आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रसिक स्पेशल:आप क्रोनोलॉजी समझिए..!

7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र विधिमंडळाच्या संयुक्त सभागृहात निषेधाच्या घोषणांना सामोरे जात राज्यपालांनी दीड - दोन मिनिटांत अभिभाषण उरकले... विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत व्हिडिओ क्लिप्सचे बॉम्बस्फोट घडवले... राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले असताना तिकडे उत्तर प्रदेशसह चार राज्यांमध्ये भाजपला मतदारांचा कौल मिळाला... या साऱ्या घटनांचा काही एकत्रित अर्थ आहे का? गेल्या काही दिवसांतील वेगवगेळ्या, सुट्या प्रसंगांचा तार्किक क्रम लावला तर त्यातून राज्याच्या राजकीय पटलावरील संभाव्य घडामोडींचा अंदाज येऊ शकतो.

८ मार्च २०२२, स्थळ : महाराष्ट्र विधानसभा :
विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संसदीय आयुधांचा वापर करत व्हिडिओ क्लिप सादर करून साखळी बॉम्बस्फोट घडवले. महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकारच प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना बदनाम करून खोट्या प्रकरणांमध्ये गुंतवण्याचा कथित कट करत असल्याबद्दलच्या या व्हिडिओ क्लिप आहेत. या क्लिपचा एक पेनड्राइव्ह फडणवीसांनी विधानसभा अध्यक्षांकडे सोपवला आणि या प्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी केली. त्याचबरोबर मंत्री नवाब मलिक यांनी देशाचा शत्रू असलेल्या दाऊद इब्राहिमच्या साथीदारांशी आर्थिक व्यवहार केला असल्याने त्यांचा तत्काळ राजीनामा घ्यावा, अशी मागणीही त्यांनी केली.

९ मार्च २०२२, स्थळ : आझाद मैदान, मुंबई :
भाजपचा मोर्चा आणि जाहीर सभेचे नेतृत्व करत प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि देवेंद्र फडणवीसांनी नवाब मलिकांच्या राजीनाम्याचा विषय थेट जनतेच्या दरबारात नेला.

१० मार्च २०२२, स्थळ : निवडणुका झालेली राज्ये :
पंजाब वगळता उर्वरित चारही राज्यांत म्हणजे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मणिपूर आणि गोव्यामध्ये भारतीय जनता पक्षाने वर्चस्व पुनर्प्रस्थापित केले. सर्वाधिक महत्त्वाच्या उत्तर प्रदेशात भाजपने सलग दुसऱ्यांदा सत्ता मिळवत इतिहास घडवला.

थोडासा फ्लॅशबॅक...
३ मार्च २०२२, स्थळ : महाराष्ट्र विधिमंडळ :

वर्षातून एकदाच विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांना उद्देशून होणाऱ्या राज्यपालांच्या अभिभाषणाची वेळ. सभागृहात घोषणाबाजी झाल्याने राज्यपालांनी त्यांच्या भाषणातले केवळ तीन पॅरेग्राफ वाचून भाषण संपवले अन् ते राजभवनाकडे निघून गेले.

पुन्हा वर्तमान...
१० मार्च २०२२, स्थळ : मुंबई

राष्ट्रवादी कॉँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पाच राज्यांतील निवडणुकांत मतदारांनी दिलेला कौल स्वीकारला पाहिजे, असे मत व्यक्त केले. त्याच वेळी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीचे सरकार स्थिर असून त्याला काहीही धोका नाही, असेही सांगितले. चार राज्यांत भाजपच्या बाजूने निकाल लागला असला तरी राज्यातील महाविकास आघाडी सरकार स्थिर राहील, असा विश्वास दुसरीकडे शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही व्यक्त केला.

११ मार्च २०२२, स्थळ : भाजपचे प्रदेश कार्यालय :
गोव्यातील भाजपची सत्ता राखण्यात यश आल्याबद्दल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांचा भाजपच्या प्रदेश कार्यालयात जंगी सत्कार करण्यात आला. आता आपल्याला मुंबई भ्रष्टाचारमुक्त करायची आहे, असे सांगत त्यांनी भविष्यातील संघर्षाचे संकेत दिले.
आता या सर्व घटना किंवा घटनाक्रम वानगीदाखल, आठवणीसाठी देत आहे. कारण या सर्व घटना अगदी ताज्या आहेत. तरीही ३ मार्चची घटना आपल्याला आठवावी लागते आणि पटकन राज्यपाल अभिभाषणातून निघून गेल्याची टीव्हीवर पाहिलेली वा वृत्तपत्रात वाचलेली बातमी कदाचित आठवू शकते. ते कोश्यारी फार भारी किंवा तयारीचे आहेत वगैरे चर्चाही झाल्याचे लक्षात येते. पण, त्याआधीच्या काही घटना सांगितल्या तर त्यांच्या तारखा, वेळा किंवा तपशील फारसा आठवत नाही. तुम्ही म्हणाल की, या साऱ्या सुट्या सुट्या घटना एकत्रितपणे सांगण्याचा काय उद्देश आहे? उद्देश नक्कीच आहे. अनेक घटना सुट्या सुट्या बघितल्या की त्यांचा अर्थ पूर्णांशाने लागणं अवघड जातं. पण, त्याच एकत्रितपणे बघितल्या की वेगळेच चित्र समोर येऊ लागते आणि मग ही गोष्ट अशी का घडली असावी याचाही आदमास येऊ लागतो.

राष्ट्रीय पातळीवर बहुचर्चित अशी पाच राज्यांची विधानसभा निवडणूक पार पडली आणि मतमोजणीनंतर सर्वच ठिकाणी कॉँग्रेसचा धुव्वा उडून चार राज्यांत भाजपची सत्ता आली. पंजाबसारख्या राज्यात आम आदमी पक्षाने निर्विवाद विजय मिळवत दिल्लीपाठोपाठ आणखी एक राज्य काबीज केलं. या पाच राज्यांच्या निवडणूक निकालांमधून राष्ट्रीय पातळीवरील समीकरणे आणि अनेक प्रश्नांचे संदर्भ बदलणार आहेत. राजकारणात एखाद्या पक्षाची किंवा नेत्याची ताकद मोजायची फूटपट्टी काय असावी, यावर मतमतांतरे असली तरी निवडणुका जिंकण्याची क्षमता आणि सत्तेवर येऊन राज्य चालवण्याची क्षमता हे महत्त्वाचे निकष खचितच आहेत. गोव्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखाली आणि निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीसांच्या देखरेखीखाली भाजपने निवडणूक जिंकल्याने सावंतांबरोबरच फडणवीसांचेही राजकीय वजन वाढेल यात शंका नाही. उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथांचे वजन निश्चितच वाढणार आहे. तीच गोष्ट पंजाबमध्ये निवडणूक जिंकून आपला पक्ष आता ‘राष्ट्रीय’ होऊ पाहत आहे, याची अप्रत्यक्ष घोषणाच करणारे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचेही राजकीय वजन आणि राष्ट्रीय पातळीवरील स्थान वाढणार आहे.

ममता बॅनर्जींना जमले ते काही महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांना जमले नाही, अशी चर्चा पश्चिम बंगालच्या निकालानंतर झालीच होती. आता त्यात अरविंद केजरीवाल यांचीही भर पडली आहे. पवारांना तरी दोन राज्ये जिंकून दाखवता आली का, असा सवाल महाराष्ट्रातील ‘आप’वाले झाडून विचारू लागले आहेत. शरद पवारांचा पक्ष गोव्यात, केरळमध्ये आणि आणखी कुठे कुठे निवडणूक लढतो, पण ते लक्षातही राहत नाही. आमचे उद्धव ठाकरेही परराज्यांत भगवा फडकवायला जातात आणि अनामत रकमा जप्त होऊन परत येतात, हा ताजा इतिहास आहे. त्याउलट तुलनेने नवा असलेला आम आदमी पक्ष पंजाबसारखे राज्य जिंकतो आणि गोव्यातही अस्तित्व दाखवतो हे लक्षणीयच आहे. त्यामुळे राष्ट्रीय राजकारणात या पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचे परिणाम होणार आहेतच. पण, महाराष्ट्रावर तर ते नक्कीच होणार आहेत. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना चाळीस- बेचाळीस वर्षांपूर्वी राष्ट्रपती राजवटीचा कटू अनुभव घेतलेले शरद पवार मुरब्बी नेते आहेत. काळाची पावले किमान ते तरी ओळखतील, अशी आशा करायला हरकत नसावी.

आता लक्षात येईल की वर दिलेला घटनाक्रम का महत्त्वाचा आहे.. थोडं अधिक सांगायचं तर राज्यपाल आणि राज्य सरकार यांच्या संघर्षात राज्यपालांना विमानातून खाली उतरवणे, त्यांना खरमरीत भाषेत पत्र लिहून ते मुखपत्रात प्रसिद्ध करणे आणि मीडियात लीक करणे, विधानसभेच्या अध्यक्षाची निवडणूक ‘तुम्ही नाही म्हटलात तरी आम्ही घेऊ, तुमचा काय संबंध?’ असली अधिकृत पत्रव्यवहारात न शोभणारी भाषा वापरणे आणि सर्वांवर कडी म्हणजे अभिभाषणाच्या वेळी घोषणा देऊन राज्यपालांचा निषेध करणे... आता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी अभिभाषणाला होणारा विरोध किंवा नारेबाजी गृहीत धरली होतीच आणि त्यांनी आधीच ठरवून केवळ दीड - दोन मिनिटांचे भाषण उरकून टाकण्याची औपचारिकता केली आणि ते निघून गेले. पण, काही कळायच्या आत ते अचानक कसे निघून गेले, हा धक्का बसल्याचे संयुक्त सभागृहात उपस्थित अगदी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अनेकांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होते. या साऱ्या घटना म्हणजे संविधानिक पदावरच्या राज्यपालांचा अनादर कसा केला जातोय याचे ठरावीक अंतराने झालेल्या प्रसंगातून गोळा केलेले किंवा झालेले पुरावे नाहीत काय..? पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालाच्या दोनच दिवस आधी फडणवीस परिश्रमपूर्वक जमा केलेल्या व्हिडिओ क्लिपचा बॉम्ब टाकून विधानसभेत खळबळ माजवून देतात, याला अचूक टायमिंग आणि ‘शंभर टक्के कार्यक्रम’ म्हणायचे का..?

फडणवीसांनी केलेल्या आरोपांबद्दल गृहमंत्री दिलीप वळसे पाटील सोमवारी विधानसभेत उत्तर देणार आहेत. आपल्या उत्तरानंतर ‘दूध का दूध, पानी का पानी’ होऊन जाईल, असे त्यांनी म्हटले आहे. पण मुळात आपल्याच सरकारविरुद्ध सीबीआय चौकशीला राज्यातील महाविकास आघाडी सरकार अनुमती देण्याची शक्यता नाही. तसेच नवाब मलिकांना हटवणार नाही, हे तर शरद पवारांनीच स्पष्ट केले असल्याने फडणवीसांच्या दोन्ही मागण्या राज्य सरकार मान्य करेल, अशी स्थिती दिसत नाही. परिणामी, हे सरकार भाजप नेत्यांविरुद्ध कट करून त्यांना खोट्या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न करत आहे, या दाव्याच्या क्लिपसह भाजप कदाचित न्यायालयाचे दरवाजे ठोठावेल. मलिकांच्या राजीनाम्यासाठी राज्यभर मोर्चे, निदर्शने असे सारे सायास करेल. थोडक्यात, जनआंदोलन उभारून राज्यातली परिस्थिती कशी गंभीर आहे आणि सरकार नावाची गोष्ट अस्तित्वात नाही हे प्रकर्षाने मांडले जाईल... ‘राज्यातील सरकार स्थिर आहे’ असे शरद पवार आणि संजय राऊत का म्हणताहेत हे मग लक्षात येईल.

गेल्या काही दिवसांतील वेगवगेळ्या, सुट्या प्रसंगांचा तार्किक क्रम लावला तर त्यातून राज्याच्या राजकीय पटलावरील संभाव्य घडामोडींचा अंदाज येऊ शकतो. एकाएकी काही मोठ्या घडामोडी घडतीलच असे नाही. पण, राजकारण हा अनिश्चिततेचा खेळ आहे. त्यात केव्हाही, काहीही घडू शकते. उद्याचा अंदाज येण्यासाठी कालच्या आणि आजच्या काही घटनांची सुसंगत, क्रमबद्ध मांडणी त्यासाठी महत्त्वाची ठरते. ती करता आली की मग राज्यात राष्ट्रपती राजवट लागू शकते का? ममता बॅनर्जींपाठोपाठ अरविंद केजरीवाल यांचीही तुलना शरद पवारांशी होईल का? आणि ती करताना केजरीवालांनी दोन राज्ये जिंकून दाखवलीत, हा तर्क दिला जाईल का? उद्धव ठाकरे, शरद पवार जनतेसमोर येऊन ‘होय, आमचे पक्ष महाराष्ट्रापुरतेच सीमित आहेत,’ हे मान्य करण्याचे साहस दाखवतील का? आणि मग फडणवीसांचे राजकीय वजन वाढेल का? अशी प्रश्नांची यादीच तयार होते... पण, ही ‘बकेट लिस्ट’ नाही. हे आणि असे काही प्रश्न अलीकडच्या साऱ्या घटनाक्रमानंतर आपसूकच उभे राहत आहेत. मी त्यांना फक्त वाट करून देतोय...

शैलेंद्र परांजपे
shailendra.paranjpe @gmail.com

बातम्या आणखी आहेत...