आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Sandeep Singh Allegations By Female Coach; Haryana Minister | Story Of Rise And Fall | Sandeep Singh

मला खुश केले तर इन्स्टाग्राम व्हेरिफाय करून देईन:महिला कोचच्या आरोपांत अडकलेल्या संदीप सिंह यांच्या उदय आणि पतनाची पूर्ण कहाणी

लेखक: शाश्वतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

'माझ्या मांड्यांवर हात ठेवत तो म्हणाला - मला तु आवडते. इकडे तिकडे पळू नकोस, मी तुला स्पॉन्सर करीन. जर तु मला खुश केले तर मी इन्स्टाग्राम अकाऊंटही व्हेरिफाय करून देईन. बळजबरीने किस करण्याचा प्रयत्नही केला, पण मी त्याला मागे ढकलले.'

एका महिला प्रशिक्षकाने पोलिसांसमोर दिलेला हा जबाब आहे, जो त्यांनी हरियाणाच्या क्रीडामंत्री पदाचा राजीनामा देणाऱ्या संदीप सिंह यांच्यावरील आरोपांप्रकरणी दिला आहे. पोलिसांनी संदीप सिंह यांच्याविरुद्ध 5 कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे, ज्यामध्ये दोन अजामीनपात्र आहेत. संदीप सिंह यांनी आधी पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळून लावले, नंतर राजीनामा दिला.

हे तेच संदीप सिंह आहेत, जे एकेकाळी भारतीय हॉकी संघाचे कर्णधार आणि जगातील सर्वात वेगवान ड्रॅग-फ्लिकर्सपैकी एक होते. गोळी लागल्यानंतरही त्यांनी हॉकीत पुनरागमन केले. राजकारणात आल्यावर पहिलीच निवडणूक जिंकून मंत्रीही झाले. आता महिला प्रशिक्षकाच्या लैंगिक छळाच्या आरोपांनी ते घेरले आहेत. दिव्य मराठी एक्सप्लेनरमध्ये जाणून घ्या संदीप सिंह यांचा उदय आणि पतनाची संपूर्ण कहाणी...

1986 मध्ये जन्मलेल्या संदीप सिंह यांचे मोठे भाऊ बिक्रमजीत सिंह हे हॉकी खेळाडू होते. संदीप सिंह यांन त्यांच्या हॉकी किटची आवड होती, पण त्याला हात लावण्याची त्यांना परवानगी नव्हती. त्यांच्या मोठ्या भावाला बूट-कपडे मिळायचे. इकडे-तिकडे जायला मिळायचे. घरचे म्हणाले की तुलाही हे हवे असेल तर तुला हॉकी खेळावे लागेल.

संदीप सिंह यांचा किशोर वयातील एक फोटो. एका मुलाखतीत संदीप सिंह यांनी सांगितले होते की, भावाच्या हॉकी किटसाठी त्यांनी हॉकी खेळायला सुरुवात केली होती.
संदीप सिंह यांचा किशोर वयातील एक फोटो. एका मुलाखतीत संदीप सिंह यांनी सांगितले होते की, भावाच्या हॉकी किटसाठी त्यांनी हॉकी खेळायला सुरुवात केली होती.

संदीप त्यांच्या अचूक ड्रॅग फ्लिकने फ्लिकर सिंह बनले

ज्युनियर खेळताना संदीप यांनी खूप नाव कमावले. त्यांच्या ड्रॅग फ्लिकची खूप डिमांड होती. ड्रॅग फ्लिक ही हॉकीमध्ये पेनल्टी कॉर्नरवरून गोल करण्याची पद्धत आहे. कोपऱ्यातून अटॅककडे ढकलेल्या बॉलने याची सुरुवात होते.

संदीप सिंह यांच्या ताशी 145 किमी तुफानी वेगामुळे त्यांना फ्लिकर सिंह म्हटले जाऊ लागले.
संदीप सिंह यांच्या ताशी 145 किमी तुफानी वेगामुळे त्यांना फ्लिकर सिंह म्हटले जाऊ लागले.

2003 मध्ये भारतीय हॉकी संघात निवड झाली. 2004 मध्ये अथेन्स ऑलिम्पिकमध्ये सहभागी झाले. ते तेव्हा तिथले जगातील सर्वात तरुण हॉकीपटू होते. 2005 मध्ये ज्युनियर वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 10 गोल केले. 2006 मध्ये जर्मनीत होणाऱ्या हॉकी विश्वचषकासाठी वरिष्ठ संघाचा भाग बनले. या स्पर्धेपूर्वीच संदीप सिंह यांना गोळी लागली होती.

चालत्या ट्रेनमध्ये गोळी लागली, शरीराच्या खालच्या भागात अर्धांगवायू झाला

2006 सीनियर वर्ल्ड कपच्या तयारीसाठी एक आठवड्याचा ब्रेक होता. 22 ऑगस्ट 2006 रोजी संदीप त्यांच्या मित्रांसह कालका शताब्दी एक्स्प्रेसने चंदीगडहून घराकडे निघाले. संदीपच्या सीटच्या मागे रेल्वे पोलीस दलाचा जवान बसला होता. तो बंदूक साफ करत असताना चुकून गोळी सुटली.

संदीप सिंह एका मुलाखतीत सांगतात, 'मी खाली बसताच अचानक स्फोट झाला आणि माझ्या आजूबाजूचे सर्व काही सुन्न झाले. कुणाला काही समजायच्या आतच एक जवान 9 एमएमची पिस्तुल घेऊन आला आणि म्हणाला की माझ्याकडून चुकून गोळी झाडली गेली. यानंतर असे वाटले जसे माझ्या कमरेत कोणीतरी गरम लोखंडी रॉड घातली आहे.

गोळी संदीप यांच्या मणक्याला लागली आणि त्यांच्या शरीराच्या 40% भागाचे काम थांबले होते. त्यांना चंदीगड येथील पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

रुग्णालयाच्या बेडवर पडलेल्या संदीप सिंह यांचा फोटो. डॉक्टर्स म्हणाले होते की संदीप सिंह आता पुन्हा खेळू शकणार नाही.
रुग्णालयाच्या बेडवर पडलेल्या संदीप सिंह यांचा फोटो. डॉक्टर्स म्हणाले होते की संदीप सिंह आता पुन्हा खेळू शकणार नाही.

संदीप या घटनेला गेम चेंजर मानतात. त्यांनी आपल्या भावाला हॉकी स्टिक मागितली आणि ती त्यांच्या पलंगाजवळ ठेवली. संदीप सांगतात, 'गोळी झाडल्यानंतर शरीराच्या सर्व अवयवांना इजा झाली होती. फक्त लिक्विड दिले जायचे. त्यामुळे माझे वजन कमी होऊ लागले. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा मी अस्वस्थ झालो, परंतु मी ठरवले की हे माझ्यासाठी बनलेले नाही. माझ्यासाठी हॉकीचे मैदान बनले असून मला खेळायचे आहे.'

सगळ्यांना वाटलं करिअर संपलं, पण संदीप 2 वर्षांतच मैदानात उतरले

संदीप सिंह यांच्या शरीराचा खालचा भाग सुन्न झालेला होता. त्यांच्याकडे एकच हॉकी स्टिक होती. ते म्हणतात, 'झोपेसाठी औषधे दिली होती, तरीही मी 1-2 तासच झोपू शकत होतो. माझ्या मनात फक्त हॉकीचे विचार होते. मला खेळायचे होते आणि ते सर्व रेकॉर्ड तोडायचे होते जे मी अजून बनवलेले नाहीत. ज्या हॉकी स्टिकने मी जगातील सर्वोत्कृष्ट ड्रॅग फ्लिक मारायचो त्याच्या मदतीने चालण्याचा प्रयत्न करावा लागत होता.'

संदीप सिंह पीजीआयमधून उपचारानंतर बाहेर आले तेव्हा व्हीलचेअरवर होते.
संदीप सिंह पीजीआयमधून उपचारानंतर बाहेर आले तेव्हा व्हीलचेअरवर होते.

तब्येतीत थोडी सुधारणा झाल्यावर ते भारतीय हॉकी महासंघाच्या वतीने पुनर्वसनासाठी परदेशात गेले. तिथे 6-7 महिने उपचार घेतले आणि भारतातून व्हीलचेअरवर गेलेले संदीप स्वतःच्या पायावर परतले.

संदीप तेव्हा एअर इंडियामध्ये काम करायचे आणि त्यांच्या टीमकडून खेळायचे. त्यांनी तिथे सतत सर्वोत्तम करत फिट झाले. देशातील अनेक स्पर्धांमध्ये खेळल्यानंतर संदीप सिंह यांनी हॉकी फेडरेशन ऑफ इंडियाशी संपर्क साधला आणि दोन वर्षांनी त्यांना संधी मिळाली. निमित्त होते सुलतान अझलान शाह चषकाचे. ही तीच स्पर्धा होती ज्यात चार वर्षांपूर्वी संदीप सिंह सर्वात लोकप्रिय आणि तरुण खेळाडू होते. यामध्ये संदीप सिंह यांनी एकूण 8 गोल केले आणि ते सर्वाधिक गोल करणारे खेळाडू ठरले आणि त्यांना संघाचा कर्णधार बनवण्यात आले.

वाढदिवसाच्या रात्री तीन रेकॉर्ड केले

एका वर्षाच्या आत, 2009 मध्ये, संघाने 13 वर्षांनंतर सुलतान अझलान शाह कप जिंकला. यामध्ये संदीप सिंह यांनी सर्वाधिक गोल केले आणि त्यानंतर ते टूर्नामेंटचे सर्वोत्तम खेळाडूही ठरले.

2009 मध्ये भारतीय हॉकी संघाने 13 वर्षांनंतर सुल्तान अझलान शाह कप जिंकला. या टीमचे कर्णधार संदीप सिंह होते.
2009 मध्ये भारतीय हॉकी संघाने 13 वर्षांनंतर सुल्तान अझलान शाह कप जिंकला. या टीमचे कर्णधार संदीप सिंह होते.

2010 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्कार मिळाला होता. 2011 मध्ये, संदीप सिंह यांचा जागतिक हॉकी महासंघाने जगातील टॉप 5 खेळाडूंच्या यादीत समावेश केला. 2012 च्या लंडन ऑलिम्पिकसाठी संदीप सिंह यांच्याकडून मोठ्या अपेक्षा होत्या. फ्रान्सविरुद्धच्या पात्रता फेरीच्या अंतिम सामन्यात संदीप सिंह यांनी एकापाठोपाठ एक अनेक विश्वविक्रम केले.

145 किमी प्रतितास वेगाने ड्रॅग फ्लिकसह, आंतरराष्ट्रीय स्तरावर फायनलमध्ये एकाच सामन्यात 5 गोल केले. संदीप यांनी आपले आदर्श धनराज पिल्ले यांचा एकाच स्पर्धेत 121 गोलचा विक्रमही त्याच दिवशी मोडला. योगायोग असा होता की हा सामना 27 फेब्रुवारीला होता आणि संदीप सिंह यांचा वाढदिवसही त्याच दिवशी आहे.

निवृत्तीनंतर चित्रपट बनला, नंतर राजकारणात आले

संदीप सिंह यांनी 200 हून अधिक आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 150 हून अधिक गोल केले आहेत. ते शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2016 मध्ये खेळले होते. 2018 मध्ये त्यांच्या जीवनावर 'सूरमा' नावाचा चित्रपटही बनवण्यात आला होता, ज्यामध्ये संदीप यांची भूमिका दिलजीत दोसांझने केली होती.

संदीप सिहांच्या जीवनावरील चित्रपट सूरमा शाद अलींनी दिग्दर्शित केला होता. यात दिलजीत दोसांझ, तापसी पन्नू, अंगद बेदी आणि विजय राज यांनी अभिनय केला होता.
संदीप सिहांच्या जीवनावरील चित्रपट सूरमा शाद अलींनी दिग्दर्शित केला होता. यात दिलजीत दोसांझ, तापसी पन्नू, अंगद बेदी आणि विजय राज यांनी अभिनय केला होता.

2019 मध्ये संदीप यांनी राजकारणात प्रवेश केला. हरियाणा विधानसभा निवडणुकीत त्यांना भारतीय जनता पक्षाने पिहोवा येथून तिकीट दिले होते. पहिल्याच निवडणुकीत संदीप यांनी दणदणीत विजय नोंदवला. त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हरमोहिंदर सिंह चट्ठा यांचे पुत्र मनदीप सिंह चट्ठा यांचा पराभव केला. मनोहर लाल खट्टर यांच्या सरकारमध्ये संदीप यांना क्रीडा मंत्री आणि मुद्रण मंत्री करण्यात आले.

राजकारणातील निष्णात खेळाडू नाही, मंत्र्यांचीही साथ मिळाली नाही

त्यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली, जिंकली आणि मंत्रीही झाले. हॉकीमधील कामगिरी पाहून त्यांना क्रीडा मंत्रालयाची जबाबदारी सोपवण्यात आली. काही ज्येष्ठ मंत्रीही या निर्णयावर नाराज होते. यामुळेच महिला प्रशिक्षकाच्या आरोपांनी घेरले असताना मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचीही साथ त्यांना मिळाली नाही.

वरिष्ठ सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संदीप सिंह यांना मनोहर मंत्रिमंडळातील नॉन-परफॉर्मर मंत्री म्हणून आधीच संबोधले जात होते. विभागांच्या विलीनीकरणानंतर संदीप सिंह यांच्याकडून एक विभागही गेला आहे. यानंतर संभाव्य मंत्रिमंडळ फेरबदलात त्यांची खुर्ची गमवण्याचा धोकाही वर्तवला जात होता. अशा स्थितीत अचानक ते महिला प्रशिक्षकाच्या आरोपाच्या वादात सापडला आहे.

संदीप सिंह यांच्यावर महिला प्रशिक्षकाचे आरोप आणि क्रीडा खाते सोडण्यापर्यंत काय झाले?

  • 26 डिसेंबर रोजी ज्युनियर महिला प्रशिक्षकाने म्हटले की, मंत्र्यांनी तिला सरकारी निवासस्थानी बोलावले आणि तिच्या मांडीवर हात ठेवला. ते म्हणाले की मला खुश ठेव, मग मी तुम्हाला खुश ठेवीन. आरोपांनंतर तासाभरात मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन आरोप फेटाळून लावले.
  • 27 डिसेंबर रोजी क्रीडा विभागाच्या उपसंचालक कविता यांनी संदीप सिंह यांच्या समर्थनार्थ पत्रकार परिषद घेतली. महिला प्रशिक्षकावर असभ्यतेचा आरोप करत या प्रकरणाची चौकशी व्हायला हवी असे त्या म्हणाल्या.
  • 28 डिसेंबरला अचानक क्रीडा मंत्री संदीप सिंह विधानसभा अध्यक्ष ग्यानचंद गुप्ता यांना भेटायला आले. याचा तपशील समोर आला नाही, परंतु संध्याकाळपर्यंत हरियाणाचे डीजीपी पीके अग्रवाल यांनी तपासासाठी 3 सदस्यांच्या विशेष तपास पथकाची (एसआयटी) स्थापना केली.
  • 31 डिसेंबर रोजी प्राथमिक तपासात, महिला प्रशिक्षकाचे विधान खरे असल्याचे आढळल्यानंतर मंत्र्यांविरोधात चंदिगडच्या, सेक्टर 26 पोलिस ठाण्यात कलम 354, 354A, 354B, 342 आणि 506 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
  • चंदीगड पोलिसांनी 1 जानेवारी रोजी खुलासा केला की, मंत्री संदीप सिंह यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. ते सकाळीच मुख्यमंत्री मनोहर लाल यांची भेट घेण्यासाठी पोहोचले. गुन्हा नोंदवण्याची बाब सार्वजनिक झाल्यावर संदीप सिंह म्हणाले- मी क्रीडा खाते सीएम मनोहर लाल यांच्याकडे सोपवले आहे. माझी प्रतिमा डागाळण्याचे षडयंत्र होत आहे. तपास सुरू आहे, मुख्यमंत्र्यांचा निर्णय मला मान्य असेल.
बातम्या आणखी आहेत...