आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:हर्ड इम्युनिटी तयार झाली की नाही, याचे संकेत देतो सिरो सर्व्हे, जाणून घ्या 'हर्ड इम्युनिटी' आणि 'सिरो सर्व्हे' नेमकं आहे तरी काय?

आबिद खान9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • जाणून घेऊया, सिरो सर्व्हे म्हणजे नेमके काय, हा सर्व्हे कसा होतो, यासह बरंच काही...

देशातील कोरोनाची दुसरी लाट आता हळूहळू ओसरत चालली आहे. शनिवारी कोरोनाचे 1 लाख 14 हजार 415 रुग्ण आढळले. ही मागील दोन महिन्यांत एका दिवसांत आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांची सर्वात कमी आकडेवारी आहे. सिरो सर्व्हेनुसार, जानेवारीपर्यंत 21% लोकसंख्येला कोरोनाचा संसर्ग होऊन गेला आहे. यानंतर देशात कोरोनाची दुसरी लाट आली आणि ज्यामध्ये सुमारे एक कोटी केसेसची नोंद झाली. यापैकी काही प्रकरणांची नोंद झालेली नसावी, असा अंदाज आहे. यासाठी इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर) देशातील चौथे सिरो सर्वेक्षण करण्याची तयारी करत आहे. यासह, हर्ड इम्युनिटी (समूहाची रोग प्रतिकारकशक्ती) विषयीचे चित्रदेखील स्पष्ट होण्यास मदत होईल.

चला तर मग जाणून घेऊया, सिरो सर्व्हे म्हणजे नेमके काय, हा सर्व्हे कसा होतो, यासह बरंच काही... सर्वप्रथम जाणून घेऊया हर्ड इम्युनिटी म्हणजे काय?

हर्ड इम्युनिटी म्हणजे काय?
हर्ड या इंग्लिश शब्दाचा अर्थ कळप किंवा समूह असा होतो, तर इम्युनिटी म्हणजे रोग प्रतिकारकशक्ती. म्हणजेच हर्ड इम्युनिटी म्हणजे समूहाची रोग प्रतिकारकशक्ती. म्हणजे जेव्हा समाजातल्या भरपूर लोकांच्या शरीरात एखाद्या रोगाचा प्रतिकार करण्याची शक्ती निर्माण होते, तेव्हा त्या रोगाचा परिणाम कमी होऊ लागतो.

सिरो सर्वेक्षण म्हणजे काय?
सिरो सर्वेक्षण सेरोलॉजी चाचणी करून केले जाते. यात रक्ताचा नमुना घेऊन तपासणी केली जाते. म्हणजेच एखाद्या विशिष्ट संसर्गाविरूद्ध बनवलेल्या अँटीबॉडीजची चाचणी केली जाते. जेव्हा एखादा व्हायरस आपल्या शरीरात प्रवेश करतो तेव्हा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती त्या विषाणूविरूद्ध प्रतिपिंडे (अँटीबॉडी) बनवते. हे अँटीबॉडी तुमच्या रक्तात सुमारे एक महिना राहतात. याचाच अर्थ म्हणजे जर तुमच्या शरीरात अँटीबॉडी तयार झाल्या असतील तर तुम्हाला अलीकडच्या काळात संसर्ग झाला असावा.

सिरो सर्वेक्षण कसे केले जाते?
सिरो सर्व्हेसाठी रँडम सॅम्पलिंग केले जाते. मागील वर्षी देशात पहिला सिरो सर्व्हे करण्यात आला होता, तेव्हा देशाचे दोन भागात विभाजन करण्यात आले होते. पहिल्या भागात, अशी शहरे किंवा जिल्हे होती जिथे संसर्ग दर सर्वाधिक होता. या शहरांमधील 5 कंटेन्मेंट झोन निवडले गेले. प्रत्येक कंटेन्मेंट झोनमधून 10-10 लोकांचे रक्ताचे नमुने घेण्यात आले होते.

दुसर्‍या भागात, जवळपास 60 जिल्हे आणि शहरे निवडली गेली, जी कोरोनाच्या पुष्टी झालेल्या घटनेच्या आधारे कमी, मध्यम आणि उच्च श्रेणींमध्ये विभागली गेली. या सर्व ठिकाणांमधील 10 कंटेन्मेंट झोनमधून रक्ताचे नमुने घेण्यात आले. म्हणजेच, देशातील ब-याच भागातील वेगवेगळ्या वर्गातील लोकांचे नमुने घेण्याचा प्रयत्न केला गेला आहे जेणेकरून अचूक आणि नेमके आकडे सापडतील.

सिरो सर्वेक्षण किती महत्वाचे आहे?
कोरोना साथीचा रोग वैद्यकीय जगात नवीन आहे. या आजाराविषयी शास्त्रज्ञ आणि डॉक्टरांना आधीपासूनच कोणतीही माहिती नाही. म्हणूनच, साथीच्या रोगाशी संबंधित मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी सिरो सर्वेक्षण केले जाते, जेणेकरून भविष्यात रोगाचा सामना करण्यासाठी एक रणनीती तयार केली जाऊ शकेल. सिरो सर्व्हेद्वारे शास्त्रज्ञ आणि डॉक्टर या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करतात.

  • ज्या लोकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्या आहेत, ते संसर्ग रोखण्यासाठी एखाद्या ढालीसारखे काम करतात. याला समुहाची रोग प्रतिकारशक्ती (हर्ड इम्युनिटी) असे म्हणतात. सिरो सर्वेक्षण याचा शोध घेण्यात मदत करते.
  • सिरो सर्वेक्षणातून देशातील किती टक्के लोकसंख्येत अँटीबॉडी आहेत, याची माहिती मिळते. तज्ज्ञांच्या मते, जेव्हा 60-70% लोकसंख्येमध्ये अँटीबॉडीज विकसित होतात, तेव्हा समूहाची रोग प्रतिकारशक्ती तयार होईल.
  • देशातील कोणत्या भागात आणि कोणत्या वयोगटातील लोकांना जास्त संसर्ग होतो? किती लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला होता आणि संक्रमित लोकांमध्ये अँटीबॉडी किती काळ राहतील?

आतापर्यंत देशात किती सिरो सर्व्हे करण्यात आले आहेत आणि त्याचे निकाल काय आहेत?
आयसीएमआरने मे 2020 मध्ये देशात पहिला सिरो सर्व्हे केला होता. यानंतर आणखी 2 सिरो सर्व्हे करण्यात आले. शेवटचा सिरो सर्व्हे 17 डिसेंबर 2020 ते 8 जानेवारी 2021 या काळातघेण्यात आला. या सर्वेक्षणातील निष्कर्षांमध्ये असे दिसून आले आहे की, देशातील 21.5% लोकसंख्या कोरोनाने संक्रमित झाली आहे. अद्याप 80% लोकांना कोरोना संसर्ग होण्याचा धोका आहे.

संपूर्ण देशभरात रँडम सॅम्पलिंगच्या आधारे हे सर्वेक्षण 28,589 जणांमध्ये करण्यात आले. पहिल्या सिरो सर्वेक्षणात केवळ 18 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या लोकांचा समावेश होता. त्यानंतरच्या दोन्ही सर्वेक्षणांमध्ये 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचा देखील समावेश होता. भिन्न शहरे आणि राज्यांनी देखील त्यांच्या स्तरावर सिरो सर्वेक्षण केले.

हर्ड इम्युनिटी भारतात विकसित झाली आहे का?
हर्ड इम्युनिटी तयार होण्याचे 2 मार्ग आहेत. पहिला मार्ग - नैसर्गिक पद्धत आणि दुसरा मार्ग - लसीकरण म्हणजेच व्हॅक्सिनेशन हा आहे. एखाद्या रोगाची साथ पसरायला लागली की त्याचा संसर्ग अनेकांना होतो. ज्यावेळी समाजातल्या मोठ्या गटाला या रोगाचा प्रादुर्भाव होतो आणि ही लोकसंख्या यातून बरी होते, तेव्हा या लोकांच्या शरीराराला रोगाशी कसे लढायचे हे माहीत होते. म्हणजेच त्यांच्या शरीरारात या रोगासाठीची इम्युनिटी तयार होते. आणि दुसरा मार्ग म्हणजे लसीकरण. हे दोन्ही निकष बघता भारतात हर्ड इम्युनिटी अद्याप तयार व्हायला बराच वेळ आहे.

देशात आतापर्यंत 23 कोटी लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे. एकूण लोकसंख्येपैकी हे केवळ 13% आहे. दुसरीकडे, सिरो सर्वेक्षणात केवळ 21% लोकसंख्येत अँटीबॉडी असल्याची पुष्टी केली गेली आहे. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत हा आकडा वाढला असावी, परंतु त्यातून हर्ड इम्युनिटी तयार झाली आहे का? ही माहिती केवळ सिरो सर्व्हेद्वारे उपलब्ध होईल.

चौथा सिरो सर्वेक्षण कधी केला जाऊ शकतो?
या महिन्यात आयएमसीआर देशातील चौथे सिरो सर्वेक्षण सुरू करणार आहे. कोरोनाच्या तिस-या लाटेत लहान मुलांमध्ये संसर्ग होण्याची शक्यता अधिक आहे, त्यामुळे या सर्वेक्षणात 6 वर्षांपेक्षा मोठ्या मुलांचा देखील समावेश केला जाईल. पूर्वीच्या सर्वेक्षणात केवळ 10 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या मुलांचाच समावेश होता. तसेच, दुसर्‍या लाटेत ग्रामीण भागात संसर्ग पसरण्याच्या घटना लक्षात घेऊन चौथा सिरो सर्व्हेक्षणाचे लक्ष्य ग्रामीण भागावर अधिक असेल.

सिरो सर्वेक्षणातून कोणत्या गोष्टी कळत नाहीत?

  • सिरो सर्वेक्षणातून किती लोकांच्या शरीरात अँटीबॉडीज आहेत हे समजते, परंतु या अँटीबॉडीज व्हायरसशी लढा देण्यास सक्षम आहेत की नाहीत याची माहिती मिळू शकत नाही. प्रत्येक व्यक्तीची इम्युनिटी वेगळी असते, म्हणून ज्या व्यक्तींमध्ये अँटीबॉडीज आहेत ते कोरोनाविरूद्ध इम्युन आहेत की नाही, हे समजू शकत नाही.
  • तसेच, समुहाची रोग प्रतिकारशक्ती मिळविण्यासाठी अँटीबॉडीज किती टक्के असणे आवश्यक आहे याचे अचूक आकडे शास्त्रज्ञांकडे नाहीत. सिरो सर्वेक्षणातून किती टक्के लोकसंख्येत अँटीबॉडी आहेत याचा शोध घेतला जाऊ शकतो, परंतु हर्ड इम्युनिटी मिळवण्यासाठी ती पुरेशी आहे की नाही याची माहिती मिळू शकत नाही.
बातम्या आणखी आहेत...