आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थर्ड आय:सी धिस (फिल्म) सून!

8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुकेश माचकर

कलाकार घराघरांत बंदिस्त झाले तरी कला बंदिस्त होऊ शकत नाही, हे दाखवून देण्याचा चंग बांधून वेगवेगळ्या ठिकाणच्या, वेगवेगळ्या कलाक्षेत्रांमधल्या कलावंतांनी ‘घरच्या घरी एकट्याने’ किंवा ‘घरीच राहून पण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकत्र येऊन’ काही कलाकृती घडवण्याचा प्रयत्न केला. गायन, अभिवाचनापासून ते मोबाइलवरून एखादी मालिका चित्रित करण्यापर्यंत अनेक प्रयोग झाले… अॅमेझाॅन प्राइमवर इंग्लिश सबटायटल्ससह रिलीझ झालेला ‘सी यू सून’ हा मल्याळी सिनेमा यांतल्या आपल्या देशातल्या सर्वात यशस्वी प्रयत्नांपैकी एक म्हणायला हवा…

कोरोनाकहराने जगभरात लाॅकडाऊन लादल्यानंतर सगळं जनजीवनच बंद पडलं, त्यात मनोरंजनविश्वाशी संबंधित सगळ्या उपक्रमांचाही समावेश होता. कलाकार घराघरांत बंदिस्त झाले तरी कला बंदिस्त होऊ शकत नाही, हे दाखवून देण्याचा चंग बांधून वेगवेगळ्या ठिकाणच्या, वेगवेगळ्या कलाक्षेत्रांमधल्या कलावंतांनी ‘घरच्या घरी एकट्याने’ किंवा ‘घरीच राहून पण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून एकत्र येऊन’ काही कलाकृती घडवण्याचा प्रयत्न केला. गायन, अभिवाचनापासून ते मोबाइलवरून एखादी मालिका चित्रित करण्यापर्यंत अनेक प्रयोग झाले… अॅमेझाॅन प्राइमवर इंग्लिश सबटायटल्ससह रिलीझ झालेला ‘सी यू सून’ हा मल्याळी सिनेमा यांतल्या आपल्या देशातल्या सर्वात यशस्वी प्रयत्नांपैकी एक म्हणायला हवा… लाॅकडाऊनच्या काळात मल्याळी चित्रपटसृष्टीतल्या किमान पन्नासेक तंत्रज्ञ-कलावंतांना काहीएक रोजगार मिळावा, हा या सिनेमाच्या निर्मितीमागचा मुख्य उद्देश होता. जूनमध्ये सिनेमाची घोषणा करून १८ दिवसांत त्याचं आयफोनवर चित्रिकरण करून आॅगस्टमध्ये तो ओटीटीवरच रिलीझ करण्यात आला. ‘सी यू सून’ ही भारतातली पहिली ‘कम्प्यूटर स्क्रीन फिल्म’ आहे… माइक कोस्टांझा लिखित-दिग्दर्शित ‘द काॅलिंग्जवुड स्टोरी’ या २००० साली निर्मिती सुरू झालेल्या आणि २००६ साली प्रदर्शित झालेल्या अमेरिकन सिनेमापासून हा चित्रपटप्रकार आंतरराष्ट्रीय पातळीवर रूजला आहे असं मानलं जातं. व्यक्तिरेखांच्या वेबकॅमच्या सापडलेल्या फुटेजच्या माध्यमातून (फाऊंड फुटेज फिल्म्स हाही एक शैलीप्रकार आहे) हा सिनेमा उलगडत जातो. आपल्याकडे दिबाकर बॅनर्जीने ‘एलएसडी- लव्ह, सेक्स और धोखा’ या सिनेमात सीसीटीव्ही, वेबकॅम, व्हिडिओ कॅमेरे यांच्यात चित्रित झालेल्या प्रसंगांच्या माध्यमातून अख्खा सिनेमा उभा केला होता. तो फारच गहिरा आणि हादरवून टाकणारा प्रयोग होता. त्यावेळी हे स्क्रीन नवे होते, मोबाइल, कम्प्यूटरचे स्क्रीन हा आयुष्याचा अविभाज्य भाग बनलेला असण्याच्या आजच्या काळात घडणारा

‘सी यू सून’ हा संपूर्णपणे कम्प्यूटर आणि मोबाइलच्या स्क्रीन्सवर घडतो. कम्प्यूटर आणि मोबाइलचे कॅमेरे जी टिपतात ती दृश्यंच सिनेमाचा भाग नाहीत, तर ईमेल, सोशल मीडिया यांच्यावर मजकुरातून म्हणजे टेक्स्टिंगमधून होणारं संभाषण हाही सिनेमाच्या कथनशैलीचा एक महत्त्वाचा घटक आहे. अशा प्रयोगांच्या बाबतीत सगळ्यात मोठा धोका संभवतो तो तंत्रज्ञानात आणि प्रयोगात आशय हरवून जाण्याचा किंवा छटाकभर आशय तंत्रज्ञानाने फुलवून फुगवून दाखवण्याचा. लेखक, दिग्दर्शक, संकलक (आणि या सिनेमाच्या बाबतीत ‘सिनेमॅटोग्राफर’सुद्धा) महेश नारायणन यांचा ‘सी यू सून’ असा तंत्रज्ञानाखाली पिचलेला, रूक्ष, नुसताच प्रयोगशील सिनेमा झालेला नाही, तो व्यवस्थित ‘सिनेमा’ आहे… एकतर सिनेमाच्या केंद्रस्थानी एक प्रेमकहाणी आहे, तिच्यातून निर्माण होणारा थरार आहे आणि ते सगळं मोबाइलचे स्क्रीन, कम्प्यूटरचे स्क्रीन, वेबकॅम, सीसीटीव्ही यांच्यावर घडत जाणं हे घडवलेलं, बेतीव नाही, तर आपोआप घडल्यासारखं आहे… सतत मोबाइलमग्न असलेल्या तरूण पिढीला आणि कम्प्यूटरवरच सगळा कारभार चालवणाऱ्या त्यावरच्या वयाच्या मंडळींना हा सिनेमा पाहताना काही वेगळं पाहतो आहोत, असं कळणारही नाही, इतक्या प्रमाणात आपण आॅलरेडी या स्क्रीन्सवरच वावरायला लागलो आहोत (हेही कदाचित कळणार नाही पहिल्या फटक्यात.) शिवाय या सिनेमातल्या तिन्ही प्रमुख कलावंतांचा मर्यादित अवकाशातला जबरदस्त अभिनय ही त्याला भावनिकदृष्ट्या प्रेक्षकाशी जोडून ठेवणारी फार मोठी जमेची बाजू आहे. ‘सी यू सून’मध्ये जिमी (रोशन मॅथ्यू) हा यूएईमध्ये एका बँकेत नोकरी करणारा एक्झिक्युटिव्ह टिंडरवर अनुमोल सेबॅस्टियन (दर्शना राजेंद्रन) या मुलीला राइट स्वाइप करतो. तिथलं टेक्स्टिंग पुढे गुगल हँगआउट्सवर जातं आणि मग तो तिच्याशी व्हिडिओ काॅलवर बोलू लागतो. नुकताच एका प्रेमभंगातून सावरत असलेला जिमी अनुमोलच्या प्रेमातच पडतो. अमेरिकेत असलेल्या आईला व्हिडिओ काॅन्फरन्सिंगवर घेऊन तो तिच्यासमक्ष अनुशी लग्न करण्याचा इरादा जाहीर करतो. हे अनुसाठीही सरप्राइझ असतं. जिमीची आई कोचीमध्ये साॅफ्टवेअर इंजीनियर असलेल्या केविनला (फहाद फाझिल) अनुमोलचा बॅकग्राऊंड चेक करायला सांगते. माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून लोकांच्या खासगी आयुष्यात फार डोकावणं हा त्यांच्या खासगीपणाच्या अधिकाराचा भंग आहे असं मानणारा केविन वरवर चेक करून ही चांगल्या घरातली मुलगी आहे, असा निर्वाळा जिमी आणि त्याच्या आईला देतो. एका व्हिडिओ काॅलवर जिमीला अनुमोलच्या गालावर जखम दिसते. जिमीबरोबरची ही आॅनस्क्रीन जवळीक पसंत नसलेल्या वडिलांनी ही मारहाण केल्याचं अनु त्याला सांगते. जिमी तिची अत्याचारी वडिलांपासून सुटका करायचं ठरवतो. लिव्ह इन रिलेशनशिपला कायद्याने मान्यता नसताना तिला आपल्या घरी आणतो. तिच्यासोबत राहतो. तिच्या वडिलांना जाब विचारायला बोलावतो. ते चूक मान्य करतात आणि तिचा नंबर मिळवतात. जिमी घरी जातो तेव्हा अनु घरी नसते, व्हिडिओ सुसाइड नोट ठेवून ती निघून गेलेली असते… मी तुला परोपरीने सांगत होते की आपल्याविषयी कुणाला काही सांगू नकोस, आता मला याची फळं भोगावी लागतील, असं ती त्यात म्हणालेली असते…

इथून पुढे ती कुठे गेली असेल, तिच्यावर काय संकट कोसळलं असेल, या सगळ्याचा छडा
केविन त्याच्या कौशल्यांचा वापर करून (आणि अनेक ठिकाणी बेकायदा व्हर्च्युअल घुसखोरी करून)
लावत जातो. अनेक धक्के बसत जातात आणि सकारात्मक शेवटाचं सूचन करून सिनेमा संपतो…
या सिनेमात प्रेमिक जोडी केंद्रस्थानी असली तरी प्रमुख व्यक्तिरेखा आहे केविनची. ती
साकारणारा फहाद फाझिल (‘सुपर डीलक्स’ या अफलातून तामीळ सिनेमात पाहिलं असणार
अनेकांनी त्याला) हा केरळमधला गुणाढ्य अभिनेता या सिनेमाचा सहनिर्माताही आहे. टिपिकल
आयटी गीक असलेल्या केविनचं निशाचर अस्तित्त्व तो सहजतेने उभं करतो. जिमी आणि खासकरून
अनुच्या कहाणीत केविनचं गुंतत जाणं हेच प्रेक्षकांनाही गुंतवत नेतं… तोच इथे प्रेक्षकांचा प्रतिनिधी
आहे. अनुची कहाणी जशी उलगडते, तशी दर्शनाच्या अभिनयकौशल्याची कसोटी लागते. त्यामानाने
रोशन मॅथ्यू या देखण्या अभिनेत्याला प्रेमातली तगमग दाखवण्यापलीकडे फारसा वाव नाही.
दिग्दर्शक महेश नारायणनने बंदिस्त पटकथेच्या सादरीकरणाची तांत्रिक कामगिरी उत्तम पार
पाडली आहेच, पण सोशल मीडियावरचा कमेंटआधीच्या तीन टिंबांपासून ते ब्लू टिकपर्यंतच्या
सगळ्या साध्यासाध्या गोष्टींचा उत्सुकता वाढवण्यासाठी आणि ‘कथा सांगण्या’साठी केलेला वापर
विशेष लक्षणीय आहे.
देशात वेगळ्या शैलीची पायाभरणी करणारा हा सिनेमा उत्तम अभिनयाने सजलेला चांगल्यापैकी
थ्रिलरही असल्याने मनोरंजकही आहे. लौकर पाहून टाका.

mamanji@gmail.com
संपर्क - ९३२६४७३३४४

बातम्या आणखी आहेत...