आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Sri Lanka Colombo Young Womens Became Sex Workers | Brother In Army Sister Goes To Spa Center For Money

श्रीलंकेत मजबुरीने सेक्स वर्कर बनत आहेत तरुणी:भाऊ आर्मीत, बहिणीची स्पा सेंटरमधून कमाई, कारण तिला शिकून मोठं व्हायचंय

लेखक: पूनम कौशलएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

टाइट पेन्सिल स्कर्ट, क्रॉप डीप नेक टॉप, फोनमध्ये खिळलेली नजर. काचेच्या पलीकडे बाकावर बसलेल्या या तरुणी एखाद्या शोपीससारख्या दिसत होत्या. चाहुल लागताच त्या सतर्क होतात. तिरप्या नजरेनेच येणाऱ्याला पाहण्याचा प्रयत्न करतात की, एखादा ओळखीचा तर आला नाही ना!

काचेच्या या बाजूला तरुण, मध्यमवयीन आणि वृद्धही त्यांना वखवखलेल्या नजरेने पाहतात. आपल्या पसंतीची मुलगी निवडतात अन् पैसे मोजून पायऱ्या चढत वरच्या एका पलंगापुरत्या खोलीत जातात.

ग्राहक हसून परतले की सर्व्हिस देऊन आलेली मुलगी परत काचेच्या पलीकडील बाकावर बसते. रिसेप्शनवर बसलेला मॅनेजर जाणाऱ्या कस्टमरला मान वाकवून हसत विचारतो, ‘सर, वॉझ इट ए हॅपी एंडिंग.’ तिकडून उत्तर येते, 'यस, आय विल कम अगेन.'

मध्यम प्रकाशात काचेच्या पलीकडे सजूनधजून बसलेल्या मुलींमध्ये काही विद्यार्थिनीही आहेत, ज्या उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहतात, काही पत्नी आहेत ज्या पूर्ण कुटुंबाला सांभाळत आहेत, तर काही सिंगल मदर आहेत, ज्यांच्यावर मुलांचे पोट भरण्याची जबाबदारी आहे.

श्रीलंकेच्या सध्याच्या आर्थिक संकटाने पूर्वी नोकरी करणाऱ्या किंवा उच्च शिक्षणाची स्वप्ने पाहणाऱ्या अनेक मुलींना सेक्स वर्कमध्ये ढकलले आहे.

मोठ्या संख्येने नवीन मुली वेश्याव्यवसायात सामील

श्रीलंकेत वेश्याव्यवसाय कायद्याने प्रतिबंधित आहे. राजधानी कोलंबोमध्ये सेक्स वर्कचे कोणतेही विशिष्ट क्षेत्र नाही. तपासात असे आढळून आले की येथे स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाखाली सेक्स वर्क केले जात असून यामध्ये मोठ्या प्रमाणात नवयुवतींचा सहभाग आहे.

गेल्या काही महिन्यांत सेक्स वर्कमध्ये गुंतलेल्या मुलींची संख्या वाढल्याचेही आम्हाला समजले. त्यांच्यापैकी अनेक जणी अशा आहेत की ज्यांची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्या हे काम करत आहेत.

आम्हाला असेही कळले की पूर्वी सेक्स वर्कमध्ये व्यावसायिक वेश्या होत्या, ज्या दीर्घ काळापासून या कामात होत्या, परंतु आता बिघडलेल्या आर्थिक परिस्थितीमुळे बहुतांश नवीन मुली या कामात सामील झाल्या आहेत.

आई नाही, वडील आजारी...

21 वर्षीय इशारा लहानपणापासूनच हुशार विद्यार्थिनी होती. कोणत्याही तरुणीप्रमाणेच तिचे स्वप्न एक यशस्वी व्यावसायिक बनण्याचे होते, परंतु आता तिला परिस्थितीने स्पा सेंटरमध्ये सेक्स वर्क करण्यास भाग पाडले आहे. श्रीलंकेच्या सध्याच्या आर्थिक संकटामुळे तिने सेक्स वर्कमध्ये प्रवेश केला आहे. इशारा जेमतेम बोलायला तयार झाली. तिला आई नाही आणि वडील आजारी आहेत. भाऊ श्रीलंकेच्या सैन्यात आहे आणि विवाहित आहे.

इशारा स्पा सेंटरमध्ये काम करण्यापूर्वी, एका कंपनीत 25 हजार रुपये प्रति महिना पगारावर काम करत होती (पूर्वी सुमारे 12 हजार भारतीय रुपये, आता सुमारे 6 हजार रुपये), परंतु कोरोना महामारी आणि आर्थिक संकटामुळे तिची नोकरी गेली. खूप शोधाशोध करूनही काही काम न मिळाल्याने तिने स्पा सेंटरमध्ये काम सुरू केले.

इशारा सांगते, “माझा भाऊ सैन्यात आहे. तो आपल्या कुटुंबाचा खर्च भागवू शकत नाही. माझी नोकरी गेली आणि पैसेही संपले. कुठेही काम मिळत नव्हते. मग मी गुगल सर्च केले आणि मला कोलंबोमधील स्पा सेंटरमध्ये नोकरी मिळाली."

ती स्पा सेंटरमध्ये सेक्स वर्क करते हे इशाराच्या कुटुंबातील कोणालाही माहीत नाही. ती पूर्वीसारखीच नोकरी करत असल्याचे तिने घरात सांगितले आहे. इशारा म्हणते, “जर श्रीलंकेतील आर्थिक परिस्थिती खराब नसती तर मी या व्यवसायात कधीच प्रवेश केला नसता. माझ्यासमोर खूप कठीण परिस्थिती होती आणि मला तडजोड करावी लागली."

इशाराला वैद्यकीय परिचारिका व्हायचे आहे आणि तिने आवश्यक स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण केली आहे, परंतु तिच्याकडे प्रवेशासाठी पैसे नव्हते.

6 महिन्यांपासून काम करतेय, लाख रुपये महिन्याला कमाई

ती सांगते, “मी येथे 6 महिन्यांपासून काम करत आहे आणि दरमहा एक लाख रुपये कमावते आहे. मला आशा आहे की मी जूनपर्यंत नर्सिंग कोर्सला प्रवेश घेण्यासाठी पुरेसे पैसे जमा करू शकेन.”

इशाराचा बॉयफ्रेंड भारतात राहतो. ती म्हणते, “माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे आणि मी त्याच्यासोबत चांगल्या आयुष्यासाठी उत्सुक आहे. मी लवकरच हे सर्व सोडून देईन."

जेव्हा मी तिला विचारले की तिच्या प्रियकराला तिच्या कृत्याची जाणीव आहे का, तेव्हा तिने मौन ठेवले आणि नंतर डोळ्यात अश्रू आणून उत्तर दिले, "नाही."

इशारा म्हणते, “माझा भाऊ देशाच्या सैन्यात आहे, पण त्याचा पगार फार जास्त नाही. वाढत्या महागाईमुळे तो आपला खर्च भागवू शकत नाही. माझा भाऊ सैन्यात असूनही मला सेक्स वर्क करावे लागते याचे मला दुःख आहे.

40 हजार मुली सेक्स वर्कमध्ये उतरल्या

श्रीलंकेची राजधानी कोलंबो येथील स्पा सेंटरमध्ये इशारासारख्या हजारो मुली सेक्स वर्क करत आहेत. एका अंदाजानुसार, श्रीलंकेत सुमारे 40 हजार सेक्स वर्कर्स आहेत, त्यापैकी निम्म्याहून अधिक राजधानी कोलंबोमध्ये आहेत. तथापि, श्रीलंकेत सेक्स वर्क करणाऱ्या महिलांबाबत कोणताही ठोस डेटा नाही.

येथील स्पामध्ये काम करणाऱ्या एका व्यवस्थापकाच्या मते, अलीकडच्या काही महिन्यांत काम शोधणाऱ्या तरुणींची संख्या वाढली आहे. यातील बहुतांश तर अशा आहेत ज्या पूर्वी काम करून आपले कुटुंब चालवत होत्या आणि आता काम न मिळाल्याने त्रस्त आहेत.

देशाच्या दूरवरच्या भागातून नोकरीच्या शोधात किंवा शिक्षणासाठी राजधानीत येणाऱ्या महिलाही स्पा सेंटरमध्ये काम करत असून कामाच्या शोधात आहेत.

24 तास खुले असते स्पा सेंटर

ही स्पा सेंटर्स चोवीस तास सुरू असतात आणि त्यामध्ये मुलींची राहण्याची व्यवस्था असते. आयुर्वेदिक उपचार, वेलनेस सेंटर, स्पा आणि मसाज सेंटरच्या नावाने सुरू असलेली ही केंद्रे राजधानीच्या पॉश भागात आहेत.

26 वर्षीय रीझा गेल्या एक वर्षापासून अशाच एका स्पा सेंटरमध्ये काम करत आहे. पूर्वी ती चिप्स बनवण्याच्या कारखान्यात 25 हजार रुपये पगारावर काम करायची. रिझाचा नवरा बांधकाम क्षेत्रात काम करतो आणि महिन्याला जेमतेम 10 हजार रुपये कमावतो.

कोरोना महामारीच्या काळात रिझाच्या पतीची नोकरी गेली होती आणि ती ज्या कंपनीत काम करत होती तिथे पगार मिळत नव्हता. रीझा म्हणते, “मला सात वर्षांचा मुलगा आहे. आम्ही किरायाच्या घरात राहतो. त्याच्या शाळेची फी जाते. घरभाडेही द्यावे लागते."

बचत काहीही नव्हती आणि अचानक पती-पत्नी दोघांचेही उत्पन्न बंद झाले. "मला एका स्पा सेंटरमध्ये नोकरी मिळाली आणि मी येथे चांगली कमाई करू लागले." रिझाचे सासू-सासरेही तिच्यासोबत राहतात. आता तिच्या कमाईवर संपूर्ण कुटुंब चालते.

रिझाच्या कुटुंबातील प्रत्येकाला हे माहीत आहे की, ती चिप्सच्या कारखान्यात काम करते. रिझाला तिच्या घरात या कामाची माहिती मिळाल्यास काय होईल, अशी भीती वाटते.

रिझा सांगते, “येथे विविध प्रकारचे ग्राहक येतात. प्रत्येकाला सेवा द्यावी लागते. बरेच लोक चांगले असतात आणि टिप देऊन निघून जातात, पण काही खूप वाईट लोकदेखील येतात. मी दररोज हे काम सोडण्याचा विचार करते, परंतु मी सोडू शकत नाही."

श्रीलंकेत असे कोणतेही काम नाही ज्यातून एवढे कमवू शकेन

ती म्हणते, “मी इथे एका महिन्यात 80,000 ते 1 लाख रुपये कमावते. सध्या श्रीलंकेत असे कोणतेही काम नाही जिथे मी इतके पैसे कमवू शकेन. श्रीलंका आर्थिकदृष्ट्या डबघाईला आली आहे. हे काम करताना मला पश्चाताप होतो, पण जेव्हा मी कुटुंबाच्या गरजा पूर्ण होताना पाहतो तेव्हा तो पश्चातापही दूर होतो.

24 वर्षीय समीराचा घटस्फोट झाला असून ती तीन वर्षांपासून या व्यवसायात आहे. पूर्वी ती एका कंपनीत काम करायची. नोकरी गेल्यानंतर ती एका स्पा सेंटरमध्ये काम करू लागली. समीराचा मुलगा पतीसोबत आहे, ज्याच्या खर्चासाठी ती पतीला महिन्याला 25 हजार रुपये देते.

समीरालाही हे काम सोडायचे आहे, पण सोडता येत नाही. समीरा म्हणते, “मी सध्या इतके पैसे कमवू शकेन अशी दुसरी नोकरी नाही. मी पैसे जोडत आहे आणि एका वर्षात सोडेन.”

इशारा, रिझा आणि समीरासारख्या मुलींना एकमेकांशी बोलण्याची परवानगी नाही. या स्पामध्ये काम करणाऱ्या मुली कुठून येतात आणि कुठे जातात हे कळत नाही.

एकमेकांच्या संपर्कात राहू नये, अशा सक्त सूचना दिल्या आहेत, मात्र येथे काम करणाऱ्या व्यवस्थापक स्तरावरील व्यक्तीच्या म्हणण्यानुसार, या दिवसांत मुली मोठ्या संख्येने येत आहेत. “पुढील काही महिन्यांत अशा स्पा सेंटर्सची संख्या वाढू शकते.”

या स्पा सेंटर्सना भेट देणाऱ्या ग्राहकांमध्ये शिपाई, पोलीस, वकील आणि डॉक्टर यांसारख्या व्यावसायिकांचा समावेश आहे. स्पा सेंटर्समध्ये सेक्स वर्क होतो हे इथल्या बहुतांश लोकांना माहीत आहे, पण त्यांच्यावर कधीही कारवाई केली जात नाही.

येथे काम करणाऱ्या लोकांशी बोलताना असे दिसते की स्पा ऑपरेटर्सचे संबंध श्रीलंकेतील सत्तेच्या शीर्षस्थानापर्यंत आहेत.

एकेका व्यक्तीच्या डझनभर स्पा…

एका स्पा सेंटरचे व्यवस्थापक म्हणतात, “या स्पामागे राजकीय लोक आहेत. प्रत्येक व्यक्तीच्या डझनभर स्पा आहेत. हे अतिशय संघटित पद्धतीने केले जाते. यामुळेच या स्पा सेंटर्सवर कधीही छापा पडत नाही."

जे ग्राहक येथे काम करतात आणि येथे भेट देतात त्यांना हे चांगले माहिती आहे की, हे स्पा त्यांच्यासाठी सुरक्षित आश्रयस्थान आहेत. मी एका मॅनेजरला विचारले की कधी छापा पडला आहे का, त्याने उत्तर दिले, “रेड टाकणारे आमचे कस्टमर आहेत आणि रेड टाकायला लावणारे आमचे मालक आहेत. आता तुम्ही याबाबत अधिक प्रश्न न विचारल्यास बरे होईल."

स्पामधून बाहेर पडताना कळले की बाकावर बसलेल्या मोबाइलमध्ये खिळलेल्या नजरा कधी आपल्या मुलाचा फोटो पाहून आनंदित होतात, तर कधी प्रियकराचा मेसेज आल्यावर हसू उमलते, तर कधी नवऱ्याला धीर देत असतात, "तू काळजी करू नकोस, मला नोकरी तरी आहे ना...!"

(या रिपोर्टमध्ये सर्व मुलींची नावे बदलण्यात आली आहेत)

बातम्या आणखी आहेत...