आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अभिवादन:वहीदुद्दीन खान : भूमिकांचे डोंगर माथ्यावर घेउन फिरलेला म्हातारा’

12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

इस्लामी प्रागतिक विचारांची प्रामाणिकपणे पाठराखण करणारे...धाडसी भूमिकांसाठी प्रसिध्द असणारे... भारतीय इस्लामच्या जडण-घडणीतील महत्वाच्या अशा २० व्या शतकाचे साक्षीदार आणि त्याच्या ऐतिहासिकतेचे भाग असणारे आणि या शतकात इक्बालपासून मौलाना आझाद यांच्यापर्यंत आणि देवबंदच्या चळवळीपासून नद्वतुल उलूमपर्यंतच्या अनेक विचारप्रवाहांचा जिवंत अनुभव घेणारे मौलाना वहीदुद्दीन खान यांचे नुकतेच निधन झाले. त्यानिमित्त त्यांच्या कार्याचा आढावा घेणारा लेख...

महामारीत एकापाठोपाठ एक धक्के बसत असताना मौलाना वहीदुद्दीन खान यांना कोरोनाने गाठल्याची बातमी आली. वयाच्या ९७ व्या वर्षी गंभीर अवस्थेत ते अपोलो रुग्णालायात दाखल झाले. त्याचवेळी त्यांची रुग्णालयातून परतण्याची शक्यता धुसर होत गेली. एक शतक अनुभवलेला हा माणूस अनेकांच्या अनेक भूमिकांचा, नेतृत्वाचा साक्षीदार होता. २० व्या शतकाच्या सुरुवातीला हमीदुद्दीन फराही यांनी इस्लामच्या कालतर्कसंगत पुनर्व्याख्येची चळवळ सुरु केली होती. त्यांच्यानंतर अमीन हसन इस्लाही यांनी या चळळीचे नेतृत्व केले. अमीन हसन इस्लाही यांच्याशी सुरुवातीपासून जिव्हाळ्याचे संबंध असणाऱ्या वहीदुद्दीन खान यांनी फाळणीनंतर भारतात या चळवळीची धुरा हाती घेतली. पण त्यांनी इस्लाही विचारविश्वाहून पुढे पावले टाकली. त्यांच्या अनेक मर्यादांच्या पुढे जात, हमीदुद्दीन फराही यांच्या कालतर्कसंगत राहण्याच्या नियमाला जागत वहीदुद्दीन खान यांनी स्वतःचे स्वतंत्र विचारविश्व विकसित केले. अनेक भुमिकांचे डोंगर माथ्यावर पेलत नव्या भूमिका मांडत, या बुजुर्गाने इस्लामी प्रागतीक विचारांची प्रामाणिक पाठराखण केली. धाडसी भूमिकांसाठी प्रसिध्द असणारा हा बुजूर्ग भारतीय इस्लामच्या जडण-घडणीतील महत्वाच्या अशा २० व्या शतकाचा साक्षीदार आणि त्याच्या ऐतिहासिकतेचा भाग होता. या शतकात त्यांनी इक्बालपासून मौलाना आझाद यांच्यापर्यंत आणि देवबंदच्या चळवळीपासून नद्वतुल उलूमपर्यंतच्या अनेक विचारप्रवाहांचा जिवंत अनुभव घेतला आहे. काळानुसार विचारविश्वाच्या युक्त-अयुक्त अशा प्रत्येक कोनाड्याचा धांडोळा घेऊन त्यातील कालकथित भाग टाळून पुढे जाण्याची अचाट क्षमता वहीदुद्दीन खान यांच्याकडे होती.

राज्य आणि इस्लाम, जीवन आणि त्याच्या विविध शाखांसदर्भात इस्लामी तत्वज्ञानाने मांडलेल्या बंधनकारक, गरजेच्या आणि सामान्य आचरणतत्वांच्या भूमिकांविषयी त्यांचा व्यासंग दांडगा होता. कालसंगतता, आधुनिक दृष्टी, विज्ञानवाद यांना सुसंगत केलेली तर्कव्युहाची रचना ही वहीदुद्दीन खान प्रणित विचारविश्वाची वैशिष्ट्ये होती. त्यांनी संवादाच्या प्रत्येक माध्यमाला हाताळून, प्रत्येक गटाशी चर्चा करत भारतीय इस्लामच्या आधुनिक वळणावर त्याची पुनर्व्याख्या केली. वहीदुद्दीन खान यांना उर्दू माध्यमे गांधीवादी म्हणून काहीशा हिणकस स्वरात हेटाळत आली आहेत. त्यांनी गांधीवादाविषयी मांडलेली विस्तृत भूमिका उपलब्ध नाही. त्यामुळे त्यांना एकजात गांधींच्या अनुयायी गोटात ढकलणे मला मान्य नाही. पण शैलीच्या बाबतीत आणि भूमिका जगण्याच्या पध्दतीविषयी त्यांची तुलना गांधीशिवाय इतरांशी होऊ शकत नाही. भारतीय मुसलमानांच्या राजकीय स्थितीची जाणीव ठेऊन त्यांच्या सांस्कृतिक भूमिकांची पुनर्रचना व्हायला हवी हे त्यांचे मत काही अंशी मान्य करावे लागेल. पण सांस्कृतिक भूमिकांच्या पुनर्रचनेसाठी राज्याच्या वळचणीला लागून भूमिकांचे हितरक्षण करणे वहीदुद्दीन खान यांच्यासारख्या प्रज्ञावंत माणसाने टाळायला हवे होते, असे वाटते. पण आपल्या कार्याचे वर्तुळ त्यांनी ठरवून घेतले होते, त्यामुळे त्यांची मरणोत्तर समिक्षा करताना आपल्या अपेक्षांचे ओझे आपण त्यांच्या भूमिकांवर टाकू शकत नाही.

भारतीय समाजात जगताना मुसलमानांसमोर जमातवादाचे आव्हान मोठे आहे. वाढत्या जमातवादाची कारणमिमांसा करताना हिंदू आणि मुस्लिम समाजातील त्याच्या उगमाच्या मुळाशी जाऊन वहिदुद्दीन खान यांनी त्याला आव्हान दिले होते.

जमातवादाविषयी वस्तुनिष्ठ भूमिका जमातवादाविषयी त्यांची भूमिका अतिशय प्रामाणिक होती. त्यांनी मुसलमान समाजातील जमातवादाच्या अनेक प्रेरणा शोधल्या. त्या नाकारुन मुस्लिमांनी हिंदूशी संवादाला पुढे यायला हवे असे त्यांना वाटत होते. त्यांनी मुसलमानांच्या औरंगजेब प्रेमावर जोरदार टिका केली. मौलाना म्हणाले, ‘‘एक मंदिर, एक मसजिद उद्ध्वस्त करुन त्याबदल्यात तुम्ही शंभर मंदिर, मसजिद बनवून त्याची भरपाई करु शकत नाही. प्रश्न हा आहे की, औरंगजेबने मंदिरे पाडलीच कशासाठी? माझी विनंती आहे की, तुम्ही इस्लाम आणि औरंगजेब यांना एक करु नका. माझा आधार इस्लाम आहे औरंगजेब नाही. तुम्ही औरंगजेबला नकार द्या. जेणेकरुन इस्लाम सुरक्षित राहू शकेल. औरंगजेब मोठा आहे की, इस्लाम?

दुसरे खलिफा उमर फारुख हे आमचे आदर्श आहेत. उमर फारुख आणि ख्रिश्चनांमध्ये पॅलेस्टीन येथे एक करार झाला होता. त्या करारातील एक मुद्दा महत्वाचा आहे, ‘ला तुहदम कनायसोहुम- (खिश्चनांचे चर्च उद्ध्वस्त केले जाणार नाहीत.) उमर फारुख मोठे आहेत की औरंगजेब? हा कोणता न्याय आहे की, तुम्ही चार मंदिरांना देणग्या देउन एक मंदिर उद्ध्वस्त करत आहात. तुम्हाला एकही मंदिर पाडण्याचा आधिकार नाही. आज जर मुसलमान औरंगजेबला विसरत असतील, त्याला नाकारत असतील तर या शर्तीवर हिंदूंचा मुसलमानांकडे पाहण्याचा दृष्टीकोन बदलून जाईल. हा माझा दावा आहे. जर असे घडले नाही तर माझे कार्यालय जाळून टाका.’’ मौलाना वहीदुद्दीन खान यांचे हे धाडस अतिशय महत्वाचे होते.

भूमिका घेताना त्यातील तथ्य, वर्तमान वास्तवाच्या पातळीवरची वस्तुनिष्ठता तपासून, उपयुक्तता पाहून समाजाच्या भल्यासाठी ती पुढे रेटण्याचे कसब जे त्यांच्या समकालीनांमध्ये नव्हते, त्यांच्यात मात्र ठासून भरले होते. संवाद हा सर्व प्रकारच्या जमातवादी हिंसाचारावरचा अखेरचा उपाय असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले. त्यांच्या ‘रिसाला’ या मासिकात याविषयीचे शेकडो लेख त्यांनी प्रकाशित केले आहेत. दंगली झालेल्या अनेक शहरांना भेटी देऊन वहीदुद्दीन खान यांनी त्याचा अभ्यास केला. पाकिस्तानच्या सिंध प्रांताला मौलाना वहीदुद्दीन खान यांनी भेट दिली होती. तेथून परतल्यानंतर पाकिस्तानात हिंदूवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातम्या अतिरंजीत असल्याचे म्हटले. इतिहास हा दोन्ही बाजूला वादाचा विषय असल्याचे त्यांचे मत होते.

मध्यकालीन आक्रमकांचा वारसा लादू नका
‘काही मध्यकालीन आक्रमकांनी हिंदूंच्या काही श्रध्दाकेंद्रांना उद्ध्वस्त केले आहे. त्यांनी ही कृती मुसलमान म्हणून नाही तर राज्यकर्ता म्हणून केली आहे. त्यांचा वारसा मुसलमानांवर लादणे चुकीचे आहे. इथला मुसलमान मध्यकालीन आक्रमकांपेक्षा वेगळा आहे. तो सहीष्णू आहे. त्याला जमातवादाकडे ढकलण्यासाठी, भारतीय समाजापासून अलग उभे करणे योग्य नाही.’ इतिहासाकडे वस्तुनिष्ठ पध्दतीने पाहायला हवे. त्यातील आदर्श शोधताना, क्लेषदायी घटनांची जबाबदारी वर्तमानातील घटकांवर लादून भुतकाळातला क्लेष, हिंसा वर्तमानात करणारा समाज प्रगतीशील असू शकत नाही. इतिहास वर्तमानाकडे डोळसपणे पाहण्याचे मुल्यभान देणारा विचार आहे, विघातकता, उद्रेक देणारे तत्वज्ञान नाही, ही त्यांची भुमिका अतिशय महत्वाची होती.

मुसलमानांना सामान्य हिंदूविषयी वस्तूनिष्ठ समज देण्यात मुसलमानांचे धार्मिक, सामाजिक आणि राजकीय नेते कमी पडले आहेत. मुस्लिम पत्रकार देखील त्यांच्याच वळचणीतले आहेत. हे दोघेही ‘पित श्रेणीतले’ आहेत. मुसलमानांना आधी त्यांच्या जोखडातून मुक्त व्हावे लागेल. आपले नवे नेतृत्व, नवे प्रवक्ते जन्माला घालावे लागतील. वर्तमानाची व्याख्या करताना वर्तमानाच्याच कसोट्या वापराव्या लागतील. ज्या राष्ट्रात जगायचे तेथील आपली पाळेमुळे मजबूत करण्यासाठी त्याच राष्ट्रातील आदर्श शोधून जमीनी वास्तवात जगावे लागेल, अन्यथा उपरेपणा हे मुसलमानांचे स्थायी भविष्य ठरेल. सुफींनी दिलेले वास्तवाचे भान घेऊन मुसलमान ज्यावेळेस संवादी, सुफींप्रमाणे समाजहितैषी भुमिकेत घेतील, त्यावेळी त्यांच्या सर्व समस्यांना सार्वकालीक उत्तर मिळेल. मौलाना वहीदुद्दीन खान यांनी सुरु केलेल्या चळवळीचा हा सार होता.

वहीदुद्दीन खान यांची समीक्षा व्हायलाच हवी
वर्तमानाच्या प्रभावात भूमिका मांडण्यापेक्षा, वर्तमानाच्या वास्तवातून आकाराला येणाऱ्या भविष्याचे भान घेऊन इतिहासापासून धडे घेत मार्ग शोधणाऱ्या वहीदुद्दीन खान यांच्यावर विखारी टिका होणे स्वाभाविक होते. कारण काळापेक्षा कितीतरी मागच्या विचारवविश्वाला तडाखे देऊन त्यात बदल करायचे म्हटले की, हा धोका पत्कारावा लागतोच. असा धोका मौलाना रुमी, इमाम गजाली यांच्यापासून मोहम्मद इक्बाल यांच्यापर्यंत सर्वांनीच पत्करला होता. उलट ही जोखीम पत्करण्याची त्यांची वृत्तीच त्यांना इस्लामी तत्वज्ञानाचा पारंपारीक पध्दतीने अभ्यास करणाऱ्यांच्या समुहापासून वेगळे आणि स्वतंत्र अस्तित्व देऊन जाते. म्हणून विरोधकांच्या टिकेमुळे वहीदुद्दीन खान यांच्या योगदानाविषयी सहानभूतीपुर्वक विचार करण्याची गरज नाही. मौलाना वहीदुद्दीन खान यांच्या कार्याची समीक्षा जशी त्यांच्या ऐतिहासिकतेच्या प्रेमात होऊ शकत नाही तशी त्यांच्या टिकात्मक विश्लेषणातील विद्रोहातून उदध्वस्त झालेल्या मुल्यांच्या प्रेमातूनही ती होऊ शकत नाही.

जावेद अहमद गामीदी म्हणतात, ‘मुसलमान अत्यंत दुर्दैवी समाज आहे. त्याचे सांस्कृतिक प्रतिनिधी म्हणवून घेणारे लोक परिवर्तनवादी विचारवंताच्या कार्याची समिक्षा करताना त्याची व्यक्तीगत उपयुक्तता आणि मतभेदातून त्याचे महत्व तपासतात. त्यातून ते थेट त्याला कुचकामीच ठरवतात. वहीदुद्दीन खान यांनी रिसाला या मासिकातून केलेल्या कार्यास एक क्लासिकल महत्व आहे.’ त्यासाठीच तत्वज्ञान आणि समाजशास्त्राच्या अभ्यासकांनी पुढे येऊन त्यांची समीक्षा करायला हवी. त्यातून खऱ्या अर्थाने वहीदुद्दीन खान यांचे महत्व प्रतिपादीत होऊ शकेल.

सरफराज अहमद
sarfraj.ars@gmail.com

बातम्या आणखी आहेत...