आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मिरजेत राहत असलेल्या आपल्या ६४ वर्षीय आईला कोरोना संसर्ग झाल्यानंतर सांगली, मिरजेतील २५ ते ३० खासगी रुग्णालये तसेच शासकीय रुग्णालयांत हेलपाटे मारूनही आईला दवाखान्यात भरती करता आले नाही. तिच्या शरीरातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी होत होते. अखेरच्या क्षणी शासकीय रुग्णालयात तिला दाखल करावे लागले. मात्र, काही दिवसांतच कोरोनाने तिचा बळी घेतला. सर्वसामान्य कोरोना रुग्णांचे जे हाल होत आहेत त्यांना जो त्रास सहन करावा लागतो यावर उपाय म्हणून आपल्या आईच्या स्मरणार्थ शकील पिरजादे या सामाजिक कार्यकर्त्याने ४० बेडचा स्वतंत्र कोविड सेंटरचा संकल्प केला आणि १५ दिवसांत ते उभे करून सर्वसामान्य रुग्णांना दिलासा दिला आहे.
गेली अनेक वर्षे पिरजादे हे सामाजिक कार्यात कार्यरत असतात. असंख्य रुग्णांना वेळीच वैद्यकीय साहाय्यता मिळवून देत त्यांनी अनेकांचे प्राणही वाचवले आहेत. पण, स्वत:च्या आईवर असा गंभीर प्रसंग आला तेव्हा त्यांना हतबल व्हावे लागले. खूप प्रयत्न करूनही आईसाठी ऑक्सिजनचा बेड उपलब्ध करून देण्यात आपल्याला अपयश आले याचे शल्य त्यांच्या मनात घर करून बसले. इतर रुग्णांच्या करुण कोरोना कहाण्यादेखील ऐकायला मिळत होत्या. बेडअभावी धडधाकट रुग्णांचा बळी जात असल्याचे दिसत होते. त्यातून स्वतंत्र कोविड सेंटरचा संकल्प केला. हयात फाउंडेशनतर्फे उभारल्या जाणाऱ्या या रुग्णालयासाठी जमीर सनदी, मौलाना मुबारक, इरफान पिरजादे, इम्रान ढालाईत यांनी पुढाकार घेतला.
प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सोय
महापालिका आयुक्तांनी परवानगी दिली. मिरजेत जनावर बाजारातील शेतकरी भवन भाडे तत्त्वावर उपलब्ध झाले. मदतीसाठी असंख्य हात पुढे आले. अवघ्या पंधरवड्यात ४० बेडचे कोविड रुग्णालय प्रत्यक्षात आले. प्रत्येक बेडला ऑक्सिजनची सोय आहे. रुग्णांसाठी रक्त तपासणी, जेवण, चहा-नाष्ट्याची सोय आहे. १४ तज्ञ डॉक्टर्स, ३० परिचारिका व इतर स्टाफ उपलब्ध केला. नाममात्र शुल्कात कोरोनाबाधितांवर उपचार केले जाणार आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.