आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक दिन विशेष:सुरक्षिततेला प्राधान्य देऊन शाळा सुरू कराव्यात - फरिदा लांबे

मुलाखतकार - श्रुति गणपत्ये12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दीड वर्षाहून अधिक काळ शाळा बंद राहिल्याने मुलांच्या केवळ शिक्षणच नव्हे तर मानसिक, शारिरीक आरोग्यावरही परिणाम झाला आहे. सातत्याने होणाऱ्या मोबाईल आणि संगणकाच्या वापराने, समवयस्क न भेटल्याने मुलं एकलकोंडी झाली आहेत. अशावेळी कोविडचा धोका लक्षात घेऊनच आणि सुरक्षिततेला प्राधान्य देऊन शाळा सुरू कराव्या लागतील असं मत “प्रथम” संस्थेच्या सहसंस्थापक आणि शिक्षण तज्ज्ञ फरिदा लांबे यांनी व्यक्त केले. त्यांनी शाळा सुरू करण्यासाठी काही उपाय सुचवले असून पालक, शिक्षक, शैक्षणिक संस्था, मुलं राहत असलेल्या वस्त्या अशा सगळ्यांचा त्यामध्ये सहभाग असावा, असे मत व्यक्त केले आहे. आजच्या शिक्षक दिनानिमित्त त्यांनी "दिव्य मराठी रसिक'शी खास बातचीत केली.

प्रश्न - सध्याच्या कोविड काळामध्ये शाळा का सुरू कराव्यात याबाबत संभ्रम आहे. तुम्ही काय सुचवाल?

गेले एक वर्ष नऊ महिने शाळा बंद असल्याने मुलांचं सामाजिक आयुष्य राहिलंच नाही. शाळेत जाणं, खेळणं, शिक्षकांशी बोलणं, मित्र-मैत्रिणींशी भेटणं हे झालेलंच नाही. शिक्षणाबरोबरच त्यांच्या आयुष्यातल्या विविध लोकांशी संवाद साधणं ही सुद्धा एका “वाढी”चीच (growth) प्रक्रिया मानली जाते. उलट सातत्याने टीव्ही, मोबाईल, संगणक यांच्यासमोर बसून ती एकलकोंडी झाली आहेत. अनेक घरांमध्ये आई-वडिलांची नोकरी जाणं, काम नसणं, आर्थिक नुकसान, कौटुंबिक कलह, शारिरीक हिंसा याचा परिणाम कुटुंबावर होतो तसाच मुलांवरही झाला आहे. आपलं दुःख सांगायला त्यांच्याकडे सोबती नाहीत. मुलींची कमी वयात लग्न, अभ्यासात फार चांगला नसलेल्या मुलांना कामाला पाठवणं अशीही परिस्थिती काही मुलांवर आली आहे. अर्थात केवळ पालकांना त्यासाठी दोष देऊन चालणार नाही कारण भीतीच्या वातावरणामध्ये, आर्थिक विवंचेनेतून हे सगळं घडत आहे. अनेक मुलांना शाळेमध्ये मिळणारा पोषण आहार बंद आहे. त्याशिवाय अभ्यासाचं नुकसान तर होतचं आहे आणि अद्याप आपल्याला त्याबद्दल नीट माहिती नाही. ऑनलाईन अभ्यास सुरू असला तरी तो पुरेसा नाही आणि प्रत्यक्ष शाळेतील वातावरण, शिक्षक यांना ती पर्यायी व्यवस्था नाही. या पार्श्वभूमीवर सर्वतोपरी काळजी घेऊन, पूर्व तयारी करून शाळा सुरू कराव्यात.

प्रश्न - पण एवढ्या मोठ्या काळानंतर शाळा पुन्हा सुरू करताना नक्की काय उपाययोजना केल्या पाहिजेत आणि त्याचं काही मॉडेल आहे का?

आपल्या इथे प्रत्येक भागामध्ये कोविडची परिस्थिती, आर्थिक स्तर वेगळा आहे. त्यामुळे एक मॉडेल सगळीकडे लावून नाही चालणार. स्थानिक पातळीवरील अधिकारी, शिक्षक, ग्राम पंचायत सदस्य यांना शाळा सुरु करण्याच्या प्रक्रियेमध्ये सामील करून घेऊन काही निर्णय त्यांच्यावर सोपवले पाहिजेत. पहिलं तर कोविडविषयी सतर्कता असावी पण अनाठायी भीती नको. सरकारने शाळा सुरू करण्यासाठी एक तारीख निश्चित करावी आणि पूर्वतयारीला वेळ द्यावा. त्यामध्ये स्वच्छता, वारंवार हात धुणं, मास्क वापरणं हे अनिवार्य आहेच. त्याचबरोबर सगळ्या शिक्षक आणि इतर कर्मचाऱ्यांचं लसीकरण पूर्ण करणं, त्यांच्या प्रवासाची सोय बघणं, शाळेत दवाखाना सुरू करू शकतो काय याची चाचपणी करणं या गोष्टीही लक्षात घ्यायला हव्यात. शाळांमध्ये नक्की किती मुलांनी प्रवेश घेतला आहे याची नोंद ठेवणं सध्या गरजेचं झालं आहे कारण शाळाबाह्य मुलांची संख्या अगदी मुंबईमध्येही वाढली आहे. सरकारने जारी केलेले सर्व नियम काटेकोरपणे पाळणं अनेक शाळांना शक्य नाही. त्यामुळे ती नियमावली शिक्षक, पालक, मुलं अशी विभागून जाच न वाटता मुलांना शाळेकडे परत आणणारी, आकर्षक अशी बनवायला हवी. सर्व काळजी घेऊनही एखाद्या मुलाला कोविडची लागण झाली तर काय करायला हवं याची पूर्वतयारी हवी. ज्या शाळांमध्ये मोठी पटांगणं, मैदानं आहेत त्यांनी वर्गात मुलांना बसवण्याएेवजी मोकळ्या जागेत बसवावं कारण बंद जागेमध्ये कोविडचा विषाणू लवकर पसरतो. अगदी बालवाडी आणि पहिली, दुसरीच्या मुलांनाही शाळेत बोलवायला हरकरत नाही.

प्रश्न - मुलांच्या अभ्यासाचं झालेलं नुकसान कसं भरून काढणार?

अभ्यासक्रम पूर्ण करणं याची लगेच काळजी नको. सध्या मुलांनी शाळेत येणं, पालकांनी त्यांना आत्मविश्वासाने पाठवणं गरजेचं आहे. शिक्षण आकर्षक करून मुलं सातत्याने शाळेत येत राहिली पाहिजेत. सध्याच्या परिस्थितीमध्ये त्यांना प्राथमिक आकडेमोड, वाचन हे आलं तरी खूप आहे. गाणी म्हणणं, गप्पा, खेळ या माध्यमातून मुलांमध्ये पूर्वीसारखा उत्साह निर्माण करण्याची गरज आहे. त्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर भर देता येईल. मूळात गेल्या दीड वर्षात ऑनलाईन अभ्यास सुरू असला तरी मुलांना नक्की काय समजलंय, किती गोष्टी त्यांच्यापर्यं पोहोचल्या आहेत हे एखाद्या चाचणीच्या माध्यमातून कळू शकले. त्यानंतर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी दिशा ठरवता येऊ शकते.

प्रश्न - ऑनलाईन अभ्यासापासून अनेक मुलं वंचित राहिली, डिजिटल भेदभाव (discrimination) बघायला मिळालं असं नाही का वाटत?

सुरुवातीचा काही काळ काही मुलं मोबाईल किंवा संगणक नसल्याने अभ्यास करू शकली नाहीत हे खरं आहेत. एका घरात एकच मोबाईल असेल तर दोन किंवा तीन भावंडांना अभ्यास करणं अशक्य होतं. अनेकदा घरातला मोबाईल वडील सोबत घेऊन जात त्यामुळे मुलांना त्याचा उपयोग नव्हता. म्हणून “प्रथम”ने त्यावर उपाय शोधून काढला. आम्ही रेडिओवरून मुलांना एकेक धडा शिकवायचो. मग त्यांच्यासोबत पालक किंवा इतर स्वयंसेवक त्यांना पुढचा अभ्यास करायला मदत करायचे. काही गावांमध्ये ही पद्धत इतकी लोकप्रिय झाली की देवळाच्या पुजाऱ्यांनी देवळात लाऊड स्पीकरवरून रेडिओ ऐकवायचा अशी मदत केली. रेडिओसाठी वायफाय किंवा महागडा संगणक लागत नाही. तसचं या डिजिटल माध्यमातून टाळेबंदीच्या काळात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता आलं. डिजिटलला मर्यादा आहेत. पण ते उपयोगीही आहे. प्रत्यक्ष शिक्षण आणि त्याचा डिजिटल माध्यमातून पाठपुरावा असं हायब्रीड मॉडेल निर्माण करावं लागेल.

प्रश्न - शाळा सुरू करताना शिक्षक आणि पालक यांची भूमिका काय असेल?

सरकारने शिक्षकांसाठी काही उपाययोजना आधीपासून सुरू केल्या आहेत. अभ्यासक्रम ठरवणं, टाइमटेबल आदीवर काम झालं आहे. मुलांना क्रमिक पुस्तकंही मिळाही आहेत. मात्र आताच्या परिस्थितीमध्ये मुलांना कसं शिकवावं यासाठी ट्रेनिंग घ्यावं लागेल आणि शिकवण्यासंबंधीच्या योजना कशा राबवायच्या यासाठी शिक्षकांना स्वातंत्र्य द्यावं लागेल. किती मुलांना वर्गात बोलवायचं, त्यांना कसं शिकवायचं यासाठी एक फ्रेमवर्क हवी. टाळेबंदी नसताना, अर्ध-टाळेबंदीमध्ये आणि पूर्ण टाळेबंदीमध्ये अशा तीन परिस्थिती लक्षात घेऊन अभ्यासक्रम, शाळा चालवणं या गोष्टी कराव्या लागतील. तसंच परीक्षेसाठी लगेच शिक्षकांना जबाबदार धरू नका. पालकांशी संपर्क करून त्यांना विश्वासात घ्यायला हवं, संवाद साधायला हवा. मुलांना शाळेत पाठवण्यासाठी त्यांची पूर्ण मानसिक तयारी हवी. पालकांनीही शाळेला सहकार्य केलं पाहिजे. मोहल्ला क्लासेस, वस्त्यांमध्ये वर्ग असेही उपक्रम पालकांच्या मदतीने राबवता येऊ शकतील.

बातम्या आणखी आहेत...