आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

निमित्त:पन्नालालजी, तुमचं असणं हीच आशा आहे!

4 महिन्यांपूर्वीलेखक: संजय आवटे
  • कॉपी लिंक

सोलापुरातील ‘छाया- प्रकाश फाउंडेशन'च्या वतीने दिल्या जाणाऱ्या ‘अभिवंदन' पुरस्कारासाठी यंदा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि विचारवंत संपादक पन्नालाल सुराणा यांची निवड झाली आहे. आज हा पुरस्कार सोहळा होत आहे. त्यानिमित्त...

पंचवीस वर्षांपूर्वीची गोष्ट. पुण्यातील “रानडे इन्स्टिट्यूट'मध्ये आम्ही पत्रकारितेचे शिक्षण घेत होतो. खऱ्या अर्थाने तो ‘पत्र'कारितेचा काळ होता. संवादासाठी व्हॉट्सअॅप वा आणखी माध्यमे नव्हती. आधी पेजर आणि मग मोबाइल ही मिरवण्याची गोष्ट होती. ई-मेल वापरणाऱ्या प्राण्याला भयंकर टेक्नोसॅव्ही वगैरे मानण्याची पद्धत होती. त्यामुळे ‘पत्र' हीच संवादाची खात्रीची सोय होती. पन्नालाल सुराणा यांचं “ग्यानबाचे अर्थकारण' त्याच सुमारास आलं होतं. ते वाचून मी पन्नालालजींना पत्र लिहिलं. पत्रकार म्हणून मी काय वाचायला हवं, कसं लिहायला हवं, असंही काही त्या पत्रात होतं. माझ्या भाबड्या प्रश्नांवर पन्नालालजींचं सविस्तर उत्तर आलं. वापरलेली पाकिटं उकलून जो पाठकोरा कागद मिळतो, अशा कागदांवर लिहिलेलं ते पत्र होतं. धावत्या चित्रासारखं पन्नालालजींचं अक्षर. ओघात लिहिलेलं ते पत्र म्हणजे जणू “आपलाचि वाद आपणाशी'! सामान्य माणसाला केंद्रबिंदू मानणारी आणि मूल्यं उराशी बाळगत झेपावणारी जी ‘पॅशनेट' पत्रकारिता पन्नालालजींनी सांगितली, ती तेव्हाही नजरेच्या टप्प्यात नव्हती. आज तर अशा पत्रकारितेचा पत्ता शोधूनही सापडणार नाही!

काळ निराश करणारा खराच, पण तरीही उमेद कायम असते. कारण, तेव्हा मला दीर्घ पत्र लिहिणाऱ्या ‘पन्ना'लालांची उमेद ८३ व्या वर्षीही तीच असते. आजही अशा एखाद्या पाठकोऱ्या कागदावर शेती विधेयकाबद्दल पन्नालाल लिहीत असतात. त्यासाठी रस्त्यावर उतरू शकतात आणि सत्तेला जाब विचारू शकतात. ८३ वर्षांचा असा योद्धा रिंगणात असताना, आपल्याला जहाज सोडण्याची परवानगी कशी असू शकते? सारं कोसळत असतानाही हा माणूस उभा असतो. इतरांनाही उभं करतो. किल्लारीत धरणी दुभंगली, तेव्हा इतस्ततः झालेल्या लेकरांना मायेचं आभाळ देणारा हाच बापमाणूस असतो! लोकशाही समाजवादासाठी आयुष्य पणाला लावणाऱ्या पन्नालालजींच्या या सच्चेपणानं थक्क व्हायला तर होतंच; शिवाय त्यांची ही पायपीट आपल्यालाही पावलांपुरता प्रकाश देत असते. ‘एकला चलो रे' म्हणत हा माणूस गेली इतकी वर्षे धावतो आहे. “आउट ऑफ साइट' वर्गाचा आवाज होतो आहे. शहाण्यांच्या या दुनियेत असा एखादा वेडा माणूस असतो, म्हणून माणूसपणावरचा विश्वास अढळ राहतो.

मला आठवतं. पुण्यात शिकत असताना एकेदिवशी भाई वैद्य म्हणाले, “संजय, या रविवारी आपल्याला पन्नालाल सुराणांना भेटायला जायचंय.' मनात आलं, महाराष्ट्राचा माजी गृहमंत्री आणि महाराष्ट्रातला एक ख्यातकीर्त माजी संपादक यांच्या भेटीचे आपण साक्षीदार ठरणार! तोवर अशा काही “सेलिब्रिटीज'च्या भेटीगाठी झाल्या होत्याच. पण, सकाळी पहिला धक्का बसला. माजी गृहमंत्री आणि मी एसटीच्या लालपरीने निघालो होतो. धुळीनं माखलेल्या रस्त्यावरून धुळाक्षरे गिरवत माझं शिक्षण सुरू झालेलं होतं. परंडा तालुक्यातल्या आसू नावाच्या दुर्गम गावात आम्ही आलो. तिथून मग पन्नालालजींच्या शेतात. ते तेव्हा काही शेतीविषयक, पर्यावरणविषयक प्रयोग करत होते. उन्हाळ्याचे दिवस होते. चालताना मी घामाघूम झालो. पण, भाई मस्त गप्पा मारत होते. आम्ही त्यांच्या शेतावर पोहोचलो. मग पन्नालालजींनी जलसंधारणाच्या प्रयोगांची माहिती दिली. काही अनुभव सांगितले. शेती प्रश्नांची चिकित्सा केली. भाई आणि पन्नालालजी मग अॅडम स्मिथ ते शरद जोशी अशा जग कवेत घेणाऱ्या गप्पा मारत होते. मला हा धक्का होता. दोन वर्षांपूर्वीच एका मोठ्या दैनिकाचा मुख्य संपादक असणारा, समाजवादी पक्षाचा राज्याचा नेता असणारा हा माणूस आसूसारख्या आडवळणी गावात शेतीचे प्रयोग करतो आहे... दुष्काळग्रस्तांच्या डोळ्यांतले आसू पुसतो आहे!

पन्नालालजींनी कधी लौकिकाची पर्वा केली नाही की आपल्या मूल्यांशी तडजोड केली नाही. नव्या पिढीच्या ‘करिअरिस्ट' संपादकांना अथवा मुत्सद्दी राजकीय नेत्यांना ही पॅशन कधी समजणारही नाही. दुष्काळ असो की वंचितांचे प्रश्न, हा माणूस चालत सुटतो. राष्ट्र सेवा दलाला नवी दिशा देतो. साहित्य संमेलनांना उभारी देतो. नव्या पिढीशी संवाद साधताना साने गुरुजी कथामालेला नवी ऊर्जा देतो! या सगळ्या धावपळीत अखंड वाचतो, चिंतन करतो, तीस - पस्तीस पुस्तकं लिहितो. त्याच वेळी, थेट राजकीय भूमिका घेत संसदीय राजकारण करू पाहतो आणि राष्ट्रीय स्तरावर समाजवादी विचारांची पेरणी करत राहतो. मार्ग अनेक असतील, पण या पायपिटीचा केंद्रबिंदू असतो, तो या देशातला सामान्य माणूस. समतेच्या पायावर समाज उभा करण्याचं स्वप्न, हेच या वेड्या मुसाफिराचं इंधन असतं. आणि म्हणून चालण्याचं बंधन नसतं.

पन्नालालजी थोडं शहाण्या माणसासारखं वागले असते तर त्यांना हवी ती पदं मिळाली असती. हवी ती सत्ता मिळाली असती. सगळं वैभव समोर उभं राहिलं असतं. पण, मग त्यांच्या चेहऱ्यावर आजच्यासारखं हे असं निरागस हसणं फुललं नसतं आणि ८३ व्या वर्षीही डोळ्यांत नवजात स्वप्नं उमलली नसती. भूकंपानं उपटली गेलेली कोवळी आयुष्यही मग उभी राहू शकली नसती. या घनघोर अंधारात आशेच्या पणतीने अशी तग धरली नसती.

पन्नालालजी, आज नेमका ‘टपाल दिन' आहे! या टपालात एवढाच मजकूर तुमच्यासाठी : "तुम्ही आहात, म्हणून किती आधार वाटतो, म्हणून सांगू!’

संजय आवटे
लेखक ‘दिव्य मराठी'चे राज्य संपादक आहेत.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser