आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जग थांबलं, पण समृद्धी गतिमान:701 किलोमीटरच्या महामार्गाचे अविरत काम, सप्टेंबर 2022 च्या आधीच प्रकल्प पूर्ण करण्याचा ध्यास

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • समृद्धी महामार्गाच्या बजेटवर कोणताही परिणाम नाही, बांधकामांची आर्थिकदृष्ट्या 26 टक्के प्रगती

कोरोनाच्या संसर्गामुळे सुरू असलेल्या लॉकडाऊनमध्ये संपूर्ण देश ठप्प झाला असताना राज्याच्या महत्त्वाकांक्षी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम मात्र अखंडितपणे सुरू आहे. परप्रांतीय मजूर गावी परतल्याने अर्ध्याहून कमी मनुष्यबळात महामार्ग बांधकामांची २६ टक्के प्रगती शक्य झाली. कामगारांच्या कमतरतेवर मात करण्यासाठी अधिकाधिक यंत्रांचा वापर करत ठिकठिकाणी डोंगर कापून रस्त्यांचे काम सुरू आहे. नियोजित सप्टेंबर २०२२ च्या डेडलाइनआधीच प्रकल्प पूर्ण होईल, असा विश्वास अधिकाऱ्यांना वाटतोय.

राज्याचा विकास केवळ मुंबई, पुण्यापर्यंत मर्यादित न राहता त्यात मराठवाडा, विदर्भाचाही समावेश व्हावा या हेतूने नागपूर-मुंबई शीघ्र संचार द्रुतगती महामार्गांची घोषणा तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारने केली होती. त्यानंतर पायाभूत सुविधांवरही मंत्रिमंडळ उपसमितीने ३० नोव्हेंबर २०१५ रोजी या प्रकल्पाची धुरा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे सोपविली. प्रकल्पासाठी आवश्यक जमिनीचे १०० टक्के संपादन झाले असून द्रुतगती मार्गाचे बांधकाम जोरात सुरू आहे.

काम वेळेत पूर्ण होणार

समृद्धी महामार्गाचे काम टाळेबंदीच्या काळातही प्रगतिपथावरच आहे. या पार्श्वभूमीवर प्रकल्पाची कार्यान्वयन यंत्रणा असलेल्या महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे सहव्यवस्थापकीय संचालक चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याशी केलेली बातचीत...

> समृद्धी महामार्गांची आजची स्थिती काय आहे? नेमका किती रस्ता तयार झाला आहे?

समृद्धी महामार्गांची लांबी ७०१ किमी असून १६ भागांमध्ये महामार्गाचे बांधकाम प्रगतिपथावरच आहे. आतापर्यंत महामार्ग बांधकामांची २६ टक्के (आर्थिक) प्रगती साध्य झाली आहे.

> कोरोनामुळे महामार्गाच्या बजेटवर परिणाम झाला आहे का? प्रकल्पाचा निधी इतरत्र वळवला किंवा तो मिळण्यात विलंब होत आहे का?

नाही, समृद्धी महामार्गाच्या बजेटवर अद्यापपर्यंत कोणताही परिणाम झालेला नाही. प्रकल्पासाठी असणारा निधी इतरत्र कुठेही वळवलेला नाही. निधी मिळवण्यात विलंब झालेला नाही.

> कोरोनाच्या संसर्गामुळे कामावर परिणाम झाला आहे का? 

होय, कोरोना संकटामुळे प्रकल्पाच्या प्रगतीवर काही प्रमाणात परिणाम झाला आहे. मात्र, सद्यःस्थितीत सर्व प्राप्त सूचनांचे पालन करून नियमित स्वरूपात प्रकल्पाचे काम सुरू आहे. फेब्रुवारी महिन्यात प्रकल्पावर काम करणाऱ्या मजुरांची संख्या २० हजार ९५८ एवढी होती. आता ही संख्या ९ हजार ४५० एवढी झाली आहे. प्रकल्पाचे बहुतांश काम यंत्रसामग्रीवर अवलंबून असून कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर मजूर पुन्हा कामावर परततील, असा विश्वास आहे.

> समृद्धी महामार्गाचे १०० टक्के काम कधी पूर्ण होईल?

समृद्धी महामार्ग प्रकल्पाच्या नागपूर ते इगतपुरी यादरम्यान ६१२ किमी लांबीचे बांधकाम पूर्ण करण्याची तारीख जून २०२१ आहे. इगतपुरी ते भिवंडी (आमने) या उर्वरित भागाचे बांधकाम पूर्ण करण्याची अंतिम मुदत सप्टेंबर २०२२ आहे. प्रकल्प पूर्ण करण्यासाठीची डेडलाइनच अद्यापपर्यंत पुढे ढकलण्यात आलेली नाही. महामार्गाचे काम नियोजित वेळेनुसार म्हणजे सप्टेंबर २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे प्रस्तावित आहे. तथापि नियोजित तारखेच्या अगोदरच हे काम पूर्ण होईल याची मला खात्री आहे.

डोंगर कापून रस्ते

‘दिव्य मराठी’ प्रतिनिधीने समृद्धीच्या कामावर होणाऱ्या परिणामांची माहिती घेण्यासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील करमाडपासून ४ किलोमीटरवरील शेवगा, भांबर्डा, जयपूर, वरझडी, पळशी, जटवाडा ते हर्सूल सावंगी मेन कॅम्प या ५७ किलोमीटरच्या कामाला भेट दिली. बहुतांश भाग डोंगराळ आहे. ८ ठिकाणी डोंगर कापून रस्ता तयार केला जात आहे. भांबर्डा गावातील डोंगरातून ६३ मीटरचा रस्ता जात असून दोन्ही बाजूने ५ मीटर उंच डोंगर असल्याची माहिती धन्विका कॉट्रॅक्टर्सचे संचालक रामू राजपूत यांनी संागीतले. मे २०१९ पासून हे काम सुरू होते. जानेवारीपासून कामाने वेग घेतला आहे. २५ किलोमीटरच्या कामावर ६०९ कामगार होते. पैकी ४०० परप्रांतीय कामगार गावी परतले. उर्वरित कामगार परिसरातील गावातले आहेत. त्यांच्यामुळे कामात खंड पडलेला नाही, अशी माहिती भांबर्डाचे सरपंच भीमराव साळुंके यांनी दिली.

अर्ध्या मजुरांवर वेगवान काम

प्रकल्पावरील मजूर लॉकडाऊनमध्ये गावी परतले. सुरुवातीला ३-४ दिवस काम बंद होते. नंतर विशेष परवानगीने कामाला सुरुवात झाली. मजुरांची कमतरता भरून काढण्यासाठी अधिकाधिक यंत्रांचा वापर केला जात आहे

बातम्या आणखी आहेत...