आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सहवेदनेतली स्त्रीशक्ती:भानुमतीची माया

7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे भल्याभल्यांच्या नोकरीला जिथं ग्रहण लागलं तिथं लोककलावंतांची काय कथा? कोंड्याचा मांडा करून जगण्याची वेळ आलेल्या या कलावंतांची ना सरकार दरबारी नोंद घेतली गेली ना जनता जनता दरबारी...

मात्र, भानुमतीनं हे असं जगणं नाकारलं. तंत्रज्ञानाची मदत घेत अभिनव प्रयोग केला. स्वत:ची कला समाजमाध्यमांवर सादर करून मदतीचं आवाहन केलं. या अनोख्या कल्पनेतून भानुमतीला थोडीफार मदत तर मिळालीच, पण आपल्यासारख्या आणखी १५ कलावंतांनाही तिने ही मदत मिळवून देत सहवेदनेतल्या स्त्रीशक्तीचा प्रत्यय दिला.

कोणत्याही समस्येवर राजकारणी मंडळींची आश्वासने म्हणजे तथ्य कमी आणि बडेजाव, पोकळपणा जास्त असतो. यात मरण सामान्य माणसाचं, गरिबांचं होतं. त्याचं एक उदाहरण गेल्या महिन्यात अनुभवास आलं. झालं असं की, एका पक्षाच्या लोककलावंत आघाडीतर्फे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. गरिबांचा मसीहा अशी प्रतिमा असलेले मंत्रिमहोदय खास पाहुणे होते. त्यात या महोदयांनी विरोधी सरकारवर जबर टीकास्त्र सोडले. गरिबांच्या मदतीसाठी केलेल्या घोषणा ते सरकार कसे विसरले, याची उजळणी केली. त्यावर कलावंतांनी एका स्थानिक नेताजींमार्फत मंत्रीसाहेबांना आठवण करून दिली की, साहेब, तुमच्या सरकारनं आम्हाला ठोस मदतीचं आश्वासन दिलं होतं. कित्येक महिने उलटून गेले. मदत बेपत्ता, फरार झालीय. त्यावर कसलेल्या त्या मंत्र्यानं ‘लवकरच होईल. थोडं थांबा’ एवढंच म्हणत पुन्हा विरोधी सरकारकडे तोफेचे तोंड वळवले. ते पाहून लोककलावंत कमालीचे निराश झाले. आपलं आपल्यालाच लढावं लागणार. राजाश्रयाच्या भाकड गप्पा ऐकण्यापेक्षा लोकाश्रयाकडं वळलं पाहिजे, असं त्यांच्यातील काही जणांना वाटलं असावं. त्यांच्यासाठी, खऱ्याखुऱ्या दानशूर रसिकांसाठी केरळच्या ए. भानुमती यांची ही खरीखुरी कहाणी.

केरळ म्हणजे शास्त्रीय, परंपरागत नृत्यकलांचे आगार. महाराष्ट्राएवढी नसली तरी नाट्यकला तेथे स्थिरावली आहे. पर्यटकांसमोर कथ्थकली आणि अन्य नृत्यांचे सादरीकरण झाल्यावर एखादे छोटेसे नाटक सादर करणारे ग्रुप तेथे अनेक वर्षांपासून कार्यरत आहेत. केरळी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जगभरातून लोक येतात. ते बऱ्यापैकी पैसे बाळगत असल्याने नाट्यकलावंतांना कुटुंब चालवण्यापेक्षा थोडी जास्तही कमाई होत होती. त्रिसूर येथील ए. भानुमती अशा कलावंतांपैकी एक होत्या. वयाच्या पंचविशीत असताना त्यांनी नाट्यकलेतून पोट भरण्याचा मार्ग निवडला. छोट्या, किरकोळ भूमिका त्या पार पाडत. शिवाय ग्रुपच्या प्रमुखांनी सांगितली ती कामंही करत. त्यातून सुखाचे चार घास मिळत होते. पण पन्नाशी ओलांडली असताना कोरोनाचं संकट कोसळलं. अतिथी हाच देव असलेल्या केरळची अक्षरश: नाकेबंदी झाली. पर्यटकच नाही म्हटल्यावर अर्थकारण ठप्प झालं. अशा स्थितीत सरकारकडून आश्वासनाच्या पलीकडं काहीही मिळणार नाही, हेही भानुमतींच्या लक्षात आलं. त्यांनी बरीच शोधाशोध सुरू केली. तेव्हा त्यांना मराठी कलावंतांच्या एकपात्री प्रयोगाची आठवण झाली असावी. वऱ्हाडकार प्रा. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांचे वऱ्हाड निघालंय लंडनला हे एकपात्री नाटक गिनीज बुकात नोंदवले गेले. त्या काळात, तत्पूर्वी आणि नंतरही अनेकांनी एकपात्रीत यश मिळवले. वऱ्हाडचे सादरीकरण सुरुवातीच्या काळात एखाद्या घराच्या गच्चीवर अगदी चार-पाच प्रेक्षकांपुढे होत असे. त्याच धर्तीवर भानुमतींना सुचलेला प्रयोग प्रत्यक्षात आणण्यासाठी रंगचेतना नावाचा नाट्यग्रुप मदतीला धावून आला. नवरात्रोत्सवाची चाहूल लागली तेव्हा त्यांनी या प्रयोगांना प्रारंभ केला. त्यासाठी त्या राहत असलेल्या एका खोलीच्या भाड्याच्या घरात नेपथ्यरचना केली. कोरोनापूर्वी ज्यांच्या रिक्षातून त्या नेहमी प्रवास करत ते रिक्षाचालक एकमेव श्रोते बनले. त्यांच्यासमोर त्यांनी स्वत: लिहिलेला एकपात्री प्रयोग सादर केला. त्याची संहिता म्हणजे कोरोनामुळे कलावंतांचे काय हाल होत आहेत, याचीच कहाणी होती. त्याचे थेट प्रक्षेपण रंगचेतनाच्या सोशल मीडिया पेजवर करण्यात आले. भानुमतींची आर्थिक स्थिती बिकट असल्याने रसिक मायबापांनी इच्छेनुसार मदत करावी, अशी ओळ प्रक्षेपणाच्या खाली ठळकपणे सांगण्यात आली आणि राजाश्रयापेक्षा लोकाश्रय किती मोलाचा, भरवशाचा असतो, याचा अनुभव भानुमतींना आला. तासाभरात त्यांच्या बँक खात्यात दहा हजार रुपये जमा झाले होते. रंगचेतना ग्रुपच्या चौघांचाही रसिक दात्यांमध्ये समावेश होता.

पण एका महिला कलावंताने स्वत:च्या अस्तित्वासाठी केलेला नावीन्यपूर्ण प्रयोग आणि त्याला नाट्यसंघाने केलेली मदत इथं ही गोष्ट संपत नाही. तर सुरू होते. ठरवलं असतं तर त्या स्वकेंद्रित सहज राहू शकल्या असत्या. पण त्यांनी मदतीचं जग आपल्याभोवती ठेवलं नाही. उलट त्याचा विस्तार केला. असं म्हणतात की, नवरात्र म्हणजे देवीच्या विविध रूपांची आठवण करून देणारा उत्सव. देवीचं एक रूप शैलपुत्री म्हणजे कणखर, खंबीर, निडर. दुसरं रूप कात्यायनी म्हणजे संगोपन, सांभाळ करणारी आणि तिसरं स्कंदमाता म्हणजे करुणामयी. चौथं सिद्धियात्री म्हणजे प्रावीण्य कमावलेली. तर भानुमतीचा अर्थ जादू करणारी, माया रचणारी असा आहे. त्रिसूरच्या भानुमतींमध्ये देवीच्या चारही रूपांचा संगम झाला आहे. त्या कणखर, खंबीर, निडर आहेत. आपल्यासोबतच्या लोकांचं संगोपन करणं आपलं कर्तव्य आहे, अशी त्यांची भावना आहे. स्वत:हून मदतीला धावून जाणे, यात त्यांची करुणा दिसते. सर्वात म्हणजे त्यांच्यातील कलागुणामध्ये त्यांनी निपुणता, प्रावीण्य मिळवले आहे. कोरोनापूर्वी कदाचित त्यांच्या अभिनयगुणाला एवढा प्रतिसाद मिळाला नसता. तो त्यांच्यातील नावीन्यामुळे मिळाला. त्यांनी स्वत:च्या नावाप्रमाणे रसिकांवर अक्षरश: जादू केली. रंगचेतनाच्या मदतीने त्यांनी प्रयोगांचा धडाका लावला. आणि पाहता पाहता १५ कलावंतांना प्रत्येकी दहा हजार रुपयांची मदत मिळवून दिली. तीदेखील सन्मानाने. सरकारी यंत्रणेपुढे हात न पसरता. रंगचेतनाचे अध्यक्ष ई. टी. वर्गीस सांगतात की, भानुमती यांनी जे केले ते अफलातून होते. त्यांनी जे काही भोगले तेच त्यांनी मांडल्याने त्यातील अस्सलता रसिकांच्या हृदयाच्या आरपार गेली, यात शंकाच नाही. ही मालिका आता थांबणार नाही. कारण हरीश पेराडीसारखे नामवंत कलावंत यात सादरीकरण करून इतरांना स्वत:च्या खिशातून मदत करत आहेत. त्यामागे अर्थातच भानुमती यांच्या प्रयोगाची प्रेरणा आहे. एक सामान्य अभिनेत्री जर हे करू शकते तर आपण मागे का, असा विचार केरळमधील अनेक स्थिरावलेले कलावंत करू लागले आहेत. नवरात्रोत्सव आणि पुढील सणांच्या काळात मालिका अधिक व्यापक होणार आहे. किमान १०० गरजू रंगकर्मींना मदतीचे उद्दिष्ट त्यांनी ठेवले आहे. मराठी कलावंतापासून प्रेरणा घेऊन भानुमतींनी शोधलेल्या या मार्गावरून मराठी लोककलावंत चालले तर त्यांनाही सरकारच्या भरवशावर राहून कपाळमोक्ष करून घेण्याची गरज भासणार नाही. होय नाॽ

श्रीकांत सराफ
संपर्क : ९३४००६१६२५

बातम्या आणखी आहेत...