आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Dvm originals
 • Sangli Corona Situation: Sanjay Awate Writes About Sangli Corona Situation And Guardian Minister, NCP Leader Jayant Patil

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

लेख:जयंत पाटील, जागे व्हा, अन्यथा उद्या तुम्ही स्वतःलाही माफ करू शकणार नाही!

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • दैनिक दिव्य मराठीचे राज्य संपादक संजय आवटे यांचा कॉलम
 • सांगली जिल्ह्यातली परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली, पालकमंत्री असलेले जयंत पाटील मुंबईत जाऊन बसलेले!

हा लेख म्हणजे, राजकीय टिप्पणी नाही. परिस्थितीचं गांभीर्य सांगण्याचा प्रामाणिक प्रयत्न आहे.

दक्षिण महाराष्ट्राचा दौरा केल्यानंतरचे आणि विविध घटकांशी चर्चा केल्यानंतरचे हे अभ्यासपूर्ण मत आहे.

सांगली जिल्ह्यातली परिस्थिती नियंत्रणाबाहेर गेली आहे. आणि, पालकमंत्री असलेले जयंत पाटील मुंबईत जाऊन बसलेले आहेत. माणसं मरत असताना, जयंत पाटील यांनी सांगलीला वा-यावर सोडलं आहे.जयंतराव 'पाहुणेमंत्री' झालेले आहेत.

अनेक आश्वासनं जयंतरावांनी दिली, पण ती सगळी हवेत विरली.

 1. ऑगस्ट महिन्यापासून, सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यांत कोरोनाने जबरदस्त दहशत निर्माण केली आहे. मुंबई, पुणे या खालोखाल सर्वाधिक रुग्णसंख्या या तीन जिल्ह्यांत झाली आहे. आणि, एकूण लोकसंख्येच्या प्रमाणात पाहिले तर राज्यात सर्वाधिक रुग्णसंख्या ही या जिल्ह्यांत आहे.
 2. सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णांना बेडस् मिळत नाहीत. याबरोबरच अत्यावश्यक असलेल्या ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरची सुविधाही अत्यंत तोकडी असल्याने अनेक रुग्णांना त्याअभावी मृत्यूला सामोरे जावे लागले असल्याने, जिल्ह्यातील कोरोना मृत्यूचा दर हा राज्यात सर्वाधिक म्हणजे ३.८३ टक्यावर जाऊन पोहचला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तर १५ दिवसांत ६६ टक्यांवरून ५२.४९ टक्क्यांवर आले आहे.
 3. रुग्णांना ऑक्सिजन व व्हेंटिलेटरचे बेड मिळेनात. तरीही, प्रशासन ढिम्म आहे. रोज सरासरी ४० कोरोना मृत्यू होत आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याच्या बाबतीत सांगली जिल्ह्याचा राज्यात २६ वा क्रमांक आहे.
 4. दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात वजनदार मंत्री म्हणून जयंत पाटील यांची ओळख आहे. सध्या त्यांच्याकडे सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची सूत्रे आहेत. सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील आहेत. तर कोल्हापूरचे पालकमंत्री गृहराज्यमंत्री सतेज पाटील आहेत. या तिन्ही जिल्ह्यांत राजकीय दबदबा आणि प्रशासनाची सारी सूत्रे ही जयंत पाटलांच्याकडेच आहेत. परंतु, जयंत पाटील सपशेल अपयशी ठरले आहेत.
 5. काही दिवसांपूर्वी, मुंबई- केरळसह कोरोनाचे प्रमाण कमी केलेल्या भागातील तज्ज्ञ यंत्रणा इथे देण्याची घोषणा जयंत पाटील यांनी केली होती. परंतु ती केवळ पोकळ राजकीय घोषणा ठरली. खुद्द त्यांच्या सांगली जिल्ह्यातील जिल्हा प्रशासनाच्या उदासीन कारभाराने सांगलीच्या मृत्यू दरात सर्वाधिक वाढ झाली आहे.
 6. ऑक्सिजनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्ण अत्यवस्थ होत आहेत. एमआयडीसीचा ऑक्सिजन पुरवठा 20 % इतका कमी केला आहे. तरीही ऑक्सिजन पुरत नाही. ऑक्सिजन संपल्यामुळे रुग्ण गेल्याच्या घटना काही खासगी रुग्णालयात घडलेल्या आहेत आणि घडत आहेत. परंतु, प्रशासनाने याकडे सोईस्कर दुर्लक्ष केले आहे. सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन निर्मितीचा प्लांट शासनाने रखडवून ठेवला आहे. तात्काळ मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनची व्यवस्था न झाल्यास जिल्ह्यात हाहाकार उडेल.
 7. सगळे दवाखाने फिरून सुद्धा पेंशटला बेड मिळाला नाही. आणि, ज्या गाडीतून दवाखाने फिरतोय त्याच गाडीत मृत्यू झाल्याच्या घटना जिल्ह्यात घडत आहेत.
 8. जयंत पाटील हे साखर उद्योगाचे मोठे नेते म्हणून ओळखले जातात. सांगली जिल्ह्यातील १८ सहकारी साखर कारखान्यांपैकी १० साखर कारखाने सुरु आहेत. या १० कारखान्यांकडून १०० बेडची कोरोना रुग्णालये उभारण्याची घोषणा केली गेली खरी, परंतु दोन महिने झाले तरीही अशी रुग्णालये उभारण्यात जयंत पाटील अपयशी ठरले आहेत.
 9. सर्वात महत्वाचे म्हणजे, सांगली जिल्हा हा कोरोना रुग्णांच्या संख्येत अव्वल क्रमांक गाठत असताना जयंत पाटील हे सांगलीत डेरा टाकून न बसता 'फ्लाईंग व्हिजिट'च्या माध्यमातून सांगलीत येतात. त्यावेळीही कोरोना प्रश्‍नाबाबत चर्चा न करता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आणि इतर उद्घाटनांच्या कार्यक्रमांना अधिक पसंती देतात. एवढेच नव्हे तर आपला इस्लामपूर मतदारसंघ वगळता जिल्ह्यातील अन्य भागांकडे ते कानाडोळा करतात, असा आरोप इतर पक्षांतून नव्हे. खुद्द राष्ट्रवादीमधूनही होतो आहे.
 10. २०१९ च्या महापुराने गलितगात्र झालेली सांगली कोरोनामुळे पूर्णपणे उध्वस्त होईल की काय, अशी भीती निर्माण झाली आहे.

जयंत पाटील, उठा, जागे व्हा. सांगलीत तळ ठोकून बसा.

नाहीतर, उद्या तुम्ही स्वतःलाही माफ करू शकणार नाही.

Open Divya Marathi in...
 • Divya Marathi App
 • BrowserBrowser