आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

"रसिक'ची दशकपूर्ती:"रसिक'मुळेच "मुलुखमाती'गाजवू शकलो - संपत मोरे

18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

हासूर सासकिर या दक्षिण महाराष्ट्रातील एका खेड्यापासून सुरू झालेला आडवाटेवरचा प्रवास आमच्या गावातील तुकादादा गायकवाड यांच्या आठवणीपर्यंत सुरू राहिला. सलग दोन वर्षे "दिव्य मराठी'च्या "रसिक' पुरवणीत माझा कॉलम सुरू होता. या कॉलमचे नाव होते "मुलूखमाती'... "दिव्य मराठी'च्या पुरवणी संपादकांनी माझ्यासारख्या एका खेड्यातील तरुण पत्रकाराला कॉलम लिहिण्याची संधी दिली. आपुलकी दाखवत संपादकीय टीम माझ्या लिखाणाचे कौतूक करत राहिले. मी लिखाण द्यायचं आणि त्यांनी ते प्रसिध्द करायचं असं सुरू झालं. मग मी माझ्या मोटरसायकलवरून अनेक गावांत गेलो, अनेक लोकांना भेटलो. हा कॉलम सुरू नव्हता तोपर्यंत मी "रसिक'चा नियमित वाचक होतो. माझा कॉलम सुरू झाला तेव्हा काय लिहायचं, हे नक्की ठरवलं होतं.

बातम्यांचा विषय न झालेली अनेक माणसं मला दिसत होती.ही माणसं आगळीवेगळी होती. साधी आणि लक्षवेधी होती. या लोकांना समोर आणण्यासाठी माझा प्रवास सुरु झाला. रसिक पुरवणीत दोन वर्षे हा कॉलम सुरू होता.कॉलमच्या काळात गावगाड्यातील महत्त्वाची माणसं समोर आणता आली. डिजिटलवर झळकतात ती माणसं गावगाडा चालवत नाहीत तर गावगाडा उभा करणारी माणस ही कुठंतरी त्या डिजिटलच्या झगमगाटापासून दूर असतात... साधी असतात. आपलं आपलं काम करत असतात.त्याच लोकांना समोर आणावं असं वाटत होतं. दिव्य मराठीने संधी दिली आणि मग मी लिहीत राहिलो. लिखाणाला राज्यभर उदंड प्रतिसाद मिळाला.

हासुर सासकीरच्या शांताबाई यादव यांच्याबद्दल ऐकून होतो. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याच्या सीमेवर असणार हे खेडं. या खेड्यात शांताबाई यादव या केसकर्तनालय चालवतात.शांताबाई यादव यांचा नवरा मरण पावल्यावर त्यांनी नवऱ्याचं काम पुढं सूरु ठेवलं. ही गोष्ट चाळीस वर्षांपूर्वीची.त्या काळात खेड्यातील एक विधवा स्त्री पुरुषांचा व्यवसाय स्वतः करते.त्यातून आपल्या संसाराचा गाडा चालवते ही गोष्ट प्रेरणादायी आहे. या मुलुखावेगळ्या शांताबाई यांना भेटलो हा मला आयुष्यात सांगत रहावा असा क्षण होता.

मुलूखमातीच्या निमित्ताने फिरताना अनेक माणसं भेटली. सगळीच माणसं भावतील अशीच होती. आमच्या सांगली जिल्ह्यातील मसूचीवाडी गावचे माजी सरपंच दत्तू रत्तु खोत. सलग 32 वर्ष गावचे सरपंचपद भूषवलेले दत्तू आप्पा यांना भेटल्यावर असे सरपंच जर प्रत्येक गावाला भेटले तर स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या स्वप्नातील ग्रामीण महाराष्ट्र उभा राहायला फार वेळ लागणार नाही. दत्तू आप्पाना भेटल्यावर मी अनेकांना या माणसाला तुम्ही एकदा भेटा अस आवर्जून सांगू लागलो..दत्तू आप्पा आणि त्यांच्या सरपंचपदाची कहाणी वाचून मला राज्यभरातून फोन आले. त्यातील काही फोन 'खरोखरच असा माणूस आहे का? की ही कथा आहे?'असं विचारणारे होते.

कुस्ती हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय. आमच्या गावापासून जवळ असलेल्या कुंडल आणि बांबवडे या गावाला कुस्त्यांची मोठी परंपरा. तिथल्या कुस्त्या लहानपणापासून बघत आलेलो आहे. स्वतःही लाल माती अंगाला लागलेला,गावच्या तालमीत सराव केलेला मी एक कुस्तीप्रेमी. हिंदकेसरी अर्जूनवीर गणपतराव आंधळकर यांच मूळ गाव माझ्या गावापासून जवळ. आंधळीवरून मधल्या मार्गे शिरगावला जाताना अनेकदा हिंदकेसरी गणपतराव आंधळकर विद्यालय आंधळी हा बोर्ड दिसायचा.त्याच आबांना जेव्हा मी विट्याच्या मैदानात पाहिलं तेव्हा मी उठून उभा राहिलो होतो. बराच काळ त्यांच्याकडं बघत होतो. हिंदकेसरी मारुती माने यांच्या गोष्टी आम्हा पोरांना माझे आजोबा किसनराव यादव नेहमी सांगायचे. दुसरे महाराष्ट्र केसरी भगवानराव बाबा मोरे.

आमच्या भागात त्यांच्याबद्दल लोकांच्या मनात मोठी श्रद्धा आहे. या सगळ्या थोर पैलवानाच्या गोष्टींनी कुस्तीकडे वळलो.कुस्तीवर अनेक ठिकाणी लिहिलं. मुलूखमाती मध्ये उपेक्षित मल्ल बापू नाना बेलदार, प्रतिकूल परिस्थितीतही कुस्तीगिर होण्यासाठी जीवापाड मेहनत करणारी संजना बागडी आणि कुस्तीची ओघवत्या शब्दात कॉमेंट्री करणारे शंकर आण्णा पुजारी यांची शब्दचित्र मांडली आहेत.बापू नाना बेलदार यांचा लेख वाचून अकोला जिल्ह्यातील येळवण येथे त्यांचे नाव एका सभागृहाला दिले आहे. संजना बागडी हिच्या पाठीशी औरंगाबाद येथील कुस्तीप्रेमी उभा राहिले.त्यांनी तिला सहकार्य केले. रसिक पुरवणीतील काही निवडक लेखांचे पुस्तक "मुलूखमाती' च्या रूपाने अलीकडेच प्रसिद्ध झाले आहे.पुस्तक लिहिणारा लेखक म्हणून माझी "दिव्य मराठी रसिक' मुळे ओळख झाली.

मुलुखमाती
लेखक - संपत मोरे
प्रकाशक - लोकायत प्रकाशन, सातारा
मूल्य - २५० रु.
संपर्क - ९४२२७४२९२५

बातम्या आणखी आहेत...