकविध रूपांमध्ये गणेशाची आराधना केली जाते. आपली लोककला, लोकसंस्कृती आराध्य दैवत म्हणून ‘गण’पतीचे पूजन करते नि कलेचे सादरीकरण निर्विघ्न पार पडावे म्हणून त्याच्यातील विघ्नहर्त्याला आवाहनही करते. संत - पंत - तंत कवींनी, शाहिरांनी अन् लोककलावंतांनी विविध कला प्रकारांतून, प्रबोधन परंपरेतून समृद्ध केलेल्या या आगळ्या गणेश माहात्म्याचा लोककलेच्या अभ्यासकांनी घेतलेला हा वेध...

खंडोबाचे जागरण आणि देवीच्या गोंधळामध्ये संकीर्तन रूपात होणाऱ्या गणरायाच्या दर्शनाचे आगळे माहात्म्य आहे. त्यात प्रत्यक्ष गणेशाचे अवतरण होत नसले, तरी या दोन्ही विधिनाट्यांमधून होणारी गणेशाची आराधना अतिशय लोकप्रिय आहे. ती या विधिनाट्यांच्या प्रारंभाचे केवळ स्तवन नव्हे, तर त्यांचा आत्मा आहे.

वि घ्नहर्ता मंगलमूर्ती गणराय ही शिवकुलातील देवता आहे. भगवान शंकराचा अवतार असणाऱ्या खंडोबाच्या जागरणामध्ये आणि देवींच्या साडेतीन शक्तिपीठांच्या गोंधळामध्ये गणेशाचे नर्तन अथवा प्रत्यक्ष अवतरणे नसले, तरी संकीर्तन मात्र निश्चित असते. कारण, गणपती ही विद्येची देवता आहे तशीच ती कलेचीही देवता आहे. अशुभ निवारणासाठी गणपतीचे आशीर्वचन मागितले जाते. गणेश हा शिवपार्वतीचा पुत्र असल्याने खंडोबाचे जागरण आणि देवीच्या गोंधळाच्या प्रारंभी त्याला वंदन केले होते. वैदिक धर्मात गणपतीचे अधिष्ठान मोठे आहे, कारण श्रीमद्भगवद्गीतेच्या निर्मितीत वेदव्यासांइतकेच गणेशाला महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वरांनीही श्रीमद्भगवतगीतेची ऋचा लिहिताना ‘ओम नमोजी आद्या..’ असे संकीर्तन प्रारंभीच्या ओवीतच केले आहे. वैदिक संस्कृतीने भगवान गणेशाचे बुद्धिप्रामाण्यवादी रूप आपलेसे केले, त्याला ‘सकल मती प्रकाशु’ असे म्हटले. लोकसंस्कृतीने भगवान गणेश आपलासा केला, तो अधिक विघ्नहर्ता होता म्हणून. विघ्नहर्त्या गणेशाची पूजा संपूर्ण भारतातील संस्कृती लोकधर्माने बांधली. लोककला प्रकार कुठलाही असो; त्याचा प्रारंभ गणेश स्तवनाने अथवा गणेश दर्शनाने होतो.

भगवान श्रीकृष्णासारखे गणपतीला लोककलावंतांनी ‘लोकसखा’ म्हटले आहे. पण, खंडोबाच्या जागरणामध्ये.. ‘आधी भजावे गणाला। मग त्या मल्हारी देवाला।।’ अशी विनवणी वाघ्या मुरळी करतात. तर शक्तिदेवतेच्या गोंधळात.. ‘देवा गजानना रे.. वंदितो देवा गजानना रे..’ असा धावा केला जातो. परभणीचे गोंधळमहर्षी राजारामभाऊ कदम यांनी गोंधळातील गणाला केवळ राष्ट्रीय स्तरावर नव्हे, तर आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. ‘देवा गजानना रे..’ हा गण राजारामभाऊ सादर करीत. संत वाड्.मयात, पंत वाड्.मयात आणि तंत वाड्.मयात भगवान गणेशाचे संकीर्तन ठायी ठायी आहे. संतांच्या अभंगांमध्ये.. ‘नाचत आले हो गणपती। पायी घागऱ्या वाजती’ असे म्हटले आहे. मोरोपंत, वामन पंडित, रघुनाथ पंडित अशा पंतांच्या वाड्.मयातही गणेशाचे संकीर्तन आहे. तर पठ्ठे बापूराव, भाऊ फक्कड, दगडू बाबा साळी, हैबती, राम जोशी, परशुराम, सगनभाऊ, मुकुंद गिरी, बाबाजी गोकुळ, हरिभाऊ साळी अशा अनेक शाहिरांनी आपल्या कवनांमधून गणेशाचे वर्णन केले आहे. ही कवने खंडोबाच्या जागरणात आणि देवीच्या गोंधळात सादर होतात. देवीच्या गोंधळात सादर होणारा एक गण असा आहे...

मूषकवाहना सुख सजना रे गणपती गजवदना गजानना आधी पुजू मोरयाला रे गणपती गजवदना गजानना। लाल शेंदूर ल्याला रे गणपती गजवदना गजानना पायी घागुऱ्या वाजती रे गणपती गजवदना गजानना।। अलीकडच्या काळामध्ये खंडोबाच्या जागरणात शंकर वाघे धामणीकर यांचे गण प्रामुख्याने म्हटले जातात. त्यांचे त्यांचे गुरू दगडूबाबा साळी आणि हरिभाऊ साळी यांचे गणही गायले जातात. जागरणातील गण संकीर्तन स्वरूपात सादर होतात. त्यात प्रत्यक्ष गणेशाचे दर्शन नसते आणि गण सादर होताना मुरळी खंडोबाच्या घराच्या समोर नसते. शंकरराव जाधव-धामणीकर यांनी शब्दबद्ध केलेले जागरणातील गणाचे रूप पाहा...

आज वंदन करितो, गौरीनंदना नवविध विद्या करितो भक्ती भक्तासी द्यावी मुक्ती हीच आमुची सर्व शक्ती लावितो पणा ।।१।। चौदा विद्येचा गणपती। चौसष्ट कला तुझे हाती बालकासी द्यावी स्फूर्ती । गावया गुणा ।।२।। नमो तुज सरस्वती। ब्रह्म वीणा घेऊन हाती। स्वर गायनाने डुलती सभा रंगणा ।।३।। शाहीर शंकर करी गर्जना। रक्षी रक्षी भक्ता जना। बबन नामदेव दावी । अंतरी खुणा ।।४।। गणपती ‘विघ्नहारक’ असल्याने तो रणात निश्चित तारून नेईल, अशी श्रद्धा गणातून व्यक्त केली जाते. मार्तंड भैरव आणि मणिमल्ल दैत्याच्या युद्धात गणपतीच्या योद्धा रूपाचे दर्शन होते. उल्कामुख दैत्याचा वध करणारा गणपती रणात रक्षण करील या श्रद्धेपोटी शंकरराव जाधव-धामणीकर यांनी रचलेल्या गणातील हे वर्णन पाहा... या गणा या या रणा या । विघ्न हारा या तारा या ।।धृ।। तुझ्याच स्मरणी जग हे तरले। अखंड व्यापुनी त्रिखंड उरले। दुखंड मनाला कधी न पुरले। पाखंड मनाला माराया ।।१।। काम, क्रोध अनिवार । होतो मजवर मारा फार । पडेल कार्याचा हा भार। जडल रोग तो बरा कराया ।।२।। ऋद्धी-सिद्धीचा तू सागर। दुःख क्लेष यावे हराया। विकल्पबुद्धीचा हा घोर। ज्ञान अमृत पाजाया ।।३।। कवी शंकर म्हणे कृपासिंधु। दीननाथा दीनबंधू। वारंवार तुजशी वंदू । दुःख क्लेश हराया ।।४।। खंडोबाचे जागरण आणि देवीच्या गोंधळामध्ये संकीर्तन रूपात होणाऱ्या गणरायाच्या दर्शनाचे आगळे माहात्म्य आहे. त्यात प्रत्यक्ष गणेशाचे अवतरण होत नसले, तरी या दोन्ही विधिनाट्यांमधून होणारी गणेशाची आराधना अतिशय लोकप्रिय आहे. ती या विधिनाट्यांच्या प्रारंभाचे केवळ स्तवन नव्हे, तर त्यांचा आत्मा आहे.

प्रा. डॉ. प्रकाश खांडगे prakash.khandge@gmail.com संपर्क : 9821913600

बातम्या आणखी आहेत...